-प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर जीने की कला सिखाते शिक्षक…ज्ञान की कीमत बताते शिक्षक…पुस्तकों के होने से कुछ नही होता…अगर मेहनत से नहीं पढाते शिक्षक… शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या विशेष योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी ५ सप्टेंबर हा दिवस देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिन साजरा करण्याची कल्पना १९ व्या शतकात अनेक देशांमध्ये रुजली. वेगवेगळे देश हा दिवस वेगवेगळ्या तारखांना साजरा करतात. भारतात दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर १८८८ हा १९६२ पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिष्याच्या मनात शिकण्याची इच्छा जागृत करू शकणारेच खरे शिक्षक असे म्हणता येईल. तर मुलांचा पहिला आदर्श शिक्षक असतो. शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य हे शिक्षणाशी व विद्यार्थ्याशी जोडलेले आहे. शिक्षक आणि शिक्षण हे हातात हात घालून चालत असते. शिक्षणातून काय साध्य करायचे आहे हे ध्यानी घेतल्याशिवाय कुठलाही शिक्षक उत्कृष्टतेकडे वाटचाल करू शकणार नाही. आणखी वाचा-‘निधिपती’ – ‘प्रतिनिधी’ या शब्दांचा अर्थ ओळखणाऱ्या संस्कृतीची गरज जे ज्ञान मनुष्यामध्ये आधीचेच निहीत असते, त्याचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण होय! शिक्षणासाठी शाळा ही केवळ विटांनी बांधलेली नसून ती आजीवन शिक्षणाची केंद्रे आहेत. ज्ञान ही शक्ती आणि शिक्षण हे इंधन! देशभरातील शाळा हळूहळू पण निश्चितपणे स्वतःची पुनर्रचना करत आहेत त्यामुळे शिक्षकांनाही परंपरेनुसार चालत आलेले शिक्षण, पद्धती आणि स्वतःला बदलावे लागत आहे. खरे तर परंपरेने, शिक्षकांना काय, केव्हा आणि कसे शिकवायचे हे सांगितले. शिक्षण म्हणजे वळण आहे! दळण नव्हे! शिक्षणाचा मुख्य उद्देश संस्काराचे बीजारोपण हे आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या शरीराला व मनाला योग्य वळण लावणे हे शिक्षणाचे व पर्यायाने शिक्षकाचे कार्य आहे. विद्यार्थ्याच्या डोक्यात अधिकाधिक माहिती कोंबणे आणि ती परीक्षेसाठी पुन्हा पुन्हा दळून घेणे हा शिक्षणाचा मूळ हेतू नाही, हे आजच्या काळातील शिक्षकाने समजून वागले पाहिजे. दळण्यापेक्षा शिक्षणप्रक्रियेत वळणाला अधिक महत्त्व आहे हे कायम ध्यानी ठेवायला हवे. आजच्या डिजिटल युगात, शिक्षकांची भूमिका केवळ उपदेशकापासून गुरूकडे वळली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या ज्ञानाचे अंतिम लक्ष्य सुंदर चारित्र्य निर्माण होणे हेच असले पाहिजे. चारित्र्याशिवाय ज्ञानाला आणि चारित्र्यहीन ज्ञानी माणसाला मान नाही. म्हणून ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेचा शेवट हा सुंदर चारित्र्य निर्मितीतच व्हायला हवा. शिक्षणाचा हा हेतू लक्षात घेऊनच शिक्षकाने शिकवले पाहिजे. आपापल्या विषयात नैतिक शिक्षणातून विविध प्रकारचे संस्कार कुठे व कसे करता येतील याचा विचार प्रत्येक शिक्षकाने केला तर सुंदर चारित्र्यनिर्मितीचे शिक्षणाचे ध्येय गाठता येणे कठीण नाही. आणखी वाचा-पुतळे कशासाठी? कुणासाठी? शिकवणे म्हणजे माझा विषय शिकवणे ही वृत्ती नव्या जमान्यातील शिक्षकांच्या मनातून हद्दपार व्हायला हवी. शिक्षक हा पाठ्यपुस्तकाचा नसावा. तो एखाद्या विशिष्ट विषयाचाही नसावा. शिक्षक हा विद्यार्थ्याचा असावा! हा मूलभूत विचार नव्या पिढीतील शिक्षकासमोर त्याला समजेल अशा पद्धतीने आणि त्याला रूचेल अशा रीतीने मांडला पाहिजे. शिक्षणाकडे बघण्याचा निकोप दृष्टिकोन एखाद्या शिक्षकाला लाभला म्हणजे मग पुढच्या गोष्टी त्याला सांगाव्या लागणार नाहीत. दुर्दैवाने शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमात वर्गात शिकवण्यासाठी आवश्यक ती तंत्रे शिकवली जातात. परंतु शिक्षणाकडे बघण्याचा शुद्ध दृष्टिकोन प्रदान करण्याची सोय या अभ्यासक्रमात नाही. त्यामुळे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या बिचाऱ्या शिक्षकाला शिक्षण म्हणजे काय व शिकवणे म्हणजे काय हे ठाऊक नसते. शिक्षणाची मूळ संकल्पना स्पष्ट नसलेला शिक्षक मुलांमध्ये कसल्याही प्रकारचे ज्ञान, कौशल्य व चारित्र्य यांचे बीजारोपण करू शकत नाही. अलीकडच्या काळात शाळाही ‘मार्क्सवादी’ बनल्यामुळे शिक्षकांना समृद्ध बनवण्यासाठी शाळांकडे वेळ नसतो. एकदा प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकालाही निरंतर प्रशिक्षणाची आवश्यकता असते याचा विचार फार कमी शाळा करतात. त्यामुळे नोकरीला लागताना शिक्षक जसा असतो, तसाच तो बऱ्याचवेळा निवृत्त होतो. त्याच्या कौशल्यात, ज्ञानात कसल्याही प्रकारचा बदल झालेला दिसत नाही. अशा बिकट परिस्थितीत चांगला शिक्षक सापडणे कठीण होऊन बसले आहे. प्रगल्भ शिक्षकनिर्मिती हा आजच्या काळातील शिक्षण क्षेत्रातील ऐरणीवरचा विषय मानायला हवा असे वाटते. tatyasahebkatkar28@gmail.com (लेखक करिअर समुपदेशक असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक विषयावर लेखन करतात)