रघुनंदन भागवत
ममता बॅनर्जी हे नाव देशभरात प्रसिद्ध झाले १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत. काँग्रेसच्या तिकिटावर जादवपूर मतदारसंघातून निवडणूक लढवताना त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सोमनाथ चटर्जी यांचा धक्कादायक पराभव केला. त्यावेळी पश्चिम बंगाल हा कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला होता. राज्यात मार्क्सवादी पक्षाच्या नेतृत्वात डावी आघाडी सत्तेत होती आणि ज्योती बसू हे बंगालचे मुख्यमंत्री होते. ममता या डाव्या पक्षांच्या हाडवैरी.

ममताना बंगालमधील काँग्रेस पक्ष पुरेसा आक्रमक वाटत नव्हता. प्रियरंजनदास मुन्शी त्यावेळी काँग्रेसचे बंगाल मधील प्रमुख नेते होते. ममता या बंगालमधील काँग्रेसला कलिंगडाची उपमा देत. कलिंगड जसे वरून हिरवे व आतून लाल असते त्याप्रमाणे काँग्रेसचे प्रादेशिक नेतृत्व आतून मार्क्सवाद्यांना सामील आहे, असा त्यांचा आरोप होता. लोकसभेत डाव्या आघाडीवर तोंडसुख घ्यायची एकही संधी त्या सोडत नसत.

काँग्रेसचे डाव्या पक्षांविरोधात असलेले मवाळ धोरण पसंत न पडल्याने ममतांनी आपली वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९९८ च्या जानेवारी महिन्यात आपल्या स्वतंत्र तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. काँग्रेसमध्ये फूट पडली. बंगालमधील काँग्रेसचे अनेक तरुण कार्यकर्ते ममता दीदींना येऊन मिळाले. १९९८ मध्ये ममता अटल बिहारी वाजपायी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्या. वाजपेयी मंत्रिमंडळात त्या रेल्वेमंत्री होत्या. त्यानंतर बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजप- तृणमूल काँग्रेसची युती होती.

एन. डी. ए. सरकारचा २००४ मध्ये पराभव झाल्यावर कालांतराने ममता काँग्रेसप्रणित यू. पी. ए. आघाडीला येऊन मिळाल्या. लालू यादवनंतर त्या पुन्हा रेल्वेमंत्री झाल्या. त्यांनी भारतात सर्वप्रथम विना थांबा दुरांतो एक्सप्रेस सुरू केल्या. बंडखोर ममतांनी लालू यादव यांच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले. (लालूही त्यावेळी यू. पी. ए. मध्येच होते.)लालूंनी रेल्वे नफ्यात आणली म्हणून त्यांना हार्वर्ड विद्यापीठात व्याख्यानासाठी बोलावले होते. पण लालूंनी रेल्वे कशी खड्ड्यात घातली, ते ममतांनी जनतेला सविस्तर समजावून सांगितले होते.

बंगालमध्ये ममतांचा डाव्या पक्षांविरुद्ध कडवा संघर्ष सुरूच होता. बंगालमध्ये बांगला देशी घुसखोरांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला होता. त्यावर लोकसभेत चर्चा करण्याची त्यांची मागणी अमान्य झाल्याने त्यांनी आपल्या हातातील फाईल सभापतींच्या दिशेने भिरकावली होती. या घटनेचा व्हिडीओ उपलब्ध आहे. त्यांनी रस्त्यावर उतरून अनेक आंदोलने केली. सिंगूरमध्ये टाटाच्या नॅनो प्रकल्पाला त्यांनी प्रचंड विरोध केला. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या कारखान्यासाठी देऊ नयेत म्हणून त्यांनी रक्तरंजित संघर्ष केला. परिणामी टाटानी बंगालमधून काढता पाय घेतला. पुढे नरेंद्र मोदी यांनी संधी साधून टाटांना गुजरातमध्ये आणले.

सिंगूरच्या लढ्याने ममतांची प्रतिमा एक लढाऊ महिला अशी निर्माण झाली. एका मतिमंद मुलीवर कोलकत्यात बलात्कार झाला तेव्हा ममता त्या मुलीला घेऊन थेट मुख्यमंत्री बुद्धदेब भट्टाचार्जी यांच्या ‘रायटर्स’ इमारतीतील कार्यालयात गेल्या व तिथे त्यांनी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान सलग ३४ वर्षें सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीविरोधात जनमत पेटले व २०११ मध्ये तृणमूल काँग्रेस -काँग्रेस यांच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आणि बंगालमध्ये ‘ममता पर्व’ सुरू झाले.

२०१६ची विधानसभा निवडणूक त्यांनी स्वबळावर लढवून प्रचंड बहुमत मिळवले. त्यावेळी बंगालमध्ये समर्थ विरोधी पक्ष उरला नव्हता. त्यांनी बेरोजगार तरुणांना ‘बेरोजगारी भत्ता’, मुलींच्या शिक्षणासाठी ‘कन्याश्री योजना’, गरीब महिलांसाठी ‘लाखी भांडार’ अशा कल्याणकारी योजना सुरू केल्या. त्यांनी राज्याची आरोग्य योजनाही सुरू केली. पण याच काळात ममतांचे रूपांतर एकाधिकारशाही गाजवू पाहणाऱ्या व्यक्तीत झाले.

डाव्या आघाडीचे बांगलादेशी नागरिकांविषयीचे तुष्टीकरणाचे धोरण जोमाने राबवण्यास त्यांनी सुरुवात केल्याचे आरोप झाले. बेकायदा बांगलादेशी नागरिकांना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका देऊन त्यांना भारतात बस्तान बसवायची खुली सूट देण्यात आल्याचे आरोप होऊ लागले. परिणामी हे परकीय नागरिक भारताचे ‘अवैध’ मतदार झाले. त्याचबरोबर तृणमूल काँग्रेस पक्षातील गुंडप्रवृत्ती वाढू लागली. खंडणीखोरी, निरापराध लोकांच्या तसेच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार हे प्रकार वाढले. ममतांची दहशत एवढी होती त्यांच्याविरुद्ध ब्र काढण्याची कोणाची हिंमत नव्हती. निवडणुकांमध्ये बोगस मतदान घडवून आणणे, मतदारांना मतदान करण्यापासून रोखणे इत्यादी गैरप्रकार खुलेआम केले जात असल्याचे आरोप होत होते. ममतांनी आपला भाचा अभिषेक याला आपला उत्तराधिकारी बनवून आपल्या पक्षाचे परिवारवादी पक्षात रूपांतर केले.

भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत तसेच २०२१च्या विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारून प्रमुख विरोधी पक्षाचे स्थान मिळल्यानंतर ममतांनी केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध असहकार पुकारल्याचे दिसले. बंगाली विरुद्ध बाहारी अशा प्रांतवादाचा मुद्दा निर्माण केला गेला. भारताच्या बांगलादेशलगतच्या सीमेच्या सुरक्षेत हलगर्जी केली.

नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी ९३ टक्के इतके विक्रमी मतदान केले आणि भाजपला बहुमताने सत्तेत आणले. अखेर १५ वर्षानंतर ममतांची राजवट संपुष्टात आली.

raghunandan.bhagwat@gmail.com