विजया जांगळे

एखाद्या कंपनीच्या अस्तित्वासाठी, प्रगतीसाठी फायद्या-तोट्यापेक्षाही महत्त्वाचे काय असले, तर तिची प्रतिष्ठा. झालेला तोटा एकवेळ भरून काढता येईल, पण बाजारातली गेलेली इभ्रत परत मिळविणे महाकठीण. त्यामुळेच आपल्या उत्पादनांवरून कोणताही वाद उद्भवू नये यासाठी कंपन्या जंग जंग पछाडतात, मात्र ‘पतंजली’ या नियमाला अपवाद असल्याचे दिसते. ‘कोरोनिल’ या औषधापासून, आटा नूडल्सपर्यंत या कंपनीच्या विविध उत्पादनांवरून वाद उद्भवले. बाबा रामदेव यांना अनेकदा त्यांचे दावे मागे घ्यावे लागले, विविध नियामक संस्थांनी कंपनीला नोटिसा बजावल्या, डॉक्टरांनी निषेध नोंदविला, तक्रारीही केल्या मात्र कंपनीचा आलेख चढताच राहिला आहे.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
millions of old vehicles running on pune road no re registration after fifteen years
पुण्यातील रस्त्यावर लाखभर जुनी वाहने! पंधरा वर्षे होऊनही पुनर्नोंदणी नाही

नुकतेच पतंजलीच्या ‘दिव्य दंत मंजन’वरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. वेष्टनावर शाकाहारी असल्याचे दर्शवणारा हिरवा ठिपका असलेल्या या दंतमंजनात माशाच्या हाडांची भुकटी असल्याचा दावा करत, ‘बीएलजे लॉ फर्म’च्या ॲड. साशा जैन यांनी पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबा रामदेव आणि संचालक आचार्य बाळकृष्ण यांना या संदर्भात १५ दिवसांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

पतंजलीची स्थापना २००६ साली झाली. आर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये कंपनीचे महसुली उत्पन्न ८४१ कोटी रुपये एवढे होते. त्यात वाढ होऊन २०१६-१७ पर्यंत ते १० हजार ५२६ कोटींपर्यंत पोहोचले. त्या वर्षी पतंजली हिंदुस्तान युनिलीव्हर (स्थापना- १९३३) नंतरची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी (फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स) ठरली. तुलनेने अतिशय नवख्या असलेल्या या कंपनीने ‘गोदरेज’ आणि ‘नेस्ले’ सारख्या एफएमसीजी क्षेत्रातील प्रस्थापित कंपन्यांसमोर आव्हान निर्माण केले. आज या कंपनीचे महसुली उत्पादन ३० हजार कोटींच्या घरात आहे.

एड्सवर उपाय (२००६)

पतंजलीची स्थापना २००६ साली झाली आणि तेव्हापासूनच वादांची आणि धादांत खोट्या दाव्यांची मालिका सुरू झाली. याच वर्षी बाबा रामदेव यांनी योग विद्येच्या सहाय्याने एड्स बरा करणे शक्य असल्याचा दावा केला. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने हा दावा फसवा असल्याचे स्पष्ट करणारे परिपत्रक काढले होते. बाबा रामदेव यांच्या दाव्यावर विश्वास ठेवून रुग्ण केवळ योगावरच विसंबून राहिल्यास त्याची प्रकृती गंभीर होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी टीका त्यावेळी डॉक्टरांनी केली होती. अशाच स्वरूपाचा दावा त्यांनी २०१७ साली समलैंगिकतेबाबतही केला होता. समलैंगिकता हे ‘चुकीचे लैंगिक वर्तन’ असून योगाच्या माध्यमातून हा आजार बरा करता येऊ शकतो, असा हा दावा होता.

इन्स्टन्ट नूडल्स (२०१५)

‘मॅगी’मध्ये मानवी शरीरास घातक घटकांचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाल्याने २०१५ साली अल्पावधीसाठी ‘मॅगी’च्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. इन्स्टन्ट नूडल्सच्या बाजारात निर्माण झालेल्या या पोकळीतील संधी पतंजलीने हेरली आणि लगोलग ‘इन्स्टन्ट आटा नूडल्स’ बाजारात आणले. मात्र हे नूडल्स बाजारात पोहोचतात न पोहोचतात, तोच ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि नियमन प्राधिकरणा’ने (‘एफएसएसएआय’) पतंजलीला हे उत्पादन योग्य त्या मान्यता न मिळवताच बाजारात आणण्यात आल्याची आणि त्याची विक्री थांबविण्याची नोटीस पाठविली. या नूडल्सच्या पाकिटांवर ‘एफएसएसएआय’चा लायसन्स नंबरही छापण्यात आला होता. त्यावर ‘एफएसएसएआय’चे तत्कालीन अध्यक्ष आशिष बहुगुणा यांनी या उत्पादनाला मान्यता नसताना त्यांना लायसन्स नंबर कसा मिळाला, असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी नंतर पतंजलीला अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याची नोटीस बजावण्यात आली होती.

दिव्य पुत्रजीवक बीज (२०१५)

पतंजलीने दिव्य पुत्रजीवक बीज नावाचे औषध आपल्या दुकानांत उपलब्ध केले होते. पुत्र जीवक या शब्दयोजनेतून हे औषध मुलगा होण्याची खात्री देत असल्याचा समज निर्माण झाला होता. कंपनीने हे औषध वंध्यत्वावर उपाय असल्याचा दावा केला होता. या औषधाला हरियाणमधून मोठ्या प्रमाणात मागणी होती.

संरक्षण खात्याकडून आवळा सरबताला बंदी (२०१७)

पतंजलीचे आवळा सरबत सेवन करणे आरोग्यासाठी योग्य नसल्याचा दावा करत भारतीय संरक्षण दलांच्या ‘कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट’ने या सरबताची विक्री थांबविली होती.

पोस्ट डेटेड औषधे (२०१८)

मे २०१८ ही उत्पादनाची तारिख (मॅन्युफॅक्चरिंग डेट) छापलेले ‘पतंजली गिलोय घन वटी’ हे औषध मार्च २०१८मध्ये म्हणजे उत्पादनाच्या तारखेच्या दोन महिने आधीच दुकानांत उपलब्ध झाल्याची छायाचित्रे व्हायरल झाली होती. ‘एफएसएसएआय’ आणि ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या ट्विटर खात्याला टॅग करून ही छायाचित्रे पोस्ट करण्यात आली होती. त्यांची दखल घेत ‘एफएसएसएआय’चे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी पवन अग्रवाल यांनी राज्य अन्न आयुक्तांना या प्रकरणाची शहानिशा करण्याचे आदेश दिले होते. २०१७ मध्ये पतंजलीच्या मध आणि मुरांब्याबद्दलही अशाच स्वरूपाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण यांनी मात्र आपल्या विरोधकांनी फोटोशॉपच्या सहाय्याने तारीख बदलून ही छायाचित्रे व्हायरल केल्याचा दावा केला होता.

कोविडवरील औषध ‘कोरोनिल’ (२०२०)

संपूर्ण जग कोविडशी झगडत असताना आणि जगातील प्रस्थापित आणि प्रतिथयश औषधनिर्मिती कंपन्या कोविड प्रतिबंधक लशींसंदर्भातील प्रयोग करत असताना बाबा रामदेव यांनी जून २०२० मध्ये पतंजलीचे ‘कोरोनिल’ हे औषध बाजारात आणले. हे औषध कोविड सात दिवसांत पूर्णपणे बरा करते, त्याच्या चाचण्याही झाल्या आहेत आणि त्यांना १०० टक्के यश आले आहे, असा दावा त्यांनी केला होता. तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. मात्र लगेचच आयुष मंत्रालयाने या औषधासंदर्भातील कागदपत्रांची छाननी होत नाही, तोवर त्याची कोविडवरील उपाय अशी जाहिरात करण्यावर बंद आणली. आयुष मंत्रालयाच्या उत्तराखंडमधील आयुर्वेद विभागाने या औषधासाठी करण्यात आलेल्या अर्जात कुठेही ‘कोविडवरील औषध’ असा उल्लेख नसल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र आणि राजस्थान सरकारने आयुष मंत्रालयाची मान्यता मिळेपर्यंत या औषधाची जाहिरात वा विक्री करण्यात येऊ नये, अशी नोटीस पतंजलीला बजावली. राजस्थान सरकारने तर ‘नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’लाही राज्य सरकारला कल्पना न देताच औषधाच्या चाचण्या घेतल्याबद्दल नोटीसही बजावली. ‘द इंडियन मेडिकल असोसिएशन’ने कोरोनिल जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केल्याचा पतंजलीचा दावा धक्कादायक असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर ‘जागतिक आरोग्य संघटने’ने कोविडवर कोणताही पारंपरिक वैद्यकीय उपचार उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले. पुढे २०२१ मध्ये या औषधाला प्रतिकारशक्ती वाढविणारे औषध म्हणून मान्यता मिळाली.

मोतिबिंदू बरा करणारे ड्रॉप्स (२०२३)

केरळमधील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. के. व्ही. बाबू यांनी दिव्य फार्मसीच्या डोळ्यांत घालायच्या ड्रॉप्सविषयी तक्रार दाखल केली होती. या ड्रॉप्समुळे ग्लुकोमा, मोतिबिंदूसाराखे आजार बरे होऊ शकतात, असा दावा जाहिरातीतून करण्यात आला होता. अशा जाहिरातींना भुलून रुग्ण ड्रॉप्सवर अवलंबून राहिले आणि त्यांना योग्य उपचार मिळाले नाहीत, तर रुग्णांना अंधत्व येऊ शकते, असा आक्षेप डॉ. बाबू यांनी घेतला होता. दिशाभूल करणारी जाहिरात केल्याबद्दल पतंजलीवर कारवाई करण्यात आली होती.

हे काही निवडक दावे, त्यावरून उपस्थित झालेले वाद आणि केल्या गेलेल्या तक्रारी. बाबा रामदेव आणि पतंजलीसंदर्भात याव्यतिरिक्तही अनेक वाद उद्भवले आहेत. वादांच्या या मालिकेनंतरही कंपनीच्या उत्पादनांची विक्री सुरू आहे, वाढत आहे, त्यात नवनवीन उत्पादनांची आणि त्याबरोबरच नव्या दाव्यांचीही भर पडत आहे. कोणत्याही कंपनीचे कोणतेही औषध, खाद्यपदार्थ किंवा सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना त्यांना सरकारच्या नियामक संस्थांची मान्यता आहे का, हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

vijaya.jangle@expressindia.com