डॉ. विजय पांढरीपांडे
एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स् आणि एमएल म्हणजे मशीन लर्निंगची तुतारी वाजताच आपला तंत्रशिक्षण विभाग जागा झाला. जिथून ही सूत्रे हलविली जातात त्या दिल्लीतील एआयसीटीई अधिकारी कामाला लागले. या दोन विषयात स्वतंत्र पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचे सूतोवाच करण्यात आले. आपल्या राज्यातील राजकारणी मंडळीच्या अधिपत्याखालील खासगी शिक्षण संस्था उत्साहाने कामाला लागल्या. कारण नवा कोर्स म्हणजे अधिक प्रवेश संख्या, अधिक तुकड्या, अन् डोनेशनद्वारे करोडोंची कमाई… असे पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा मूर्खपणा जगात कुठल्याही विद्यापीठात बघायला मिळत नाही. बहुतेक ठिकाणी अजूनही इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स अशा मूळ विषयातच पदव्या दिल्या जातात.
 
असाच चुकीचा व्यापारी निर्णय काही दशकापूर्वी याच एआयसीटीईने घेतला होता. त्यावेळी आयटी बूम होती. वायटूके नावाच्या समस्येने धुमाकूळ घातला होता. देशात, देशाबाहेर अनेक संगणक पदवीधरांची गरज होती. तेव्हा आयटीची स्वतंत्र पदवी सुरू झाली. एमसीएसारखे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले. मूलभूत इलेक्ट्रॉनिक्सची पदवी होतीच. जोडीने कॉम्पुटर सायन्सचा देखील वेगळा विभाग, स्वतंत्र पदवी झाली. पण आयटी बूमचा फायदा घेत त्यावेळी खासगी संस्थांच्या जागा वाढविण्यासाठी हास्यास्पद प्रयोग झाले! इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, आयटी, कम्युनिकेशन या अनेक शब्दांपैकी एका वेळी वेगवेगळे दोन शब्द वापरून अनेक नावांनी पदव्या निर्माण झाल्या. या हास्यास्पद प्रकारात एआयसीटीईबरोबर त्या त्या राज्यातील तंत्रज्ञान विद्यापीठांनी देखील साथ दिली. प्रवेश संख्या हजारोंनी वाढल्यामुळे खाजगी संस्थांचे, व्यवस्थापनाचे तर उखळ पांढरे झालेच पण इतर परवानग्या देणाऱ्या संस्थांनी देखील वाहत्या पाण्यात हात धुवून घेतले! त्या काळापासून इंजिनियरिंग शिक्षण क्षेत्रात संख्या विरूध्द गुणवत्ता, (quantity verses quality) असे शीतयुद्ध सुरू झाले. पिठाच्या गिरणीतून पीठ बाहेर पडावे तसे या खासगी इंजिनियरिंग कॉलेजातून आयटी, संगणक इंजिनिअर बाहेर पडू लागले. इतर कोर्सेसच्या तुलनेत यांना कॉल सेंटरसारखे जॉब मिळणे सोपे झाले. अनेकांनी परदेशाची वाट धरली. तिकडे अमेरिकेच्या तुलनेत कमी पगार असला तरी विनिमय दराने गुणले तर रुपयातला पगार लाखात! याचा दोन्ही पक्षी फायदा झाला. इलेक्ट्रॉनिक्स, आयटी हे विषय नोकरीच्या बाजारात सदैव जादा भाव देणारे हे सत्य नाकारता येत नाही. या मृगजळाचा फायदा सर्वांनीच घेतला. सिव्हिल, मेकॅनिकलची मंडळीदेखील पदवीनंतर संगणक क्षेत्राकडे वळली. आता यात आयटीच्या सोबतीने एआय, एमएल, डेटा सायन्स या विषयाची भर पडली आहे. हे असे सामान्य शिक्षणाकडून स्पेशलायझेशनकडे जाणे भविष्याच्या दृष्टीकोनातून कितपत योग्य आहे हा खरा विचाराचा मुद्दा आहे.

हेही वाचा >>>पक्षांतराच्या रोगावरील इलाज मतदारांकडेच

Mumbai Ghatkopar hoarding collapse incident
अग्रलेख : फलक-नायक फळफळले…
China Becomes India Top Trade Partner
­­­­अग्रलेख : डोळे वटारता वटारता…
According to a report by the Center for Study of Society and Secularism more hate speech was given in Maharashtra
राज्याला पुरोगामी परंपरा…तरीही नेते करत आहेत द्वेषजनक भाषणे…
loksatta editorial joe biden imposes heavy import tariffs on chinese imports
अग्रलेख : बाजार कुणाचा उठला…
julio ribeiro article on narendra modi controversial remark on muslim community in rajasthan speech
मोदींना वस्तुस्थिती माहीत आहे, पण…
india signs agreement with iran for chabahar port
अन्वयार्थ : चाबहार करार आणि काही प्रश्न…
Israeli Defence Minister Yoav Gallant & Israeli Prime Minister Benjamin Netanyahu
अग्रलेख : नेतान्याहूंची नाकेबंदी
loksatta editorial bjp bring pakistan issue in lok sabha election campaign for targeting congress
अग्रलेख : शेजार‘धर्म’!

पूर्वी आपली शिक्षण पद्धत त्रिकोणासारखी होती. आधी पायाभूत सर्व विषय शिकायचे.  वय वाढते तसे पदवीनंतर विशिष्ट विषयाचे (पदव्युत्तर स्पेशलायझेशन) शिक्षण घ्यायचे. नंतर अधिकाधिक अरुंद गल्लीत प्रवेश करीत सुपर स्पेशालिस्ट व्हायचे. वैद्यकीय शिक्षण याचे उत्तम उदाहरण. आताच्या स्पेशल विषयातल्या पदव्या याच प्रकारात मोडणाऱ्या! असे पदवीधर विद्यार्थी नव्या क्षेत्राचा, अवांतर विषयातील समस्यांचा सामना करण्यात अयशस्वी ठरण्याची शक्यता असते. आपण भविष्यातील गरजा, तंत्रज्ञानाचा विस्तार अन् वेग, नवी आव्हाने, समस्यांचे गुंतागुंतीचे स्वरूप (complex problems), हे सारे लक्षात घेतले तर शिक्षण, अभ्यासक्रम, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे स्वरूप याचा नव्याने विचार करावा लागेल. हा आकार त्रिकोणाऐवजी चौकोनी हवा. म्हणजे विद्यार्थ्याला सर्व विषयाचे थोडे थोडे ज्ञान हवे. एकाच विषयाचे सखोल ज्ञान उपयोगाचे ठरणार नाही.

भविष्यातील सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, तांत्रिक विस्ताराचे स्वरूप लक्षात घेतले तर इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, आयटी, एआय यांच्या सोबतीने बायो टेक, नॅनो टेक, जेनेटिक, नुरल नेटवर्क या विषयांचे थोडे थोडे ज्ञान गरजेचे आहे. याशिवाय मानव्य शाखा, कला, संस्कृती, व्यवस्थापन, नीती शास्त्र, समाज शास्त्र, अर्थ शास्त्र यांचे देखील आकलन हवे. अभ्यासक्रम ठरवताना असा आंतर शाखीय (इंटिग्रेटेड) विचार केला पाहिजे.

हेही वाचा >>>मोदींना वस्तुस्थिती माहीत आहे, पण…

सुदैवाने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात हे सहज शक्य आहे. यात मेजर, मायनर ही संकल्पना आहे. आता इंजिनियरिंग पदवीचा विचार केला तर वेगवेगळ्या विभागाची वेगळी पदवी न देता बॅचलर ऑफ इंजिनियरिंग ही एकच पदवी राहू शकते. शिकताना विद्यार्थ्याला कोणते विषय घ्यायचे, कशात जास्त शिकायचे हे निवडीचे स्वातंत्र्य राहील.उ दा एखादा विद्यार्थी ६० टक्के क्रेडिटस् इलेक्ट्रॉनिक्सचे अन् बाकीचे मायनर क्रेडिटस् आयटी, एआय, मॅनेजमेंट, फायनान्स अशा विषयांची निवड करू शकेल. विद्यार्थ्याचे क्रेडिट ग्रेड कार्ड ही त्याची कुंडली असेल. ते पाहून तो कुठल्या कामासाठी उपयुक्त आहे हे समजू शकेल. हेच तत्व इंजिनियरिंग पदवीपुरते मर्यादित न राहता इतर पदवी विभागासाठी वापरता येईल. विज्ञानात एखादा विद्यार्थी मेजर क्रेडिट, ६०-६५ %, फिजिक्सचे घेईल अन् बाकीचे मायनर क्रेडिट आवडीप्रमाणे केमिस्ट्री, संगणक, आयटी, गणित, संख्याशास्त्र अशा कुठल्याही विषयाचे घेईल. हीच पद्धत कला पदवीसाठी देखील लागू होते. यामुळे शिक्षण एकांगी न राहता ते आंतरशाखीय स्वरूपाचे होईल. भविष्यासाठी, नोकरीच्या दृष्टीने आपली उपयुक्तता वाढविण्यासाठी आता हेच गरजेचे आहे. केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर पालकांनी देखील हे समजून घ्यायला हवे. अगदी शिकले सवरलेले पालक देखील अनभिज्ञ असतात. काही विद्यापीठे, काही संस्था बीई अशी पदवी देतात. तर काही बीटेक अशी पदवी देतात. या दोन पद्व्यात नेमका फरक काय, कॉम्पुटर सायन्समध्ये सायन्स शिकवतात की इंजिनियरिंग, एआय, एमएलसारखे सुपर स्पेशलायझेशन पदवीसाठी गरजेचे आहे का, भविष्यातील उद्योग क्षेत्राला नेमकी कशाची गरज आहे असे प्रश्न पालकांना पडत नाहीत. ते अभ्यासक्रम ठरविणारे शिक्षण तज्ञ देखील विचारात घेत नाहीत. हे वैचारिक दारिद्र्य चिंतेचा गंभीर विषय आहे. त्यासाठी आताच खडबडून जागे झालेले बरे… म्हणून हा लेखन प्रपंच!
vijaympande@yahoo.com