बापू राऊत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय समाजाला उद्देशून म्हणाले होते की, ‘‘धर्म हा तुमचा आवडता विषय आहे, त्यामुळे तुम्ही हिंदू धर्मीय लोकांकडे धार्मिक व सामाजिक हक्कांची मागणी करता. परंतु ते तुम्हास अधिकार देण्यास तयार नाहीत. ज्या हिंदूधर्मात तुम्ही आहात त्याच धर्माचे लोक तुमचा द्वेष करतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्यासाठी नवा मार्ग चोखाळला पाहिजे. निष्कारण हिंदूचे चरण धरून व विनवण्या करून तुम्ही तुमच्या माणुसकीला कमीपणा आणू नका. जे धर्म तुमच्या उन्नतीकडे लक्ष देतात त्या धर्माचा विचार करा.’’ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मातराच्या ६६ वर्षांनंतरही हिंदू धर्म, संस्कृती व धर्ममरतडांच्या स्वभावगुणांत बदल झालेला नाही. रोज काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना घडत आहेत. त्यामुळे मागासवर्गीय समाज अस्वस्थ असून त्यांच्यात हिंदू धर्म सोडून इतर धर्मात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मानवतेच्या वाटेवर जाऊ इच्छिणारे बौद्ध धर्माची दीक्षा घेत आहेत.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
What Navneet Rana Said?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, “मला माझी मुलं रोज विचारायची, आई…”

धर्मातराच्या घटना
भारतातील पहिले मोठे धर्मातर हे नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी झाले. या धर्मातराचे मुख्य प्रवर्तक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह पाच लाख व्यक्तींनी धर्मातर केले. ‘‘मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. जन्म कोठे घ्यावा हे माझ्या हातात नव्हते, परंतु मी कोणत्या धर्मात मरावे हे माझ्या हातात आहे,’’ असे त्यांनी म्हटले होते. आज देशात बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. हे धर्मातर लपवाछपवी न करता शासकीय यंत्रणांकडे नोंद करून केले जात आहे. यात आमिष, पैसा व बळजबरी नाही. धर्मवादी मानसिकतेतून बाहेर पडल्याची भावना त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसते. बौद्ध धम्म हा भारताच्या भूमीत जन्मलेला धर्म आहे. भारतातील बहुसंख्य जनतेचे पूर्वज हे बौद्धधर्मीय होते, हा दावा नाकारता येण्यासारखा नाही.

माजी खासदार उदित राज यांनी २००१ मध्ये दिल्ली येथे १० हजार जणांसह बौद्ध धर्म स्वीकारला. गुजरातमधील ऊना येथे २०१६ साली ३०० हिंदू नी गाय रक्षक तुकडीने मारल्याच्या निषेधार्थ बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. २०१७मध्ये सहारनपूर येथे १८० हिंदू नी तर २०१८ मध्ये उत्तर प्रदेशातील बहराइचच्या माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी कानपूर येथे १० हजार जणांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. २०२१-२२ मध्ये धर्मातराचे प्रमाण वाढलेले दिसते. राजस्थानातील बांरा येथे २५० जणांनी, भुलोन येथे एका कुटुंबातील १२ सदस्यांनी तर भरतपूर जिल्ह्यातील सामूहिक विवाह मेळय़ात ११ नवविवाहित जोडप्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. हिंदूू धर्मात अपमान व उपहासाव्यतिरिक्त काहीही मिळाले नाही, असे सांगून, १७ ऑक्टोबर २०२२ रोजी कर्नाटकातील शोरापूर येथे ४५० स्त्री- पुरुषांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला. उत्तराखंड येथील काशीपूर येथे ३००, तर लखनऊ येथेही २२ जणांनी प्रतिज्ञेचे उच्चारण करीत बौद्ध धम्मदीक्षा घेतली. गुजरातमधील बालासिनोर, अहमदाबाद, दानालीपाडा, कलोल आणि सुरेंद्रनगर येथील ३९६ व्यक्तींनी बौद्ध धम्मदीक्षा घेतली. विशेष म्हणजे यातील काही जणांनी धर्मातरानंतर आपापल्या घरातील देवी-देवतांच्या मूर्ती व चित्रे नदी पात्रात सन्मानाने विसर्जित केल्या.

दीक्षाभूमी नागपूर येथे २०२२ साली २०० लोकांनी धम्मदीक्षा घेतली. त्यात नवसृजन ट्रस्टच्या प्रमुख मंजुळा प्रदीप यांच्यासह ९० गुजराती हिंदूंचा समावेश होता. औरंगाबाद येथे श्रावण गायकवाड, भारत पाटणकर (सांगली), अच्युत भोईटे (मुंबई) यांच्यासह ४०७ हिंदूंनी दीक्षा घेतली. छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे महापौरांच्या उपस्थितीत अनेकांनी बौद्ध धर्मप्रवेश केला. मात्र या सगळय़ात अधिक गाजावाजा झाला तो आम आदमी पक्षाचे मंत्री राजेंद्र पाल यांचा. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी दहा हजारांपेक्षा अधिक जणांसोबत त्यांनी डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा केल्या. त्यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आल्यावर, त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेणे केजरीवाल यांस भाग पाडले.

धर्मातराची कारणे
‘आम्हाला तुमच्यासारखेच माणूस म्हणून जगण्याचे अधिकार आहेत. हिंदू म्हणून तुम्ही जे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक स्वातंत्र्य उपभोगता, तेच स्वातंत्र्य हिंदू म्हणून आम्हास हवे आहे,’अशी दलितांची मागणी आहे. परंतु स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गाठला तरीही अत्याचार सुरूच आहेत. त्यामुळे जनतेत अस्वस्थता वाढून धर्मातर होऊ लागले आहे. त्यामागची काही कारणे..

कर्नाटकातील शोरापूर (अमलिहला गाव) येथील स्थानिक मंदिरात दलितांना प्रवेश नाकारण्यात आला. कोलार जिल्ह्यात मंदिरातील देवीच्या खांबाला हात लागल्यामुळे एका व्यक्तीस ६० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. याच तालुक्यातील किरधल्ली गावात दलितांच्या घरी एखाद्याचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारांसाठी अन्य गावांतून येणाऱ्या दलितांचा स्पर्श होऊ नये म्हणून गावातील सवर्ण आपली सर्व हॉटेले व दुकाने बंद ठेवतात. चामराजनगर जिल्ह्यातील हेगगोतरा गावात (१८ नोव्हेंबर २०२२) एका दलित महिलेने पाणी पिण्यासाठी पाण्याच्या टाकीला हात लावला म्हणून टाकी गोमूत्राने स्वच्छ करण्यात आली. राजस्थानातील जितेंद्रपाल मेघवाल या दलित युवकाने समाजमाध्यमावर मिशीवर पीळ देणारे छायाचित्र अपलोड केल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली. जालोर येथील शाळेत इंद्रकुमार मेघवाल या विद्यार्थ्यांचा ‘शिक्षकासाठी राखीव’ माठातील पाणी प्यायल्यामुळे शिक्षकाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. एका आयपीएस अधिकाऱ्याला दलित असल्यामुळे घोडीवर बसून लग्नाची वरात काढण्यास विरोध करण्यात आला. मध्य प्रदेशातील भिंड (दाबोहा) येथे दिलीप शर्मा नामक व्यक्तीशी वाद घातल्यामुळे पंचायतीने दीड लाख रुपयांचा दंड आकारला आणि दोन भावांचे केस कापून त्यांची गावातून धिंड काढली.

दलित स्त्रिया हा अत्याचारास हमखास बळी पडणारा वर्ग ठरला आहे. बरेली येथे बलात्कार पीडितेच्या आई-वडिलांनी समझोत्यास नकार दिल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. त्याच जिल्ह्यात दहावीत शिकणाऱ्या उच्च जातीच्या मुलीसोबत बोलल्यामुळे दलित मुलाच्या गळय़ात चपलांचा हार घालून धिंड काढण्यात आली.

मध्य प्रदेशात ‘चाइल्ड राइट्स ऑब्झव्र्हेटरी’ व ‘मध्य प्रदेश दलित अभियान संघ’ या संस्थांमार्फत १० जिल्ह्यांत झालेल्या सर्वेक्षणानुसार ९२ टक्के दलित मुलामुलींना शाळेत पाणी पिऊ दिले जात नाही. ८० टक्के गावांत मंदिरात प्रवेश दिला जात नाही. तर गावात मुलामुलींचे चांगले नाव ठेवल्यास कुटुंबास मारहाण करण्यात येते. तमिळनाडूत दलित सरपंचाला राष्ट्रध्वज फडकवू दिला गेला नाही. ‘तमिळनाडू अस्पृश्यता निवारण फ्रंट’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार ८६ पंचायतींपैकी २० दलित पंचायती प्रमुखांना बसण्यासाठी खुर्ची दिली जात नाही, फलकावर त्यांचे नाव टाकले जात नाही. काही शाळांमध्ये दलित विद्यार्थ्यांनाच शौचालय साफ करण्यास सांगितले जाते.

हिंदू यावर कधी विचार करणार?
अत्याचार करणाऱ्यांना न्यायालयामार्फत जबर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. आपले अधिकार मागणाऱ्यांचे डोके फोडण्यासाठी दगड उचलण्याएवढी असहिष्णुता का निर्माण होते, यावर मंथन होणे आवश्यक आहे. अन्यथा दुसरा मार्ग म्हणजे धर्मातर. एकाच धर्मात एकाने मालक व्हावे व दुसऱ्याने गुलाम, हे कसे चालेल? एखाद्याच्या धर्मस्वातंत्र्याचा विचारच केला जात नसेल, तर ‘‘तुम्ही आमचे मालक बनावे हे तुमच्या हिताचे असेल, परंतु आम्ही तुमचे गुलाम बनावे हे आमच्या हिताचे नाही,’’ असे म्हणत कृती केली तर ते राष्ट्रहितच समजले पाहिजे. कारण समता व मानवी कल्याण हा राष्ट्रहिताचाच सर्वोच्च बिंदू असतो.

लेखक सामाजिक/राजकीय घडामोडींवर नियमित लिखाण करतात.
bapumraut@gmail.com