विजया जांगळे

एक खूप जुनं बडबडगीत आहे… लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली. या गाण्यातल्या बाहुलीचं नाक नकटं आहे. तिने ‘भात केला कच्चा झाला, वरण केलं पात्तळ झालं.’ झालं तर झालं. ठीक आहे ना. नको येऊ दे स्वयंपाक, असू दे नकटं नाक. सगळंच का परफेक्ट हवं? एकाच साचातलं, एकाच रंगातलं, प्रमाणबद्ध, एकसुरी… जगात एवढी विविधता आहे. हज्जार प्रकारची माणसं आहेत. मग सगळ्याच बाहुल्या गोऱ्या, घाऱ्या, उंच, शिडशिडीत, लांबसडक रेशमी केसांच्या का? जगातलं वैविध्य आता खेळण्यांतही प्रतिबिंबित होऊ लागलं आहे.

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार

एके काळी तथाकथित सौंदर्याचा नमुना असलेल्या बाहुल्या विकून बाजार काबीज करणाऱ्या ‘मेटल’ या कंपनीने आपल्या बार्बी या लोकप्रिय उत्पादनात साठच्या दशकापासून सर्वसमावेशकतेचे प्रयोग अगदी अल्प प्रमाणात का असेनात, पण सुरू केले. १९६८ मध्ये बार्बीने सर्वप्रथम ख्रिस्ती आणि नंतर ज्युलिया या दोन बाहुल्या आणल्या. आज या कंपनीने सर्वसमावेशक खेळण्यांच्या वर्गात मोठी आघाडी घेतली आहे. यात वर्ण, चेहरेपट्टी, डोळ्यांचे रंग, उंची, शरीरयष्टी यात वैविध्य आणण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने सावळी, कृष्णवर्णीय, स्थूल, कुरळ्या केसांची, चष्मा लावणारी अशा अनेक बाहुल्या आणल्या. याशिवाय व्हीलचेअरवर बसलेली, श्रवणयंत्र लावलेली, शरीरावर कोड असलेली, स्थुल, मधुमेह तपासणीचं किट हाती घेतलेली, कृत्रिम पाय लावलेली अशा अनेक प्रकारच्या बाहुल्या उपलब्ध आहेत. एकूण २०० प्रकारची करिअर्स असलेल्या बार्बी बाहुल्या उपलब्ध आहेत. मेटलचे बाहुलेही उपलब्ध आहेत. तथाकथित पुरुषी शरीरयष्टी न लाभलेल्या मुलांचंही प्रतिबिंब उमटेल, याचीही काळजी घेण्यात आली आहे. ‘स्वमग्न’ म्हणजेच ‘डाउन्स सिन्ड्रोम’ असलेल्या बाहुलीच्या रूपाने या संचात नवी भर पडली आहे.

आणखी वाचा- गौतमी पाटीलच नाही, समाजही नाचतोय… बैलासमोर!

मुलांना खेळण्यांतून परीकथेतल्या नव्हे, तर खऱ्या खुऱ्या जगाची ओळख व्हावी, जगातलं वैविध्य खुल्या मनाने स्वीकारण्याची त्यांची तयारी व्हावी म्हणून खेळण्यांच्या विश्वात अनेक प्रयोग होत आहेत. गतवर्षी सेरेना विलियम्सने असाच एक प्रयोग केला. तिची मुलगी ऑलिम्पिया हिची पहिली बाहुली कृष्णवर्णीय असावी, असा तिचा आग्रह होता. तिने मुलीसाठी तशी बाहुली मिळवली. तिचं नाव ‘क्वे क्वे’. या क्वे क्वेचं इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून तिच्या डिजिटल रूपातल्या गमतीजमती समाजमाध्यमांवर शेअर करण्यात आल्या. तिच्या साहसकथांचं ‘द ॲडव्हेन्चर्स ऑफ क्वे क्वे’ हे चित्रिमय पुस्तकही सेरेनाने लिहिलं. सर्वसामान्य मुलांसाठीही ही बाहुली उपलब्ध व्हावी म्हणून तिने तिचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केलं. ही कृष्णवर्णीय गुबगुबीत, मोठ्ठाले डोळे असलेली, डोक्यावर जावळाचे केवळ उंचवटे असलेली आणि फ्रिलचा फ्रॉक घातलेली बाहुली आता ॲमेझॉनवर उपलब्ध आहे.

वैविध्य, सर्वसमावेशकता…

‘लेगो’ हा बिल्डिंग ब्रिक स्वरूपाचा खेळही आता सर्वसमावेशक होण्याचा प्रयत्न करत आहे. या खेळातल्या साधारणपणे पिवळ्या रंगांच्या मानवी फिगरिन्स आता विविध वर्णांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ‘एव्हरीवन इज ऑसम’ हा लेगोसेट चर्चेत आला तो एलजीबीटीक्यू वर्गाचं प्रतीक असलेल्या सप्तरंगी झेंड्याच्या रंगात उपलब्ध करून दिल्यामुळे. या सेटमध्ये विविध वर्णांच्या आणि विविध प्रकारचे केस असलेल्या ११ फिगरिन्सचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त कोलाज स्वरूपातील कोडी, बैठे बोर्ड गेम्स यांतही विविध वंशाच्या व्यक्तींची वैशिष्ट्ये प्रतिबिंबित होऊ लागली आहेत. मानवी आकृतींतही जगाच्या विविध भागांत राहणाऱ्या, विविध वंशांच्या व्यक्तींना प्रतिनिधित्व देण्यात येत आहे. गोऱ्या, उंच पात्रांच्या जागी सावळी, कृष्णवर्णीय पात्र दिसणं आता पूर्वीएवढं दुर्मीळ राहिलेलं नाही. रंग भारण्यासाठीची छापील चित्रपुस्तकं अनेक बालकांना आवडतात. यात आता कार्टून्स किंवा प्राण्या-पक्ष्यांप्रमाणेच साइन लँग्वेजचं प्रशिक्षण देणारी पुस्तकं उपलब्ध होऊ लागली आहेत.

आणखी वाचा- नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे हिंदुत्व व राष्ट्रवादाच्या नावाखाली शिक्षणाचे व्यापारीकरण…

लहान मुलांच्या दृष्टीने खेळणी ही मित्रांसारखीच असतात. बाहुला-बाहुली त्यांच्यासारखेच दिसणारे असतील, तर त्यांच्याशी मुलांचं भावनिक नातं तयार होतं. मूल काळं- सावळं असेल आणि सर्व बाहुले-बाहुल्या गोरेपान असतील, तर ‘आपणच का असे’ हा न्यूनगंड त्याच्यात निर्माण होण्याची भीती असते. यातूनच पुढे ते आदर्श रूप साधण्याची धडपड सुरू होते आणि बाजार त्याचा पुरेपूर गैरफायदा घेतो. खेळण्यांनी जगातलं वैविध्य स्वीकारलं तर बालपणातच पेरला जाणारा हा न्यूनगंड दूर होईल. आपल्यासारखे इतरही अनेक आहेत आणि सर्व प्रकारची माणसं छान आहेत, असा विश्वास निर्माण होईल.

खेळणी मुलांपेक्षा अगदी वेगळी दिसणारी असतील, तर जगात अशीही माणसं असतात आणि असं वेगळं असण्यात वावगं काहीच नाही, याचा स्वीकार मुलं हळूहळू करू लागतील. मुलांसाठी निळा आणि मुलींसाठी गुलाबी रंग, मुलांनी दणकटच असावं, मुलींनी नाजूकच असावं, सर्वांनी गोरं आणि प्रमाणबद्धच असावं, एकतर मुलगा असावं किंवा मुलगी असावं… अशा सगळ्या चौकटी तोडून मुलांची खेळणी त्यांच्याही नकळत त्यांच्याकडून भेदांच्या पलीकडे जाण्याचा धडा गिरवून घेऊ लागली आहेत. यातून निकोप मनोवृत्तीच्या जगाकडे वाटचाल सुरू होणार असेल, तर खेळण्यांना गांभीर्याने घ्यायलाच हवं!

vijaya.jangle@expressindia.com