अॅड. नोएल डाबरे
४ नोव्हेंबर २०२४ रोजी अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण जिंकणार याची साऱ्या जगाला उत्सुकता लागून राहिली आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी २१ जुलै रोजी अचानक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी त्यांनी पुढे केले. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी पक्षाची उमेदवारी लाभणे अत्यंत किचकट असते. अनेक प्राथमिक निवडणुकांतून उमेदवाराला पुढे जावे लागते. प्रत्येक राज्यामध्ये चांगली मते मिळवावी लागतात. पक्षाच्या प्रतिनिधींची मते मिळवावी लागतात. वर्षभराच्या या जटील प्रक्रियेनंतर कोणत्या उमेदवाराला पक्षाची उमेदवारी मिळेल हे ठरते. मागच्या वेळी जो बायडन यांची दमछाक झाली होती. यावेळी तशी मुदतही नव्हती. परंतु एखादा चमत्कार तशी कमला हॅरिस यांना उमेदवारी मिळाली. जो बायडन यांनी कमला हॅरिस यांची उमेदवारी घोषित करताच त्यांना पसंती देण्यास डेमोक्रॅटीक पक्षात चढाओढ सुरू झाली. अवघ्या १५ दिवसांत कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटीक पक्षाची उमेदवारी लाभली. डेमोक्रॅटिक पक्षाच्या सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणेच फक्त बाकी आहे.

जोपर्यंत जो बायडन निवडणुकीच्या रिंगणात होते तोपर्यत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अत्यंत जोशात होते. ते निवडूनच आलेले आहेत असे वातावरण तयार झाले होते. जो बायडन यांना ते चितपट करणार असे चित्र होते. २७ जूनला दोघे आमनेसामने आले होते. अमेरिकेत निवडणुकीत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना तीन वेळा आमनेसामने यावे लागते. या वादविवादात ज्याची सरशी होते तोच निवडणूक जिंकतो, असा आजवरचा इतिहास आहे. पहिल्याच वादविवादात जो बायडन फिके पडले. या वादविवादानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता शिगेला पोहचली. जो बायडन यांची प्रतिमा पराभूत उमेदवारात बदलली. बायडन यांनी नंतर फार सारवासारव केली. एक जोरदार भाषण त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर केले. आपला लढाऊ बाणा दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तोपर्यंत बाण भात्यातून बाहेर पडला होता. पक्षाच्या प्रमुख नेत्यांतही साशंकता निर्माण झाली. बायडन निवडणुकीत नक्की हरणार यांची त्यांना खात्री झाली. हळूहळू काही नेते मंडळी बोलू लागले. बायडन यांनी निवडणुकीची लढाई सोडून द्यावी म्हणून एकेक जण मागणी करू लागला. तरीही जो बायडन निवडणूक लढण्याचा आपला हट्ट सोडेनात. त्यांचेही समर्थक होते. खास पत्रकार परिषद घेऊन त्यांनी लढण्याचा निर्धार जाहीर केला. डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि समर्थकांचे जे उरलेसुरले अवसान होते तेही गळून पडू लागले. पक्षाला मिळणारी मदत थांबली. मदतीचे आश्वासन दिलेल्या लोकांनीही हात आखडते घेण्यास सुरुवात केली. दुसरीकडे जल्लोष सुरू झाला. डोनाल्ड ट्रम्प आवरेनासे झाले. त्यांच्यापेक्षा जास्त उत्साही त्यांचे समर्थक होते. हल्क होगन हा डब्ल्यूडब्ल्यूएफचा एक जगप्रसिद्ध कुस्तीगीर आहे. त्याचे चाहते त्याला देव मानतात. तो तर चेकाळलेलाच होता. आपले गुरू डोनाल्ड ट्रम्प असल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्याने घोषित केले. भाषणाच्या ओघात त्याने जर्सीच फाडून टाकली तेव्हा संपूर्ण स्टेडियम ट्रम्प यांच्या नावाने दुमदुमले.

Navi Mumbai, Naina area, PM Narendra Modi,
नवी मुंबई : नैना क्षेत्रातील २५०० कोटी रुपयांच्या कामाचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
sri lanka president leftist leader anura kumara dissanayake
लेख : श्रीलंकेसाठी ‘ग्रीक’ धडे!
Ikra predicts that banks will raise funds through bonds as growth in bank deposits slows
बँकांची रोख्यांवर मदार, ठेवीतील वाढ मंदावल्याने पाऊल; १.३ लाख कोटींच्या निधी उभारणीचा इक्राचा अंदाज
tirupati temple animal fat in laddoos row
चंद्राबाबू नायडूंच्या आरोपानंतरही तिरुपती मंदिरातील लाडूच्या विक्रीवर परिणाम नाही; गेल्या चार दिवसांत विकले गेले तब्बल ‘इतके’ लाडू
Mercedes-Benz, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”
Amar Preet Singh
पाच हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव असलेले एअर मार्शल अमर प्रीत यांची IAF च्या प्रमुखपदी नियुक्ती!
Hezbollahs influence hasan nasarullah
“लेबनॉनवर हल्ले म्हणजे युद्धाची घोषणा”; हिजबुलच्या प्रमुख नेत्याचं वक्तव्य, कोण आहेत हसन नसराल्लाह?

हेही वाचा >>>चिनी थेट गुंतवणुकांचा ‘विरोधविकास’

या सगळ्यांचा डेमोक्रॅटिक पक्षावर विपरित परिणाम होत होता. डेमॉक्रॅटिक पक्ष हा सुधारणावादी, उदारमतवादी, सर्वसमावेशक आहे. विस्थापितांचे आणि स्थलांतरितांचे तो स्वागत करतो. विज्ञानवादी दृष्टी बाळगतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे रिपब्लिकन पक्ष विभाजनवादी झाला आहे. अमेरिका ही मूळच्या श्वेतवर्णीयांची आहे, असे रिपब्लिकन्स मानतात. त्यांच्यामध्ये प्रतिगामी विचारांचा भरणा अधिक आहे. ते उघड उघड वर्णद्वेष करतात. ते अविज्ञानवादी झाले आहेत. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी लसीकरणाची सक्ती करण्यास विरोध केला होता. ग्लोबल वार्मिंगची त्यांनी खिल्ली उडवली होती. रिपब्लिकनांनी त्यांची री ओढली. लाखो रिपब्लिकन मृत्युमुखी पडले. तरीही त्यांच्यात काही फरक पडला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांची खोटारडे, बाईलवेडे म्हणून जगभर थट्टा होते. न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आहे. हे सर्व ठावूक असूनही रिपब्लिकन त्यांच्या कच्छपी लागलेले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी उच्छाद मांडला होता. उघडउघड वांशिक वादाला खतपाणी घातले होते. त्यांनी जॉर्ज फ्लॉईड याच्या खुन्यांना, अतिरेकी इस्रायलला, हुकूमशहांना उघडउघड पाठिंबा दिला होता. अमेरिकेतील लोकशाही धोक्यात आणली होती. त्यामुळे अमेरिकेत लोकशाही संपली तर सारेच संपेल या भावनेने अमेरिकी जनता एकवटली. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना धिक्कारले. जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. परंतु जो बायडन यांची राजकीय कारकिर्द निष्प्रभ ठरली. त्यांची परराष्ट्र नीति फसली. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याला अक्षरश: पळ काढावा लागला. रशिया-युक्रेनची उगाचच लढाई लावून दिली. तीही ‘तुम लढो, हम कपडा संभालता है’ या धाटणीची. यातील शेवटची काडी म्हणजे इस्रायलचा वांशिक नरसंहार.

गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला हमासने बेसावध इस्रायलवर अनपेक्षित हल्ला केला. या हल्ल्यात बाराशे ज्यूंना ठार मारले. दोन-अडीचशे इस्रायलींना बंदिवान केले. हा प्रकार निंदनीय होता. त्याची प्रतिक्रिया म्हणून इस्रायलने आजपर्यंत गाझापट्टीत जो नरसंहार केला आहे, तो अजिबात समर्थनीय नाही. तेथील लोकसंख्या २५ लाखांच्या आसपास आहे. त्यापैकी किमान ४० हजार पॅलेस्टिनींना इस्रायलने ठार केले आहे. दोन लाख लोकांना कायमचे जायबंदी केले आहे. नरसंहार यापेक्षा वेगळा काय असतो? आतापर्यंत इस्रायलने गाझापट्टीवर जो बॉम्बवर्षाव केलेला आहे तो हिरोशिमा आणि नागासाकी येथील अणुबॉम्ब हल्ल्याच्या २० पटीने अधिक हानीकारक आहे. जगभर इस्रायलची छी-थू होत आहे. अगदी इस्रायलमध्येही. परंतु जो बायडनच्या प्रशासनाने उघडउघड इस्रायलची बाजू घेतली. त्यांचे परराष्ट्र मंत्री अॅन्थनी ब्लिंकेन जेव्हा इस्रायलमध्ये उतरले आणि बेंजामिन नेतान्याहूंना मिठी मारली तेव्हा अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. नेतान्याहू आणि हिटलरमध्ये फरक नाही. याचा अर्थ अमेरिका ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट’ असा सरळसरळ दुजाभाव करते. तेव्हापासून जो बायडन हे लोकांच्या मनातून उतरले होते. अमेरिकेत अनेक ठिकाणी त्यांच्या परराष्ट्रनीतीच्या विरोधात निदर्शनेही करण्यात झाली. त्यात नीट चालता येत नाही आणि बोलताही येत नाही अशा अवस्थेतील जो बायडन ‘मीच निवडणूक लढवणार, परमेश्वर सांगेल तरच माघार घेईन’ असे जेव्हा बोलू लागले तेव्हा हसावे की रडावे अशी परिस्थिती झाली. जो बायडन अगदी हास्यास्पद व्यक्तिमत्त्व झाले होते.

अखेरीस कोरोनामुळे जो बायडन हादरले. हा ईश्वरी संकेत आहे असे मानून त्यांनी त्यानंतर माघार घेतली असावी. त्यानंतर त्यांनी धूर्त चाल खेळली. कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला. बघता बघता साऱ्या डेमोक्रॅट्सनी त्यांची उमेदवारी पक्की केली. जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे हे सारे झाले. अल्पावधीतच कमला हॅरिस यांना सर्व स्तरांतून प्रतिसाद मिळू लागला. थांबलेल्या देणग्या पूर्ववत झाल्या. त्यांच्या सभांना विक्रमी गर्दी होऊ लागली. निवडणुकीच्या रिंगणात बायडन हे ट्रम्प यांच्या तुलनेत फारच पिछाडीवर होते. कमला हॅरिस यांनी हे अंतर भरून काढले. अवघ्या १५ दिवसांत त्यांनी ट्रम्प यांच्यावर आघाडी मिळविली. आज त्या ट्रम्प यांच्यापेक्षा पाच गुणांनी पुढे आहेत. निवडणुकीला अजून ८० दिवस बाकी आहेत. या ८० दिवसांत चमत्कार होईल का? इथे मला अब्राहम लिंकन यांची आठवण होत आहे. अब्राहम लिंकन यांनी पहिली निवडणूक जिंकली होती. परंतु राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागण्यास सुरुवात झाली. लिंकन हे मानवतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी अमेरिकेतून गुलामगिरी हद्दपार केली होती. ते लोकशाहीवादी होते. वसाहतवादाला त्यांनी प्रचंड विरोध केला होता. तरीदेखील सर्व आघाड्यांवर ते विफल ठरले होते. अंतर्गत युद्धकलहामध्ये सातत्याने हरल्याच्या बातम्या येत होत्या. अब्राहम लिंकन यांची लोकप्रियता इतकी घसरली होती की अध्यक्ष असूनही पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांना प्रचंड धडपड करावी लागली. लिंकन निवडणूक हरणारच, असे चित्र होते. अब्राहम लिंकन जर निवडणूक हरले असते तर जी अमेरिका आज दिसते तशी ती दिसली नसती. प्रतिगामी विचारसरणीने अमेरिकेचा ताबा घेतला असता. कदाचित अमेरिकेचे दोन तुकडेदेखील झाले असते. गुलामगिरी परत आली असती. परंतु एखादा चमत्कार व्हावा तसेच झाले. निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर आली असताना युद्धभूमीवरून विजयाच्या बातम्या येऊ लागल्या. बघता बघता जनरल मॅकक्लिनन अगदी मामुली वाटू लागले. निवडणुकीच्या अगोदर एका प्रख्यात दैनिकाने व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये लिंकन यांची उंची आभाळाला टेकली आणि विरोधी उमेदवाराची उंची खुजी दाखवलेली होती. झालेही तसेच. अब्राहम लिंकन २१२ विरुद्ध २१ एवढ्या प्रचंड फरकाने निवडून आले.

हेही वाचा >>>‘खूप खर्च, खूप लोक, खूप आनंद…’ हे उत्सवी समीकरण चुकतंय…

आताचे चित्रही असेच आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ट्रम्प यांची लोकप्रियता घसरणीला लागली आहे. त्यांच्यावर झालेल्या गोळीबरात ते थोडक्यात वाचले. तेव्हा त्यांची लोकप्रियता शिगेला पोहचलेली होती. कमला हॅरिस यांच्या आगमनानंतर सारे चित्र बदलले. डोनाल्ड ट्रम्प यांची भाषणे अगदीच पोरकट, दिशाहीन, कुठलेली धोरण नसलेली वाटू लागली आहेत. गर्दीही आटू लागली आहे. त्यांच्या समर्थकांचा उत्साह मावळू लागला आहे. भाषणादरम्यान ट्रम्प यांच्या मागे चित्कारणारे समर्थक थंडावलेले दिसतात. पक्षामध्ये कुरबूरी वाढल्या आहेत. निवडणुकीच्या दिवसापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांची अवस्था अब्राहम लिंकन यांच्या विरोधकासारखी होईल असे दिसते. एकूणच अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या येत्या निवडणुकीत कमला हॅरिस यांचा प्रचंड विजय होणार, अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत.

(लेखक राजकीय विश्लेषक, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, सामाजिक चळवळीतील सक्राrय कार्यकर्ते व ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.)