विजया जांगळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखादा देश अन्नधान्याची निर्यात करतो, एखादा खनिज तेलाची किंवा आणखी कशाची, पण सदैव युद्धाच्या सावटाखाली असणाऱ्या दक्षिण कोरियाने चक्क आपल्या बहुरंगी संस्कृतीची निर्यात करून तिजोरीत गडगंज भर घातली. कोरियन पॉप म्युझिक (के- पॉप), टीव्ही मालिका, चित्रपट, खाद्यसंस्कृती आणि प्रसाधनांनी गेल्या काही वर्षांत जगावर गारूड केलं आहे. या सांस्कृतिक बाजारपेठेतील सर्वाधिक लोकप्रिय घटक म्हणजे- ‘बीटीएस’ हा म्युझिक बँड. पण पुढची तीन वर्षं बीटीएस प्रेक्षकांसमोर येऊ शकणार नसल्याचं वृत्त आलं आणि त्याचे पडसाद जगभरातल्या चाहत्यांपासून कोरियातल्या शेअर मार्केटपर्यंत सर्वत्र उमटले. यामुळे कोरियाच्या अर्थव्यवस्थेला किती फटका बसणार आहे, याचेही आडाखेही बांधले जाऊ लागले.

बीटीएसच्या या ‘ब्रेक’मागचं कारण असणार आहे, कोरियातील अनिवार्य लष्करी सेवा. शेजारचं शत्रुराष्ट्र असलेल्या उत्तर कोरियाने कधीही आक्रमण केलं तरी आपण त्यासाठी सज्ज असायला हवं म्हणून दक्षिण कोरियात प्रत्येक धडधाकट तरुणाने वयाची ३० वर्षं पूर्ण होण्यापूर्वी १८ ते २१ महिने लष्करात सेवा देणं बंधनकारक आहे. कोरियन समाजातही या सेवेला प्रचंड मानाचं स्थान आहे. त्यामुळे लष्करी सेवा देण्यात टाळाटाळ करणं म्हणजे देशवासीयांचा असंतोष ओढवून घेणं हे समीकरण पक्कं आहे.

हेही वाचा… ‘भारत जोडो यात्रे’त राहुल गांधींचा फिटनेस चर्चेच्या केंद्रस्थानी

सेवा टाळण्याचा प्रयत्न केला तर देशभरात कशा प्रतिक्रिया उमटतील याची पुरेशी कल्पना ‘बी बिग हिट’ म्युझिक या बीटीएसच्या एजन्सीला असणारच. या पार्श्वभूमीवर कंपनीने बीटीएसचे सदस्य येत्या काळात लष्करात सेवा बजावणार असल्याचं जाहीर केलं आहे. या प्रक्रियेची सुरुवात जिम या २९ वर्षांच्या सदस्यापासून होणार आहे. ऑक्टोबरअखेरीस त्याचा सोलो अल्बम रीलीज झाल्यानंतर तो सेवेत रुजू होईल. इतर सदस्यही त्यांची याआधी सुरू असलेली कामं पूर्ण करून टप्प्याटप्प्याने रुजू होणार आहेत.

हेही वाचा… एक देश, एक वीजजाळे, एक वीज दर

‘बीटीएसने कोरियाला जागतिक पटलावर मिळवून दिलेलं मानाचं स्थान आणि बँडच्या लोकप्रियतेमुळे अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या पडलेली मोलाची भर विचारात घेऊन सरकारने या मुलांना लष्करी सेवा न करण्याची मुभा द्यायला हवी,’ असं मत जगभरातले चाहते आणि कोरियातल्या एका वर्गाकडून व्यक्त केलं जातं होतं. मात्र त्याच वेळी ‘बीटीएसने हे सारं काही देशासाठी केलेलं नाही. बँडच्या सदस्यांनी वैयक्तिक यशासाठी काम केलं, त्यातून अनायासे के पॉपच्या लोकप्रियतेत आणि देशाच्या तिजोरीत भर पडत गेली. बीटीएस ही एका कंपनीने दिलेली सेवा आहे. त्यातून त्या कंपनीने आणि गायक- वादकांनी भरपूर नफा मिळवला आहे. अशा प्रकारे देशाच्या तिजोरीत भर घातल्याचा निकष लावला तर या सवलतीसाठी पात्र ठरणाऱ्यांची लांबलचक यादी तयार होईल,’ असं कोरियातल्या एका वर्गाचं मत होतं.

हेही वाचा… अन्वयार्थ : दवडलेली संधी

अनिवार्य लष्करी सेवेतून सवलत मिळतच नाही असं नाही. जागतिक पातळीवर देशाचं प्रतिनिधित्व करणारे किंवा देशाला मोठे मानसन्मान मिळवून देणारे खेळाडू, अभिनेते, गायक यांना सवलत देण्यात येते. पण ही प्रक्रिया सरकारकडून झाली तर ठीक. एखाद्या व्यक्तीने स्वतः सेवा टाळण्याचा प्रयत्न केला किंवा त्यासाठी काही क्लृप्त्या केल्या तर त्याचे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतात. स्टीव्ह यू या अमेरिकन कोरियन अभिनेता आणि गायकाने ही सेवा टाळण्याचा प्रयत्न केला असता त्याला १८ वर्षांसाठी कोरियातून हद्दपार करण्यात आलं होतं. अशी आणखीही काही उदाहरणं आहेत. त्यामुळे सामान्यपणे कोणीही लष्करी सेवा टाळण्याचा विचार करत नाही. बीटीएसच्या बाबतीत त्यांच्या आर्थिक योगदानापेक्षा देशातला कायदा आणि जनमत श्रेष्ठ ठरलं. त्यामुळे बीटीएसच्या सदस्यांना लष्करात सेवा द्यावीच लागणार आहे. पण आता याचा मोठा फटका कोरियाच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. कसा ते पाहू या…

हेही वाचा… अग्रलेख : शहरबुडी आली..

‘फोर्ब’च्या अहवालानुसार बँड कार्यक्रम करत राहिला असता, तर २०१४ ते २०२३ या कालावधीत त्याने कोरियाच्या अर्थव्यवस्थेत २९ अब्ज ४० कोटी डॉलर्सची भर घातली असती. पुढची तीन वर्षं या महसुलावर पाणी सोडावं लागणार आहे. ‘ह्युंडाई रिसर्च इन्स्टिट्यूट’ने २०१८साली केलेल्या अभ्यासात बीटीएस त्या काळात दरवर्षी कोरियन अर्थव्यवस्थेत तीन अब्ज ६० कोटी डॉलर्सची भर घालत असे. हे योगदान तिथल्या मध्यम आकाराच्या २६ कंपन्यांच्या योगदानाएवढं प्रचंड आहे. याच अभ्यासातून असंही दिसून आलं की २०१७ मध्ये दक्षिण कोरियात आलेल्या दर १३ परदेशी पर्यटकांपैकी एक पर्यटक हा बीटीएसच्या आकर्षणापोटी आलेला होता आणि त्या वर्षी बीटीएसच्या मर्चंडाइजच्या आणि या बँडमुळे लोकप्रिय झालेल्या प्रसाधनांच्या विक्रीतून तब्बल १.१ बिलियन डॉलर्सचा महसूल जमा झाला होता. बीटीएस सध्या कोरियाच्या अर्थव्यवस्थेत दरवर्षी सुमारे चार अब्ज ९० कोटी रुपयांची भर घालत आहे. या बँडमुळे कोविडकाळातही महसुली उत्पन्नात चांगली भर पडल्याचं तिथल्या सांस्कृतिक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रालयाने एकत्रितपणे केलेल्या अभ्यासातून निदर्शनास आलं. वरवर केवळ एक म्युझिक बँड वाटणाऱ्या बीटीएसचं स्थान आर्थिकदृष्ट्या एवढं महत्त्वाचं आहे. साहजिकच बीटीएसचं काम बंद होण्याच्या नुसत्या शक्यतेनेच बाजारात उलथापालथ सुरू झाली.

हेही वाचा… निर्यातोन्मुख धोरणाची गरज

बीटीएसचे सदस्य लष्करात जाणार असल्याची चर्चा जून २०२२ मध्ये सुरू झाली. या वृत्ताने ‘बिग हिट कंपनी’ ज्या ‘हाइब कॉर्पोरेशन’ या बहुराष्ट्रीय कंपनीअंतर्गत कार्यरत आहे, त्या कंपनीच्या समभागांचं मूल्य एकचतुर्थांशाने गडगडलं. कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर प्रथमच एवढी मोठी घसरण झाली. आता ‘बिग हिट’ने २०२५च्या सुमारास बीटीएस पुन्हा एकत्र येणार असल्याची घोषणा केल्यानंतर समभागांचं मूल्य पुन्हा वधारलं आहे. दरम्यानच्या कालावधीत बीटीएसच्या अनुपस्थितीमुळे कोरियन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे. म्युझिक अल्बम, परदेश दौरे, जाहिरात, प्रसिद्धी, विविध कंपन्यांबरोबरची कोलॅबोरेशन्स, बीटीएसच्या निमित्ताने येणारे पर्यटक, त्यांच्या मर्चंडाइजची विक्री, त्यांच्या पोशाख आणि प्रसाधनांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या साहित्याची विक्री यातून कोरियाच्या महसुलात आणि परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठ्या प्रमाणात भर पडत होती, त्याला आता तेथील सरकार मुकणार आहे.

हेही वाचा… विश्लेषण: महागाईपुढे सारेच हतबल? सरकार आणि रिझर्व्ह बँकेची महागाईनियंत्रणात काय भूमिका?

गेल्या काही काळापासून बँड चर्चेत होता तो त्यातील गायकांनी स्वतंत्रपणे काम सुरू केल्यामुळे. बँडची स्थापना झाली २०१३ मध्ये. बँडचे सर्व सदस्य तेव्हा साधारण १६ ते २० वर्षं वयोगटातले होते. किशोरवयात जगाच्या व्यासपीठावर आलेल्या या मुलांनी गेल्या नऊ वर्षांत प्रचंड लोकप्रियता आणि संपत्ती पाहिली. पण त्याचा परिणाम असा झाला की सतत नवनवी गाणी तयार करणं, संगीतनिर्मिती, प्रमोशन्स, बँड म्हणून जगभर परफॉर्म करणं यात ही मुलं एवढी गुंतून गेली की थोडं थांबून एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आपल्याला नेमकं काय हवं आहे, कोणत्या दिशेने जायचं आहे याचा विचार करण्याएवढी उसंतच त्यांना मिळाली नाही. जूनमध्ये लष्करी सेवेबद्दल चर्चा सुरू होती तेव्हा ग्रुपचा लीडर आरएम त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर म्हणाला होता की, ‘मला एखादं रॅपिंग मशीन झाल्यासारखं वाटू लागलं आहे. के-पॉपबाबतीत एक समस्या आहे की, तुम्हाला सतत गीत-संगीताची निर्मिती करतच राहावं लागतं. पण या धबडग्यात प्रगल्भ होण्याएवढा वेळ मिळतच नाही. गेल्या १० वर्षांत माझं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. मला जगाला काही तरी द्यायचं आहे, पण काय ते मला अद्याप समजलेलं नाही. एक बँड म्हणून आम्ही नेमके कोणत्या दिशेने जातोय, हे या क्षणी तरी कळेनासं झालं आहे. थोडं थांबून यावर विचार करायला हवा असं वाटतंय…’

हेही वाचा… विश्लेषण: पावसात पुणे का तुंबते?

के-पॉपच्या लखलखत्या लोकप्रियतेमागची ही व्यथा फार बोलकी आहे. कदाचित या अनिवार्य लष्करी सेवेमुळे या गायक-वादकांनाही उसंत मिळेल. सततच्या स्टारडममधून काही काळासाठी बाहेर पडून सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळेल. तीन वर्षांत के-पॉप कुठे पोहोचलेलं असेल, बीटीएस खरंच पुन्हा एकत्र येईल का, आधीची लोकप्रियता पुन्हा मिळवू शकेल का, तेव्हा अर्थव्यवस्थेतलं त्यांचं स्थान काय असेल… अशा अनेक प्रश्नांबाबत आता तरी फक्त आडाखेच बांधता येतील. बाकी काही होवो न होवो, पण १६-१७व्या वर्षापासून संगीतनिर्मितीची यंत्र झालेल्या या सात तरुणांना शांतपणे स्वत:चं गाणं आणि आयुष्याविषयी विचार करण्याची उसंत तरी मिळेल…

vijaya.jangle@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is there so much discussion about south koreas bts band and its compulsory military training asj
First published on: 20-10-2022 at 10:15 IST