scorecardresearch

भगवा रंग निळ्याला मतदान करणार का?

आपल्याच जुन्या अडचणीच्या भूमिका सोडणारा एक पक्ष आणि प्रत्येक निवडणुकीत भूमिका बदलणारा दुसरा, असा सांधा जुळून येईल का, ही उत्तरे काळच देईल.

भगवा रंग निळ्याला मतदान करणार का?
भगवा रंग निळ्याला मतदान करणार का?

सुहास सरदेशमुख

प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू ही प्रतिमा राजकीय अर्थाने सोयीची, की बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र या प्रतिमेचे महत्त्व अधिक? या दोन्ही नात्यांचा समतोल राखत शिवसेनेची वाटचाल केली जाईल असा संदेश आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मतदरांसमोर स्पष्टपणे मांडला जात आहे. पडझडीनंतरच्या काळात सहानुभूती वाढत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे एका मंचावर येणे नव्या समीकरणाची नांदी ठरू शकेल. पण त्यातील संधी आणि धोके दोन्ही बाजूंनी सारखे नाहीत. मतांचे ध्रुवीकरण करणे आणि ती एकगठ्ठा मते एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला देताना युती किंवा आघाडीच्या नेतृत्वास खूप काळजी घ्यावी लागते. अन्यथा काय होते याचा अनुभव वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी मजलिस -ए- इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाबरोबर राजकीय मैत्री करताना घेतलेला आहे.

दिसते असे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मुस्लीम नेतृत्वाची उंची जाणीवपूर्वक परावलंबी ठेवली गेली. ना संख्यात्मक वाढ होऊ दिली ना मुस्लीम नेत्यांचा प्रभाव राहू दिला. समुदाय म्हणून असणारा एकजिनसीपणा मतांच्या ध्रुवीकरणात एकगठ्ठा राहील, याची काळजी घेतली गेली. त्यामुळे मुस्लीम समाजातून नेता उभा ठाकला नाही. मुस्लीम नेतृत्वाने कधी समाजाचे किंवा एकूण मुख्य राजकीय धारेत काही प्रश्न सोडविलेत असे दिसून आले नाही. डॉ. रफिक झकेरियांसारखी हाताच्या बोटावर मोजता येतील अशी उदाहरणे अपवादात्मक. मुस्लीम समाजातील नेतृत्व पुढे आणण्याचा विचार म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी ‘एमआयएम’बरोबर युती केली. बाबासाहेब आंबेडकरांचा नातू आणि दलित व बहुजन समाजाला जोडले गेलो तर सत्तेच्या शिडीवरची पायरी अधिक सुलभ होईल हे माहीत असल्याने ॲड्. असदोद्दीन ओवेसी यांनी तेव्हा युतीसाठी कमालीचा आग्रह दाखविला. वंचित बहुजन आघाडीने ‘एमआयएम’बरोबर युती केली. त्याचा लाभ मात्र त्यांना झाला नाही. उलट भाजपचा ‘ब’ चमू हा शिक्का त्यांच्यावर बसला. काँग्रेस नेत्यांच्या मते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १६ मतदारसंघांत त्याचा जोरदार फटका बसला, हे वास्तवही आहेच. मतांचे ध्रुवीकरण केल्यानंतर ती मते हव्या त्या पक्षाकडे फिरवता येतात, हे प्रकाश आंबेडकर यांनाही या युतीनंतर कळाले आहे. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर एकवटलेल्या दलित आणि बहुजन समाजाने एमआयएमला मतदान केले. पण मुस्लीम समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना मतदान केले नाही. अगदी सोलापूर मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांनाही त्याचा फटका बसला. पुढे युती तुटली. त्यामुळे आता नव्या युतीमध्ये वंचित बहुजनचे नेते ताकही फुंकून पिण्याच्या तयारीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या काळातील ‘हिंदुत्ववादी’ शिवसैनिकांची मते ‘प्रबोधनकारा’च्या विचारांच्या आधारे घडविणे हे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. एवढे दिवस ‘जय भवानी – जय शिवाजी’ च्या घोषणेनंतर घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही जयघोष तेवढ्याच उंच आवाजात व्हावा, हे रुजविण्याची गरज होतीच. ते आता होणार असेल तर त्याचे आंबेडकरी चळवळीकडून स्वागतच होईल. फक्त शंका उपस्थित केली जाते, भगव्या रंगात बुडालेला कार्यकर्ता निळ्या रंगाशी राजकीयदृष्टया एकरूप झालेल्या उमेदवारास मतदान करेल का ही. यापूर्वी शिवशक्ती- भीमशक्तीचा प्रयोग शिवसेनेकडून करण्यात आला होता. पण तो केवळ राजकीय व्यासपीठावर झेंडे मिरविण्यापुरताच राहिला. कारण आंबेडकरी चळवळीतील बहुतेकांना तेव्हा शिवसेना हे भाजपच्या हातचे खेळणे असून त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील धुरीण हाताळत आहेत, हे माहीत होते. ते प्रत्येक गावागावात पोहोचलेही होते. त्यामुळे आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा असणाऱ्या समाजाने शिवसेनेला फारसे जवळ केले नाही. आता सेनेतील बदल दिसू लागले आहेत. प्रतिमांमधील ‘आक्रमक हिंदुत्वा’चा परीघ आणि खरे हिंदुत्व याची व्याप्ती नव्याने तपासून पाहिली जात आहे. अशा काळात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे हे एका मंचावर आले आहेत. कदाचित त्यांची राजकीय युती झाली तर त्याचा फायदा महाविकास आघाडीतील पक्षांनाही होऊ शकतो.

नव्या घडामोडीनंतर प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणी करण्याची राष्ट्रवादीचीही तयारी असल्याचे अजित पवार यांनी नुकतेच जाहीर केले आहे. काँग्रेसबरोबरही वंचित बहुजन आघाडीची चर्चा सुरूच असते. पण त्यातून फारसे काही निघत नाही. जागा वाटपाच्या बोलण्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कमालीचे ताठर असतात, आणि बोलणी फिसकटतात, असे काँग्रेसकडून वारंवार सांगितले जाते. त्यामुळे आता बोलणी करण्यासाठीचा नवा सोयीचा मार्ग म्हणूनही शिवसेना- वंचितमधील नव्या घडामोडीकडे पाहिले जाते. नेत्यांच्या पातळीवर होणारी युती आणि मतांचे ध्रुवीकरण आणि अन्य पक्षाला होणारे त्याचे हस्तांतर यासाठी एक विचारधागा द्यावा लागतो. वंचित आघाडीबरोबर तो प्रबोधनकारांपर्यंत मागे जातो. परिणामी राजकीय पटलावर प्रबोधनकारांचे साहित्य, विचार याची चर्चा सुरू होईल. हेही नसे थोडके, अशी यामध्ये डाव्या विचारांच्या किंवा डाव्या विचारांच्या बाजूला असणाऱ्या सहानुभूतीदारांची इच्छा असू शकते.

पण असे मोठे राजकीय बदल कार्यकर्त्यांमध्ये घडवून आणता येतात का? व्यक्ती मनातून किती हिंसक असो, त्याला विचारांनी बदलवता येते याची उदाहरणे शोधण्यासाठी पुराणकाळात जाण्याची आवश्यकता नाही. गांधी युगातील म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील याचे एक उदाहरण आहे खान अब्दुल गफार खान यांच्या काळातील. ज्या पख्तून प्रांतात खैबरखिंडीतून येणाऱ्या प्रत्येक आक्रमकावर पहिल्यांदा हल्ला करा, अशी शिकवण दिली जात असे, त्या आफ्रिदी, पठाण जमातीमधील सहा-साडेसहा फूट उंचीच्या व्यक्ती हिंसेचा मार्ग सोडून देत महात्मा गांधींनी स्वीकारलेल्या अहिंसा चळवळीत सहभागी होत. ब्रिटिश सैन्य अंगावर चालून आले तरी ते त्याला प्रतिकार करीत नसत. ती हिंसा सहन करत. त्या काळी ‘सरहद्द गांधी’ यांच्या कार्यकर्त्यांना ‘रेड आर्मी’ म्हणले जायचे. पण हे परिवर्तन त्यांच्याच आणले कसे होते ? राजकीय लढ्याला भावनिक साद लागते. किंबहुना तीच त्याची ऊर्जा असते. तेव्हा ती ऊर्जा देण्यासाठी वापरली गेलेली व्याख्या होती- ‘शोषणाविरुद्धचा लढा म्हणजे धर्माची लढाई’. तेव्हा शोषण करणारा वर्ग जर ब्रिटिश असेल आणि त्याच्या विरोधात जर अहिंसा हे हत्यार असेल तर ते आपण धर्माची लढाई म्हणून वापरायला हवे, अशी त्यांची मांडणी होती.

त्या काळातील इंजिन आणि धर्माची लढाई उद्धव ठाकरे यांना सापडेल का, हे काळ ठरवेल. पण हिंदुत्वाचे छत्र जपत प्रबोधनकार समाजावून सांगणे हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षासमोरचे मोठे आव्हान आहे. हे सगळे घडण्याचा काळही संक्रमणाचा आहे. महाराष्ट्रात भाजप हा एकटा पडलेला पक्ष आहे. मनसेसारखा माध्यमी दंडात बेटकुळी दाखविणारा पक्ष वगळता त्याच्या बरोबर अन्य कोणताही पक्ष नाही. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातील मित्रांवर मताच्या राजकारणासाठी भाजपला अवलंबून राहता येईल, अशी स्थिती ‘५० खोके’च्या संदेशामुळे किती उपयोगी पडेल याविषयी शंका घेतल्या जात आहेत. अशा काळात विधानसभा निवडणुकीमध्ये ४० लाखांहून अधिक मते घेणारा एक पक्ष हातमिळवणीसाठी पुढे येण्याची तयारी दाखवू लागला आहे. त्याला प्रतिसाद देताना समाजात असणारी जातीयता, ती तोडण्याची तयारी असणारे हिंदू कार्यकर्ते तयार करणे असे अवघड काम शिवसेना करू शकेल काय, ही शंका वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे.

मतदानादिवशी दुपारी चारनंतर मतदान केंद्रावर लागणाऱ्या रांगांची लांबी वाढते. ती रांग २०१९ च्या निवडणुकीमध्ये कमी झाली होती. एखाद्या पक्षाला सर्वसामान्य माणूस पैसाही देतो हे गेल्या दोन निवडणुकांमधील चित्र वंचित बहुजन आघाडीलाही कायम ठेवता येईल का, अशी शंका दुसऱ्या बाजूचीही आहे. या सगळ्यात अनुत्तरित प्रश्न आहे, भगव्यातील माणसे निळ्या रंगाला मतदान करणार का? पण आपल्याच जुन्या अडचणीच्या भूमिका सोडणारा एक पक्ष आणि प्रत्येक निवडणुकीत भूमिका बदलणारा दुसरा, असा सांधा जुळून येईल का, ही उत्तरे काळच देईल.

suhas.sardeshmukh@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 09:56 IST

संबंधित बातम्या