बांगलादेशात १२ फेब्रुवारीला होणार्या सार्वत्रिक निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. बांगलादेश कुठल्या दिशेने जाणार, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या निवडणुकीसाठी बांगलादेशातील लोकांकडे मर्यादित पर्याय आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगला निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तो पक्ष सर्वधर्म, जातींना बरोबर घेऊन बर्यापैकी सर्वसमावेशक राजकारण करणारा आहे. अल्पसंख्याक हिंदू नेहमी अवामी लीगच्या सोबत राहिला आहे. अवामी लीग निवडणुकीच्या मैदानात नसल्याने मुख्य लढाई माजी पंतप्रधान खालेदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि जमात-ए-इस्लामी यांच्यात आहे.
गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी खालेदा झिया कालवश झाल्या. बांगलादेशच्या स्वातंत्र्य आंदोलनात शेख हसीना यांचे वडील बंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. त्यांची परंपरा आपण पुढे चालवत असल्याचा शेख हसीना यांचा दावा आहे. खालेदा झिया यांचाही बांगलादेशच्या स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंध होता. त्यांचे पती झिया-उर-रहमान पाकिस्तानच्या लष्करात बंड करून स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले होते. ते मुजिबूर रहमान यांचे विश्वासू सहकारी होते. मुजिबूर रहमान आणि बीएनपीचे संस्थापक झिया उर-रहमान दोघांच्या राजकारणात बंगाली भाषा आणि संस्कृतीला महत्त्व राहिले आहे. अवामी लीग बंगाली राष्ट्रवादाचा समर्थक आहे आणि त्यात धर्मनिरपेक्षता, बंगाली भाषा व संस्कृती आणि १९७१ चा मुक्तिसंग्राम महत्त्वाचे आहेत. तर बीएनपी बांगलादेशी राष्ट्रवादाला महत्त्व देते. त्यात इस्लामिक मूल्य आणि सार्वभौमत्वाला महत्त्व आहे. हा त्यांच्यातला फरक आहे. जमातने स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध करून पाकिस्तानची बाजू घेतली होती. बंगाली लोकांच्या हत्येत पाकिस्तानच्या लष्कराला जमातने मदत केली होती. शेख हसीना यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने दिलेल्या काही निकालानंतर जमातच्या काही नेत्यांना फाशी देण्यात आली होती. पाकिस्तानने जमातच्या नेत्यांना देण्यात आलेल्या फाशीचा निषेध केला होता. रवींद्रनाथ टागोर यांचे ‘आमार सोनार बांगला…’ हे बांगलादेशचे राष्ट्रगीत आहे. तर कवी नझरूल इस्लाम राष्ट्रीय कवी आहेत. त्यांच्या कविता शोषण आणि अमानवी व्यवस्थेच्या विरोधात आहेत.
नोबेल पारितोषिक विजेते डॉ. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील वर्तमान सरकार उघड उघड पाकिस्तानच्या बाजूने आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र धोरणात युनूस सरकारने हा मोठा बदल केला. तो करताना त्यांनी काही मुद्द्यांवर भारतावर टीका करायला सुरुवात केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि युनूस काही वेळा भेटले. उभय देशात १५ वर्षांनंतर गेल्या वर्षी परराष्ट्र सचिव स्तरावरील बैठक झाली. २०१२ नंतर पहिल्यांदा पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बांगलादेशचा दौरा केला. बांगलादेश अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदा दोन्ही देशांत समुद्र मार्गे व्यापाराची सुरुवात करण्यात आली. पाकिस्तानने बंगाली लोकांवर केलेल्या अत्याचाराबद्दल अजूनही माफी मागितली नसली तरी मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशला पाकिस्तानच्या एकदम जवळ नेले. पाकिस्तानच्या लष्कराने बांगलादेशच्या स्वातंत्र्य आंदोलनात जवळपास ३० लाख लोकांची हत्या केली होती आणि अडीच लाख महिलांवर बलात्कार करण्यात आले होते. बांगलादेश अस्तित्वात आल्यानंतर या महिलांच्या पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते.
मोहम्मद युनूस सरकारवर पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेण्यासाठी बीएनपी, तसेच विद्यार्थी आंदोलनाच्या नेत्यांनी स्थापन केलेल्या नॅशनल सिटिझन्स पार्टी (एनसीपी) आणि जमातचा दबावही आहे.
भारताने शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवावे, अशी युनूस सरकारने मागणी केली आहे. भारत-बांगलादेशात २०१३ मध्ये प्रत्यार्पण करार करण्यात आला होता आणि २०१६ मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली होती. किमान एका वर्षाची शिक्षा होऊ शकेल अशा दुसर्या देशाच्या आरोपीला, गुन्हेगारांना त्याच्या देशाच्या ताब्यात देण्याची त्यात तरतूद आहे. गेल्या वर्षी बांगलादेशच्या न्यायाधिकरणाने शेख हसीना यांनी मानवतेच्या विरोधात केलेल्या गुन्ह्याबद्दल मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. विद्यार्थी आंदोलनामुळे शेख हसीना ५ ऑगस्ट २०२४ रोजी आश्रयासाठी ढाकाहून भारतात पळून आल्या आणि तेव्हापासून त्या इथे आहेत. उभय देशातील प्रत्यार्पण करारात अशीही तरतूद आहे की संबंधित देशाला वाटले की एखाद्याचे प्रत्यार्पण केल्यास त्याला तिथे योग्य न्याय मिळणार नाही किंवा त्याचा राजकीय छळ केला जाईल तर त्याचे प्रत्यार्पण बंधनकारक नाही. आंतरराष्ट्रीय संकेतही तसाच आहे. दक्षिण आशियात शेख हसीना भारताच्या खर्या मित्र होत्या. या कारणांमुळेही भारत त्यांना बांगलादेशात पाठविणार नाही. आज बांगलादेशात शेख हसीना यांच्या विरोधात वातावरण आहे. भारताने शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवावे, हा तिथे निवडणुकीचा मुद्दा झाला आहे.
२५ डिसेंबर रोजी जवळजवळ १७ वर्षांनंतर खालेदा झिया यांचे सुपुत्र तारिक रहमान लंडनहून बांगलादेशला परतले. २००८ मध्ये ते देश सोडून पळून गेले होते. सीलहट येथे २२ जानेवारी रोजी निवडणूक प्रचाराच्या पहिल्या सभेत त्यांनी ‘ना दिल्ली, ना पिंडी (रावलपिंडी); बांगलादेश सर्वात आधी’ ही घोषणा दिली. इंग्लंडमध्ये राहण्याचा त्यांच्यावर प्रभाव निश्चित असणार. सर्वसमावेशक राजकारण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. अवामी लीगच्या विरोधात अनेक वर्षांपासून बीएनपी आणि जमातने एकत्र येऊन राजकारण केले आहे, सरकारही बनवले आहे. या वेळी मात्र बीएनपी आणि जमात एकमेकांच्या विरोधात आहेत. बीएनपीने एकूण ३०० मतदारसंघांपैकी २९२ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. तर जमातने १७९ आणि एनसीपीने ३० ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. जमात आणि एनसीपीत युती आहे. जमातबरोबर युती केल्यामुळे एनसीपीत फूट पडली आहे. त्याव्यतिरिक्त ५० जागा महिलांसाठी राखीव आहेत. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात त्याप्रमाणे त्या ५० जागा त्या त्या पक्षाला वाटून दिल्या जातील.
तारिक रहमान पुढचे पंतप्रधान होणार, असा वेगवेगळ्या सर्वेक्षणांचा आणि जनमत चाचण्यांचा अंदाज आहे. आईच्या मृत्यूची सहानुभूतीही त्यांना मिळू शकते. आपण पंतप्रधान होणार याचा त्यांनाही आत्मविश्वास आहे. परस्पर आदराच्या भावनेतून इतर राष्ट्रांशी संबंध ठेवण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. चीन आणि भारतातून बांगलादेशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाईल, अशी त्यांना आशा आहे. नद्यांच्या पाण्याच्या वाटपाचा मुद्दा भारत-बांगलादेशच्या संबंधात महत्त्वाचा राहणार आहे. त्याशिवाय शेख हसीना यांचा मुद्दा आहे. अलीकडे क्रिकेटच्या निमित्ताने बांगलादेशला अधिक जवळ करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. क्रिकेटमधल्या या वादाची सुरुवात बीसीसीआयने कोलकता नाइट रायडर्सला बांगलादेशचा मुस्तफिझुर रहमान याला मुक्त करण्याचा आदेश दिला तिथून सुरू झाली. कोलकता नाइट रायडर्सने त्याला मुक्त केल्यानंतर बांगलादेशने सुरक्षिततेचे कारण पुढे करून विश्वचषकातील त्यांच्या सर्व मॅच भारताच्या बाहेर इतर देशात खेळवण्याची मागणी केली. पाकिस्तानच्या सगळ्या मॅच श्रीलंकेत खेळल्या जाणार आहेत. बांगलादेशची मागणी आयसीसीने फेटाळून लावली. त्याला उत्तर म्हणून बांगलादेशने विश्वचषकावर बहिष्कार टाकला. राजकारण लक्षात ठेवून पाकिस्तानने बांगलादेशच्या समर्थनार्थ भारताविरुद्धची १५ फेब्रुवारीची मॅच न खेळण्याची घोषणा केली. बांगलादेशला अधिक जवळ करण्याचा पाकिस्तानचा हा प्रयत्न आहे. सुरक्षिततेचे कारण देऊन भारतात विश्वचषक क्रिकेट मॅच न खेळण्याचा बांगलादेशचा निर्णय भारताला आवडलेला नाही. बांगलादेशच्या क्रिकेटपटू मुस्तफिझुरच्या निमित्ताने सुरू झालेला वाद टाळता आला असता.
खालेदा झिया यांच्या अंत्ययात्रेत भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ढाका येथे गेले होते. त्यांनी तारिक यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र त्यांनी तारिक यांना दिले. तारिक व बीएनपीशी सतत संपर्क आणि संवाद ठेवणे महत्त्वाचे आहे. पाश्चात्त्य देशांनी आणि बांगलादेशच्या काही संस्थांनी घेतलेल्या जनमतात तारिक पुढचे पंतप्रधान असतील, असे आढळून आले आहे. जमात दुसर्या स्थानावर असेल आणि तो प्रभावी विरोधी पक्ष असणार, असाही जनमताचा निष्कर्ष आहे. अलीकडे तारिक यांनी ‘मुस्लीम, बौद्ध, हिंदू, ख्रिस्ती व अन्य धर्मांतील लोक बांगलादेशात राहत आहेत. सगळ्यांना एकत्र घेऊन आम्हाला सुरक्षित बांगलादेश बनवायचा आहे’ असे म्हटले आहे. भारताचे उच्चायुक्त प्रणय वर्मा हेदेखील तारिक यांना भेटले. आगामी सरकारशी संबंध सुधारताना शेख हसीना यांचा मुद्दा अडथळा ठरणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. जमातची वाढलेली ताकद भारतासाठी चिंतेची असू शकते.
लेखक शांततावादी कार्यकर्ते आहेत.
jatindesai123@gmail.com

