– डॉ. कृष्णा गायकवाड
कोणत्याही समाजाची प्रगती केवळ उंच इमारती, आधुनिक तंत्रज्ञान किंवा आर्थिक विकासाने मोजली जात नाही; तर त्या समाजात ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सन्मानावरूनही त्याचे मूल्यांकन होते. आयुष्यभर कुटुंब, समाज आणि राष्ट्रासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना वृद्धापकाळात सन्मान, सुरक्षितता आणि आधार मिळणे हा त्यांचा हक्क आहे. मात्र आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत अनेक ज्येष्ठ नागरिक उपेक्षा, एकाकीपणा आणि विविध प्रकारच्या अत्याचारांचे बळी ठरत आहेत. या गंभीर वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी १५ जून हा दिवस ‘जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिन’ म्हणून पाळला जातो. भारताने या दिवसाचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे, कारण २०११ च्या जनगणनेनुसार १० कोटी असणारी वृद्धांची संख्या येत्या दहा वर्षांत वाढून सन २०३६ मध्ये २३ कोटींवर पाेहोचेल, असा अधिकृत सरकारी अंदाज आहे. सध्या ही संख्या किमान १५.६ कोटी असावी, असा अंदाज आहे.
वृद्धांवरील अत्याचार हा केवळ शारीरिक छळापुरता मर्यादित नसतो. मानसिक त्रास, अपमानास्पद वागणूक, आर्थिक शोषण, मालमत्तेवर बळजबरीने ताबा मिळविण्याचे प्रयत्न, दुर्लक्ष, सामाजिक अलिप्तता आणि भावनिक छळ हे देखील अत्याचाराचेच प्रकार आहेत. अनेक वृद्धांना स्वतःच्या घरातच परकेपणाची भावना सहन करावी लागते. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांना स्थान दिले जात नाही, त्यांच्या अनुभवाकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्यांच्या भावना गौण मानल्या जातात.
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत संयुक्त कुटुंब व्यवस्था झपाट्याने कमी होत आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने तरुण पिढी शहरांकडे आणि परदेशाकडे वळत आहे. परिणामी अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या मुला-नातवंडांमध्ये राहूनही एकाकी जीवन जगत आहेत. घरात सर्व सुविधा असूनही बोलण्यासाठी, दुःख व्यक्त करण्यासाठी किंवा मन मोकळे करण्यासाठी कोणी नसणे ही वृद्धांसाठी मोठी शोकांतिका ठरत आहे.
विशेषतः उच्च शिक्षण, नोकरी आणि उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने देश-विदेशात स्थायिक झालेल्या अनेक कुटुंबांमध्ये भावनिक दुरावा वाढताना दिसत आहे. आयुष्यभर कष्ट करून मुलांना घडविणाऱ्या आणि त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचविणाऱ्या पालकांना वृद्धापकाळात मात्र एकाकीपणाचा सामना करावा लागत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये अशा घटना समोर आल्या आहेत की, वृद्ध पालकांच्या निधनानंतर त्यांची मुले परदेशातून वेळेवर पोहोचू शकली नाहीत आणि शेजारी, नातेवाईक किंवा सामाजिक संस्थांनाच अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडावी लागली. आर्थिक प्रगती आणि भौतिक सुखसोयींच्या शर्यतीत मानवी नात्यांची ऊब हरवत चालली आहे का, असा प्रश्न या घटनांमुळे उपस्थित होतो.
ग्रामीण भागातील परिस्थिती देखील काही फार वेगळी नाही. शेती, जमीन, घर किंवा वारसाहक्काच्या वादांमुळे अनेक वृद्ध पालकांना मानसिक त्रास दिला जातो. काही ठिकाणी स्वतःच्या मुलांविरुद्ध पोलीस ठाणे, तहसील कार्यालय किंवा न्यायालयात धाव घेण्याची वेळ ज्येष्ठ नागरिकांवर येते. आयुष्यभर मुलांसाठी झटलेल्या आई-वडिलांना वृद्धापकाळात न्याय मागावा लागणे ही कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी चिंतेची बाब आहे.
वृद्धाश्रमांची वाढती संख्या देखील समाजातील बदलत्या वास्तवाची साक्ष देत आहे. काही ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या इच्छेने वृद्धाश्रमात राहत असले तरी अनेकांना कौटुंबिक परिस्थितीमुळे तेथे जावे लागते. आपल्या मुलांच्या सहवासात जीवनाची संध्याकाळ घालविण्याची अपेक्षा असलेल्या व्यक्तींना अपरिचित वातावरणात राहावे लागणे ही वेदनादायी बाब आहे.
ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे ओझे नसून अनुभव, संस्कार आणि जीवनमूल्यांचे जिवंत विद्यापीठ आहेत. त्यांच्या अनुभवातून अनेक संकटांवर मार्ग सापडू शकतो. त्यांनी दिलेले संस्कार आणि त्याग यांमुळेच आजची पिढी घडली आहे. त्यामुळे वृद्धांकडे दयेने नव्हे तर आदराने पाहण्याची आवश्यकता आहे.
भारतात ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी विविध कायदे आणि तरतुदी अस्तित्वात आहेत. मात्र केवळ कायदे करून समस्या सुटत नाहीत. त्यासाठी समाजात संवेदनशीलता, कुटुंबात संवाद आणि मनामनात कृतज्ञतेची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. वृद्धांचा सन्मान हा कायद्याचा नव्हे तर संस्कारांचा विषय आहे.
आज आपण ज्या ज्येष्ठांकडे पाहत आहोत, उद्या आपणही त्याच वयात पोहोचणार आहोत. त्यामुळे वृद्धांना सन्मान, प्रेम, सुरक्षितता आणि भावनिक आधार देणे ही काळाची गरज आहे. ज्या समाजात ज्येष्ठांच्या अनुभवाला किंमत दिली जाते, त्यांच्या हक्कांचे रक्षण केले जाते आणि त्यांना सन्मानाने जगण्याची संधी दिली जाते, तोच समाज खऱ्या अर्थाने प्रगत आणि संस्कारित मानला जातो.
ज्यांनी आपल्याला बोट धरून चालायला शिकवले, संकटात आधार दिला आणि आयुष्य घडवले, त्या आई-वडिलांना वृद्धापकाळात एकटे सोडणे ही केवळ वैयक्तिक चूक नाही; तर ती समाजाच्या संवेदनशीलतेवरील प्रश्नचिन्ह आहे. वृद्धांचे अश्रू हे कोणत्याही समाजाच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह उभे करतात, तर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हे त्या समाजाच्या संस्कृतीचे सर्वात मोठे प्रमाणपत्र असते.
लेखक मुक्ताईनगर येथील श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात सहायक प्राध्यापक आहेत.
krishnagaikwad753@gmail.com
