शीतल शिंदे-जाधव
अन्नातील जंतू, विषाणू, परजीवी, रासायनिक प्रदूषके किंवा अयोग्य हाताळणीमुळे अन्न दूषित होऊ शकते. ‘विश्व अन्न सुरक्षा दिना’च्या (७ जून) पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षेविषयी जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे…
अन्न हे प्रत्येकाच्या जीवनाचा मूलभूत आधार आहे. निरोगी जीवनासाठी सुरक्षित, पौष्टिक आणि गुणवत्तापूर्ण अन्न मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. मात्र आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या शहरीकरणामुळे अन्नसुरक्षेसमोर अनेक नवीन आव्हाने निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि अन्न व कृषी संघटना (एफएओ) यांच्या पुढाकाराने दरवर्षी ७ जून रोजी ‘विश्व अन्न सुरक्षा दिन’ साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश अन्नसाखळीच्या प्रत्येक टप्प्यावर अन्नसुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करणे आणि सुरक्षित अन्नाबाबत जनजागृती करणे हा आहे.
यावर्षीचा जागतिक अन्न सुरक्षा दिन ‘फ्रॉम बर्डन टू सोल्युशन सेफ फूड एव्हरीव्हेअर’ या संकल्पनेवर आधारित आहे. अन्नजन्य आजारांचे वाढते ओझे कमी करून सुरक्षित अन्न सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी केवळ माहिती गोळा करणे नव्हे तर त्या माहितीचा उपयोग करून प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक असल्याचा संदेश यावर्षीच्या विषयातून देण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार दरवर्षी लाखो लोकांना असुरक्षित अन्नामुळे २०० हून अधिक प्रकारचे आजार होतात. अन्नातील जंतू, विषाणू, परजीवी, रासायनिक प्रदूषके किंवा अयोग्य हाताळणीमुळे अन्न दूषित होऊ शकते. त्यामुळे अन्न विषबाधा होऊन अनेक आजार होऊ शकतात तसेच काही दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात. विशेषतः लहान मुले, गर्भवती, वृद्ध व्यक्ती आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना याचा अधिक धोका असतो. त्यामुळे सुरक्षित अन्न ही केवळ आरोग्याची गरज नसून सार्वजनिक आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तयार अन्नपदार्थ, फास्ट फूड, ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वेळेची कमतरता आणि सोयीसुविधांमुळे हे पर्याय लोकप्रिय झाले असले तरी अन्नसुरक्षेच्या दृष्टीने काही धोकेही वाढले आहेत. अनेक वेळा अन्नाची अयोग्य पद्धतीने साठवणूक, अपुरी स्वच्छता, दूषित पाणी, चुकीची हाताळणी किंवा तापमान नियंत्रणाचा अभाव यामुळे अन्न असुरक्षित ठरते.
रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या बाबतीत स्वच्छतेचा अभाव, उघड्यावर ठेवलेले अन्न, वारंवार वापरलेले तेल आणि दूषित पाण्याचा वापर यामुळे अन्न दूषित होण्याचा धोका वाढतो. फास्ट फूड आणि जंक फूडमध्ये जास्त प्रमाणात मीठ, साखर आणि चरबी असते, त्यामुळे आरोग्यावर दीर्घकाळ टिकणारे दुष्परिणाम होऊ शकतात. ऑनलाइन फूड डिलिव्हरीमध्ये अन्न तयार झाल्यानंतर ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत योग्य तापमान राखले गेले नाही तर सूक्ष्मजीवांची वाढ होण्याची शक्यता असते. तसेच पॅकेज्ड आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, खराब पॅकेजिंग किंवा कालबाह्य झालेल्या उत्पादनांचा वापर केल्यास अन्नसुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
अशा परिस्थितीत ग्राहकांनी अधिक जागृत होणे गरजेचे आहे. कोणतेही पॅकेज्ड अन्न खरेदी करताना त्यावरील उत्पादनाची तारीख, कालबाह्यता तारीख, घटकांची यादी, पोषणमूल्ये आणि साठवणुकीच्या सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. पॅकेजिंग फाटलेले, फुगलेले किंवा खराब दिसत असल्यास असे पदार्थ खरेदी करणे टाळावे. तसेच अन्न उत्पादक किंवा विक्रेत्याकडे वैध एफएसएसएआय परवाना आहे का याचीही खात्री करावी.
फास्ट फूड किंवा ऑनलाइन डिलिव्हरीद्वारे अन्न मागवताना विश्वासार्हतेचे आणि स्वच्छतेचे निकष पाळणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंटची निवड करणे आवश्यक आहे. गरम अन्न गरम आणि थंड अन्न थंड अवस्थेतच सेवन करावे. अन्न बराच वेळ उघडे ठेवणे टाळावे. वारंवार प्रक्रिया केलेले अन्न खाण्यापेक्षा शक्य तितके ताजे आणि घरी तयार केलेले अन्न सेवन करण्यावर भर द्यावा.
अन्नसुरक्षेची जबाबदारी केवळ ग्राहकांची नाही तर अन्न उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री करणाऱ्या प्रत्येक घटकाची आहे. अन्न उद्योग, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्य विक्रेत्यांनी चांगल्या उत्पादन पद्धती (जीएमपी), चांगल्या स्वच्छता पद्धती (जीएचपी) आणि एचएसीसीपी सारख्या अन्नसुरक्षा व्यवस्थापन प्रणालींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. सुरक्षित आणि दर्जेदार कच्चा माल वापरणे, स्वच्छ पाणी वापरणे, अन्न योग्य तापमानात साठवणे, कच्चे आणि शिजवलेले पदार्थ वेगळे ठेवणे, तेलाचा वारंवार पुनर्वापर टाळणे तसेच कर्मचाऱ्यांना नियमित अन्नसुरक्षा प्रशिक्षण देणे या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
आजच्या जीवनशैलीत फक्त जागरूकता पुरेशी नाही, तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. शासन, शेतकरी, उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक यांनी अन्नसाखळीतील आपापली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. ‘फार्म टू फोर्क’ अर्थात शेतापासून थेट ताटापर्यंत अन्नसुरक्षेचे तत्त्व पाळल्यास अन्नजन्य आजारांचे प्रमाण कमी करता येऊ शकते.
यावर्षीच्या ‘फ्रॉम बर्डन टू सोल्युशन सेफ फूड एव्हरीव्हेअर’ या संकल्पनेचा खरा अर्थ म्हणजे समस्येची केवळ चर्चा न करता त्यावर उपाय शोधणे आणि अंमलात आणणे. सुरक्षित अन्न ही केवळ निवड नसून निरोगी जीवनाची गरज आहे. ग्राहक, विक्रेते, उत्पादक आणि शासन यांनी एकत्रितपणे अन्नसुरक्षेला प्राधान्य दिल्यास अन्नजन्य आजारांचे ओझे कमी होईल आणि सुरक्षित, निरोगी व समृद्ध समाजाच्या निर्मितीकडे आपण निश्चितपणे वाटचाल करू शकू.
shindeshital518@gmail.com
(लेखिका पोषण आणि अन्नप्रक्रिया अभ्यास आहेत.)
