संयुक्त राष्ट्र संघाने मार्च २०२६ मध्ये ‘वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स रिपोर्ट’ अर्थात जागतिक आनंद निर्देशक अहवाल २०२६ जाहीर केला आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने २०१३ पासून २० मार्च हा दिवस जगभरात जागतिक आनंद दिन म्हणून साजरा केला जात असतो. त्या पार्श्वभूमीवर दरवर्षी अभ्यासपूर्वक हा अहवाल सादर केली जातो.
जागतिक आनंद दिन साजरा करण्यामागे तसेच असा जागतिक अहवाल तयार करण्यामागे आनंद हा माणसाचा मूलभूत हक्क आहे, मानवी कल्याणासाठी तो आवश्यक आहे हे गृहीततत्त्व आहे. मानवी जीवनामध्ये आनंदाचे महत्त्व पटवून देणे आणि वाढवणे, आनंदाच्या निर्मितीसाठी जागतिक पातळीवर शांततापूर्ण सहजीवनाच्या भूमिकेला प्रोत्साहन देणे, आणि जगातील अब्जावधी लोकांना कल्याणाचा मार्ग दाखवणे हा यामागील हेतू आहे.याअहवालाने २०२६ साठी मध्यवर्ती संकल्पना ‘काळजी घेणे आणि वाटून घेणे’(Care and Share) अशी घेतली आहे.
२०२६ चा अहवाल अर्थातच २०२५ या वर्षातील माहितीच्या आधारे तयार केला गेला आहे. या अहवालात १४७ देशांच्या यादीत भारताचे स्थान ११६ वे आहे. गतवर्षी ते ११८ वे होते. खरेतर आपण जनतेच्या आनंदात भर घालण्यासाठी कोणतेही प्रयत्न न करताही आपली दोन अंकांनी प्रगती कशी झाली, याचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने समिती नेमली पाहिजे. या यादीत पाकिस्तान आपल्यापुढे १२ अंकांनी म्हणजे १०४ या स्थानावर आहे. तर नेपाळ ९९ व्या स्थानी आहे. या निर्देशांक अहवालानुसार सलग नवव्या वर्षी फिनलँड जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे, तर पहिल्या पाचमध्ये फिनलँड पाठोपाठ आइसलँड, डेन्मार्क, कोस्टारिका आणि स्वीडन हे देश आहेत. तर अफगाणिस्तान, सिएरालिओन, मलावी, झिम्बाब्वे, बोत्सवाना हे तळातील पाच देश आहेत.
आनंद या शब्दाबरोबरच समाधान, शांतता, प्रसन्नता या भावना येतात. आनंद केवळ बाह्यरंगावर अवलंबून नसतो तर तो अंतरंगी असण्याला महत्त्व असते. जीवनाची अर्थपूर्णता, जीवनाचे मूल्य याची जाण आनंदासाठी आवश्यक असते. जागतिक आनंद निर्देशांक ठरवत असताना त्या देशाचे दरडोई उत्पन्न (जीडीपी), कौटुंबिक व सामाजिक परिस्थिती, सरासरी आयुर्मान, नागरिक म्हणून उपभोगता येणारे स्वातंत्र्य, सामाजिक औदार्य, भ्रष्टाचाराबद्दलचे लोकमत असे विविध घटक विचारात घेतले जातात. केवळ आर्थिक वाढ अथवा अर्थव्यवस्थेचा फुगवटा नागरिकांच्या मनात आनंद निर्माण करत नसतो. तर त्यामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक समन्यायी परिस्थितीही महत्त्वाची असते. आणि सुशासनाचेही महत्त्व असते. असे हा अहवाल दाखवून देतो.
या निमित्ताने आपण या अहवालाकडे अधिक गांभीर्याने पाहिले पाहिजे. भारतीय समाजजीवनात वेगाने बदल होत आहेत. सामाजिक आणि आर्थिक जीवनातील स्तरात्मकता कमालीच्या वेगाने व विषमतेने वाढत आहे. कल्याणकारी व्यवस्था मोडकळीस येत आहे. महागाईपासून बेरोजगारीपर्यंत अनेक समस्यांत वाढ होत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिस्थितीत आपण देश म्हणून काही धोरणे बदलत आहोत. भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे, पण जगामध्ये सर्वाधिक हातांना काम देणारा देश आपला आहे का, अशा अनेक कारणांमुळे आपला आनंद निर्देशांक इतका खालावतो आहे का, याचा विचार केला पाहिजे. खरा आनंद केवळ स्वतः खिखी करण्यात नसतो. तो इतरांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटावी असा वर्तन व्यवहार करण्यात असतो.
२०२६ च्या अहवालाचे जे काही निष्कर्ष आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे समाजमाध्यमांच्या अतिवापरामुळे अनेक देशांतील लोकांचा आनंद झाकोळला आहे आणि मानसिकस्थिती बिघडली आहे हा आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या भारताची आहे त्यामुळे साहजिकच समाजमाध्यमांच्या वापरातही आपण अग्रभागी आहोत. म्हणूनच आपण व्यक्ती समाज आणि राष्ट्र म्हणून या माध्यमाच्या अतिवापराकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे असे वाटते.
कारण आधुनिकीकरणाच्या नव्या संकल्पनेत कोट्यवधी लोकांचा ‘स्क्रीन टाईम’ मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. तसेच सतत व्यग्र असल्याच्या, कामाचा ताण असल्याच्या, दमून जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. मात्र या तक्रारींना आपण स्वतः जबाबदार किती? याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘डेटा दीड जीबी आणि सारा गाव बीझी’ ही नवी म्हण आता समाजजीवनात रूढ झाली आहे. परिणामी इंटरनेटचा अतिवापर होत आहे. तो कामापेक्षा बिनकामाचा जास्त आहे. मोबाइलवर गेम खेळणे, रील्स पाहणे, मालिका पाहणे यामध्ये दिवसातील तासनतास वाया घालवले जात आहेत. यात अबाल-वृद्ध -स्त्री-पुरुष अशा साऱ्यांचा समावेश आहे.
आपल्या कुटुंबातील माणसांकडे दुर्लक्ष करून मोबाइलवरील आभासी जीवनात स्वतःला व्यग्र ठेवणे हे गंभीर मानसिक अनारोग्याचे लक्षण आहे. आपल्या स्टेटसचा विचार करण्याऐवजी दुसऱ्याचे स्टेटस पाहण्यात अनावश्यक वेळ खर्च केला जात आहे. स्वतःकडे पाहण्याऐवजी दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावणे हा प्रकार वाढत आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे एकाकीपणा आणि चिडचिड यामध्ये कमालीची वाढ होत आहे. डोळ्यांसह आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होत आहेत. व्यायामासाठी वेळ नाही म्हणणारे अनेकजण दिवसातील पाच-सहा तास मोबाइलमध्ये सहजपणे मग्न असतात हे वास्तव आहे. जीबी संपवण्यालाच बिझी म्हणत राहणे शहाणपणाचे नाही. तर ते आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे आहे.
कोट्यवधी मानवी तास कौटुंबिक-सामाजिक संवादाऐवजी, श्रमाऐवजी, संपत्तीनिर्मितीऐवजी एकाकीपणा ओढवून घेण्यात आणि माणूस म्हणून खिळखिळे होण्यात खर्च होत असतील तर हे अतिशय उग्र स्वरूपाचे राष्ट्रीय संकट आहे. या साऱ्यातून मोठे प्रश्न निर्माण होत आहेत असे तज्ज्ञ सांगत आहेत. मोबाइलचे व्यसन हा एक वाढता गंभीर आजार होऊन घराघरात शिरले आहे. मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांत स्क्रीनवर अधिक वेळ घालवणाऱ्यांचे प्रमाण अतिशय वाढलेले आहे. तेव्हा प्रत्येकाने या गोष्टीचा अधिक गांभीर्याने विचार केला पाहिजे. दिवसभरातील आपला वेळ नेमका कुठे खर्च होतो? त्यातून निष्पन्न काय होते? आपण खरंच अतिश्रमाने त्रस्त आहोत का? आपण खरे श्रम किती? आणि श्रमपरिहार म्हणून विरंगुळा मिळवण्यासाठी मोबाइलवर घालवलेले तास किती याचा विचार करण्याची गरज आहे. कारण हा धोका व्यक्ती, कुटुंब आणि समाजाला टप्प्याटप्प्याने ग्रासत चालला आहे. जागतिक आनंद अहवाल जेव्हा समाजमाध्यमांमुळे आपण आपला आनंद गमावत आहोत असे सांगतो त्यावेळी त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीचे कार्यकर्ते आहेत.)
prasad.kulkarni65@gmail.com
