दिल-ए-नादान, तुझे हुआ क्या है? आखिर, इस दर्द की दवा क्या है?

मिर्झा गालिब यांचा हा प्रसिद्ध शेर केवळ प्रेम आणि भावनांपुरताच मर्यादित नाही, तर आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या युगात आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठीही तो तितकाच चपखल बसतो. ‘दिल’, ‘हृदय’ किंवा ‘हार्ट’ हा कोणत्याही सहृदय माणसाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या शरीरातील हा असा अद्भुत अवयव, जो जन्मापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत एका क्षणाचीही विश्रांती न घेता अविरत धडधडत असतो. आपल्याला आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या अशा सगळ्याच घटनांची, भावनांची नोंद हे हृदय घेत असते. जोपर्यंत हे हृदय धडधडते तोपर्यंतच आपल्या आयुष्याला आणि या संसाराच्या व्यापाला अर्थ असतो. एकदा का ही धडधड थांबली, की मागे उरतो तो केवळ निष्प्राण देह. हृदय जर अचानक थबकले, तर आपले अस्तित्वच क्षणात संपुष्टात येते. याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. २९ सप्टेंबर रोजी जगभरात ‘जागतिक हृदय दिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आपल्या जिवंतपणाची साक्ष देणाऱ्या हृदयाच्या सद्यस्थितीबद्दल आत्मपरीक्षण करणे काळाची गरज आहे.

आपल्या आयुष्यातील हृदयाचे अनन्यसाधारण स्थान आपण जाणतो, पण आपण त्याच्या जिवंतपणाला आणि आरोग्याला महत्त्व देतो का? हृदयविकाराने अकाली मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या पाहिली, तर आपण आपल्या हृदयावर मनापासून प्रेम करतो असे छातीठोकपणे म्हणता येणार नाही. हृदयावर केवळ भावनिक प्रेम करणे वेगळे आणि त्याची शास्त्रीय काळजी घेणे पूर्णतः वेगळे. आज आपण स्वतःचा मोबाइल, संगणक, दुचाकी किंवा चारचाकी अशा निर्जीव वस्तूंना जरासा ओरखडाही येऊ नये म्हणून किती काळजी घेतो, वेळेवर सर्व्हिसिंग, कव्हर, स्क्रीनगार्ड सारे काही करतो. परंतु, आपल्या शरीराला अविरत प्राणवायू पुरवणाऱ्या हृदयाच्या कुरबुरीकडे, लहान-सहान लक्षणांकडे आपण तितके लक्ष देतो का? याचे उत्तर दुर्दैवाने ‘नाही’ असेच मिळते.

भयावह आकडेवारी : भारतासमोरील मोठे आव्हान

भारत हा एक विकसनशील देश आहे. आजही आपल्या देशातील कानाकोपऱ्यात प्राथमिक आणि अत्यावश्यक आरोग्य सुविधा पूर्ण क्षमतेने पोहोचू शकलेल्या नाहीत. अत्याधुनिक रुग्णालये, प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टर्स, जलद दळणवळणाची साधने आणि रुग्णवाहिकांची उपलब्धता ग्रामीण भागात आजही अपुरी आहे. भारत हा खेड्यांचा देश असल्याने, ग्रामीण भागातील गंभीर रुग्णाला वेळेत शहरात आणेपर्यंत बऱ्याचदा उशीर होतो आणि रुग्णाला आपला जीव गमवावा लागतो.

हृदयरोगाची आकडेवारी अंगावर शहारे आणणारी आहे. भारतात २०१५ मध्ये हृदयरोगाने मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण सुमारे २१ लाख इतके होते. आज ही संख्या प्रचंड वेगाने वाढत जाऊन ३० लाखांच्या पार पोहोचली आहे. नामांकित वैद्यकीय नियतकालिक ‘द लॅन्सेट’च्या अहवालानुसार, १९७० सालापासून भारतात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, २०३० पर्यंत जगभरात या रुग्णांची संख्या २.३ कोटी (२३ दशलक्ष) इतकी प्रचंड वाढेल, जी संपूर्ण ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक असेल.

कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील एखादा तरुण किंवा कर्ती व्यक्ती जेव्हा हृदयविकाराच्या धक्क्याने जगाचा निरोप घेते, तेव्हा मागे उरलेल्या आप्तस्वकीयांच्या मनाची अवस्था शब्दांत मांडता येत नाही. फार पूर्वी असा एक सर्वसाधारण समज होता की हृदयविकार हा केवळ साठी किंवा सत्तरी पार केलेल्या वृद्धांनाच होतो. तो केवळ श्रीमंत, ऐषारामी जीवन जगणाऱ्या किंवा सुखवस्तू कुटुंबातील लोकांचाच आजार आहे, असाही समज होता. मात्र, गेल्या काही दशकांत हे सारे समज खोटे ठरले आहेत. आज हृदयविकाराने जीव गमावणाऱ्यांची वयोमर्यादा विशी-तिशीपर्यंत खाली आली आहे. जिममध्ये घाम गाळणारे तरुण असोत की आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे व्यावसायिक, अचानक हृदयविकाराचा झटका येऊन कोसळल्याच्या घटना रोज समोर येतात. खेड्यापाड्यांत, कष्टकरी व गोरगरीब वर्गामध्येही हा आजार मोठ्या प्रमाणावर डोकावताना दिसतो. यात पुरुषांचे प्रमाण अधिक असले, तरी महिलांमधील प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढले आहे. पूर्वी स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतरच हृदयविकाराचा धोका उद्भवतो असे मानले जात होते. परंतु, बदलत्या आधुनिक जीवनशैलीमुळे स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कॉर्पोरेट जगतात वावरत आहेत. कामाचा ताण, वाढत्या कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या, अपुरी झोप आणि व्यसनाधीनतेचा शिरकाव यामुळे महिलांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.

हृदयरोगाची प्रमुख कारणे

या समस्येच्या मुळाशी आपली ‘फास्ट’ आणि विकृत जीवनशैली. प्रचंड ताणतणावामुळे आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळे व तेही आधीच साध्य करायचे या अट्टहासापायी तरुणाई स्वतःला कामात झोकून देत आहे. ‘टार्गेट’ पूर्ततेची टांगती तलवार मनावर सतत ताण निर्माण करते. शारीरिक हालचालींचा अभाव, बैठी जीवनशैली आणि जंक फूडचे सेवन यामुळे लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणा हे हृदयरोगाचे मोठे कारण आहे. मात्र, कृश किंवा सडपातळ व्यक्तीला हृदयविकार होणारच नाही, हा समजही चुकीचा आहे. अपुरी झोप आणि प्रदूषण, कामाच्या अनियमित वेळा आणि समाजमाध्यमांमुळे पुरेशा गाढ झोपेचा अभाव आहे. वातावरणातील प्रदूषणही रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम करते. व्यसनाधीनता खास करून मद्यपान, सिगारेट, तंबाखू, गुटखा ही व्यसने थेट मृत्यूच्या दारात ओढून नेणारी आहेत.

‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया,

हर फिक्र को धुएं में उडाता चला गया…’

या गाण्याप्रमाणे सिगारेटच्या धुराच्या वलयांत आयुष्याचा धूर कधी होतो, हे व्यसनी व्यक्तीला समजतच नाही. यामुळे केवळ स्वतःचेच नव्हे, तर निष्पाप कुटुंबाचे आयुष्यही धोक्यात येते. तसेच मेटाबॉलिक सिंड्रोम, उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल हे आजार हातात हात घालून शरीरावर हल्ला करतात. यातील ८० टक्के विकार वेळेवर निदान व योग्य जीवनशैलीने नियंत्रित ठेवता येतात.

स्वभाव वैशिष्ट्ये आणि हृदयविकार

वैद्यकीय मानसशास्त्रानुसार माणसाच्या स्वभावाचे प्रामुख्याने दोन प्रकार आढळतातः

टाईप ‘ए’ स्वभाव : ही माणसे अत्यंत तापट, चिडचिडी, कमालीची महत्त्वाकांक्षी, अवास्तव ध्येयवादी आणि प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मर्जीनुसारच झाली पाहिजे असा हट्ट धरणारी असतात. ती स्वतः तर ताण घेतातच, पण इतरांनाही तणावाखाली ठेवतात. अशा व्यक्तींना उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका कित्येक पटीने जास्त संभवतो.

टाईप ‘बी’ स्वभाव :- ही माणसे नेहमी समाधानी, हसतमुख, शांत आणि प्रसंगांना निर्धास्तपणे सामोरे जाणारी असतात. त्यामुळे त्यांच्यावर ताणतणावाचा परिणाम कमी होतो आणि त्यांच्यात हृदयरोगाचे प्रमाण कमी आढळते.

आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि ‘गोल्डन अवर’

आपल्या देशात आरोग्याबाबत जनजागृतीची मोठी दरी आहे. २०१६ च्या एका पाहणीनुसार, शहरांमधील केवळ ५८ टक्के डॉक्टर्स हे रीतसर पदवीधारक आहेत, तर उर्वरित बोगस किंवा अर्धवट प्रशिक्षित डॉक्टरांच्या हाती रुग्णांचे भविष्य असते. ग्रामीण भागांत ही स्थिती अधिक बिकट असून केवळ १९ टक्के डॉक्टरच प्रशिक्षित आहेत. साध्या ईसीजी चाचणीचे अचूक निदान करण्याची क्षमताही अनेक प्राथमिक स्तरावर नसते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या अहवालानुसार, भारतातील आठ टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरच नाहीत, तर ६१ टक्के आरोग्य केंद्रे केवळ एकाच डॉक्टरच्या खांद्यावर सुरू आहेत. ‘गोल्डन अवर’ म्हणजेच हृदयविकाराचा झटका आल्यानंतरचा पहिला एक तास हा वैद्यकीय शास्त्रात ‘गोल्डन अवर’ मानला जातो. या पहिल्या एका तासात रुग्णाला योग्य प्रथमोपचार आणि वैद्यकीय मदत मिळाली, तर त्याचा मौल्यवान जीव वाचू शकतो. छातीत दुखणे, डाव्या हातात कळ येणे, अचानक अस्वस्थ वाटून थंड घाम येणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन ॲस्पिरिन (Aspirin) किंवा सॉर्बिट्रेट (Sorbitrate) सारख्या गोळ्या दिल्या गेल्यास रुग्णालयात पोहोचेपर्यंतची तीव्रता कमी करता येते.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?

हृदयविकारापासून स्वतःला आणि कुटुंबाला दूर ठेवायचे असेल, तर खालील सवयींचा दैनंदिन जीवनात अंगीकार करावा लागेल. शारीरिक आणि मानसिक संतुलनअसणे फार महत्वाचे असून मन आनंदी आणि प्रसन्न ठेवल्यास तणाव दूर राहतो. कामाच्या व्यापातून स्वतःचे छंद जोपासणे हे मनासाठी उत्तम औषध आहे. नियमित व्यायाम व योगासने जसे दररोज किमान ३० ते ४५ मिनिटे वेगाने चालणे, प्राणायाम आणि योगासने केल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते. सकस आणि संतुलित आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असावा. तेलकट, तुपकट, अतिगोड आणि फास्ट फूडचे दुष्परिणाम लहानपणापासूनच मुलांना समजावून सांगितले पाहिजेत. व्यसनांना पूर्ण नकार देऊन मद्यपान, धुम्रपान आणि तंबाखूचे सेवन पूर्णपणे थांबवणे गरजेचे आहे.

वयाच्या चाळिशीनंतर वर्षातून किमान एकदा रक्तदाब, साखर आणि ईसीजीची तपासणी अवश्य करावी.

‘आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं,

सामान सौ बरस का है, पल की खबर नहीं।’

माणूस आयुष्यभर संपत्ती, मालमत्ता आणि पदवी व प्रसिद्धी मिळवण्याच्या मागे धावतो; पण पुढच्या क्षणी काय घडेल याची कोणालाच खात्री नसते. केवळ पैशाने किंवा प्रतिष्ठेने मोठे होण्यापेक्षा वयाने मोठे होताना शरीर आणि मन निरोगी ठेवणे ही खरी श्रीमंती आहे.

‘डोंट मिस द बीट’ : एक सामाजिक चळवळ

यावर्षीच्या जागतिक हृदय दिनाचे घोषवाक्य ‘डोंट मिस द बीट’ असे आहे. म्हणजेच आपल्या हृदयाच्या ठोक्यांची जाणीव ठेवा, त्याच्या स्पंदनांकडे दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी आपण सर्वांनी एक सामाजिक चळवळ उभी केली पाहिजे. समाजमाध्यमांवर केवळ निरर्थक गोष्टी शेअर करण्यापेक्षा फिटनेसचे संदेश, व्यायाम करतानाचे व्हिडिओ आणि आरोग्याविषयी जनजागृती पसरवूया.

‘हृदय स्वस्थ, तर जीवन मस्त।’

हृदयाच्या या प्रेमळ स्पंदनांचा ठेका कायम ठेवण्यासाठी आजच स्वतःवर आणि स्वतःच्या हृदयावर प्रेम करायला शिकूया. ‘दिल से दिल तक’ हा संदेश पोहोचवून प्रत्येकाच्या हृदयाला सांभाळण्याचा संकल्प करूया !

(लेखक ‘असोशिएशन फिजिशियन्स ऑफ इंडिया, विदर्भ’चे पूर्वाध्यक्ष आहेत.)

ashok50wasalwar@gmail.com