२५ सप्टेंबर हा जागतिक औषधतज्ज्ञ दिवस. त्यानिमित्त ‘आरोग्यदायी भविष्यासाठी औषधतज्ज्ञांना सक्षम करणे’ हे इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनचे यंदाचे ब्रीदवाक्य आहे. पण सक्षम औषधतज्ज्ञ घडविण्याची व्यवस्था आपण उभी केली आहे का? लीनाला आदल्या दिवसापासून वारंवार लघवीला जावे लागत होते. लघवी करताना जळजळ होत होती. कॅनडातील ऑन्टेरियोमध्ये कार्यालयीन प्रकल्पासाठी गेलेल्या लीनाने डॉक्टरांकडे जाण्याऐवजी जवळच्या औषधांच्या दुकानाचा रस्ता धरला. डॉक्टरांची वेळ मिळण्यास काही दिवस लागले असते. औषधतज्ज्ञांना (फार्मासिस्ट) काही ठरावीक आजारांमध्ये उपचार करण्याची परवानगी असल्याचे तिने वाचले होते.

औषधतज्ज्ञांनी तिची लक्षणे, वैद्यकीय इतिहास आणि आवश्यक माहिती विचारली. मार्गदर्शक नियमांनुसार औषध दिले. औषध कसे, किती दिवस घ्यायचे, कोणती काळजी घ्यायची आणि कोणती लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे, हेही समजावून सांगितले. तीन-चार दिवसांत लीना बरी झाली. ना डॉक्टरांच्या वेळेची प्रतीक्षा, ना अनावश्यक विलंब- औषधांच्या दुकानातच योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले.

समजा मुंबईत असताना तिला असा मूत्रमार्गाचा संसर्ग झाला असता तर? तर  कदाचित डॉक्टरकडे ओपीडीच्या ठरावीक वेळेत जाऊन गर्दीत बराच वेळ बसावे लागले असते. वेळ आणि पैसे दोन्ही खर्च झाले असते, आणि  समजा थेट औषधांच्या दुकानात जाऊन सांगितले असते तर तेथील विक्रेत्या व्यक्तीने औषध जरूर दिले असते, कदाचित प्रतिजैविकांच्या दोन गोळ्या स्ट्रीपमधून कापून दिल्या असत्या.

औषध मिळाले  असते, नाही असे नाही. पण दुकानातील व्यक्ती नेमकी औषधतज्ज्ञ होती का, मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे औषध आणि औषध समुपदेशन मिळाले असते का, तसे आपल्या औषधतज्ज्ञाचे प्रशिक्षण झालेले असते का असे अनेक प्रश्न तिला सतावून गेले. तेथील (कॅनडामधील) औषधांच्या दुकानामध्ये लावलेला एक फलक तिच्या नजरेत भरला ‘थिंक हेल्थ, थिंक फार्मसी’ लीनाला ते वाक्य भावले. भारतात हे असे का होऊ नये, असे तिच्या मनात आले. पण हा  केवळ एका रुग्णाचा प्रश्न नाही. तो आपल्या संपूर्ण आरोग्यव्यवस्थेसमोर उभा असलेला प्रश्न आहे.

२५ सप्टेंबर हा जागतिक औषधतज्ज्ञ दिवस. इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन (एफआयपी)चे यंदाचे घोषवाक्य  आहे, ‘आरोग्यदायी भविष्यासाठी औषधतज्ज्ञांना सक्षम करणे (एम्पॉवरिंग फार्मासिस्ट फॉर हेल्दीअर फ्युचर)’ या निमित्ताने एक मूलभूत प्रश्न आपण विचारायला हवा, सक्षम औषधतज्ज्ञ घडविण्याची व्यवस्था आपण उभी केली आहे का?

जग बदलत आहे; औषधतज्ज्ञाची भूमिकाही…

कोणत्याही देशाची आरोग्यव्यवस्था परिपूर्ण नाही. कोणाला मनुष्यबळाची कमतरता जाणवते आहे, कुठे आरोग्य व्यावसायिकांवरील कामाचा ताण वाढतो आहे.  औषधतज्ज्ञही यास अपवाद नाहीत. मात्र अनेक देशांमध्ये यासंदर्भात एक महत्त्वाचा फरक  स्पष्टपणे दिसतो. अनेक देशांमध्ये औषधतज्ज्ञांना  आवश्यक शिक्षण, प्रशिक्षण, कायदेशीर अधिकार, योग्य आर्थिक  मोबदला आणि प्रतिष्ठा मिळते. ते आरोग्यव्यवस्थेतील अविभाज्य घटक आहेत, ही मान्यता आहे.

औषधतज्ज्ञ हे केवळ औषधांचे विक्रेते नसून ते नागरिकांसाठी  सहज उपलब्ध, प्रशिक्षित आणि विश्वासार्ह आरोग्य व्यावसायिक म्हणून काम करतात.  किरकोळ आजारांमध्ये रुग्णांचे मूल्यमापन व उपचार करण्याची परवानगी त्यांना आहे.  ते रक्तदाब, रक्तातील साखर, बीएमआय यांसारख्या तपासण्या करतात. कोविडच्या काळातही फार्मसीने कोविडचाचण्या आणि लसीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. व्यसनमुक्तीसाठी उपक्रम, मुदतबाह्य औषधांचे संकलन आणि विल्हेवाट, दीर्घकालीन आजारातील औषध व्यवस्थापन अशा अनेक जबाबदार्‍या औषधतज्ज्ञ पार पाडतो. इंग्लंडमधील ‘फार्मसी फर्स्ट’सारख्या उपक्रमांमधून काही सर्वसामान्य आजारांसाठी नागरिकांनी प्रथम कम्युनिटी फार्मसीकडेच जावे असा आग्रह शासन धरते. यामागचा उद्देश डॉक्टरांची भूमिका कमी करणे हा नसून, रुग्णाला योग्य, सोयीस्कर सेवा मिळवून देऊन आरोग्यव्यवस्थेवरील अनावश्यक ताण कमी करणे हा आहे.

भारतामध्ये क्षमता आहे; पण…

कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणजे समाजाभिमुख औषधतज्ज्ञ. भारतातही औषधतज्ज्ञांची क्षमता मोठी आहे. देशाच्या कानाकोपर्‍यात किमान साडेआठ लाख औषध दुकाने आहेत. अनेक वेळा रुग्ण डॉक्टरांपेक्षाही आधी औषधतज्ज्ञांकडे पोहोचतो. मग या उपलब्धतेचा  सार्वजनिक आरोग्यासाठी अधिक प्रभावी वापर का होऊ नये? मात्र औषधतज्ज्ञाला सक्षम करण्यासाठी आधी सक्षम औषधतज्ज्ञ घडवावे लागतील.

आजचे फार्मसी शिक्षणाचे चित्र काय आहे? एका अंदाजानुसार उर्वरित जगात मिळून चार ते पाच हजार औषधतज्ज्ञतेचा अभ्यासक्रम शिकवणारी महाविद्यालये  आहेत. साधारण तेवढीच म्हणजे चार ते पाच हजार महाविद्यालये एकट्या  भारतात आहेत. इतर कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक महाविद्यालये  आहेत. महाविद्यालयांची वाढलेली संख्या आणि कमी-अधिक शैक्षणिक दर्जा या सार्‍याचा रुग्णसुरक्षिततेशी संबंध आहे असा विचार कोणाच्या गावीही नसतो. कारण फार्मसी शिक्षण आणि आरोग्यव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य यांचा एकत्रित विचार होत नाही.

घरचेच दुकान असले तर ठीक अन्यथा…

‘कम्युनिटी फार्मसी’ हा फार्मसी विद्यार्थ्यांमध्ये पहिला करिअर पर्याय नसतोच. कारण शिक्षण त्यांना यासाठी तयार करत नाही आणि फार्मसी प्रॅक्टिसची स्थितीही उत्साहवर्धक नाही. धंद्याच्या चढाओढीत, ऑनलाइनच्या स्पर्धेत, सवलतीच्या गदारोळात आज हा व्यवसाय त्रासला आहे. स्वयंस्फूर्तीने काम करणारे थोडेफार रुग्णमित्र ‘औषधतज्ज्ञ’ सोडले तर बाकी सारे बहुश: औषधविक्रीपुरते मर्यादित आहेत.

दिवसरात्र औषध पुरवठा करण्याचे यांचे कामही महत्त्वाचे  आहे, पण औषधविक्री हे औषधव्यवसायाचे एक प्रमुख परिमाण (डायमेंशन) आहे. अंतिम ध्येय नाही. औषधतज्ज्ञांना सक्षम करून त्यांची भूमिका विस्तारायची असेल तर त्यासाठी एक संपूर्ण साखळी मजबूत करावी लागेल. दर्जेदार शिक्षण, कौशल्याधारित प्रशिक्षण, निरंतर शैक्षणिक कार्यक्रम, अधिकार, जबाबदार्‍या आणि मर्यादा याबाबत स्पष्टता, कायद्यांची कडक अंमलबजावणी, योग्य मोबदला या सार्‍याची यासाठी आवश्यकता आहे.

औषधतज्ज्ञांसाठी फार्मसी काऊन्सिल, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांनी अनेक प्रशिक्षण कार्यक्रम राबवले आहेत, त्याचा नक्कीच फायदा होत आहे. निदान औषधतज्ज्ञांना आपली भूमिका काय असावी कळते आहे. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक आव्हाने असली तरी  या दिशेने प्रयत्न काहीजण  करताहेत हेही  कौतुकास्पद आहे.

भारतात जीवनशैलीमुळे होणार्‍या आजारांचे (लाईफ स्टाईल डिसिजेस) म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब यांचे प्रमाण वाढते आहे. नागरिकांचे आयुर्मान वाढले आहे.  पण ते निरोगी राहिलेले नाही. हे लक्षात घेता अशा प्रशिक्षित कम्युनिटी फार्मसी सेवा महत्त्वाच्या ठरू शकतात. शासनातर्फे आरोग्यकार्यक्रम  राबवले जातात. आशा सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत मोहीम सुरू असते. त्यात इच्छुक औषधतज्ज्ञांनाही प्रशिक्षण आणि  योग्य भूमिका मिळायला हवी. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात अनेक औषधतज्ज्ञांनी  उत्तम कार्य केले होते.

लीनाला कॅनडातील औषध दुकानामध्ये मिळालेली सेवा ही केवळ एका रुग्णाची गोष्ट नाही. औषधतज्ज्ञांना  सक्षम करून  त्यांच्या  ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी आरोग्यव्यवस्था कशी उत्सुक आहे याची ती झलक आहे. आपल्याकडेही औषधतज्ज्ञ आहेत. औषध दुकाने आहेत. गरज तर प्रचंड आहे. मग उणीव कुठे आहे? कदाचित आपल्या दृष्टिकोनात. औषधतज्ज्ञ आरोग्यसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे आणि त्यांना सर्वतोपरी सक्षम करण्यासाठीचे बदल पद्धतशीरपणे घडवून आणले तर केवळ औषधतज्ज्ञांचे नव्हे तर सार्वजनिक आरोग्याचेही भवितव्य उज्वल असेल. डॉक्टर, औषधतज्ज्ञ, नर्सेस आणि इतर आरोग्य व्यावसायिकांनी आपापल्या कौशल्याच्या क्षेत्रात काम करून एकमेकांना पूरक ठरणे हीच प्रभावी आरोग्यव्यवस्थेची गरज आहे. 

सर्दीच्या औषधामुळे सापडलेला उच्च रक्तदाब

औषधतज्ज्ञाला योग्य प्रशिक्षण, साधने दिली आणि त्यांची भूमिका स्पष्ट केली, तर तो आरोग्यव्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा ठरू शकतो.  जीवनशैलीने होणार्‍या आजारांचा प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचार यासाठी एफआईपीतर्फे भारतात औषधतज्ज्ञांचेे प्रशिक्षण करण्यात येत आहे. या उपक्रमातील हा अनुभव बोलका आहे. एक ५२ वर्षीय व्यक्ती सर्दीचे औषध घेण्यासाठी एका औषध दुकानामध्ये आली होती. प्रशिक्षित महिला औषधतज्ज्ञाने रक्तदाब तपासला. तो खूप जास्त म्हणजे १९०/१०० आला. पुन्हा तपासला, रुग्णाला न घाबरवता अधिक विचारपूस केली. त्या व्यक्तीला धूम्रपानाची सवय होती.

कुटुंबात उच्च रक्तदाबाचा इतिहास होता आणि तिचे वजन वाढलेले होते. औषधतज्ज्ञाने जीवनशैलीतील बदलांबाबत मार्गदर्शन केले आणि ताबडतोब डॉक्टरांकडे जायला सांगितले. त्याप्रमाणे व्यक्ती डॉक्टरांकडे गेली आणि तिला रक्तदाबाच्या गोळ्या सुरू झाल्या. औषधतज्ज्ञाच्या जागरूक संवादामुळे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा बळी होण्याचा धोका  टाळता आला. सर्दीचे औषध देऊन विषय संपवणे ही दुकानदारकी; रुग्णाशी संवाद साधून त्याच्या आरोग्याचा धोका ओळखणे ही औषध विक्रेतीची खरी जबाबदारी. येथे औषधतज्ज्ञानेे तपासणी, धोका ओळखणे, समुपदेशन, डॉक्टरांकडे पाठवणे आणि पाठपुरावा ही आपली भूमिका योग्य प्रकारे पार पाडली.

symghar@gmail.com