गणेश राजन

२४ मे हा स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता/मानसिक आजार) जागृती दिवस म्हणून पाळला जातो; त्यानिमित्त हे अनुभवकथन..

loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

मानसिक आरोग्य म्हणजे मानसिक स्वस्थता असणे आणि समाजाशी, जीवनाच्या साध्यासुध्या गरजांशी समाधानकारकरीत्या जुळवून घेता येणे. मानसिक आजार, माणसाच्या विचारात, वागण्यात असमतोल निर्माण करतात. परंतु अशा तऱ्हेचे अपसामान्य (abnormal) वागण्याची वारंवारिता, तीव्रता बघून, तसे वागणे ‘आजारामुळे असू शकेल का?’ हे ठरवायला हवे. एखादी व्यक्ती काम कार्यक्षमतेने करते, स्वत:ला व इतरांना इजा पोहोचवत नाही व परिस्थितीशी जुळवून घेऊ शकते तोपर्यंत ‘व्यक्ती ठीक आहे’ असे कोणाकडूनही सर्टिफिकेट मिळवायची गरज नसते.

माझ्या बाबतीत ‘वासांचे भास होणे’ या लक्षणाने आजाराची सुरुवात झाली. त्यात सुगंधापासून दुर्गंधापर्यंत वास यायचे. त्यापाठोपाठ आजूबाजूला लोक बोलत आहेत असे ऐकू येण्याचेही भास होऊ लागले. मी सगळय़ांबद्दल संशय घ्यायला लागलो. लोक माझ्याविरुद्ध बोलत आहेत असे मला वाटू लागले. ते माझ्यावर कायम टीका करत आहेत, इतरांचे विचार जणू ते मोठय़ाने सांगत आहेत, असे मी ऐकू शकतो, असे मला वाटायचे. मी माझ्या आसपासच्या लोकांच्या हावभावांचे अर्थ माझ्या पद्धतीने लावू लागलो. नंतर मला ‘मध्यरात्री मांजर येते आणि माझ्या मनात गहन विचार आला की ती खिडकीवर उडी मारते’ असे वाटू लागले. मध्यरात्री मी आरशासमोर उभा असताना वेगळेच प्रतििबब दिसायचे, ‘करडय़ा रंगाची किनार असलेला प्रचंड मोठा हात मला उडवत नेतोय,’ असे वाटायचे. ही सर्व आजाराची लक्षणे होती. औषधोपचार सुरू झाले.

आजारातून सावरलेल्या लोकांचे औषधोपचार नाकारण्याचे मुख्य कारण ‘विश्वासाचा अभाव’ हे आहे. त्यांच्या मनात शास्त्रीय उपायाविषयी खात्री नाही किंवा औषधांचे साइड इफेक्ट्स खूप आहेत असे त्यांचे म्हणणे असते. औषधोपचाराच्या सुरुवातीच्या काळात, मलाही सुस्तावल्यासारखे वाटले होते. काही काळानंतर माझ्या शरीराने औषधांशी जुळवून घेतले. मग सुस्तावलेपण नाहीसे झाले आणि मनात शांतता स्थापित झाली.

डॉक्टरांनी ‘तू जे वास येणे, ऐकणे, पाहणे अनुभवतो आहेस ते ‘खरे की काल्पनिक’ यावर वाद घालू नकोस. त्याऐवजी मनात येणारा विचार किंवा होणारे संवेदन (ऐकणे, दिसणे, इ), तुला इतरांबरोबर सहकार्याने आणि चांगल्या रीतीने जगण्यासाठी मदत करते का? असा प्रश्न स्वत:ला विचार’ हा अंतर्दृष्टी देणारा विचार दिला. मी शास्त्रीय दृष्टिकोनाचा स्वीकार केला. या प्रश्नाआधारे डॉक्टरांनी मला येणारे अनुभव सामान्य आहेत किंवा नाही याचे उत्तर ठरवणे माझ्यावर सोडून दिले. या विचाराने मला नवजीवन मिळाले.

माझ्या आजाराची लक्षणे औषधोपचारांनी आटोक्यात आली तरी नकारात्मक विचारांचे माझ्या मनावर ओझे होते. मी समुपदेशन घेतले. त्यातून मनातली नकारात्मकता सोडून द्यायला शिकलो. ‘शिशिरापाठोपाठ वसंत येतो हे उमगले. ही अंतर्दृष्टी देणाऱ्या ज्या तीन विचारांनी मला नवजीवन मिळाले ते –

१) ‘नशिबा’ला सामोरे जा आणि आपले भविष्य घडवा. नशीब तुम्हाला मिळते, त्याला सामोरे कसे जाता यावर तुमचे भविष्य ठरते.

२) प्रत्येक जण त्याच्यासारखाच (अद्वितीय) असतो. तुमच्यासारखे दुसरे कोणी असत नाही.

३) प्रत्येक प्रसंगात आपले भले कशात आहे ते समजून घ्या.

आजारावर नियंत्रण मिळवलेला शूरवीर मी जेव्हा समाजजीवनात पुन्हा सामील झालो तेव्हा मी इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे असे मला सारखे वाटायचे. जरी मी माझी कामे करत असलो, इतरांमध्ये स्वत:ला सामावून घेण्याचा प्रयत्न करत असलो तरी मी त्यांच्याबरोबर पुरेसा संवाद साधू शकलो नाही. माझे कोणी कौतुक केले तरी ते स्वीकारायचो नाही. माझ्या मनात खूप खोलवर असलेली ‘कमतरतेची भावना’ या अस्वीकारामागे असावी असे वाटते. मी माझी इतरांशी तुलना करायचो. मी इतरांच्या नेहमीच्या वाक्यांकडे, त्यांचा माझ्यावर ‘वरचष्मा राखायचा प्रयत्न’ म्हणून पाहायचो. मला नंतरच्या जीवनात, व्यवसायात असे लक्षात आले की, मी एक बुरखा पांघरला होता, परंतु मी खराखुरा कार्यक्षम होतो व माझ्याकडून आवश्यक ते काम होत होते.

सर्वात मोठी अडचण म्हणजे ‘स्वत:त कमतरता असल्याची भावना – स्वत:वर प्रेम करणे अवघड वाटणे. जरी कुटुंबीय, मित्रांनी माझे सतत चूक/ बरोबर असे मोजमाप न करून, माझी खिल्ली न उडवून मदत केली तरी मी स्वत:चा स्वीकार उशिरा केला. मी माझ्यासारखाच आहे जसे दुसरे त्यांच्यासारखे, हे तर्काने/ बुद्धीने समजले असूनही मी या सत्याचा भावनिक अनुभव, आनंद घेऊ शकत नाही. तरीही माझी इतरांशी नाती चांगली आहेत. माझा स्वत:कडे बोट दाखवणारा राग कमी झाला आहे. माझ्यातली सहनशक्ती, धीर वाढला आहे.

साधारण आठ वर्षांपूर्वी निर्णयांना सामोरे जाण्याची वेळ आली की त्रासदायक चिंता भावना (अँग्झायटी अ‍ॅटॅक) वाढायला लागली. परंतु अशा प्रकारच्या दोन प्रसंगांतले काळाचे अंतर बरेच होते. त्यामुळे नियमित औषधोपचारांची गरज पडली नाही. त्रास वाटल्यास घेण्यासाठी डॉक्टरांनी औषधे सुचवली. त्यांचीही फारशी गरज पडली नाही. या त्रासानंतर महत्त्वाचे असे काही घडले नाही. मी सामान्यपणे कार्यरत राहिलो.

काही वेळा जास्त विचार, भावना जागवणारे काही घडले की आजही मला आजाराची काठावरची लक्षणे जाणवतात; परंतु ती ५-१० मिनिटांत विरून जातात. मी कृतीमध्ये मला गुंतवून घेऊन त्रास कमी करायला शिकलो आहे. अस्वस्थता टिकून राहत नाही हे मला माहीत आहे. त्यामुळे मी तात्पुरत्या काळासाठी अस्वस्थता सहन करतो आणि अस्वस्थता निघून जाते.

मी पूर्वी खूप धूम्रपान करायचो, अबरचबर खायचो. आजारामुळे मी शरीराची काळजी घेण्यास शिकलो. मी १५ वर्षांपूर्वी धूम्रपान सोडले, आहाराकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. व्यायामही सुरू केला. जीवनपद्धतीतल्या या बदलांनी माझ्या भावनांमध्ये बदल केले. मला स्वास्थ्य परत मिळण्यास सुरुवात झाली. समज वाढली. माझे स्वत:वरचे नियंत्रण वाढले. मी झोपेची काळजी घेतो, थकवाही क्वचितच जाणवतो.

ज्या व्यक्ती उपचार घेत आहेत त्यांना मला सांगायचे आहे की उपचारपद्धती बदलण्याआधी, लक्षणांच्या तीव्रतेत उतार पडण्यासाठी चालू असलेल्या औषधोपचारांना चार ते सहा आठवडय़ांचा अवधी द्या. त्यानंतर त्रास कमी झाला तर औषधोपचार चालू ठेवा. त्रास वाढला तर औषधोपचार/ उपचारपद्धती विचारपूर्वक बदला. काहीच बदल झाला नाही तर डॉक्टरांना सांगून बदल करून घ्या. औषधोपचारांनी फरक पडतो आहे हे तुम्हाला तुमची आनंद घेण्याची क्षमता वाढली, वाचनात रस वाटू लागला, मन आशावादी झाले यावरून लक्षात येईल.

काही गोष्टी संपर्कात आल्या की आजाराविषयीच्या आठवणी जाग्या होतात. अशा वेळेस मी त्रासदायक विचारांच्या जागी ‘रिकव्हरी इंटरनॅशनल’च्या ‘रिकव्हरी मेथड’मधली विवेकी विचार देणारी वाक्ये आठवतो. त्यासाठी स्वत:ला ‘वेगळे ठेवून’ बघण्याची सवय लावून घ्या. जवळच्या व्यक्तींशी सतत बोलत राहा. स्वत:ला प्रयत्न करण्यासाठी शाबासकी द्या आणि त्याचे फळ मिळण्यासाठी धीर धरा. एका वेळेस एकाच दिवसाचा विचार करा. महत्त्वाच्या बदलांची माहिती डॉक्टरांना, ठरावीक पद्धत वापरून देत राहा. तुम्ही जरी बरे असलात तरी डॉक्टरांच्या संपर्कात राहा.

जास्तीत जास्त लोकांमध्ये, जास्तीत जास्त वेळ, आजारासंबंधी जितकी आशेची भावना जागवता येईल तितकी जागवायची हे माझे ध्येय आहे. त्यासाठी ‘एकलव्य फाऊंडेशन फॉर मेंटल हेल्थ, पुणे’ (https://www.eklavyamh.org) यांच्या सहकार्याने चेन्नई येथे मानसिक आजारी व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ऑनलाइन पद्धतीने, विनामूल्य तत्त्वावर ‘चेन्नई एकलव्य स्वमदत गट’ सुरू केला आहे.

गणेश राजन हे चेन्नईत असतात, त्यांच्या लिखाणाचा हा अनुवाद प्राची बर्वे यांनी केला आहे.

eklavyafoundationmh@gmail.Com