चिनी लष्कराशी संबंधित दोघा उच्चपदस्थांना चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अलीकडेच तडकाफडकी बडतर्फ केल्यामुळे एक अफवावजा कुजबुज खोटी ठरली, तर दुसर्‍या कुजबुजीला अधिकच बळ मिळाले. आधी दुसर्‍या – म्हणजे सध्या खरी ठरू लागलेल्या कुजबुजीबद्दल. ज्या दोघा उच्चपदस्थांना- चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाचे (सीएमसी) अध्यक्ष जनरल ज्यांग यूशिआ आणि याच ‘सीएमसी’च्या संयुक्त सेना विभागाचे प्रमुख जनरल लिऊ शेनली यांना- हटवण्यात आले, त्यांची चौकशी आतापासूनच सुरू झाली असून यथावकाश त्यांची आणखी काहीतरी बातमी येणार, अशी ती कुजबुज. आणि पहिली, खोटी ठरलेली कुजबुज? ती क्षी यांचे आसन डळमळीत झाल्याबद्दल होती. म्हणे, चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या उच्चस्तरीय गोटांतूनच क्षींविरुद्ध कट शिजत होता… ते सारे खोटे ठरवून, आपल्या सत्तेला काहीही धोका नसून आपणच सर्वेसर्वा आहोत, हे क्षी यांनी या कारवाईतून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

या घडामोडीची अधिकृत वाच्यता २४ जानेवारी रोजी झाली, ती अनेक विश्लेषकांसाठी धक्कादायकच होती. पदभ्रष्ट करण्यात आलेल्या दोघाही उच्चपदस्थांवर ‘‘शिस्त आणि कायदे यांचे गंभीर उल्लंघन केल्याचा संशय’’ असल्याचे चिनी संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीने या दोघांची चौकशी करण्याच्या बाजूने कौल दिल्याचे प्रवक्ता म्हणाला; पण चौकशी कशासाठी? आरोप किंवा संशय तरी कोणता, बडतर्फ जनरल ज्यांग यूशिआ हे चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोचेही सदस्य होते- ते पदही काढून घेण्यात आले का, यापैकी कशाहीबद्दल कोणताही तपशील न देता निवेदन करायचे, हीच कार्यशैली या प्रवक्त्यानेही पाळली. ‘आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी’ असा थेट उल्लेख नसल्याने या दोघांवर अधिकच गंभीर गुन्ह्यांचा ठपका ठेवण्यात येणार की काय, याच्याही चर्चेस वाव मिळाला. विशेष म्हणजे ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए)च्या दैनिक मुखपत्रातील संपादकीयानेही, या दोघांवर आर्थिक अपहाराचा संशय नसल्याचे म्हटले आहे. म्हणजे आता, चौकशी अहवालातूनच या दोघांचे ‘गुन्हे’ काय आहेत ते लोकांना समजणार, तो अहवालही बहुधा नेमका ५ मार्च २०२६ पासून सुरू होणार्‍या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या अधिवेशनात जाहीर केला जाणार.

ज्यांग यूशिआ आणि लिऊ शेनली यांना हटवल्यामुळे, चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगातील सातपैकी पाच पदे रिकामी झाली असून आता हा आयोग फक्त दोघांचा ठरला आहे- त्याहीपैकी एक खुद्द क्षी जिनपिंग- कारण ते या आयोगाच्या अध्यक्षपदी आहेत. दुसरे झांग शेंगमिन. हे शेंगमिन नोव्हेंबर २०२५ मध्ये आयोगाचे उपाध्यक्ष झाले, कारण त्यांच्या आधीचे उपाध्यक्ष- जनरल हेइ वेइडाँग – यांना ऑक्टोबर २०२५ मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षातून, तर नोव्हेंबरात पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) मधूनही काढून टाकण्यात आले होते. चिनी केंद्रीय लष्करी आयोगाची पुनर्रचना १९८२ मध्ये झाली होती, तेव्हापासूनच्या वाटचालीत पहिल्यांदाच हा आयोग जवळपास नष्टप्राय अवस्थेला पोहोचला आहे.

‘केंद्रीय शिस्त निरीक्षण आयोग’ (सीडीआयसी) ही चीनची भ्रष्टाचारविरोधी संस्था. जिनपिंग यांनी मार्च २०१३ पासून, लष्करालाही या ‘सीडीआयसी’च्या कक्षेत आणले. तेव्हापासूनच्या जवळपास बारा वर्षांत चिनी सेनादलांतील मेजर जनरल पदाच्या वर/खाली असलेल्या एकंदर २०० अधिकार्‍यांवर शिक्षा अथवा बडतर्फीची कारवाई झाली आहे. यापैकी तब्बल ८० अधिकारी हे वरिष्ठ पदांवरचे- म्हणजे व्हाइस ॲडमिरल वा लेफ्टनंट जनरल वा त्याहून मोठ्या दर्जाचे आहेत. याखेरीज, चिनी नौदलात रिअर ॲडमिरल वा त्याहून वरिष्ठ पदांवर असणार्‍या १२ अधिकार्‍यांना काढून टाकल्याच्या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. इतक्या घाऊक प्रमाणात चिनी सेनाधिकार्‍यांवर खप्पामर्जी होत असली तरीही, तेवढ्याने ज्यांग यूशिआ आणि लिऊ शेनली, किंवा त्यांच्या आधीचे हेइ वेइडाँग यांच्या बडतर्फीचे गांभीर्य कमी मानता येणार नाही. हे तिघेही जण चिनी लष्करातले अत्यंत वरिष्ठ अधिकारी होते आणि यापैकी प्रत्येकाची निवड होत असताना जिनपिंग यांनी स्वत:च लक्ष घातले होते. त्यातही ज्यांग यूशिआ यांच्याशी जिनपिंग यांचा खासच दोस्ताना. कम्युनिस्ट चीनमध्ये पिढीजात नोकरशाहीत वा लष्करात मोठ्या पदांवर असणार्‍यांच्या पुढल्या पिढीला ‘राजपुत्र’ असे (काहीशा हेटाळणीच्या सुरात) म्हटले जाते, तोच शब्द वापरायचा तर यूशिआ आणि जिनपिंग हे दोघेही ‘लष्करी राजपुत्र’- दोघांचेही वडील रेड आर्मीमध्ये कमांडर होते. तेही एकमेकांचे मित्र होते आणि ही दोन्ही कुटुंबे मूळची एकाच प्रांतातली- शांक्सी भागातली. ही मैत्री दुसर्‍या पिढीतही टिकल्यामुळेच, जिनपिंग यांनी वयोमर्यादेच्या नियमाकडे काणाडोळा करून ज्यांग यूशिआ यांना पक्षाच्या पॉलिटब्युरोत आणि केंद्रीय लष्करी आयोगातही कायम ठेवले. जिनपिंग आणि हेइ वेइडाँग यांचीही मैत्री होतीच- जिनपिंग झेजियांग आणि फुजियान प्रांतांमध्ये लष्करी अधिकारी असताना, हेइ वेइडाँग जवळच्याच लष्करी ठाण्यांमध्ये असल्याने हेइ वेइडाँग आणि क्षी जिनपिंग हे मित्र आणि मद्यपान करणारे सहकारीदेखील होते. जिनपिंग यांची राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनीच हेइ वेइडाँग यांना बीजिंगला आणून त्यांना केंद्रीय लष्करी आयोगाच्या उपाध्यक्षपदी बसवले तेव्हा ‘हेलिकॉप्टर नियुक्ती’ची टीकाही कुजबुजत झालेली होती. अर्थात, अशा टीकेकडे दुर्लक्ष करून जिनपिंग यांनी वेइडाँग यांची वर्णी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोतही लावली.

जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्याही वर असलेल्या पॉलिटब्यूरोत आपली माणसे नेमली खरी, पण खुद्द या कार्यकारिणीतील चिनी सेनादलांचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात कमी करून, एकंदर सेनादलांचा प्रभाव कमी केला. या कार्यकारिणीत चिनी सेनादलांचे ४२ सदस्य होते, ती संख्या आजघडीला निम्म्याहून कमी झाली आहे. आता तर पॉलिटब्यूरोत हेइ वेइडाँगही नाहीत आणि ज्यांग यूशिआही नाहीत, म्हणजे चिनी लष्कराला पॉलिटब्यूरोत काही प्रतिनिधित्वच नाही. हेइ वेइडाँग यांच्या जागी केंद्रीय लष्करी आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून झांग शेंगमिन यांना बढती देण्यात आली असली तरी या शेंगमिन यांना पॉलिटब्यूरोचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेले नाही. चिनी कम्युनिस्ट पक्षाचे पुढले खुले अधिवेशन २०२७ मध्ये होईल, तेव्हा तरी कार्यकारिणीतल्या लष्करी प्रतिनिधित्वाच्या रिक्त जागा जिनपिंग भरणार का, की त्याआधीच कुणाकुणाला निवडून कार्यकारिणीवर धाडणार, हे सारे एकट्या जिनपिंग यांच्या मर्जीवर अवलंबून. त्यामुळे सध्या तरी जिनपिंग यांनी या कृतीतून दिलेले संकेत ‘पक्ष श्रेष्ठ आहे आणि चिनी सेनादलांनी केंद्रीय लष्करी आयोग आणि पक्षाच्या अध्यक्षांशी ‘पूर्णपणे निष्ठावान’ आणि आज्ञाधारक असले पाहिजे,’ असेच आहेत, असा निष्कर्ष निघतो. ‘पीएलए डेली’ या चिनी सेनादलांच्या मुखपत्राने २४ जानेवारी रोजी छापलेले संपादकीय ज्यांग यूशिआ आणि लिऊ शेनली यांच्यावर गंभीर आरोप असल्याचे सूचित करते. ‘‘पक्षाच्या केंद्रीय समिती आणि केंद्रीय लष्करी आयोगाच्या विश्वासाचा आणि अपेक्षांचा (या दोघांनी) गंभीरपणे विश्वासघात केला आहे, केंद्रीय लष्करी आयोगाच्या अध्यक्षांना त्यांना कमकुवत केले आहे… लष्करावरील पक्षाच्या पूर्ण नेतृत्वाला कमकुवत केले आहे आणि पक्षाच्या सत्ताधारी पायाला धोका निर्माण केला आहे’’ अशा मोघम आरोपांची फैर कमी म्हणून की काय, या दोघांनी ‘केंद्रीय लष्करी आयोगाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा गंभीरपणे खराब केली’ आणि त्यामुळे ‘पक्षावर, देशावर आणि लष्करावर अत्यंत नकारात्मक परिणाम झाला’- असे निष्कर्षही या संपादकीयात आहेत. ज्यांग यूशिआ आणि लिऊ शेनली यांची चौकशी होऊन त्यांना शिक्षा करण्याचा सल्ला सरकारला देताना हे संपादकीय अशी आशा व्यक्त करते की, तसे झाले तरच ‘राजकीय परिस्थिती आणखी सुधारेल, वैचारिक विष आणि गैरप्रकार दूर होतील’ तसेच ‘पीपल्स लिबरेशन आर्मीच्या पुनरुज्जीवनाला प्रोत्साहन मिळेल आणि मजबूत लष्कराच्या विकासाला चालना मिळेल’!

चीनच्या सर्वोच्च लष्करी नेतृत्वाची एकामागून एक हकालपट्टी होण्याचा हा प्रकार अनेक प्रश्नांचे मोहोळ उठवणारा आहे. महत्त्वाचा प्रश्न हा चीनमधील राजकीय स्थैर्याचा आहे. विशेषत: ज्यांग यूशिआ आणि हेइ वेइडाँग यांचे तर जिनपिंग यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध होते – म्हणजेच, जिनपिंग यांच्या हकालपट्टीतून त्यांना काय मिळणार होते हा प्रश्न अत्यंत रास्त ठरतो. त्यामुळे २१व्या पक्ष अधिवेशनाला अवघे वर्षभर उरले असताना जिनपिंग यांना चौथ्या कार्यकाळासाठी विरोध होऊ लागल्यानेच जिनपिंग प्रचंड संशयी झाले आहेत की काय, अशी शंका निर्माण होते.
– जयदेव रानडे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे माजी सदस्य, ‘सेंटर फॉर चायना ॲनालिसिस ॲण्ड स्ट्रॅटेजी’चे अध्यक्ष