आनंद परांजपे, जेष्ठ पत्रकार
कृष्णाकाठच्या कराडपासून ते यमुनाकाठच्या दिल्लीच्या तक्तापर्यंत पोहोचलेल्या एका सामान्यातल्या असामान्य सुपुत्र, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक मानाचं पान म्हणजे यशवंतराव चव्हाण !
यशवंतराव चव्हाण १९४२ साली बी.ए.एल एल. बी. झाले आणि १९४६ साली सातारा मतदार संघातून मुंबई राज्याचे विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये यशवंतराव चव्हाण नागरी पुरवठा, सामाजिक कल्याण तसेच वनखात्याचे मंत्री झाले. १९५७ ते १९६० त्यांची अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारी समितीमध्ये नियुक्ती झाली होती. १ मे १९६० रोजी ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी औद्योगिकीकरण, सहकार चळवळ, शिक्षणाचा विस्तार आणि ग्रामीण विकास यांना विशेष चालना दिली. त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने, शिक्षणसंस्था आणि ग्रामीण विकासाच्या विविध उपक्रमांना बळ मिळाले.
१९६२ मध्ये ते देशाचे संरक्षणमंत्री झाले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असेही या कारकीर्दीचे वर्णन केले जाते. १९६२ मधील Sino-Indian War नंतर त्यांची संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी लष्कराचे आधुनिकीकरण, प्रशिक्षण सुधारणा, सीमाभागातील संरक्षण व्यवस्था मजबूत करणे आणि लष्कराला आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामुळेच पुढे १९६५ मधील भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय सैन्य अधिक आत्मविश्वासाने लढू शकले.
१९६६ मध्ये ते देशाचे गृहमंत्री झाले. गृहमंत्री म्हणून केंद्र आणि राज्य सरकारांमधील समन्वय वाढवणे, पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि देशातील विविध प्रादेशिक व सामाजिक तणावांना राजकीय संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे, हे त्यांनी केले. १९७० मध्ये ते देशाचे अर्थमंत्री होते. या काळात वाढती महागाई, अन्नधान्याची टंचाई आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक अस्थिरता हे प्रश्न होते. याच काळात १९७३ मधील जागतिक तेलसंकटही उद्भवले. नियोजनाधारित आर्थिक विकासाला चालना, औद्योगिक विकास, शेतीला मदत आणि सार्वजनिक क्षेत्राच्या बळकटीकरणावर भर यातून त्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
१९७४ ते १९७७ या काळात ते परराष्ट्रमंत्री होते. तो शीतयुद्धाचा काळ होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा स्वतंत्र आणि संतुलित धोरण असलेल्या देशाची राहावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्याच कार्यकाळात देशाने अणुचाचणी केली. त्यानंतर निर्माण झालेली आंतरराष्ट्रीय परिस्थितीही त्यांनी समर्थपणे हाताळली.
१९८० मध्ये ते विरोधी पक्षनेते झाले. संयमी स्वभाव, अभ्यासू वृत्ती आणि राजकीय परिपक्वता यांमुळे ते सत्ताधारी आणि विरोधक दोघेही त्यांच्याकडे आदराने पहात. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचे योगदान संसदीय लोकशाही मजबूत करणारे मानले जाते.
२५ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्ली येथे हदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले! सतत सत्तास्थानी असलेल्या या लोकनेत्याची केवढी ही दीर्घ कारकीर्द.
यशवंतराव चव्हाण सत्तेचे लोभी नव्हते आणि धनाचेही लोभी नव्हते. सुसंस्कृत, शालीन नेता हीच त्यांची ओळख होती. ते विरोधकांचा ते नेहमीच सन्मान करीत असत. त्यांनी विरोधकांची कधीही अवहेलना केली नाही. तसेच साहित्यिक, कलाकार, पत्रकार अशा सर्वांनाच ते सन्मानानेच वागवत. नागपूरच्या तरूण भारत या संघविचारांच्या दैनिकाचे संपादक श्री. चं. माडखोलकर यांनी यशवंतराव चव्हाण यांना अग्रलेखातून जाहीर प्रश्न विचारला होता की हे राज्य हे राज्य मराठा होणार की मराठी होणार? यशवंतराव चव्हाण यांनी जाहीरपणे सांगितले की हे राज्य मराठा (जात या अर्थाने) नाही, तर मराठी (म्हणजे मराठी जनतेचे) होणार आहे. !
यशवंतराव चव्हाण यांच्या मृत्युपत्रात त्यांची एकूण संपत्ती चार लाख पाच हजार ५० रुपये एवढीच नोंदलेली होती. त्यामध्ये त्यांच्या कऱ्हाड येथील ‘विरंगुळा’ बंगल्याचाही समावेश होता. पुण्याचे नामांकित विधीज्ञ गो. नी. जोगळेकर यांच्या उपस्थितीमध्ये यशवंतराव चव्हाण यांनी आपले इच्छापत्र केले होते.
३४ वर्षे सतत सत्तेत असलेला या लोकोत्तर नेत्याचा हा आर्थिक लेखाजोखा आजच्या पुढाऱ्यांनी शिकावा असाच आहे.
आज एखादा सरपंच किंवा नगरसेवक निवडून आला की पुढच्या वर्षी तो कोट्याधीश होतो. त्याची चौकशी का होत नाही, हा सामान्य नागरिकांना प्रश्न पडतो, म्हणजेच सामान्य माणसाला कळतं तो भ्रष्ट आहे. मग ईडी, इनकम टॅक्स यांच्या का लक्षात येत नाही? त्याच्यावर कारवाई का होत नाही? आपण १०० रूपये मिळवतो. त्यावर ३० रूपये इनकम टॅक्स भरतो. १८ रूपये जीएसटी भरतो. हे सगळं केल्यानंतरही आपल्या चौकश्या होतात. यांच्या का होत नाही असा सात्विक संताप व्यक्त होतो सामान्य माणसाचा !
यशवंतराव चव्हाण यांच्या ‘बेरजेचे राजकारण’ या संकल्पनेलाच आज सातारा जिल्हयातील राजकारण्यांनी मूठमाती दिली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सातारा जिल्हयात भाजपा, शिवसेना आणि अजित पवार काँग्रेसने एकहाती विजय मिळवला. १९८० साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तिकीटावर दोन लाखांवर मते मिळवून यशवंतराव चव्हाण सातारा जिल्हयातून निवडून गेले होते.
पण आज सातारा जिल्हयातच यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराकडे दुर्लक्ष होत आहे. आज त्यांची ११३ वी जयंती ! या निमित्ताने आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केलेल्या यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.
लेखक जेष्ठ पत्रकार आहेत.
anandsparanjape@gmail.com
