scorecardresearch

Premium

मराठवाड्यातील तरूण फुलवत आहेत प्रगतीचे मळे…

मराठवाड्याचे वर्णन करताना दुष्काळी हा शब्द जणू अपरिहार्य असतो. पण त्याच मराठवाड्यातील परिस्थिती आता बदलत आहे…

farming
मराठवाड्यात प्रामुख्याने कोरडवाहू प्रकारची शेती वाड वडिलांपासून केली जाते. (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

आदित्य शेंडे

नुकताच मराठवाडा मुक्ती संग्रामाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा झाला. या ७५ वर्षांच्या काळात मराठवाड्यात अनेक बदल झाले आणि हे बदल आजही वेगाने सुरू आहेत. मराठवाड्यात प्रामुख्याने केला जाणारा व्यवसाय म्हणजे शेती. काळी कसदार कापसाची रेगूर मृदा हा शब्द आपण सर्वांनी शाळा कॉलेजात वाचलेला असतो. पण तो शब्द अनुभवावा तो मराठवाड्यातच.

Big fall in gold prices
सोन्याच्या दरात मोठी घसरण; आजचा निच्चांकी दर किती? पहा एका क्लिकवर…
Should Ganpati idol be immersed or not
गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करावे की करू नये? काय आहे चर्चा व लोकप्रवाद, जाणून घ्या सविस्तर…
kolhapur
आरक्षणप्रश्नी मराठा समाजाचे आता कोल्हापुरात गांधी जयंतीपासून बेमुदत उपोषण
five suspects arrested before robbery Dharangaon police jalgaon
दरोड्यापूर्वीच पाच संशयित जाळ्यात; धरणगावातील गस्ती पथकाची कारवाई

वर्षभरापासून महसूल सेवेत प्रवेश केल्यापासून प्रशिक्षणाच्या निमित्ताने मराठवाडा याची देही याची डोळा पाहण्याचा अन् अनुभवण्याचा काय तो योग. आणि याच वर्षभराच्या अनुभवाच्या पोतडीतून काही अनुभव आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. मराठवाड्यातील युवा वर्ग, मग तो शेतीमधला असो वा उद्योगामधला असो, नक्की काय सकारात्मक बदल घडवून महाराष्ट्र अन देशासमोर आदर्श ठेवू पाहतोय हे पाहू आपण लेखाच्या प्रवासात.

आणखी वाचा-‘कारवाई’ला न भिता, प्रामाणिक न्यायाधीशांचा गौरव करू!

अनुभवाच्या गाठोडीतून पहिलं उदाहरण द्यायला पाहिजे ते शेतीचं. मराठवाड्यात प्रामुख्याने कोरडवाहू प्रकारची शेती वाड वडिलांपासून केली जाते. बरं यात पाण्याची टंचाई, म्हणून मग शेतात घ्यायचं काय? तर कापूस, हळद, सोयाबीन आणि इतर सदृश पिकं. पण तीही कधी परवडतात तर कधी दिवाळं काढतात. बरं वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे शिकून नोकरी मिळवण्याकडे सगळ्यांचाच कल. पण अपवाद इथेसुद्धा असणारच.

नांदेडच्या हिमायत नगरमधला २८ वर्षांचा धनंजय तुप्तेवार बीएससी ॲग्रीचे शिक्षण घेतो आणि शेतीत जादूचे प्रयोग करायला सुरुवात करतो. आणि यातूनच त्याने २० एकर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. हो, अगदी बरोबर, करोना काळात निरनिराळ्या औषधी काढ्यांच्या गर्दीत मान वर काढलेलं तेच ते ड्रॅगन फ्रूट. अगदी निवडुंगासारखं असणार हे झाड एकरी २० ते ४० क्विंटल उत्पादन देतं. धनंजयने पांढरा, गुलाबी आणि पिवळा असा निरनिराळा गर असणाऱ्या फळांची लागवड केली. उन्हाळ्यात पाणी कमी पडू नये म्हणून दीड एकरात शेततळे खोदले. धनंजय आपला शेतीमाल नांदेडच नाही तर मुंबई, वाशी अन हैदराबादलाही पाठवतो. आगामी काळात मत्स्यपालन आणि जमलं तर मोत्यांची शेती पर्ल कल्चर करायचा त्याचा मनसुबा आहे.

आता नुसतीच शेती करू तरी किती, असं म्हणत घारापूरच्या ढगे बंधूंनी शेतीपूरक व्यवसायाला हात घालायचं ठरवलं. या तिन्ही बंधूंमधला समान धागा म्हणजे तिघेही उच्चशिक्षित. मुद्द्याची बात म्हणजे तिघेही भाऊ एकत्रित शेती करतात. मुद्दाम सांगायचं कारण म्हणजे शेतीच्या होत चाललेल्या तुकडीकरणाला यांनी लगाम घातलाय. अन एकीचं बळ ते निराळंच, नाही का? वेगळी वाट पकडून म्हणून त्यांनी सेंद्रीय शेती केली. त्यातही चिकू, आंबा आणि औषधी वनस्पतींची लागवड केली. त्यांच्या शेतात स्पष्टपणे नजर हेरणारी बाब म्हणजे बांधावरची सीताफळ लागवड. ही महत्त्वाची. कारण ही झाडं बांधाला हलू देत नाहीत आणि शेती खरडून जायच्या प्रकाराला आळा घालतात. बरं, सीताफळांचं वेगळं उत्पन्न देतात ती गोष्ट निराळीच.

आणखी वाचा-गणेशोत्सवात डीजे, फटाके, धक्काबुक्की अपरिहार्यच आहे का? 

असो, ढगे बंधूंचा आणखी एक हट्ट म्हणजे आमच्या शेतीमालावर आम्हीच प्रक्रिया करणार आणि आम्हीच तो थेट ग्राहकांना विकणार. मग हे घडवून आणायचं कसं? तर शेळीपालन, म्हशी पालन, कोंबडी पालन. आता यांच्या कोंबडी पालनाबद्दल नाही बोललं तर काय घ्या ! कोरोना काळात आपण औषधी काढा बनवायचे व्हिडिओ पाहण्यात दंग असताना त्यांनी कृषी विद्यापीठाचे ऑनलाइन सेमिनार केले. मग त्यांनी स्वतःच अंडी उबवणी केंद्र आणि नंतर दहा हजार कोंबड्यांचा खुराडा आणि स्वच्छ मशीनद्वारे कटिंग करून हवाबंद डब्यात चिकन ग्राहकांना घरपोच करण्यासाठी सुरुवात केली आणि यशस्वी करून दाखवली. यात तोळ्याची गोष्ट म्हणजे शेतकरी ते ग्राहक प्रवास म्हणजे ऑर्डरसाठी ते स्वतःचा मोबाईल ॲप वापरतात. आहे की नाही शेतकरी हायटेक !

चला पुढे जाऊया. सरसम या खेडेगावात एक युवा उच्चशिक्षित जोडपं डॉक्टर वृषाली आणि विनय देशमुख, इंजिनिअर, आपल्या क्षेत्रात आगे कूच करत असतं. कोरोना काळामध्ये गावाशी असलेली नाळ पुन्हा घट्ट होते आणि याच जाणिवेतून ते ३३ कोटी नावाचा १०० टक्के इको फ्रेंडली ब्रँड तयार करतात. या ब्रँडच्या माध्यमातून इको फ्रेंडली गोमय गणेशा, धूप, अगरबत्ती, होम हवन गोवऱ्या, राख्या आणि यासारखे ३३ वस्तू गाईचं शेण, गोमूत्र आणि औषधी वनस्पतींपासून बनवतात. बरं, या विविध वस्तू थेट सरसमसारख्या खेड्यातून अमेरिका, युरोप आणि संबंध भारतभर पाठवतात. या समविचारी जोडप्याचं कौतुक यासाठी की ग्रामीण भागातील १५ महिलांना त्यांनी हे कौशल्य देऊन वर्षभर त्यांच्या हाताला काम दिलं. म्हणजेच काय तर या १५ कुटुंबांचं पालकत्वच घेतलं म्हणा की.

आणखी वाचा-नागपूर बुडाले, शेतीचे नुकसान नेहमीचेच, तरी ‘दिव्याखाली अंधार’ कसा? 

आता चला टेंभुर्णी या गावाकडे. या गावचे विशेष म्हणजे, हे आहे डासमुक्त गाव. कसं काय बुवा, हा प्रश्न येणारच. ही किमया असायचं कारण म्हणजे या गावचे तत्कालीन सरपंच प्रल्हाद पाटील. पुन्हा तेच, हे सुद्धा शिक्षणाने इंजिनीयर. टेंभुर्णी हे गाव आहे पुनर्वसित. तेव्हा घराघरातून निघणारं सांडपाणी हे प्रल्हाद पाटलांनी स्वतः डिझाईन केलेल्या शोषखड्यात जातं. आता पुन्हा प्रश्न डोकं वर काढणार, शेवटी शोष खड्डाच की तो. त्यात काय विशेष? आहे. तर हा शोष खड्डा तळाला मोठे दगड, त्यावर छोटे गोटे आणि त्यावर मातीचा रांजण किंवा डेरा बसवून बनवला जातो. सगळं साहित्य गावात उपलब्ध. पाटलांनी ट्रायल ॲण्ड एरर पद्धतीने शोष खड्डा विकसित केलाय. यात विशेष हे की डेरा, रांजण यांना खाली छिद्र न करता मानेकडच्या बाजूला छिद्र करतात. का? तर सांडपाण्यात असलेला घनकचरा तळाला जमतो तर वरचं पाणी या छिद्रातून जमिनीत मुरतं त्यामुळे शोषखड्डा तुंबत नाही. या सांडपाण्यातून गावकऱ्यांनी आपापल्या घरासमोर मस्त बाग फुलवली आहे आणि खाली साचलेला घनकचरा गावकरी शेतात खत म्हणून वापरतात. यामुळे झालं काय की गावातून गटारं, सांडपाण्याची डबकी हद्दपार झालीत. परिणामी मच्छरांनी टेंभुर्णी गावाला टाटा, बाय-बाय केलंय. या स्वच्छतेसाठी आणि डासमुक्तीसाठी टेंभुर्णीचा सन्मान केलाय माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी. शोष खड्ड्याच्या माध्यमातून डासमुक्तीचा हा टेंभुर्णी पॅटर्न नक्कीच खास आहे.

मराठवाड्यातील या काही प्रतिनिधिक उदाहरणांपैकी धनंजयच्या उदाहरणातून वातावरण अनुरूप व बाजारपेठेच्या मागणीनुसार शेती मनावर घ्यायला पाहिजे हा संदेश मिळतो. ढगे बंधू सांगतात की शेतीला जोडधंदा उभारून आर्थिक समतोल साधणं ही काळाची गरज. तर डॉक्टर वृषाली आणि विनय म्हणतात की लघु उद्योगातून ग्रामीण रोजगार अन् समृद्धी येऊ शकते. तर टेंभुर्णी पॅटर्न सांगतो पारंपारिक शोष खड्डा तंत्रज्ञानातून आरोग्यम् धनसंपदेकडे जाता येते. गोळा बेरजेत असे म्हणता येईल की शेतकरी वैयक्तिकरित्या किंवा शतकरी संघटनांच्या माध्यमातून सर्जनशील प्रयोग करू शकतात आणि यशस्वी होऊ शकतात. तेही अगदी कमी गुंतवणुकीत.

आणखी वाचा-भरती थांबल्यावर तरी, संगीत शिक्षकांचा एक सूर हवा!

जाता जाता एवढेच म्हणता येईल की मराठवाड्याचा युवावर्ग आणि गावं नवीन वाटा तर धुंडाळत आहेतच, पण त्याचबरोबर सबंध राज्य आणि देशासाठी नवा पायंडा घालून देण्यातही प्रगतीपथावर आहेत. लेखातील उदाहरणं नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक स्वरूपाची आहेत तरी सबंध मराठवाड्यात अशी कितीतरी उदाहरण सापडतील जी महाराष्ट्राची मान उंचावत आहेत. अशा या सर्वांचं अभिनंदन आणि पुढील समृद्ध वाटचालीसाठी सदैव शुभेच्छा!!!!

लेखक तहसीलदार आहेत.
एक्स आयडी – AdityaShendeSay
adityashende55@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Youth of marathwada are blooming the farm mrj

First published on: 28-09-2023 at 09:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×