लोकसभा निवडणुकीचे (२०१४) पडघम वाजू लागले होते. ‘पप्पू’ हे खरंतर भारताच्या विविध भागांतलं अतिशय लोकप्रिय टोपण नाव. पण ‘पप्पू पास हो गया’, ‘पप्पू कान्ट व्होट’, ‘पप्पू कान्ट डान्स’ या टॅगलाइन्सनी पप्पूची मठ्ठ मुलगा अशी प्रतिमा लोकांच्या मनात पक्की केली होती. अमित शहांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हटलं, ‘काँग्रेसला वाटतं पंतप्रधानपद हा पप्पूचा जन्मसिद्ध अधिकारच आहे. आम्ही आमचा उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसचा उमेदवार कोण आहे? पप्पू?’ तेव्हा फेसबुकच भारतातलं प्रमुख समाजमाध्यम होते. ट्वीटर आपल्यासाठी तुलनेने नवं होतं.

या दोन्ही माध्यमांतून अतिशय नियोजनबद्धपणे राहुल गांधींची पप्पू ही प्रतिमा प्रस्थापित केली गेली. त्यांचं डोळे मिचकावणं, हसताना पडणारी खळी, लागलेली डुलकी, एखादं भलताच अर्थ निघणारं वक्तव्य जे मिळेल ते प्रसारित करून ही प्रतिमा जनमानसात पक्की होईल, याची काळजी भाजपचा आयटी सेल घेत होता. हा शिक्का एवढा पक्का होता की जवळपास २०२४ पर्यंत म्हणजे दहा वर्षांहून अधिक काळ तो कायम राहिला. तेवढ्या काळात दोन सार्वत्रिक निवडणुका होऊन गेल्या.

पुढे राहुल गांधींच्या ‘भारत जो़डो यात्रे’ला मिळालेला प्रतिसाद आणि त्यादरम्यान बदलत गेलेला त्यांचा पेहराव, वाढवलेली दाढी, सर्वसामान्यांत मिसळणं आणि भाजपला निवडणुकीत ‘चारसो पार’ जाण्यात आलेलं अपयश यानंतर पप्पू हे संबोधन ऐकू येईनासं झालं. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचंही भाजपच्या वाचाळ नेत्यांनी असंच नियोजनबद्ध प्रतिमाभंजन केलं होतं. त्यांची ‘मौनमोहन सिंग’ अशी संभावना केली गेली. या साऱ्या भाजपच्या आयटी सेलने राबवलेल्या मोहिमा होत्या, असे आरोप आजही होतात.

पण म्हणतात ना, काट्याने काटा काढला जातो. कदाचित भाजप आणि विशेषतः मोदींना आता याचा अनुभव येत असेल. कारण आज त्याच समाजमाध्यमांचा वापर करून मोदींची प्रतिमाही अशीच धुळीला मिळवली जात आहे. २०१४पासून मोदी एका मखरात बसलेले होते. त्यांच्याकडे कोणी बोटही दाखवू शकत नव्हतं. भक्तगण फारतर लांबून दर्शन घेऊ शकत वा स्तुतीसुमनांची उधळण करू शकत. आपण साक्षात देवाचाच अंश असल्याचा भास स्वतः मोदींनाही होऊ लागला होता. आपण अजैविक असल्याचं त्यांनीच तर मुलाखतीत सांगितलं होतं.

एका भाषणात असंही म्हटलं होतं की मी रोज तीन किलो शिव्या खातो. म्हणजे शिव्या देण्यावर त्यांचा आक्षेप नव्हता. राजकारणात शिव्या खाणं म्हणजे चर्चेत राहणं. मोदींना विरोधक शिव्या देतात तेव्हा त्यांचे समर्थक अधिक चवताळून विरोधकांवर तुटून पडतात. प्रचंड ट्रोलिंग करतात. त्यामुळे शिव्या त्यांच्या हिंदुत्ववादी, अजिंक्य, विश्वगुरू या प्रतिमेसाठी पोषकच ठरत होत्या. निवडणुकांच्या तोंडावर जाहीर सभांत ते आपल्यावर कोणी काय टीका केली हे मोजून दाखवत. त्याचं भांडवल करत. त्यामुळे मोदींना शिव्या आवडतात, हे जगजाहीरच होतं.

पण पंचाईत झाली ती विनोदांमुळे. पोरांनी या अजिंक्य विश्वगुरूची अक्षरशः खिल्ली उडवली. ‘ना पढा हू ना पढने दुंगा’, ‘कुचू पुचू मोदीजी तुम कहा हो’, ‘फ्रेंड्स विदाऊट बेनिफिट’, ‘जंतर मंतर में टेलिप्रॉम्पटर लगा दो शायद मोदीजी आ जाएंगे…’ अशा टॅगलाइन्सची पोस्टर्स त्यांनी जंतर मंतरवर आणले. मीम्स केली आणि जगभर पोहोचवली. ‘आपण यांना पाहिलंत का?’, ‘मैं हू नकारा मोदी’, ‘मोदी जी बुरे दिन वापस कर दो’, ‘जब जब मोदी डरता हैं, पुलिस को आगे करता हैं’ म्हणून त्यांची खिल्ली उडवली.

‘चहा बनवा, वेडे बनवू नका’, ‘बडी आपसे तो चाय भी ना बने’ असं म्हणताना आपण कोणातरी बड्या असामीचा अपमान करतोय, या भावनेने त्यांना स्पर्शही केलेला नसणार कारण त्यांच्या डिक्शनरीत कोणीच बडं नाही, सगळेच ‘बडी’ आहेत. ‘प्रोटेस्ट खत्म हुआ हो तो एक राउंड हिंदू मुस्लीम हो जाये?’ असे भाजपचा प्रपोगंडा थेट चव्हाट्यावर मांडणारे प्रश्न विचारले गेले. मोदी-अदानी, मोदी-मेलोनी अशी मीम्सही कोणताही मुलाहिजा न राखता बनवली गेली. मोदी जिथे जातात तिथल्या सर्वांशी त्यांचा बहुत पुराना रिश्ता असतो. आणि त्यांची ही लोणकढी खपूनही जाते.

या पोरांसमोर तर ती सहजच खपून जाईल, असं मोदींना वाटलं असावं. त्यामुळेच तर ते मध्यरात्री रिल पोस्ट करत ‘मित्रों’ वरून ‘फ्रेंड्स’वर आले. आपणही तुमच्यातलेच एक आहोत, असं भासवण्याची ही धडपड पुरती फसली. पोरांनी त्यांनाच कॅमेरा कसा पकडावा इथपासून ‘कौन फ्रेंड्स, हम नहीं है तुम्हारे फ्रेंड्स’पर्यंत सारं काही जगासमोर सुनावलं.

या फुकटात तयार केलेल्या मीम्सनी मोदींच्या आजवर सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च करून निर्माण केलेल्या भव्य प्रतिमेच्या अक्षरशः चिंधड्या उडत होत्या. बरं यातलं काहीही नियोजनबद्ध नव्हतं. सारं ‘जेनेरिक’. आपोआप तयार होत गेलं. मोदींनी आपल्या ‘इमेज’साठी आजवर काय काय नाही केलं? कोविडच्या लसीकरण प्रमाणपत्रापासून, रेल्वे स्थानकांवरच्या सेल्फी बुथ्सपर्यंत सर्वत्र झळकले. सर्जिकल स्ट्राइक करून ‘घर में घुस के मारल्या’चे दावे केले. नोटाबंदीतून काळा पैसा परत आणणारे आपणच तारणहार असा डंका पिटला.

वृत्तपत्रांच्या पानोपानी आणि रस्त्यांवरच्या नाक्यानाक्यांवर तेच झळकताना दिसतात. कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचं उद्घाटन हा मोदींच्या प्रतिमासंवर्धनाचा इव्हेंट असतो. आपल्या कार्यकाळात देशविदेशांत भारताचा दरारा वाढल्याचं ते स्वतःच नेहमी सांगत असतात, अर्थात कोणत्याही पुराव्यांशिवाय. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी तर त्यांची प्रतिमा रामापेक्षाही भव्य होती. रामललाला ते बोट पकडून मंदिराकडे घेऊन जात होते. छप्पन इंच की छातीचे दावेही त्यांनी अनेकदा जाहीर सभांत केले आहेत.

पण ‘देशाचा एकमेव तारणहार’, ‘कणखर नेता’, ‘एक अकेला सब पे भारी’, ‘छप्पन इंच की छाती’ या प्रतिमेची जेन झीने ‘कुचू पुचू…’ म्हणत पुरती धुळधाण उडवली. ‘चंदा चोर कहाँ मिलेंगे बीजेपी के दफ्तर में, बलात्कारी कहाँ मिलेंगे बीजेपी के दफ्तर में’, ‘जब तक सूरज चाँद रहेगा, मोदी तू बदनाम रहेगा’ अशा घोषणा राजधानीतल्या रस्त्यांवर दणाणल्या. ‘मैंने गरिबी देखी हैं और तुम्हे भी दिखाऊंगा’, ‘मोदीजी आप चले जाइये, चाहे तो मैं झोला ले के आता हूँ’ अशी मीम्स पसरवली गेली. त्यांच्या शिक्षणावर, वैवाहिक जीवनावर अतिशय अश्लील शब्दांत टिप्पणी केली गेली. हा देशाचा अपमान असल्याचा कांगावा करत मोदी समर्थकांनी पुन्हा एकदा मोदी म्हणजेच देश हे नॅरेटिव्ह प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, पण तो पुरता फसला.

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा तर एक मोदींच्या प्रतिमेला मोठाच धक्का होता. ‘एनडीए सरकार में मंत्रीयों के इस्तिफे नहीं होते,’ असं राजनाथ सिंह यांनी आत्मविश्वासाने म्हटलं होतं. तब्बल दोन महिने राजीनाम्याची मागणी होत असूनही भाजपचा एकही मंत्री, पदाधिकारी वा कार्यकर्ता जंतर मंतरकडे फिरकला नव्हता. पण भाजपने बालिश म्हणून संभावना केलेल्या याच पोरांनी एनडीएमध्ये जे अशक्य होतं, ते करून दाखवलं. हे शक्य झालं, कारण मोदींना या विनोदास्त्राची संहारक क्षमता पक्की ठाऊक आहे. त्यांनी त्याची चाचणी अनेक विरोधकांवर याआधी केली आहे. प्रधानांचा राजीनामा घेतला नाही, तर उद्या पंतप्रधानांची पाळी येईल, अशी भीती वाटू लागल्यानेच राजीनामा घेतला गेला, असे दिसते.

आंदोलनात सहभागी अनेकांची भाषा अश्लील, खालच्या दर्जाची आणि आक्षेपार्हही होती, हे मान्यच. भाजपनेही हेच केलं होतं असं म्हणणं म्हणजे ‘…पण आणीबाणीचं काय’, या भाजपच्याच पालुपदासारखं होईल. पण ही पिढीच अशी आहे. मोठ्यांचा आदर केलाच पाहिजे, त्यांनी अधिक पावसाळे पाहिले आहेत, त्यांना उलट बोलू नये, अरे-तुरे करू नये असं काही त्यांना वाटत नाही. तुम्ही बरोबर आहात की चुकीचे, एवढंच त्यांच्यासाठी महत्त्वाचं. आपलं मत साखरपेरणी न करता थेट मांडणं, सरळ समोरच्याला मोडीत काढणं हीच त्यांची जगण्याची पद्धत.

इंटरनेटच्या प्रसारानंतर त्यांचा जन्म झाला. सारं जग समाजमाध्यमं, गुगल, युट्युबने त्यांच्या हातात आणून दिलं. आयुष्य ही काहीतरी गंभीर गोष्ट आहे, त्यामुळे आपण सतत लढ्यासाठी सज्ज असलं पाहिजे, नियमांचं काटेकोर पालन केलं पाहिजे असं काही यांना वाटत नाही. अशी प्रवचनं देणाऱ्या पालकांनाही ‘चिल ब्रो’ म्हणून गप्प बसवणारी ही पिढी. ती पंतप्रधानांना सिरियसली घेणं तर शक्य नव्हतंच. साहजिकच त्यांनी मोदींचा ‘ऑरा मायनस’ करून टाकला.

मोदींचा आजवरचा प्रवास पाहता ते यातूनही मार्ग काढतील. गोध्रा, नोटाबंदी, पहलगाममधून काढला तसाच. पण अशा प्रत्येक घटनेगणिक ‘ऑरा’ काही प्रमाणात ‘मायनस’ होत जातोच. आज त्यांची खिल्ली उडवणारी पिढी येत्या काही काळात मतदार होणार आहे. ती त्यांना विश्वगुरू, एक अकेला सब पे भारी म्हणून स्वीकारेल का, भाजपला आता यावर गंभीरपणे विचार करावा लागेल.

jaya.jangle@expressindia.com