स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील २७व्या ओवीकडे आता वळू. ही ओवी अशी:
तुवां शरीरपरां नोहावें। कामनाजात सांडावें। मग अवसरोचित भोगावे। भोग सकळ।।२७।। (अ. ३ / १८८).
प्रचलितार्थ : तू केवळ देहासक्त होऊन राहू नकोस, सर्व कामनांना टाकून दे आणि मग सर्व भोगांचा यथाकाली उपभोग घे.
विशेषार्थ  विवरण :  इथे देह नाकारलेला नाही, देहासक्ती नाकारली आहे. देहवास्तव नाकारलेले नाही, देहभाव व देहबुद्धी नाकारली आहे. आपलं जगणं मात्र देहासक्त आहे. हीच ओवी अगदी उलटय़ा क्रमानं आपल्या जीवनात ठसली आहे. म्हणजे ‘सकळ भोग भोगावे अवसरोचित’ संधी मिळताच प्रत्येक भोगाचा यथेच्छ उपभोग घ्यावा. ‘मग सांडावे कामनाजात’ भोग घेतल्यावर भोगेच्छा तृप्त होईल, मग कामनांचा त्याग करता येईल. ‘नोहावे शरीरपरां तुवा’ पण शेवटी देहाची साथ मरेपर्यंत आहे. त्यामुळे त्या देहापलीकडे विचार करू नये! आपल्या जगण्याची हीच रीत आहे. दहाही इंद्रियांच्या आवडीचे दहा विषय आहेत. अर्थात बापडय़ा इंद्रियांना आवड कसली? ती आवड माझीच आहे. डोळ्यांद्वारे मी पाहतो, पाहण्याची ओढ मला आहे, डोळ्यांना नाही. डोळे फक्त पाहण्याचे साधनमात्र आहेत. अगदी याचप्रमाणे सर्व कर्मेद्रियांची स्थिती आहे. तेव्हा प्रत्येक इंद्रियाच्या साह्य़ानं आपण आपली आवड पुरवू पाहातो. संधी मिळताच चांगलं-चुंगलं खावं-प्यावं, चांगलं-चुंगलं पाहावं, ऐकावं, बोलावं. अर्थात या ‘चांगलं’ कशाला ठरवायचं, हे आपल्याच मर्जीनुसार ठरणार. शरीराला मानवत नसलं तरी आपल्याला आवडतं ते यथेच्छ खायचं, परनिंदा ऐकण्यात आणि मुखाद्वारे करीत राहण्यात गोडी वाटते तर तीच ऐकत आणि करीत राहायचं, डोळे थकले तरी तासन्तास दूरचित्रवाणी पाहत बसायचं. तर आपण अवसरोचित सकळ भोग भोगण्यात दंग आहोतच. आपल्याला वाटतं, भोग भोगून तृप्ती होईल आणि मग मनातून भोगेच्छा कमी होतील. प्राचीन काळापासून हे सत्य ग्रथित आहे की, यज्ञात तूप ओतल्यावर आग जशी अधिकच भडकते तसे भोग भोगून ते भोगण्याची ओढ मंदावत नाही तर अधिकच वाढते. तेव्हा ती ओढ संपली नसताना कामना सांडणं केवळ अशक्य आहे. आपण मात्र तसं मानतो आणि भोगांत दंग राहतो. आद्य शंकराचार्य म्हणतात, ‘‘अङ्गं गलितं पलितं मुण्डं, दशनविहीनं जातं तुण्डम्। वृद्धो याति गृहीत्वा दण्डं, तदपि न मुञ्चति आशापिण्डम्।।’’ केस गळाले, दात निखळले, हातात काठी घेतल्याशिवाय एक पाऊलही टाकवत नाही अशी शरीराची जर्जर अवस्था आली तरी सुखाच्या आशेमागे धावण्याची सवय कणमात्रही मंदावली नाही!  म्हणजे शेवटचा श्वास घेईपर्यंत आशेचा हव्यास सुटत नाही. त्यासाठी आधार एकमात्र देहाचाच आहे आणि म्हणून देहापलीकडे कोणताही विचार करवत नाही आणि सोसवत तर त्याहून नाही! देहासक्तीत भोगतन्मय होऊन आपण देवासाठी भावतन्मय व्हायची इच्छा बाळगत असतो!