फेलिक्स बॉमगार्टनर

‘धाडसी’ ही त्यची ओळख कधीपासूनचीच! वयाच्या १९ व्या वर्षीपासून काही ना काही अचाट करून दाखवण्याचा ध्यास फेलिक्स बॉमगार्टनर याने घेतला होता, त्यामुळे ही ओळख रुळायला वेळ लागला नाही.

‘धाडसी’ ही त्यची ओळख कधीपासूनचीच! वयाच्या १९ व्या वर्षीपासून काही ना काही अचाट करून दाखवण्याचा ध्यास फेलिक्स बॉमगार्टनर याने घेतला होता, त्यामुळे ही ओळख रुळायला वेळ लागला नाही. त्याने एक लाख २८ हजार ९७ फुटांवरून मारलेली उडी, हा विक्रम मानावा की नाही याबद्दल दुमत आहे; परंतु एक गोष्ट नक्की आहे : तीन-तीन कॅमेरे अंगावर घेऊन फेलिक्सने ही उडी मारली, त्यामुळे त्याचा प्रत्येक मिलिसेकंद नोंदवला गेला आहे. त्याने घातलेला ‘स्पेससूट’ हा आजवरचा सर्वाधिक सुरक्षित अंतराळपोषाख ठरू शकेल काय आणि अंतराळयानात काही दुर्घटना घडल्यास कल्पना चावलासारख्यांचे बळी न जाता ते केवळ पॅराशूटनिशी उडय़ा मारून सुखरूप भुईवर परतू शकावेत यासाठी आणखी कायकाय करता येईल, या साऱ्याच अभ्यासांना फेलिक्सच्या उडीमुळे उभारी मिळणार आहे! फेलिक्स रगेल आहेच. त्याशिवाय अशी साहसे जमत नसतात. पण त्याची रग मानवी प्रगतीला उपयोगी पडणार आहे, हे अधिक महत्त्वाचे. आज तो ४३ वर्षांचा आहे, पण  अठरा वर्षांचा असताना इंग्लिश खाडी पोहण्यापासून ते या उडीपर्यंतच्या प्रवासात त्याने अनेक उंच इमारती, पूल यांवरून उडय़ा मारल्या आहेत. हेलिकॉप्टरमधून स्कायडायव्हिंगमध्ये तरबेज झाल्यावर  १९९७ साली त्याने ‘बेस जम्प’चे – म्हणजे इमारतींवरून पॅराशूटच्या साह्याने उडी मारण्याचे- रीतसर प्रशिक्षण घेतले, तो व्यावसायिक हेलिकॉप्टर चालक आहेच पण अंतराळवैमानिकीचेही प्रशिक्षण त्याला या महा-उडीसाठी घ्यावे लागले. मैत्रिणी, खाणेपिणे, व्हेनिस वा हॉलिवूडसारख्या ठिकाणी फिरणे त्यालाही आवडते, पण त्यापेक्षा अधिक आवडते ते ‘स्वतच्या मर्यादा न पाळणे’! एका कथित उत्साहवर्धक पेयाने त्याला अंतराळ-उडीची संधी दिली, त्यासाठी तो जानेवारीपासून तयारी करत होता. फेलिक्सचे उमदे व्यक्तिमत्त्व आणि त्याच्या नावावर जमा होत जाणारी काही सुविचारवजा वाक्ये हे सारे पुढल्या काळात तो ‘सेल्फ हेल्प’ प्रकारचे टीव्ही कार्यक्रमही करू शकेल, असे आहे.  ‘ध्येय व तुम्ही यांच्यामध्ये फक्त एकच गोष्ट असते.. हे मला करता येणार नाही याची तुम्हीच तुम्हाला सांगितलेली कारणे’ हे म्हणणेही फेलिक्सचेच!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Felix baumgartner

Next Story
अनलजित सिंग
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी