मराठीत ‘देवकण’ म्हणून ओळखल्या जाणार्या ‘हिग्ज बोसॉन’ या अतिसूक्ष्म अवआण्विक कणाच्या नावातला ‘बोसॉन’ म्हणजे कण आणि ‘बोसॉन’ हे नाव अशा कणांची कल्पना मांडणारे भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या आडनावावरून आले, इतपत ठीक… पण पीटर हिग्ज यांचे एकट्याचे नाव ‘देवकणा’साठी वापरणे हा खरेतर अन्यायच- कारण १९६४ सालात अशा कणाच्या अस्तित्वाचे सैद्धान्तिक संशोधन जेवढे हिग्ज यांनी ब्रिटनमध्ये केले, तेवढेच बेल्जियममध्ये त्याच वर्षी फ्रान्स्वां इन्ग्लर्ट आणि रॉबर्ट ब्राउट यांनी केले होते.
पुंजभौतिकीच्या (क्वांटम फिजिक्स) ज्ञानात मोलाची भर घालणार्या हिग्ज आणि फ्रान्स्वां इन्ग्लर्ट या दोघांना विभागून २०१३ सालचे भौतिकशास्त्र ‘नोबेल’ देण्यात आले, इतकी इन्ग्लर्ट यांची कर्तबगारी. ढोबळमानाने ‘देवकणा’च्या क्षेत्राचा (किंवा ऊर्जाक्षेत्रात अवआण्विक कणाच्या अस्तित्वाचा) अभ्यास हिग्ज यांनी केला व त्याच्या (ऊर्जाक्षेत्रातूनच मिळणार्या) वस्तुमानाबद्दल इन्ग्लर्ट- ब्राउट यांनी सैद्धान्तिक विवेचन केले, एवढाच फरक. त्यामुळेच तर, या सिद्धान्तावर आधारित ‘लार्ज हेड्रॉन कोलायडर’च्या महत्त्वाकांक्षी प्रयोगाला २०१२ साली मिळालेले पहिले यश पाहाण्यासाठी हिग्ज यांच्या बरोबरीने इन्ग्लर्टही हजर होते.
मुळात ‘हिग्ज बोसॉन’विषयीचा सिद्धान्त पहिल्यांदा ‘ब्राउट- इन्ग्लर्ट- हिग्ज’ यांच्या आडनावांच्या आद्याक्षरांवरून ‘बीईएच संरचना’ अशा नावाने ओळखला गेला. (शोधनिबंंध प्रकाशनाच्या कालक्रमात १९६४ च्या ऑगस्टमध्ये ब्राउट-इन्ग्लर्ट, ऑक्टोबरात हिग्ज). ‘देवकणा’च्या वस्तुमान आणि क्षेत्राच्या संबंधावर गुराल्निक, हागेल आणि किबल यांनी सैद्धान्तिक संशोधन केल्यामुळे ते शास्त्रीय नाव ‘बीईएचजीएचके संरचना’ असे लांबलचक झाले… थोडक्यात, विज्ञानाच्या क्षेत्रात कुणीतरी एकच नायक असू शकत नाही… नायकत्व द्यायचे तर अनेकांना द्यावे लागते. यापैकी फ्रान्स्वां इन्ग्लर्ट हे पुंजभौतिकीचे एक नायक, गेल्या गुरुवारी वयाच्या ९३ व्या वर्षी जगाचा रंगमंच सोडून गेले.
फ्रान्स्वां यांचे वैयक्तिक आयुष्य- विशेषत: वयाच्या सहाव्या वर्षी पालकांपासून ताटातूट (१९४०) ते पस्तिशीच्या किंचित आधी मांडलेले संशोधन (१९६४) या काळातले त्यांचे जगणे- नाट्यमय घटनांनी भरलेले होते. कुटुंब पोलंडच्या ज्यू समाजापैकी. व्यवसायासाठी वाडवडील बेल्जियमला आले. नाझी फौजा बेल्जियममध्ये घुसत असताना, आईवडिलांनी छोट्या फ्रान्स्वांला एका कॅफेचालकाच्या हवाली केले. तिथून एका अनाथाश्रमातून दुसर्या असे चक्रच सुरू, त्यातच एका चर्चच्या शाळेत, तिथे पाद्रीबुवांकडून ‘ख्रिस्ती’ म्हणून बाप्तिस्मा – आणि म्हणूनच नाझींपासून बचाव, हुशार दिसतो आणि मोटारउद्योग वगैरेत बरा वाव मिळेल म्हणून ब्रसेल्सच्या विद्यापीठात विद्युतचुंबकीय भौतिकीचे शिक्षण, प्रेम, संसार सुरू असतानाच भौतिकशास्त्राची गोडी लागून पीएच.डी. आणि त्यानंतर तीन वर्षांनी नवे सैद्धान्तिक संशोधन असा प्रवास होता.
आईबाप असूनही भोगावे लागलेले पोरकेपण, स्थलांतरामुळे ‘हे दिवस विसरायचेत’ मनाची तयारी, त्यातून पौगंडावस्थेतला बेदरकारपणा, तरुणपणीची जिगर आणि युद्धोत्तर काळात नवी संधी मिळाल्यानंतरची ऊर्मी अशा टप्प्यांमध्ये हे आयुष्य कसे गेले, याचा आलेख ‘नो विज्डम विदाउट फॉली’ या त्यांच्या चरित्रात आहे. पहिल्या पत्नीपासून तीन, तर दुसरीपासून दोन अशी मुले, तिसरी हयात पत्नी तसेच नातवंडे हे त्यांचे व्यक्तिगत कुटुंब; पण पुंजभौतिकीच्या अभ्यासकांचा गोतावळा मागे सोडून ते निवर्तले.
