सिरिया या देशाची वाटचाल सध्या इराकच्या दिशेने सुरू आहे का? सिरियाचे अध्यक्ष बशर अल्-असाद हे पुढचे सद्दाम हुसेन किंवा गडाफी आहेत का? सध्या तरी तसेच दिसत आहे. असाद यांची सत्ता उलथवून लावण्यावर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ११ देशांचे परवाच एकमत झाले आहे. अमेरिकेला केवळ आपल्याच बाजूचे हुकूमशहा चालतात. असाद हे त्यातले नाहीत. त्यामुळे जगात सर्वत्र लोकशाहीची प्रतिष्ठापना करण्याची जी पवित्र शपथ अमेरिकेने घेतली आहे, त्याअंतर्गत असाद यांना सत्ताच्युत करण्यासाठी अमेरिका आता उतावीळ झालेली आहे. तेथे अरब िस्प्रग असे काही असलेच तर ते केवळ तात्कालिक कारण आहे. इराक युद्धापासूनच सिरिया हे अमेरिकेचे लक्ष्य होते. ‘सिरियात बदल केला गेलाच पाहिजे,’ हे २००३च्या एप्रिलमधले पॉल वुल्फोवित्झ यांचे उद्गार आहेत. तेव्हा ते बुश मंत्रिमंडळात संरक्षण उपमंत्री होते. फेब्रुवारी २००५ मध्ये लेबनॉनचे पंतप्रधान रफिक हारिरी यांची हत्या झाली. त्याच वेळी खरे तर असाद जायचे, पण लेबनॉनमध्ये असलेले सिरियाचे १४ हजार सनिक काढून घेण्यावर त्यांची सुटका झाली. आता मात्र त्यांना गडाफींच्या वाटेने जावेच लागेल अशी परिस्थिती आहे. गेली दोन वष्रे सिरियात यादवी सुरू आहे. असाद सरकार आणि हिजबुल बंडखोर यांची आघाडी विरुद्ध ‘फ्रेण्ड्स ऑफ सिरिया’ ही बंडखोरांची आघाडी असे युद्ध तेथे सुरू आहे. त्यात आतापर्यंत ९३ हजार लोक मारले गेले आहेत. अशा परिस्थितीत गेल्या शनिवारी दोहा येथे झालेल्या बठकीत अमेरिका, तसेच ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, जॉर्डन आणि तुर्कस्तान या राष्ट्रांनी असादविरोधी बंडखोरांना ‘तातडीने आवश्यक ती साधनसामग्री’ पुरविण्याचा ठराव केला. खरे तर हा ठराव गेल्याच आठवडय़ात झालेल्या जी-८ देशांच्या बठकीतच होणार होता; परंतु सिरियन बंडखोरांना शस्त्रपुरवठा करणे म्हणजे ब्रिटिश सनिक ली रिग्बी याची ज्यांनी हत्या केली, अशा लोकांनाच शस्त्रे पुरवण्यासारखे आहे, असा इशारा देऊन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी त्याला जोरदार विरोध केला. ही आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक गंमतच आहे. अमेरिकेला ज्या कारणासाठी असाद नको आहेत, नेमक्या त्याच कारणासाठी रशियाला ते हवे आहेत. शीतयुद्ध संपले, तरी त्या काळात जन्मलेली समीकरणे आजही काही प्रमाणात कायम आहेत आणि त्या समीकरणांना आज कधी नव्हे इतकी आíथक किनार आहे. सिरिया हा इराकनंतरचा मध्य-पूर्वेतला सर्वाधिक तेलश्रीमंत देश आहे. इराणमधील किर्कूक ते सिरियातील बनिआस बंदर व्हाया इराक ही ८०० कि.मी. लांबीची तेलवाहिनी तेथे आहे. असाद यांना पदच्युत करण्याच्या बदल्यात फ्रेंड्स ऑफ सिरियाकडून या तेलावर नियंत्रण मिळवणे हे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे; तर तिकडे रशियाचे सिरियाशी १९४६ पासूनचे घट्ट व्यापारी संबंध आहेत. एकटय़ा २०११ मध्येच रशियाने सिरियाला एक अब्ज डॉलरचा शस्त्रपुरवठा केला होता. चार अब्ज डॉलरच्या शस्त्रपुरवठय़ाची कंत्राटे अजून पूर्ण व्हायची आहेत. सिरियाला शस्त्रपुरवठा करण्यावर पुतिन जी-८ परिषदेतही ठाम होते, याचे कारण हे आहे. एकूण हा या दोन देशांच्या हितसंबंधांचा खेळ आहे. त्यात सिरियातील सामान्य लोक कुठेच नाहीत. असाद गेले तरी सिरियाचे हाल संपणार नाहीत. गडाफी गेल्यानंतर लिबियात जे सुरू आहे तेच येथे घडणार, हे दिसतेच आहे.