scorecardresearch

Premium

तो, ती, ते… की आपण सगळे?

मुलामुलींनी एकत्र एकमेकांजवळ बसण्यावर या स्थानिकांचा आक्षेप होता… आपल्याकडे अजून तो आणि ती यांनाच समानतेसाठी संघर्ष करावा लागतो आहे!

gender awareness among boys and girl
तो, ती, ते… की आपण सगळे?

वैशाली चिटणीस

लिंगभाव या मुद्द्याबद्दलची उमज किती अंगांनी बदलते आहे, हे दर्शवणाऱ्या या एकदोन दिवसामधल्या बातम्या खरोखरच लक्षवेधक आहेत. त्यातली एक बातमी आहे तिरुवनंतपूरममधली. तिथल्या त्रिवेंद्रम इंजिनियरिंग महाविद्यालयाजवळ असलेल्या बसस्टॉपवर असलेल्या बाकड्यांवर त्या महाविद्यालयांमधली मुलं-मुली बससाठी वगैरे थांबत. त्यांच्यामधली जवळीक न आवडून काही स्थानिक लोकांनी ती बाकडी मोडून तोडून लहान करून टाकली जेणेकरून मुलामुलींना एकत्र बसता येऊ नये. थोडक्यात त्या मुलामुलींनी एकत्र एकमेकांजवळ बसण्यावर या स्थानिकांचा आक्षेप होता.

Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

मुलांना हे समजल्यावर त्यांनी लॅपटॉप प्रोटेस्ट सुरू केलं. त्यांना आम्ही शेजारी शेजारी बसायला नको आहे, तर आम्ही एकमेकांच्या मांडीवर बसतो, असं या मुलांचं म्हणणं होतं. त्यांनी त्या कापून लहान केलेल्या बाकड्यांवर एकमेकांच्या मांडीवर बसून, एकमेकांच्या गळ्यात गळे घालून छायाचित्रं काढली आणि ती समाजमाध्यमांवर प्रसृत केली. त्यांची ही छायाचित्रं समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाल्यावर त्यांना इतर विद्यार्थ्यांचा, विद्यार्थी संघटनांचाही भरभरून प्रतिसाद मिळू लागला. इतरही महाविद्यालयांची मुलंमुली तिथे येऊन अशी छायाचित्रं काढून समाजमाध्यमांवर टाकायला लागले. शहराचे महापौर त्या बस स्टॉपवर येऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर करून गेले. महापालिका तिथे पुन्हा आधीसारखी मोठी बाकडी ठेवेल असं त्यांनी जाहीर केलं.

पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं आहे ते या छोट्याशा आंदोलनाला असा प्रतिसाद मिळाल्यानंतरही या आंदोलनाशी संबंधित मुलं जे काही म्हणत आहेत ते. आम्हाला अशी छायाचित्रं टाकून या स्थानिक लोकांना विरोध करायचा नाहीये, की त्यांच्याशी लढायचंही नाहीये. आमचं हे छोटंसं आंदोलन आहे ते त्यांनी निव्वळ मुलगा – मुलगी एवढ्याच दृष्टिकोनातून बघू नये, आमच्याकडे बघताना लिंगभेद हा अडथळा असू नये असं आम्हाला वाटतं. ते ज्या जगात वाढले आहेत, ते जग वेगळं होतं आणि आमचं जग वेगळं आहे. एका रात्रीत कुणी बदलणार नाही हे आम्हाला मान्य आहे. पण निदान उघड्या डोळ्यांनी आमच्याकडे बघा तरी. आणि आमच्यावर ही नैतिक पोलीसगिरी करू नका, असं या मुलांचं म्हणणं होतं.

आपल्याकडे बदल होत असले तरी अजूनही बऱ्याच घरांमध्ये मुलगा आणि मुलगी या दोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीने वाढवलं जातं. कामांची, जगण्याची विभागणी अनेक ठिकाणी लिंगसापेक्षच असते. पण ही विभागणी आम्हाला मान्य नाही, आणि लिंगभाव आम्हाला इतरांनी शिकवू नये, हे ही तरूण पिढी वेगळ्या पद्धतीने सांगू पाहते आहे, ते फार महत्त्वाचे आहे.

आपल्याकडे मुलगा मुलगी या भेदांवरच असे संघर्ष सुरू असताना जगात मात्र लिंगभावावरची चर्चा खूपच पुढे गेली आहे. कोणत्याही भाषेत काही लिंगभाव सापेक्ष शब्द, संबोधनं असतात, तर काही लिंगभाव निरपेक्ष. लिंगभाव सापेक्ष संबोधन वापरताना त्यातून भिन्नलिंगी व्यक्ती आपोआपच वगळली जाते. तिला अशा पद्धतीने वगळले जाऊ नये यासाठी शालेय पातळीपासूनच लिंगनिरपेक्ष शिक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी चर्चा काही देशांमध्ये सुरू आहे. स्पॅनिश भाषेत amigos म्हणजे मित्रांनो हा शब्द वापरण्याऐवजी amigues हा लिंगनिरपेक्ष शब्द वापरला जावा असा आग्रह सुरू झाला आहे. todos म्हणजे all हा शब्द वापरण्याएवजी काही जण todxs हा आणखी सर्वसमावेशक शब्द वापरतात. व्यक्तीचे पुरूषत्व किंवा स्त्रीत्व सूचित करणारे शब्द शालेय शिक्षणातून वगळून भाषा सर्वसमावेशक करण्याचे प्रयोग स्पेनमध्ये, फ्रान्समध्ये सुरू झाले आहेत. भाषेच्या पातळीवरचा हा दृष्टिकोन अधिक व्यापक पातळीपर्यंत नेता यावा आणि भिन्नलिंगी व्यक्तींकडे अधिक संवेदनशीलतेने बघण्यासाठी धोरणात्मक बदल व्हावेत, यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. लिंगसापेक्ष दृष्टिकोनाला ठाम विरोध करण्यासाठी भाषा हे माध्यम महत्त्वाचं आहे हा विचारच खूप मुलगामी आहे.

आपल्याकडे अजून तो आणि ती यांनाच समानतेसाठी संघर्ष करावा लागतो आहे. तो, ती, ते यांना ओलांडून आपण या पातळीवर जाण्यासाठीचा खूप मोठा टप्पा आपल्याला ओलांडायचा आहे, हेच यातून लक्षात येतं.
vaishali.chitnis@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-07-2022 at 10:44 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×