केवळ आयपीएलच्या नावाने कितीही कंठशोष केला तरी रोगाचे जोपर्यंत समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत रोगाची लक्षणे वारंवार उद्भवतील हे नि:संशय. खरा रोग आयपीएलचे भूत निर्माण करण्याच्या आणि त्या भुताचे कोडकौतुक करण्याच्या सामाजिक मानसिकतेत दडलेले आहे. आयपीएलचे खेळाडू, पंच ही सगळी केवळ पटावरची प्यादी आहेत. एकूण आजची सामाजिक मानसिकता मूल्ये पायदळी तुडविणारी आहे. कसेही करून भरपूर पसा विधिनिषेधशून्य मार्गाने मिळवायचा अणि भडक राहणीमानाने उडवायचा! हे सगळे करताना देशात करोडो लोक दोन वेळच्या अन्नालासुद्धा मोताद आहेत याची पुसटशी जाणीवसुद्धा नसणे हे या रोगाचे मूळ आहे. त्याशिवाय २० लाख रुपयांच्या जीन्स घेणे, सतत पाटर्य़ावर आणि मुलींवर पसे उधळणे आणि हे पसे देशात अराजक माजविण्यासाठी वापरणाऱ्या व्यक्तींकडून येतात याची थोडीसुद्धा फिकीर नसणे हे कसे संभवते? सर विन्स्टन चíचल यांचे ब्रिटिश संसदेतील You are leaving this country to rascals and scoundrels हे उद्गार आपण दुर्दैवाने खरे करून दाखवत आहोत!
– राजीव मुळ्ये, दादर, मुंबई

‘लीगल बेटिंग टॅक्स’ भरायला आवडेल!
स्पॉट फिक्सिंगवरून मुंबई व दिल्ली पोलिसांमध्ये शीतयुद्ध सुरू झाल्याची बातमी वाचली. खरे तर शीतयुद्ध कुठे नाही? सोनिया-मनमोहन सिंग, सुषमा स्वराज-अरुण जेटली, या दोघांबरोबर-अडवाणी, गडकरी-मुंडे यादी तर पानभर होईल. मग या पोलिसांनी जर त्यांचाच कित्ता गिरवला तर आज्ञाधारक म्हणून कौतुकच करायला हवे. आता नेहमीप्रमाणे दबाव आणायचा तर दोन्हीकडील पोलिसांवर आणावा लागेल, म्हणजे नेत्यांची डोकेदुखी वाढली. पुन्हा चॅनेलमधल्या शीतयुद्धांमुळे बातमी दाबतापण येत नाही, कारण दुसऱ्याचा टीआरपी वाढणार! खरंच अवघड झालंय या घोटाळेबाजांचं, वाईट वाटतं कधी कधी!
त्यापेक्षा बेटिंग अधिकृत करायची सूचना सर्वोत्तम आहे. दारू पिणे अधिकृत केले आहेच आणि दारूपासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आकडय़ामुळे पुन्हा बंदी शक्यच नाही आणि पिणारे काय बंदी आणणार?
तर बेटिंग पूर्वलक्ष्यी प्रभावाने अधिकृत करावे. त्यामुळे या वर्षीच्या १५ हजार कोटींवरचा करदेखील मिळेल. आमच्यासारखे ‘पापभिरू’ (खरं तर भित्रे) देखील महाराष्ट्र लॉटरीऐवजी बेटिंगमध्ये उत्साहाने सामील होतील. ‘लीगल बेटिंग टॅक्स – छइळ’ असं सुटसुटीत नाव द्यावे. बुकी व्यापारांसारखे बंद वगरे न करता इमानदारीने कर भरतील याबद्धल खात्री आहे. गांधींजी आता लिलावापुरतेच उरले आहेत, तेव्हा भीती कशाची?
– सुहास शिवलकर

आंबेडकरी चळवळीची सरसकट बदनामी का?
आंबेडकरवादी नक्षलवादाकडे वळत आहेत असा निष्कर्ष काही उदाहरणांवरून काढणे घाईचे आहे. (लोकसत्ता, २६ मे) जागतिकीकरणामुळे जी सामाजिक उलथापालथ होते आहे, आíथक दरी वाढते आहे त्याची भवितव्यातील होऊ शकणारी अपरिहार्य परिणती म्हणजे नराश्यग्रस्त तरुण (मग तो कोणत्याही जाती/धर्माचा असो) नक्षलवादाकडे वळू शकेल. नक्षलवादाचे छुपे समर्थक व प्रचारक आंबेडकरवाद्यांपेक्षा अन्य समाजघटकांत अधिक सापडले आहेत. ‘आंबेडकरी विद्रोह नक्षलवादाच्या वाटेवर?’ असे बातमीचे भडक शीर्षक देऊन ‘दै. लोकसत्ता’ने आंबेडकरी विद्रोहाचे जे सरसकटीकरण केले आहे ते चुकीचे व गरसमज पसरवणारे आहे. नक्षलवादी तत्त्वज्ञान नराश्यग्रस्त तरुणांच्या गळी उतरवणे सोपे असते. त्यामुळे मुळातच आपल्या अर्थव्यवस्थेची काळजीपूर्वक पुनर्रचना करत सर्वच समाजघटकांना जगण्याची व आत्मभान देण्याची व्यवस्था निर्माण करावी लागेल तरच माओवादाचा भस्मासुर कायमस्वरूपी नष्ट करता येईल. केवळ कम्युनिस्टांचा विरोध आहे म्हणून गप्प बसता येणार नाही, कारण नक्षलवादी हे देशाचे शत्रू आहेत हे वास्तव लक्षात घ्यावे लागणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वत: साम्यवादाच्या विरोधात, तर उदारमतवादी फेबियन समाजवादाचे नुसते समर्थक नव्हते तर तत्त्वज्ञ होते ही बाब बहुतेक आंबेडकरवादी जाणतात, त्यामुळे ते (काही गरसमजातून वाट चुकलेले तरुण वगळता) सारेच नक्षलवादाकडे वळतील ही शंका निर्थक अशीच आहे!
– संजय सोनवणी

विध्वंसाच्या मानसिकतेला विकासाची कास हेच उत्तर
गिरीश कर्नाड यांचे विचार वाचले (२६ मे) आणि त्यांनी शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. सहिष्णुतेच्या बाबतीत देश २०-३० वष्रे मागे गेला असे गिरीशजींना वाटते, पण ते अर्धसत्य आहे. गेले ४५० वष्रे हिंदू समाज सहिष्णुतेचा जप करत बसला होता, परंतु मुस्लीम मानसिकतेला ते कळत असून वळत नव्हते. तोडफोड करणे, विध्वंस करणे ही प्रामुख्याने या मानसिकतेची देण आहे. हजार हजार वष्रे ज्ञानदानाचे पवित्र कार्य समस्त मानव जातीसाठी करणारी विद्यापीठे कोणी उद्ध्वस्त केली? भारतातच नाही तर जगात अनेक ठिकाणी कोणत्या मानसिकतेने थमान घातले याचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर त्याच्या मुळाशी मुस्लीम मानसिकता आहे हे कर्नाडसाहेबांनी लक्षात घ्यावे. त्यासाठी इतिहासात फार खोलवर डोकावण्याची गरज नाही. अगदी अलीकडे अफगाणिस्तानातील प्रचंड बुद्ध मूर्ती कोणत्या मानसिकतेतून उद्ध्वस्त झाली? बाबरी मशीद पाडण्यासाठी ज्या समाजाला म्हणजेच हिंदू विचारधारेला आडवळणाने दोष दिला जातो व त्यामुळे भाजपा सत्तेत आला हे तुणतुणे किती दिवस वाजवत बसणार आहे? या देशात हिंदू बहुसंख्येने आहेत म्हणूनच येथे लोकशाही अद्याप टिकून आहे हे सत्य आहे. समाज आता अन्य गोष्टींचा विचार न करता विकासाच्या विचारालाच प्राधान्य देणार आहे हे नक्की. लोकशाही टिकविण्यासाठी मात्र सर्वानी तयार राहायला हवे. मुस्लीम समाजातील प्रगतिशील विचारकांना पुढे आणण्यास व त्या समाजात जागृती निर्माण करण्यास त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. त्याचबरोबर एकगठ्ठा मतांच्या मागे राजकीय पक्ष लागणार नाही हे पाहण्याचे काम गिरीशजी आपल्या ताकदीनुसार करतील तर काही बिघडेल का?
चित्रपट क्षेत्रामधील घटनांचा जो उल्लेख त्यांच्या मुलाखतीत झाला तो मान्य करायलाच हवा. त्यासाठीही समाजाचे प्रबोधन करणे हाच उपाय आहे.
– श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)

गुंडगिरीला मान्यता नेमकी कधी मिळाली?
गिरीश कर्नाड यांनी मांडलेल्या विचाराच्या निमित्ताने काही बाबी मांडाव्याशा वाटतात. बाबरी पडली १९९२ साली. भाजपा सरकार सर्वप्रथम केंद्रात आले १९९६ साली म्हणजे बाबरी प्रकरण घडल्यावर चार वर्षांनी. तसेच भाजपाला एकदाही स्वबळावर बहुमत मिळाले नव्हते. त्याने सरकार स्थापन केले ते अन्य पक्षांचे सहकार्य घेऊन. म्हणजेच भाजपाला अद्याप देशभर लोकमान्यता मिळालेली नाही. याउलट १९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाल्यावर सत्ताधारी काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली शिखांचे हत्याकांड झाले. त्यानंतर लगेचच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला स्वबळावर अभूतपूर्व बहुमत मिळाले. मग झुंडशाहीला खरोखरच लोकमान्यता व राजमान्यता मिळाली का? मिळाली असल्यास नेमकी कधी? १९८४ की १९९६? मात्र, मुस्लीम मतदार १५ टक्के आणि शीख मतदार फक्त २ ते ३ टक्के असलेल्या निधर्मी देशातले तथाकथित बुद्धिवादी या प्रश्नाचे उत्तर ‘१९९६ साली’ असेच देतील, यात शंका नाही.
केदार अरुण केळकर, दहिसर

भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ही केवळ झूल
आपल्या २४ व २५ मेच्या अंकांतील बातम्यांवरून मल्याळमला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून मराठीलाही तसाच दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम चालू असून लवकरच ते पूर्ण होईल असे समजते. प्रस्ताव दिल्यावर यथावकाश मराठीलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळेल; तथापि तो मिळाल्यावर मराठीप्रेमींनी आत्मसंतुष्टता येऊ देऊ नये. अभिजात भाषेचा दर्जा ही एक प्रतिष्ठेची झूल आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी जास्तीत जास्त बोलली गेली पाहिजे, तिच्यात उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती व्हायला पाहिजे, ती ज्ञानभाषा कशी होईल ते पाहायला हवे, प्रगत समाजजीवन हा तिचा पाया असायला हवा. भाषा ही लोकांनी जिवंत ठेवायची असते आणि वृद्धिगत करायची असते. सरकारकडून मिळणारे सर्टिफिकेट यासाठी फारसे कामाला येत नाही. जाता जाता एका गोष्टीचा निर्देश करावासा वाटतो. मल्याळमला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी ती भाषा त्यांना रोजगार मिळवू देऊ शकत नाही. त्यासाठी बहुसंख्य मल्याळींना मध्यपूर्वेकडे धाव घ्यावी लागते नि तिथे अरेबिक शिकावीच लागते.
– शरद कोर्डे, ठाणे.