विनोद झोंबला म्हणून हिंसाचार झाला, एवढय़ाने विनोद हरत नाही. जगभरच्या हुकूमशहांना पुरून उरण्याची ताकद विनोदात आहेच. कोणत्याही एकाच विचारसरणीची झापडे असणाऱ्यांपर्यंत विनोद पोहोचतच नाही, म्हणून काही विनोद हरत नाही. जिंकणे किंवा हरणे यांच्या पलीकडे गेलेल्या विनोदाचा विजय होतच राहतो..  
एखाद्या समाजात किंवा एखाद्या देशातील राजकारणात उलथापालथ घडवून आणण्याएवढी ताकद विनोदात नसते, असे पूर्वी म्हटले जायचे. शार्ली एब्दो या व्यंगचित्र नियतकालिकावरील हल्ल्यानंतर हे वाक्य जरा जपूनच उच्चारावे लागेल, पण हल्ल्याच्या आठवणी पुसल्या गेल्या तरी विनोद राहीलच. गेल्या काही वर्षांपासून विनोदातून उठलेल्या वादळांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रे ढवळून निघाली. तरीही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात खरे तर विरंगुळ्याचे हळवे साधन म्हणूनच विनोदाकडे पाहिले जाते. कारण, विनोद हा आरोग्यपूर्ण अभिव्यक्तीचा सुंदर आविष्कार असतो. एखादे ठरावीकच माध्यम हवे यासाठी विनोद कधी अडून, रुसून बसत नाही.  कधी त्याला भाषेचीही बंधने नसतात. तो कोणत्याही भाषेतून जन्म घेतो आणि तितक्याच नर्मपणाने कोणत्याही भाषेत विरघळून जातो. विनोदाला व्यक्त होण्यासाठी शब्दच लागतात, असेही नाही. हावभाव, अभिनय, रेषा आणि शब्द किंवा अगदी नि:शब्द अशा असंख्य माध्यमांशी विनोदाची निखळ मैत्री सहजपणे झालेली असते, कारण विनोदाचा विशुद्धपणा या सर्व माध्यमांनी स्वीकारलेला असतो. त्यामुळे कोणत्याही माध्यमातून पसरलेला विनोद सर्वतोमुखी होतोच. वाळ्याच्या पंख्यातून निघणाऱ्या मंद सुगंधी वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे तो सुखावणारा असतो. कधी बोचरा असलाच, तरी तो घातक नसतो. कधी कधी त्याच्या फैलावाच्या अतिरेकातून गैरसमज पसरतात, पण ते गैरसमजही दूर करण्याची ताकद विनोदातच असते. एखादा विनोद कधी कधी एवढा फैलावतो, की तो कायमचा कुणाच्या मानगुटीवरही बसतो. पण त्याच्या ओझ्याने माना मोडत नाहीत. उलट गुदगुल्याच होतात. मुंबई-पुणेकरांची तर एकमेकांवरील विनोदाची कुरघोडी सुरू असते.  पुणेकरांवर आजवर जेवढय़ा कोटय़ा झाल्या आहेत, तेवढे विनोद अन्यत्र क्वचितच कुठे होत असतील. पण त्यामुळे निखळ मनाच्या पुणेकरांनी महाराष्ट्राशी संघर्ष केला नाही.
असे असले, तरी विनोदाचेदेखील अनेकांना वावडे असते. विनोदातून निर्माण होणाऱ्या आनंदाचा अनुभव घेणे हा स्वभावाचा आणि मानसिक जडणघडणीचा भाग असतो. प्रत्येकाची जडणघडण तशी असतेच असे नाही. त्यातूनही राजकारण आणि काही विशिष्ट भावनांना स्पर्श करणारा निखळ विनोदही कधी कुणाला एवढा टोचू लागतो, की त्या विनोदाचे वाभाडे काढण्याचा हिंस्रपणा माना वर काढू लागतो. त्यातून संघर्ष उभे राहतात आणि विनोदाच्या अंगी उलथापालथ घडविण्याची ताकदच नसते, असा समजही खोटा वाटू लागतो. विनोद हा खिल्ली उडविण्याचा एक प्रकार असला, तरी अभिरुचीची पातळी सांभाळण्याचे भान निखळ विनोदाकडे असते. विनोद करणाऱ्यांनीच भान सोडल्याचा दावा करण्यातही, विनोद ज्यांना कळत नाही तेच पुढे असतात. भान सोडले, तर विनोद झालाच कसा, या प्रश्नावर असे दावेदार निरुत्तर असतात. विनोदाकडे पाहणाऱ्यांना ते भान नसले, तरच हे घडू शकते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावरील समाजमाध्यमातून सर्वदूर पोहोचलेल्या व्यंगचित्रांनी असेच वादळ एकदा माजविले होते. निखळ आनंद देण्याच्या भावनेतून कुणी तरी पाठविलेली ममता बॅनर्जीवरील व्यंगचित्रे त्याच भावनेतून अन्य मित्रांना पाठविणाऱ्या अंबिकेश महापात्रा नावाच्या जादवपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकास अटक झाली. त्या वेळेपर्यंत, राजकीय नेते आणि राजकारण हा भारतातही व्यंगचित्रांचा आवडता विषय होता. तसे जगभरच राजकारण आणि राजकीय नेते ही विनोदाची शेतेच असतात. व्यंगचित्रकारांना तर राजकीय नेत्यांची व्यक्तिमत्त्वे हे विनोदनिर्मितीचे आव्हानच वाटत असते. ममता बॅनर्जीना मात्र, व्यंगचित्र झोंबले आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आला. सगळेच असे नसतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राजकीय नेते असूनही व्यंगचित्रकार होते, आणि त्यांच्या शब्दाएवढीच धार त्यांच्या कुंचल्यातून व्यक्त होणाऱ्या व्यंगचित्रांच्या आशयाला होती. त्यांनी मारलेल्या कुंचल्यांच्या फटकाऱ्यांतून असंख्य राजकीय नेते अनेकदा घायाळ झाले, पण व्यंगचित्रकार बाळासाहेबांना राजकीय क्षेत्रातून नेहमीच दाद मिळत गेली. विनोदनिर्मितीसाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी मन सदैव टवटवीत असावे लागते. अशी मने वेगवेगळ्या माध्यमांमध्ये रमत असली, तरी तेथून निर्माण होणारा विनोद तेवढाच दमदार असतो. म्हणून विनोद हे वैराचे मूळ असूच शकत नाही. महाराष्ट्राचे विनोदी साहित्यिक पु. ल. देशपांडे, पत्रकार आचार्य अत्रे आदींच्या शब्दातून आणि वाणीतून जन्माला आलेल्या विनोदाचा बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांतून घेतला गेलेल्या विनोदी समाचाराचा महाराष्ट्र साक्षीदार आहे. साहित्य संमेलनाच्या वादानंतर बाळासाहेबांनी ‘मोडका पूल’ म्हणून पुलंच्या नावावर केलेली कोटी असो, किंवा ‘मैद्याचं पोतं’ म्हणून शरद पवारांवर केलेली टीका असो, बाळासाहेब आणि पुलंचे नाते हळवेच राहिले होते आणि एकमेकांचे राजकीय विरोधक असतानाही शरद पवार यांनी बाळासाहेबांच्या व्यंगात्मक कोटय़ांना दिलखुलास दादच दिली होती. कारण, एखाद्या व्यक्तीवर केलेल्या विनोदाचे रूपांतर द्वेषातच होते असे नाही. द्वेषातून निर्माण होणारा विनोद मात्र विषारी असतो. अशा विनोदामुळे अलीकडे विनोदाचा निखळपणा दूषित होऊ लागला आहे, ही चिंतेची बाब आहे. असे विनोद काहीही घडवू शकतात, हे आता दिसू लागले आहे.
खरे म्हणजे, विनोद हे रोजच्या कटकटीच्या जगण्यातून आनंदाचे विरंगुळा शोधण्याचे, मनाशी खेळकर संवाद साधण्याचे वेगळे साधन असते. म्हणूनच विनोदाची परंपरा अजूनही जागी आहे. ती कुणीही थोपवू शकत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाने तर या परंपरेला बळ दिले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील विनोद एखाद्या झंझावातासारखा दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पाझरून आनंद वाटू लागतो, ही ताकद केवळ विनोदातच असल्याने विनोदाचे महत्त्व मोठेच आहे. असे असतानाही, विनोदामुळे अनेकांना राग का येतो, विनोदाचे विपर्यास का होतात, विनोद हे हिंसाचाराचे कारण का होते, अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे. निकोप मनाने विनोद स्वीकारण्याची हरवत चाललेली मानसिकता आणि कोणत्याही एकाच विचारसरणीने ठासून भरलेल्या, अन्य सर्वच विचारांचा द्वेष करणाऱ्या मनांमध्ये विनोदाचा आनंद सामावून घेण्याची हरवलेली क्षमता ही यामागची मोठी कारणे असली पाहिजेत. पूर्वी, हुकूमशाही राजवटींमध्ये कुजबुजले गेलेले विनोदही अत्याचारांना कारणीभूत ठरल्याचा इतिहास आहे.  विनोदाचा निखळ आनंद घेणाऱ्या निष्पापांनाही या दमनशाहीचे बळी व्हावे लागले आहे. काही विनोद तर केवळ मौखिक माध्यमातून जगभर पसरले होते. उलट दमनशाहीचा जोर जेवढा अधिक, तेवढा विनोदाचा फैलाव मोठा असे. कारण त्या छळाच्या जाणिवा हलक्या करण्याची ताकद केवळ विनोदातच होती. म्हणूनच, दमनशहा संपले, तरीही विनोद टिकूनच राहिला. त्याला नामशेष करण्याची ताकद कोणत्याही दमनशाही प्रवृत्तीला कधीच प्राप्त झाली नाही. विनोदाचा हा विजय आहे. तो सदैव टवटवीतच राहणार. विनोदाचे वावडे असलेल्यांनाही कधी तरी आपल्या मानसिकतेची लाज वाटू लागेल, आणि त्यानंतर त्यांच्या निर्विकार चेहऱ्यांवरही एखादी तरी स्मितरेषा उमटेल. जगण्यात येऊ पाहणारा यांत्रिकपणा रोखण्याची ताकद असलेले हे निखळ माध्यम जोपासले पाहिजे. चेहऱ्यावरची एक हास्यरेषा तेवढय़ासाठी पुरेशी आहे. जगणे अर्थशून्य, सपक राहावे असे कुणालाच वाटत नाही.