राजधानी.. गुंडगिरीची!

नागपूर हे शहर स्वतंत्र विदर्भाची राजधानी व्हायची तेव्हा होवो.. सध्या तरी महाराष्ट्राची ही उपराजधानी, गुंडपुंड आणि राजकारणी व पोलीस यांच्या हातमिळवणीची राजधानी झाले आहे.

नागपूर हे शहर स्वतंत्र विदर्भाची राजधानी व्हायची तेव्हा होवो.. सध्या तरी महाराष्ट्राची ही उपराजधानी, गुंडपुंड आणि राजकारणी व पोलीस यांच्या हातमिळवणीची राजधानी झाले आहे.

राजकारणी, भूखंड माफिया, गुन्हेगार आणि भ्रष्ट पोलीस यांच्यात युती झाली की काय होते, याचा भयावह अनुभव सध्या नागपूरकर घेत आहेत. अपहरण, खून, हत्या, दरोडे, टोळीयुद्ध, भरवस्तीत गुंडांचा हैदोस, अशा घटनांची सध्या या शहरात रेलचेल आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे राज्यातला गडचिरोली हा जिल्हा पोलिसांच्या नियंत्रणातून मुक्त झाला आहे, असे आधी म्हटले जायचे. आता त्यात नागपूरची भर पडली आहे. या शहरात नक्षलवाद्यांचा हिंसाचार नाही, पण सराईत गुन्हेगारांनी आपल्या कारवायांच्या बळावर हे शहर पोलीसमुक्त केले आहे, असे खेदाने म्हणावे लागते. २४ लाख लोकसंख्या असलेल्या व राज्याच्या उपराजधानीचे बिरूद मिरवणाऱ्या या शहरावरचे नियंत्रण पोलिसांनी गमावले आहे. ‘नागपूर शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे व ही अतिशय चिंतेची बाब आहे,’ हे विधान कुणा विरोधी नेत्याचे नाही, तर या खात्यावर नियंत्रण ठेवण्याची मुख्य जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या गृहखात्याचे अप्पर मुख्य सचिव अमिताभ राजन यांचे आहे. खात्याच्या सचिवाने चिंता व्यक्त केली म्हणजे झाले, असे समजण्याचे काही कारण नाही. राजन यांच्या विधानापेक्षा या शहरातील परिस्थिती स्फोटक बनली असून ती नियंत्रणाबाहेर गेली आहे. येथील सराईत गुन्हेगारांचाच नाही, तर गुन्हेगारी वृत्ती जोपासणाऱ्या तरुणांनासुद्धा लहान मुलांचे अपहरण करताना, त्यांचा गळा दाबताना काहीच वाटत नाही. पोलिसांचा धाक तर अजिबातच वाटत नाही. पकडले गेलो तरी सोडवायला स्थानिक नेते आहेत, अशीच या सराईतांची भावना आहे. या शहरातील गुन्हेगारीच्या वाढत्या आलेखाला केवळ पोलिसांना जबाबदार धरून चालणार नाही. या शहराची रचना, शहरातील राजकीय नेते, भूखंड माफिया व त्यातून तयार झालेले गुंड हे सर्व घटक कारणीभूत आहेत. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले शहर, त्यामुळे परराज्यांत दबाव वाढला की, अनेक सराईत गुंड येथे सहजपणे आश्रय घेतात. तो घेताना त्यांना भाषेची अडचण जाणवत नाही. कारण येथे मराठी, हिंदी, छत्तीसगडी या भाषा सहज बोलल्या जातात. गुन्हा केल्यानंतर पळून जाण्यासाठी नागपूर इतके सोयीस्कर ठिकाण राज्यात दुसरे नाही. विविध उद्योग, वेकोलिच्या कोळसा खाणी व त्यात काम करणारा वर्ग प्रामुख्याने बिहार व उत्तर भारतातून आलेला व येथे स्थायिक झालेला आहे. त्यामुळे स्थलांतराचे प्रमाण येथे सर्वात जास्त आहे. आझमगडचे कट्टे, देशी पिस्तूल या शहरात सहज उपलब्ध होऊ शकते. या शस्त्रांच्या बळावर गल्लीबोळांत दादागिरी करीत फिरणाऱ्या गुंडांना राजकीय संरक्षण देण्याचे काम येथील सर्वपक्षीय नेत्यांनी अगदी इमानेइतबारे पार पाडले आहे.
हे शहर भविष्यात कधीतरी स्वतंत्र राज्याची राजधानी होईल, या हेतूने केवळ राज्यातीलच नाही, तर परराज्यांतील अनेक बडय़ा व्यावसायिकांनी येथे भूखंड खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. यातून उद्भवणारे वाद निपटण्यासाठी अनेक भूखंड माफियांनी गुंडांच्या टोळ्याच पोसल्या आहेत. या टोळ्यांना राजकीय संरक्षण आहेच. या साऱ्या बाबींचा एकत्रित परिणाम येथील गुंडगिरी वाढण्यात झाला आहे. विदर्भ राज्य व त्याची नागपूर राजधानी होईल तेव्हा होईल, पण आजच्या घडीला गुन्हेगारांची राजधानी मात्र निश्चित झाले आहे. एकेकाळी या शहराचे आयुक्त म्हणून अरविंद इनामदार, एसपीएस यादव, प्रवीण दीक्षित यांच्यासारख्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी काम बघितले. या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामात कधीच राजकीय हस्तक्षेप होऊ दिला नाही. पुढाऱ्यांना दूर ठेवत, जनतेशी संवाद साधत आणि गुंडांना ठेचून काढत या अधिकाऱ्यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविले. चार वर्षांपूर्वी शहराचा पोलीस आयुक्त मर्जीतलाच हवा, असा आग्रह काँग्रेसच्या एका मंत्र्याने धरला. विदर्भातील एकमेव दलित नेत्याचा आग्रह मोडायला राज्यातले आघाडी सरकार धजावले नाही. नेमकी तेथून या शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या गाडीने रूळ सोडला व आता तर ती बेपत्ताच झाली आहे. संतोष आंबेकरला शहर कुख्यात गुंड म्हणून ओळखते. तो पोलीस आयुक्तांच्या वाहनातून फिरू लागला. आयुक्त व आंबेकरांच्या एकत्रित मेजवान्यांची चर्चा पोलीस दलात चवीने चघळली जाऊ लागली. एका दाढीधारी मंत्र्याचा वरदहस्त असल्याने गुंडच पोलिसांच्या यादीतला प्रतिष्ठित व्यक्ती झाला. आंबेकरला मान मिळतो मग आपणच मागे का राहायचे, या उदात्त हेतूने मग इतर अधिकाऱ्यांनीसुद्धा एकेका गुंडाला जवळ करणे सुरू केले आणि सामान्य नागपूरकरांना कुणी वालीच उरला नाही.
या गुंडांना संरक्षण देण्यात केवळ काँग्रेसचेच नेते व मंत्री आघाडीवर आहेत, असे अजिबात समजण्याचे कारण नाही. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षाच्या नेत्यांनीसुद्धा गुंड पोसण्याची किमया आत्मसात केली आहे. कारण, या सर्व नेत्यांचे मुख्य कामच भूखंड खरेदी-विक्रीचे आहे. राजकारणी आणि गुन्हेगारांचे एवढे मेतकूट निर्माण झाल्यावर गुन्हेगारीचा आलेख वाढणार नाही तर आणखी काय होणार? या शहराचे पोलीस आयुक्त के. के. पाठक आहेत. कमीतकमी लोकांशी संपर्क, हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळेच ते संवादहीनतेचे बळी ठरले आहेत. या संवादहीनतेमुळेच दलातील इतर अधिकारी काय करतात, हे त्यांना कळत नाही. त्याचा फायदा घेऊन भ्रष्ट पोलीस अधिकारी व गुंड यांच्यात हातमिळवणी होते आहे. शहरात पोलिसांचा दबाव वाढला की, ग्रामीण भागात आश्रय घ्यायचा आणि ग्रामीण पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली की, शहरात येऊन गुन्हे करायचे, अशी पद्धत गुंडांनी येथे अवलंबिली आहे. सामान्य नागपूरकरांच्या दुर्दैवाने सध्या शहरात व ग्रामीण भागात पोलिसिंग नावाचा प्रकारच अस्तित्वात नसल्याने गुंडांचे फावले आहे. त्यामुळे गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे. गुन्हेगारीचा हा वाढता आलेख सामान्य जनतेत संताप निर्माण करणारा ठरला आहे. शहरातील दंतवैद्यमुकेश चांडक यांच्या मुलाचे दिवसाढवळ्या अपहरण झाले. भरदुपारी दरोडे पडणे या शहरात नित्याचे झाले आहे. गुन्हेगारांच्या मुक्त वावरामुळे शहरातील अनेक रस्ते रात्री ओस पडलेले असतात. नागपूरकर नुसते भयभीत नाहीत, तर संतापलेलेसुद्धा आहेत.
युग चांडकच्या अपहरण व खून प्रकरणात रात्रभर हजारोंचा जमाव पोलीस ठाण्यासमोर बसून आरोपींना ताब्यात घ्या, अशी मागणी करत होता. सामान्यांना छळणाऱ्या गुंडांना पोलिसांची वाट न बघता संपवणे, हे या शहराचे वैशिष्टय़ आहे. आजवर पाच ते सहा गुंडांना जनतेनेच एकत्र येऊन ठार मारले व भविष्यात अशीच गुन्हेगारी कायम राहिली तर जनताच कायदा हातात घेईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शहरातील गुन्हेगारीने एवढा कळस गाठला असतानासुद्धा स्थानिक राजकीय नेते अगदी शांत आहेत. राज्य व केंद्रात महत्त्व राखून असलेले हे नेते पीडितांचे साधे सांत्वन करायलासुद्धा तयार नाहीत, एवढे निर्ढावलेपण या नेत्यांमध्ये आले कुठून, असा प्रश्न पडावा इतकी ही शांतता बोचणारी आहे. मनासारख्या बदल्या करता येत नसल्याने राज्याच्या गृहमंत्र्यांचे लक्ष सुद्धा या खात्यातून उडालेले आहे. मन सुन्न करणाऱ्या एवढय़ा घटना घडूनही आबा पाटलांनी एकदाही या शहरातील स्थितीचा आढावा घेतला नाही. मंत्र्यांनी वाऱ्यावर सोडले, आयुक्तांना काही घेणे देणे नाही, कनिष्ठ अधिकारी आपल्याच मस्तीत आहेत आणि गुंडांना मुक्त वाव , अशीच या उपराजधानीची सध्या अवस्था झाली आहे. त्यामुळे सामान्य नागपूरकर अस्वस्थ आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Increasing crime in nagpur city