भारताचे एक क्षेपणास्त्र किंवा पाकिस्तानच्या मते प्रक्षेपास्त्र (प्रोजेक्टाइल) ‘चुकून’ पाकिस्तानात जाऊन पडण्याची घटना अत्यंत गंभीर आणि भारतीय सैन्य दलांच्या जबाबदार अशा प्रतिमेस अशोभनीय अशीच ठरते. ज्यांना आपल्या सैन्य दलांविषयी विलक्षण अभिमान आहे, अशा मंडळींना कदाचित हा शब्दप्रयोग आवडणार नाही. म्हणूनच काही प्रश्न मांडण्याची गरज आहे – घटना ९ मार्च रोजी घडली, परंतु तिची वाच्यता ११ मार्च रोजी पाकिस्तानकडून प्रथम झाल्यानंतर आपण खुलासा देणे योग्य आहे का? या घटनेत पाकिस्तानी बाजूकडे मनुष्यहानी झाली असती, तर त्यातून उद्भवणाऱ्या संभाव्य आंतरराष्ट्रीय पेचप्रसंगाला तोंड देण्याची आपली तयारी होती का? सहसा क्षेपणास्त्र चाचण्या देशाच्या पूर्व किनाऱ्यावर घेतल्या जातात, मग देशाच्या पश्चिम सीमेजवळ पाकिस्तानच्या इतक्या नजीक एखाद्या क्षेपणास्त्राची इतकी बेफिकीर हाताळणी कशी काय होऊ शकते? हेच क्षेपणास्त्र भारताच्या हद्दीत १०० किलोमीटर आत येऊन पडले असते तर आपल्याकडे काय प्रतिक्रिया उमटल्या असत्या? यांतील काही प्रश्न पाकिस्तानी परराष्ट्र खात्याने उपस्थित केले आहेत. भारताने चूक मान्य करून उच्चस्तरीय लष्करी चौकशीचे (कोर्ट ऑफ इन्क्वायरी) आदेश दिले आहेत. पण ही चौकशी संयुक्त स्वरूपाची व्हावी अशी मागणी आता पाकिस्तानने केली आहे. दोन अण्वस्त्रसज्ज देशांदरम्यान अशा प्रकारे एखाद्या क्षेपणास्त्राचे अपघाती प्रक्षेपण होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते. सध्या रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय सामरिक वातावरण संशयाच्या आणि भीतीच्या अमलाखाली आहे. एखाद्या देशावर क्षेपणास्त्र सोडणे हे इतकेही असामान्य राहिलेले नाही हे रशियाने दाखवून दिलेच आहे. अशा अस्वस्थ वातावरणात भारताचे क्षेपणास्त्र चुकून का होईना, पाकिस्तानकडे वळते यातील धोका लक्षात घेण्याची गरज आहे. बहुधा जे दोन्ही देशांतर्फे जाहीर झाले त्यापलीकडे दोन्ही देशांमध्ये काही अनौपचारिक संदेशवहन झालेच असेल. दोन्ही देशांची रडार यंत्रणा सतर्क असते. त्यामुळे भारताकडून अचानक पाकिस्तानकडे वळलेले क्षेपणास्त्र तेथील रडार यंत्रणेने टिपले असेलच. कदाचित भारताचा खुलासाही पाकिस्तानपर्यंत त्वरित पोहोचला असू शकतो. पण या संदेशांचे स्वरूप अनौपचारिक आहे आणि तशी देवाणघेवाण झाली असावी असा एक अंदाज आहे. हे क्षेपणास्त्र स्वनातीत व क्रूझ प्रकारातील ब्रह्मोस होते, हा सामरिक विश्लेषकांचा होरा. या क्षेपणास्त्रातील संगणकीय दिशादर्शन यंत्रणा अचानक बिघडली आणि ते भरकटले असाही एक अंदाज. पाकिस्तान या घटनेचा फायदा उठवून भारताला आरोपीच्या पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे. इतर कोणत्याही देशाने – अगदी भारतासकट – यापेक्षा वेगळे काही केले नसते. शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ अलीकडच्या काळात ड्रोनच्या माध्यमातून पंजाब सीमेवर टाकणाऱ्या, काश्मीर खोऱ्यात दहशतवादी आणि शस्त्रे पाठवणाऱ्या कुरापतखोर पाकिस्तानला आपण निष्कारण हेत्वारोप करण्याची संधी दिली हा या घटनेचा मथितार्थ. हे टाळता आले असते. क्षेपणास्त्राच्या दिशादर्शन यंत्रणेमध्ये हॅकिंग वा तत्सम हस्तक्षेप झाला असावा, असाही अंदाज व्यक्त होत आहे. तो खरा असल्यास ही बाब अधिकच गंभीर बनते. दोन्ही देशांच्या सैन्य दलांनी आतापर्यंत हा प्रकार सबुरीने हाताळला, पण ती दरवेळी गृहीत धरता येणार नाही!

Washim, manuscript Writer, Stabbed, Death, Karanja, Tehsil Office,
दस्तलेखकाच्या मानेवर चाकूने हल्ला, भर तहसील कार्यालय परिसरातच…
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…
First Secretary Anupama Singh
“जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात…”, भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल