मतदानासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकाची काही ना काही आस असते. अनेकांच्या डोळ्यांत विझू-विझू जाणारा उजेड यानिमित्ताने दिसू लागतो.  एखाद्या ढगासारख्या वाजतगाजत-गर्जत निवडणुका येतात, आभाळ दणाणून जाते, जोराचा वारा सुटू लागतो आणि आभाळातले ढग पांगतात.. आता निवडणुकांचे निकाल लागतील.  या वेळी तरी ढग निघून जाऊन वर वांझोटे आभाळ राहणार नाही, अशी अपेक्षा ..

कोणत्याही निवडणुकीचा ज्वर सहसा लवकर उतरत नाही. मतदानाआधी आणि नंतर वातावरण ढवळून निघालेले असते. प्रत्येक वेळी मतदान करताना मतदारासमोर नेहमीच काही स्वप्ने असतात. सामान्य माणूस त्याच्या त्याच्या परीने आपली भली दुनिया आपल्या नजरेने साकारीत असतो. नेमके उलटे जग वास्तवात असते. चांगल्या चित्राची कल्पना मात्र कायम मनाशी बांधली जाते. सामान्य माणसाच्या ताटातली भाकरी कोणी पळवणार नाही, त्याला हक्काचे पाणी मिळेल, त्याच्या पोराबाळांच्या शिक्षणाची सोय होईल, वृद्ध निराधारांना अनुदानाचा आधार मिळेल अशा वृद्धांचे डोळे कायम अनुदानाच्या रकमेकडे लागलेले असतात. घरात तर त्यांचे ओझे झालेले असतेच. अशा वृद्धांना आधाराची काठी लागते. खेडय़ापाडय़ांत कोणत्याही देवळात, पारावर अशी माणसे मोठय़ा संख्येने बसलेली आढळतात. मतदानासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकाची काही ना काही आस असते. अनेकांच्या डोळ्यांत विझू-विझू जाणारा उजेड यानिमित्ताने दिसू लागतो. काही तरी होईल असे वाटत राहते. प्रत्यक्षात तसा बदल मात्र घडताना दिसत नाही. निवडणुका येतात-जातात. सामान्य माणसाचे जगणे बदलत नाही.
मतदान करण्यासंबंधी वेगवेगळ्या पातळ्यांवरून आवाहने केली जातात. जशी साधीसरळ आवाहने असतात तसा दंडुक्यांचाही धाक असतो काही ठिकाणी. आपल्याला राहायचे असेल तर मतदान करावेच लागेल अशी भीतीही असते. कुणाच्या हातात पाणी असते, कुणाच्या हातात जमिनी, काहींच्या हाती धोरणे असतात. आम्ही बांधू तेच तोरण आणि ठरवू तेच धोरण अशी भाषा असते कैकदा. वर्षांमागून वष्रे जात आहेत. तरीही वस्ती मात्र तशीच दिसते. वेगवेगळ्या योजनांकडे डोळे लागलेले असतात, पण प्रत्यक्षात अंगणापर्यंत काही पोहोचत नाही. कोणत्याही निवडणुकीत विकासाच्या योजना झोपडीपर्यंत येणार आहेत, असे दावे केले जातात. प्रत्येक निवडणूक नवी घोषणा घेऊनच येते, नवे संदर्भ घेऊन येते. प्रत्यक्षात आपल्याला दिसले ते मृगजळ होते एवढेच सामान्य माणसाला नंतर कळते. असे मृगजळ अनुभवणे हेच सामान्य माणसाच्या हाती असते.
आता निवडणुकांचे निकाल लागतील. ‘येऊन येऊन येणार कोण’ असा छातीठोक दावा आजवर केलेला असतो. आता हे दावे बदलत जातात. कोणी पडतो, तर कोणी तरतो. विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांमध्ये आता ‘आवाऽऽज कुणाऽऽचा’ अशा गर्जना घुमतील. कार्यकत्रे बेभान होऊन नाचतील. मिरवणूक कोणाचीही असो, ती साजरी करणाऱ्यांचीही एक संख्या असते आणि हीच माणसे कुठल्याही उमेदवाराची मिरवणूक साजरी करतात. सामान्य माणूस रस्त्याच्या कडेला उभे राहून हे सर्व पाहतो. तो बिचारा प्रत्येकच निवडणुकीत मतदान करतो. ग्रामपंचायती असो की लोकसभेची, त्याच्यासाठी निवडणूक म्हणजे पर्वणी वगरे असे काही नाही. आजवर किती निवडणुका आल्या, गेल्या. कित्येक जण निवडून आले आणि पराभूत झाले. एखाद्या ढगासारख्या वाजतगाजत-गर्जत निवडणुका येतात, आभाळ दणाणून जाते, जोराचा वारा सुटू लागतो आणि आभाळातले ढग पांगतात तसे पुढे होत जाते. ज्यांनी ढगाकडे डोळे लावले त्यांना कालांतराने आकाशातले ढग विरले आहेत आणि आता आकाश स्वच्छ, मोकळे झाले आहे असे दिसू लागते. ढगांची दाटी झाली आहेच तर पाऊस कोसळेल असे वाटलेले असते. प्रत्यक्षात ढग निघून जातात आणि वर वांझोटे आभाळ दिसू लागते. कोणत्याही निवडणुकीनंतर सर्वसामान्य माणसाला हा अनुभव येतो.
आता मतदानाचा टक्का वाढतोय. सुरुवातीला मतदानाबद्दल एवढी जागरूकता नव्हती. मतदान नाही केले तरी काही बिघडत नाही असे लोकांना वाटायचे. आता मतदान केले नाही तर अपराध्यासारखे वाटते. पूर्वी निवडणुकीत मतदान केल्याने आपल्याला काय मिळणार? कोणीही निवडून आला तरी आपल्याला काय देणार? असे प्रश्न विचारले जायचे. आता मतदानासाठी रांगा लागतात. ज्या गावात बस जात नाही, कोणत्याही प्राथमिक सुविधा नाहीत अशा ठिकाणीही लोक मोठय़ा संख्येने मतदान करतात. नव्याने मतदानाचा हक्क बजावणारा युवक असो अथवा कोणाच्या तरी मदतीने मतदान केंद्र गाठणारा वृद्ध. मतदानाचा टक्का वाढतोय ही बाब चांगलीच, पण मतदान करणाऱ्यांच्या स्वप्नांचे पुढे काय होते? जी आश्वासने देऊन मतदान करून घेतले जाते त्यातली किती आश्वासने नंतर खरी ठरतात?
क्रांतिसिंह नाना पाटलांनी केलेल्या एका भाषणातला एक किस्सा वाचायला मिळाला. दररोज शेतात काम करणाऱ्या नवरा-बायकोची ही गोष्ट. दोघांनाही वाटते आपण इतकी मरमर करतो तरी आपल्या संसारात बरे दिवस येत नाहीत. संसाराला हातभार लागेल असे काही तरी केले पाहिजे. रोजच्या कमाईतले पसे बाजूला टाकून त्यातूनच एक शेळी विकत घेतली तर चार पसे अधिकचे मिळतील. दोघेही विचार करतात. एकाच्या कमाईत घर चालवू आणि दुसऱ्याचे पसे जमा करून एक शेळी विकत घेऊ असे ते दोघे जण ठरवतात. शेळी घेण्यापुरते पसे साठले जातात. एके दिवशी दोघे नवराबायको आठवडी बाजारातली शेळी विकत आणतात. आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर असतो. आता दररोज शेळीच्या दुधाचे पसे जमा होणार, आपल्या संसारात बरे दिवस येणार असे या दोघांनाही वाटत असते. दुसऱ्या दिवशी बायको सकाळीच उठते. शेळीचे दूध काढण्यासाठी चरवी घेऊन जाते, पाहते तर शेळीच्या कासेत दूधच नाही. असे सलग दोन-तीन दिवस झाल्यानंतर नवरा-बायकोला वाटते नक्की कोणी तरी आपण झोपेतून उठायच्या आधी शेळीचे दूध नेत असणार. एके दिवशी दोघे रात्रभर जागेच राहून या गोष्टीचा छडा लावायचे ठरवतात. मध्यरात्रीनंतर जिथे शेळी बांधली आहे त्या जागेच्या दिशेने ‘चुरूचुरू’ असा आवाज येऊ लागतो. दोघेही दाराच्या फटीतून पाहतात तर शेळीने आपल्याच दोन पायांच्या मधून तोंड घातले आहे आणि ती आपलेच दूध पिऊ लागली आहे. दोघेही नवरा-बायको चक्रावून जातात. प्रत्येक निवडणुकीनंतर मतदाराची अवस्था या नवरा-बायकोसारखी होते. जरा संसाराला हातभार लागेल म्हणून जी शेळी घ्यावी त्या शेळीनेच आपले दूध पिऊन टाकावे, असा हा सरळसरळ विश्वासघाताचाच प्रकार. प्रत्येक वेळी मतदान करताना आता काही तरी चित्र बदलेल असे वाटते आणि पुन्हा तशीच घोर निराशा येते. काही तरी करतील या आशेने ज्यांना निवडून दिले जाते ते या आठवडी बाजारातल्या शेळीसारखे स्वत:चेच भले करण्याच्या जिद्दीने झपाटलेले असतात. गोष्टीतले नवरा-बायको शेळीच्या चारापाण्याची सोय करणार आणि शेळी मात्र त्यांना दुधाचे चार थेंबही मिळू नयेत याची दक्षता घेणार. ढगांची दाटी संपून आणि त्यांचा गडगडाट विरून सर्वसामान्य माणसाच्या नशिबी वांझोटे आभाळ येऊ नये, एवढीच अपेक्षा करू शकतो आपण.