फाळणीनंतर आताच्या सिंध प्रांतातील अनेक निर्वासित जगण्यासाठी भारतात आले आणि आपले नशीब अजमावता अजमावता आपली उद्यमशीलता सिद्ध करून गेले. कन्हैयालाल गिडवाणी हे त्यापैकी एक. गिडवाणी यांचे वडील साखरेच्या व्यापारात होते. त्यामुळे सांगली हे त्यांचे मूळ गाव. व्यवसायात स्थिरस्थावर झाल्यावर, किंबहुना लवकर स्थिर होता यावे यासाठी अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना पंख फुटतात. तेव्हा मूळचेच उद्योगी असलेल्या गिडवाणी यांच्याबाबतीतही तसे झाल्यास आश्चर्य नाही. गिडवाणी खरे प्रकाशात आले ते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या सत्ताहरण नाटकाचा पडद्याआडचा प्रयोग पडद्यासमोर झाल्यामुळे. तेव्हाच्या काँग्रेस नेत्या आणि तितक्याच उद्योगी शालिनीताई पाटील आणि अन्य साखर उद्योगी मंडळी मुख्यमंत्री हेगडे यांना सत्ताच्युत करण्याच्या प्रयत्नात होती. सत्ताहरण वा ग्रहण काहीही असले तरी पैसा पाण्यासारखा वाहतो हे उघड आहे. त्या वेळी हेगडे यांच्याविरोधात पैसा ओतण्याचे काम गिडवाणी यांनी केले. पैशाच्या बॅगांसह ते पकडले गेले आणि पुढे सुटलेही. तेव्हापासून राजकारणातील अनेक पडद्यामागच्या नाटकांत सूत्रे हलविण्याचे काम गिडवाणी यांच्याकडे नैसर्गिकपणे येत राहिले. सुरुवातीला ते वसंतदादा पाटील यांच्या कळपात होते, पण दादांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणातील एक कळप असा राहिला नाही की ज्याच्याशी त्यांचा संपर्क नव्हता आणि त्या कळपालाही गिडवाणी यांची गरज लागली नाही. राजकीय व्यक्तींना मागे राहून सूत्रे हलविणारी एखादी व्यक्ती लागते. हे सर्वपक्षीय आहे. राज्याच्या राजकारणात अशी सर्वपक्षीय व्यक्ती म्हणजे गिडवाणी. बाळासाहेब ठाकरे ते शरद पवार ते अशोक चव्हाण ते गोपीनाथ मुंडे अशा सर्वाशी गिडवाणी यांचा उत्तम संबंध होता. राज्याच्या राजकारणाची कमालीची जाण त्यांना होती. त्यामुळे निवडणुकीच्या आधी काही निवडक पत्रकारांना घेऊन चर्चगेट येथील रिट्झ हॉटेलात निवांत बैठकीत स्वखर्चाने मतदारसंघनिहाय अंदाज बांधणे आणि निवडणूक निकालोत्तर ते साजरे करण्यासाठी तशीच बैठक आयोजित करणे हा त्यांचा आवडता छंद होता. राज्यातील कोणतीही निवडणूक असो, हा बैठकांचा परिपाक कधीही चुकला नाही. प्रत्येक मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, जातीची समीकरणे यांची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे असायची आणि ते स्वखर्चाने ती पुरवायचे. साखरेच्या व्यापाराची देशपातळीवरील माहिती त्यांच्याकडे असायची. अर्थविषयक पत्रकारांना त्याबाबतचे कोणतेही तपशील लागले की गिडवाणी ते आनंदाने पुरवीत. परंतु अशोक चव्हाण यांच्या आदर्श प्रकरणात गोवले गेल्याचे उघडकीस आल्यापासून गिडवाणी काहीसे मंदावले होते. अशी प्रकरणे त्यांच्यासाठी नवीन नव्हती. नवीन होते ते त्यात पकडले जाणे. यात त्यांना तुरुंगाची हवा खायला लागली. जामिनावर सुटल्यावर पुन्हा एकदा माहिती पुरवण्याच्या उद्योगाला त्यांनी स्वत:ला जुंपून घेतले होते. या साऱ्या प्रकरणाची आतली माहिती नेहमीच्याच निवडक पत्रकारांना ते देत होते आणि आपण यातून कसे सहीसलामत सुटू हेही छातीठोकपणे सांगत होते. राजकारणात लांडीलबाडीचे अप्रूप राहिलेले नाही.. परंतु ती करताना पकडले गेल्यास आसपासचे स्वच्छतेचा आव आणतात. गिडवाणी यांनाही तो अनुभव येत होता, परंतु त्याबाबत ते कधीही कडवटपणे बोलले नाहीत. राजकारणाच्या परिपूर्तीसाठी अनेक बहुरंगी व्यक्तिमत्त्वांची गरज असते. गिडवाणी असे होते. त्यांची चूक म्हणायची तर इतकीच की, उद्यमशीलता आणि उचापती यातील फरक ते फारच लवकर विसरले आणि टीकेचे धनी होत जगातूनच निघून गेले.