आर्थिक व्यवहारांचं जग, त्या जगातलं वस्तूकरण आणि कलेनं जपलेल्या शुद्धतावादी कल्पना यांची सरमिसळ गेल्या अर्धशतकात अगदी ठसठशीतपणे होत राहिली आहे. कधी या मिसळीतही कला कायम राहिली, तर कधी जाहिरात होऊनसुद्धा कलावंताची महत्ता टिकली आणि प्रतिष्ठाही वाढली. ‘जाहिरातींचे रसिक’ असलेल्या मराठीजनांनी माहीत करून घ्यावं असं कलेतिहासातलं जाहिरातबा उदाहरणं इथे आज आहेत..  जाहिरातीलगतच्या सीमारेषा पुसट होतानाच्या काळातही चित्रानं स्वत्व कसं जपलं, याच्या या खुणा..’
नेपथ्य निर्मिती, कलादिग्दर्शन, दृश्यं आणि शब्द यांची उचित निवड आणि त्यांचा एकत्रित वापर.. अशी तंत्रं म्हणजे उपयोजित कला, असं मानलं जात होतं. ही तंत्रं आजही उपयोजित कलेचा भाग आहेतच, पण उपयोजित नसलेल्या कलेतसुद्धा ही तंत्रं वापरली जातातच. मात्र उपयोजित कलेचा हेतू कुणीतरी दुसऱ्यानं ठरवलेला असतो. उपयोजित कलेच्या निर्मितीला जो आधार मिळतो तो कलेच्या इतिहासातून नव्हे, तर त्या त्या वेळच्या गरजांतून मिळत असतो. हे दोन मुद्दे लक्षात ठेवले की कलेमध्ये आपल्याशी जो संवाद साधण्याची ताकद असते तशी ती उपयोजित कलेत का नसते, हे निराळं सांगायला नको.
..वर लिहिलेल्या  या ओळी न पटणारे बरेच जण असतील.
‘उपयोजित कलाच किती थेट संवाद साधते,’ असा वाद त्यांना सुरू करता येईल. तो ओनिडाचा डेव्हिल पाहा, व्हीआयपी बॅगेच्या (कलभी, आजभी) जाहिरातीतलं ते टिकाऊ प्रेम पाहा, अ‍ॅपलचा लोगो-आणि स्टीव्ह जॉब्ज वारल्यावर त्याला श्रद्धांजली म्हणून कुणा बोधचित्रकारानं त्या काळय़ा सफरचंदाच्या उडालेल्या टवक्याऐवजी स्टीव्हचा चेहरा टाकण्याची साधीशी कृती पाहा.. वगैरे.
या वादात ते जिंकतील. समकालीन कलेचे समीक्षक कदाचित हरतीलच. ‘जे दिसतं आणि भावतं ते म्हणजे कलाच.. अर्थ कळला पाहिजे की नाही कलेचा थोडातरी!’ या साध्या निष्पाप-निरागस व्याख्येला गहन करून टाकण्याचं पाप नाहीतरी समीक्षकांनी केलेलंच असतं, त्याची फळं त्यांना भोगावी लागतील. ‘अहो पण.. पण.. कलेचा अर्थ हा कलेच्या इतिहासातून आणि कलावंताच्या हेतूविषयी प्रेक्षकाला आलेल्या अंदाजांमधून आलेला असतो.. तो अर्थ म्हणजे ‘हे = अमुक’ असा थेट असूच शकत नाही..’ असं काहीसं चिरक्या (क्षीण) आवाजात हे पराभूत समीक्षक म्हणतही राहतील. त्यांचा तो क्षीण आवाज ऐकला जाईलच याची खात्री नाही.
अशा वेळी त्या पराभूत समीक्षकांना कलेच्या इतिहासातलं जे आठवेल, त्यात अँडी वॉरहॉलच्या ‘ब्रिलो बॉक्सेस’चा क्रमांक फार वरचा असेल. तांत्रिक सफाई, दिसणं-भावणं आणि कलात्मकता यांच्या नेहमीच्या गल्लतीपुढे (मराठीत तरी) नेहमीच पराभूत झालेल्या तमाम समीक्षकांना सहानुभूती म्हणून आपण या चित्राकडे आज पाहू.
अँडी वॉरहॉलचा ‘ब्रिलो बॉक्स’ हा लाकडी खोका होता. त्यावर पांढरा रंग मारून, अमेरिकी बाजारात १९१३ पासून मिळणाऱ्या ‘ब्रिलो’ नामक साबणाच्या खोक्यावर जसं दृश्य असायचं त्याबरहुकूम डिझाइन त्याच रंगांत करून घेऊन ‘स्क्रीन प्रिंटिंग’च्या तंत्रानं या पांढऱ्या लाकडी खोक्यावर वॉरहॉलनं उतरवलं. ‘याला कला म्हणायचं का?’ हा वाद या कामामुळे उभा राहिला.
आजही ‘ब्रिलो’ ही कंपनी अमेरिकेत आहे. साबणच बनवते. तिची माहिती हवी असेल तर ती ‘ब्रिलो डॉट कॉम’ वर जाऊन पाहता येईल. वॉरहॉल आणि ही कंपनी यांचा काही म्हणजे काहीही संबंध कसा नव्हताच, हे या वेबसाइटची छाननी केल्यावर कळेल. मुद्दा हा की, वॉरहॉलनं अजिबातच ब्रिलोची जाहिरात व्हावी किंवा हल्लीच्या भाषेत ‘को-ब्रँडिंग’ व्हावं, असा हेतू बाळगला नव्हता. वॉरहॉलनं ज्या काळात चित्रं करायला सुरुवात केली तेव्हा एकीकडे अमेरिकी ‘अ‍ॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम’चा कलाप्रवाह फार जोरात आणि दुसरीकडे अमेरिकी लोकजीवनाचा ठाव घेणाऱ्या एडवर्ड हॉपर वगैरे मंडळींची चलती संपलेली, अशी स्थिती होती. कलेचा इतिहास अगदी वर्तमानातही घुटमळतच असतो आणि या घुटमळत्या इतिहासाचं ‘आत्ता’चं टोक पकडून पुढे जाण्याचा प्रयत्न कुणीतरी केल्याशिवाय कलेतिहास पुढे जात नाही. ते टोक वॉरहॉलनं पकडलं. अमूर्त अभिव्यक्तीवादी कलेत ‘वस्तुमय प्रतीक’ अजिबात नव्हतं. जॅक्सन पोलॉक, विल्लेम डिकूनिंग, आर्शाइल गॉर्की, फ्रान्झ क्लाइन, हान्स हॉफमन असे सगळे अ‍ॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझमवाले चित्रकार म्हणायचे की, आमचं चित्र हेच ‘स्वयंभू वस्तुजात’ आहे. या अमूर्त अमेरिकी कलाप्रवाहाबद्दल त्या काळचा समीक्षक हेरॉल्ड रोसेनबर्ग याचं पुस्तकही ‘द अँक्शस ऑब्जेक्ट’ याच नावाचं आहे.
पण यातून आधी जास्पर जॉन्सनं आणि पुढे अँडी वॉरहॉलनं त्या काळच्या म्हणजे १९५०च्या दशकानंतर १९६२-६४ च्या सुमारास ‘आत्ताचं टोक’ पकडलं होतं ते असं होतं की, जर चित्र हीच वस्तू असेल तर वस्तू हेही चित्र का असू नये?
वरवर पाहता ही टिंगल वाटेल. पण या टिंगलीला कला म्हणणं भाग होतं. कारण ‘रूपनिर्मिती’ आणि त्यासाठी ‘तंत्राचा सुयोग्य वापर’ ही दृश्यकलेची पूर्वअट तर जॉन्सनं, वॉरहॉलनं तंतोतंत पाळली होती. साध्या मराठीत सांगायचं तर मेहनत होती त्यांच्या कलाकृतीमागे!
जास्पर जॉन्स स्वत: रंगवायचा वगैरे. पण वॉरहॉलबाबत असा प्रश्न पडला की यानं स्क्रीन प्रिंटिंग का केलंय? हे तर उपयोजित कलेचं तंत्र ना? मग त्याला आपल्यात-आर्ट गॅलरीतल्या कलेत कशाला मोजायचं? वॉरहॉलनं हे काम मदतनीस घेऊन केलंय, म्हणजे ‘त्याची निर्मिती’ असं कसं म्हणायचं?
कलाकार बुद्धीनं काम करतात, हे लक्षात घेतलं की मग आपल्याला वॉरहॉलचं महत्त्व कळेल. ‘कलाकृतीकडे स्वयंभू वस्तू म्हणून पाहा. तिचा अर्थ लावू नका, तिला उमजून घ्या’ हे अमूर्तवादय़ांचे आग्रह त्यानं एकीकडे अगदी छानच पाळून दाखवले होते आणि दुसरीकडे, लोकजीवनाची नवी प्रतीकं शोधून ती कलेत आणण्याचा खास ‘अमेरिकी कले’चा प्रयत्न पुढे नेला होता. हे झालं विश्लेषण. पण त्यापुढे वॉरहॉलनं जे केलं त्याला त्या वेळच्या पॉप संस्कृतीतल्या कल्पनांचाही आधार होता. जग हे एकच आहे, आपण अख्ख्या जगाचे सांस्कृतिक नागरिक आहोत वगैरे स्वप्नाळू कल्पना जोपासत आज आणि आत्ताचा क्षण साजरा करणाऱ्या या ‘पॉप’ कल्पना. वर्तमानकाळ इतिहासापेक्षा फार फार मोठा मानून लोकांना काही आवडलं रे आवडलं की लगेच ते ‘युगाचं प्रतीक’ वगैरे मानण्याचे हट्ट या पॉप संस्कृतीनं केलेले आहेत. वॉरहॉलनं या हट्टांना चित्ररूप देऊन ‘अजरामर’ केलं.
 वॉरहॉलनं जे केलं ते कलेच्या हेतूंची चर्चा पुढे नेण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. वॉरहॉलनं जाहिरात केलेली नाही. याउलट, अ‍ॅब्सोल्यूट व्होडका नावाची एक दारू असते. दारूच्या जाहिरातींवर बंदी असते. म्हणून अ‍ॅब्सोल्यूटवाल्यांनी १९८५ पासून भल्या भल्या, बडय़ा बडय़ा चित्रकारांना आपल्या बाटलीचा आकार दिसेल असं एक चित्र काढायला सांगणं सुरू केलं. त्यासाठी अर्थातच प्रचंड किमती मोजल्या. या चित्रांचं संग्रहालयच ‘अ‍ॅब्सोल्यूट’नं स्वीडनमध्ये उभारलंय, ती चित्रं इंटरनेटवरही ‘अ‍ॅब्सोल्यूट आर्टकलेक्शन डॉट कॉम’ वर पाहायला मिळतात आणि खूप माहिती मिळते.. अगदी एकेका चित्रकाराची शैली कळायला मदतबिदत होते.. पण मुळात ही चित्रं काढून घेतली गेली ती जाहिरातीसाठी! ‘अ‍ॅब्सोल्यूट सुबोध गुप्ता’, ‘अ‍ॅब्सोल्यूट भारती खेर’, एवढंच लिहून खाली गुप्ता वा खेर यांच्या शैलीचा अगदी गाळीव अर्कच असणारं चित्र/शिल्प या जाहिरातीत असतं. फक्त नावाजलेल्याच आणि शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्याच कलावंतांना या व्होडक्यानं गळास लावल्यामुळे आता तर, अ‍ॅब्सोल्यूट जाहिरातीत चित्र येणं प्रतिष्ठेचं झालंय. एकप्रकारे आपण कलावंतच आहोत, यावर हे ‘अ‍ॅब्सोल्यूट’ शिक्कामोर्तब वाटतं आजच्या चित्रकार- शिल्पकारांना. बाकी काम सुरूच असतं, एका बाटलीचं चित्र दिलं काढून तर काही बिघडत नाही, अशा थाटात सारेजण जाहिरात प्रवाहात सामील होतात.
ही झाली वॉरहॉलची उलटी बाजू. पण वॉरहॉल मात्र शुद्ध कलात्म हेतूनंच सारं करत होता.
जाता जाता, ‘उपयोजित कलाच किती छान चटचट संवाद साधते’ असं म्हणणाऱ्या सर्व मित्र-मैत्रिणींसाठी एक ‘अ‍ॅब्सोल्यूट’ प्रतिवादवजा सल्ला: आर्ट गॅलरीतल्या, बहुअर्थी किंवा ‘समजायला कठीण’ काम करणाऱ्या चित्रकार/शिल्पकारांना समजून घेणारे, त्यांच्या शैलीशी संवाद साधणारे लोक जगात भरपूर आहेत, म्हणून अ‍ॅब्सोल्यूटसारखी जाहिरात चालते.. ज्यांना जाहिरातीच जवळच्या वाटतात,  त्यांना या जाहिरातींमधून एकेका चित्रकाराच्या वैशिष्टय़ांची ओळख करून घेता येईलच.