माणूस बदलतो की बदलत नाही, या कोडय़ाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जॉन फ्रीमन यांचे शंभरी न गाठताच ९९ व्या वर्षी संपलेले आयुष्य. जॉन फ्रीमन कोण, हे पहिल्याच उल्लेखाआधी सांगणे आवश्यक होते. ‘व्यक्तिवेध’ची तशी पद्धतही आहे; पण ती पाळणे अशक्यच व्हावे, इतकी फ्रीमन यांची ओळख विविधांगी. मजूर पक्षाचे खासदार, बीबीसीच्या ‘फेस टु फेस’ या अत्यंत गाजलेल्या चित्रवाणी- मुलाखतमालेत सलते आणि भलतेही प्रश्न विचारून चित्रवाणी-पत्रकारितेची नवी मळवाट रुजवणारे मुलाखतकार, ब्रिटनमधील डाव्या विचारांच्या ‘न्यू स्टेट्समन’ या साप्ताहिकाचे संपादक, भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त व अमेरिकेत राजदूत आणि पुढे रूपर्ट मर्डॉक यांच्या माध्यमसाम्राज्याचा भाग असलेल्या ‘एलडब्ल्यूटी’ (लंडन वीकएन्ड टेलिव्हिजन) या समूहाचे अध्यक्ष.. परंतु या सर्वाआधी, तरुणपणी दुसऱ्या महायुद्धात प्रत्यक्ष लढलेले मेजर!
माणूस बदलतो, बदलत राहतो; हा बदल अनपेक्षितही असू शकतो आणि १९५१ ते ६४ पर्यंत डाव्यांच्या साप्ताहिकाचा सह-संपादक आणि पुढे त्याच मासिकाचा मुख्य संपादक असलेला माणूस थेट भांडवली माध्यमसम्राटाच्या पदरी जाऊ शकतो.. हे फ्रीमन यांच्या या लांबलचक ओळखीतून स्पष्ट व्हावे. फ्रीमन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे या बदलांसंदर्भातील वैशिष्टय़ असे की, इतरांना धक्कादायक वाटणाऱ्या या परिवर्तनाच्या नाडय़ा फ्रीमन यांनी बहुतेकदा स्वत:कडे ठेवल्या होत्या. महायुद्धाच्या अखेरीस, १९४५ साली क्लेमेंट अॅटलींच्या मजूर पक्षाने विन्स्टन चर्चिल यांच्या हुजूर पक्षाविरुद्ध अनेक माजी सैनिकांना पार्लमेंटच्या निवडणुकीची उमेदवारी दिली होती आणि ते जिंकूनही आले, त्यांपैकी फ्रीमन हे एक. पार्लमेंटात पहिल्या दिवशी ते लष्करी गणवेशातच हजर होते; पण हा अपवाद. अन्य सर्व जबाबदाऱ्या निभावताना, आदल्या कामासाठीचा गणवेश त्यांनी नेहमीच बदलला होता. म्हणूनच जे केले, त्यात त्यांनी यश मिळवले. मुलाखतकार अडचणीचे प्रश्न थेट चित्रवाणीवर विचारतो आहे, ही पद्धत ‘फेस टु फेस’ने रुळवली.
भारतात इंदिरा गांधींच्या आणि पाकिस्तान युद्धाच्या काळात त्यांना फार काही करता आले नाही, पण निक्सनकाळातील अमेरिकेशी ब्रिटनचे आर्थिक आणि लष्करी संबंध त्यांनी घट्ट केले. महात्मा गांधी यांचे भाषण लहानपणी ऐकून फ्रीमन साम्राज्यविरोधी (म्हणून ब्रिटिश संदर्भात डावे) झाले होते म्हणतात. तसे असेल तर अमेरिकेने त्यांना ‘उजवे’ केले, हेही खरे. बदल हा स्थायिभावच असलेल्या फ्रीमन यांची चार लग्ने आणि स्त्रीविषयक चंचल वृत्ती, ताकास तूर लागू न देता स्वत:ला जपण्याची पद्धत आणि कुशाग्र बुद्धी या वृत्ती मात्र कधीही बदलल्या नाहीत.
संग्रहित लेख, दिनांक 27th Dec 2014 रोजी प्रकाशित
जॉन फ्रीमन
माणूस बदलतो की बदलत नाही, या कोडय़ाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जॉन फ्रीमन यांचे शंभरी न गाठताच ९९ व्या वर्षी संपलेले आयुष्य.

First published on: 27-12-2014 at 01:19 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: John freeman