एक भूमिका वठवण्यासाठी निसर्गनिवडीतून घडवली गेलेली सजीवांची गुणवैशिष्टय़े कालक्रमाने अगदी वेगळ्याच संदर्भात कर्तबगारी गाजवू लागतात आणि उत्क्रान्तीचा प्रवाह नवनवी वळणे घेत वाहत राहतो.
वसंत ऋतूत सगळा महाराष्ट्र कसा रंगून जातो. सुरुवात होते काटेसावरीच्या लालबुंद फुलांनी. पाठोपाठ फुलतात पिवळेधमक बावे, जांभळे नीलमोहोर, पांढरे अनंत आणि सर्वात डोळ्यात भरणारे पळस. सावरी, पळस, पांगाऱ्यांच्या तांबडय़ालाल फुलांतला मध चाखायला येतात तऱ्हेतऱ्हेचे रंगबिरंगी पक्षी- पिवळेजर्द हळदे, काळेशार कोतवाल, लालगल मिशावाले बुलबुल. हे रंगेल सौंदर्य प्रगटले कसे? ही तर आहे जीवसृष्टीच्या नवनव्या उन्मेषांची, भक्ष्य-भक्षकांच्या साद-प्रतिसादाची, नर-मादींच्या, फुला-पाखरांच्या सहयोगाची सुरस कहाणी.
सूर्याला आपण आळवतो : कोटि कोटि किरण तुझे अनलशरा उधळिती। अमृतकण परि होउनि अणुरेणु उजळिती। पृथ्वी आणि पाणी या पहिल्या दोन महाभूतांतील रेणूंचा आणि तेज या तिसऱ्या महाभूतातील प्रकाशकणांचा संवाद सतत चालू असतो. प्रकाशकणांतील ऊर्जा पिऊन अणुरेणूंची ठेवण बदलते. त्याच वेळी हे अणुरेणू किरणांना वळवतात, त्यांचे रंग पलटवतात. आपण आकाशातले रंग न्याहळत विचारतो : ‘रंगांचा उघडुनिया पंखा, सांज कुणी ही केली?’ भूमीवरही काळी, किरमिजी, लाल, पिवळी माती, आकर्षक रंगांचे स्फटिक, खडे आढळतात. पण सृष्टीला खरोखरच नटवली, सजवली आहे, ती सजीवांनी.
जीवसृष्टीच्या चतन्याचा मूलाधार आहे सूर्यप्रकाश. क्लोरोफिलचे हिरवे रेणू प्रकाशातली ऊर्जा वापरत पाण्याचे रेणू फोडून साखर बनवतात. या प्रक्रियेतून प्राणवायू बाहेर पडतो. मोठा उपद्व्यापी! काळजीपूर्वक हाताळला नाही तर अक्षरश: आग पाखडतो. या प्राणवायूपासून जीवयंत्रणेला वाचवण्यासाठी उत्क्रान्तीच्या ओघात पिवळ्या-लाल रंगांचे कॅरॉटिनॉइड्सचे रेणू अवतरले. पण प्राणवायूपासून बचाव केला तरी आणखी एक धोका आहे, तो म्हणजे अल्ट्राव्हायोलेट प्रकाशकिरणांचा. अल्ट्राव्हायोलेट किरणांनी आनुवंशिकतेचा आधार असलेल्या डीएनएच्या रेणूंची मोडतोड होते. या डीएनएच्या रेणूंचे चिलखत म्हणून सजीवांनी अल्ट्राव्हायोलेट किरण शोषून घेणाऱ्या तांबडय़ा-निळ्या-जांभळ्या अ‍ॅन्थोसायानिनचे उत्पादन सुरू केले. पण तरीही इजा होणारच. याची डागडुजी करायला एक न बिघडलेली प्रत हाताशी हवी. अशी प्रत सांभाळायला एक खाशी तोड काढली, नर-मादींच्या सहकार्याची. त्यातून अवतरला रसराज शृंगार.
या साऱ्या उलाढालींमुळे साडेतीन वर्षांपूर्वीच्या आदिम सायनोबॅक्टेरियांपासून, शेवाळी, नेचे, देवदार, वड-िपपळांपर्यंत साऱ्या क्लोरोफिलयुक्त जीवांच्यात कॅरॉटिनॉइड आणि अ‍ॅन्थोसायानिनचे रेणू आढळतात. एवढेच की सामान्यत: त्यांचे लाल- पिवळे- निळे- जांभळे रंग क्लोरोफिलच्या हिरव्या रंगानी झाकून टाकलेले असतात. आरंभी जीवसृष्टी नर व मादी पेशींचे मीलन घडवून आणण्यासाठी जलचरांसाठी पाणी आणि भूचरांसाठी वाऱ्याची मदत घेत होती. निसर्गच जलवायूंना खेळवत राहतो, त्यांना काही खास आकर्षति करण्याची आवश्यकता नाही. म्हणून सुरुवातीच्या काळातले जीव रंगांनी नटले नव्हते. पण वाऱ्याच्या झुळका वनस्पतींच्या नर पेशींना, पुंकेसरांना नेमक्या जागी पोहोचवत नाहीत, यातून अतोनात पराग वाया जातात. तेव्हा नेटक्या परागीकरणासाठी अवतरले वनस्पतींचे सचेतन सहकारी- कीटक, पक्षी. त्यांना आकर्षति करण्यासाठी फुलांनी अवतार घेतला. फुलांच्या पाकळ्या ही रूपांतरित पानेच आहेत. पानांतला क्लोरोफिलचा कॅरॉटिनॉइड्स-अ‍ॅन्थोसायानिनांवरचा बुरखा हटवत फुले रंगून जातात. फुलांतून उपजतात फळे. बीजप्रसरणासाठी ही कधी मदत घेतात पाणी-वाऱ्यांची तर कधी प्राण्यांची. काटेसावरीची फुले परागीकरण करणाऱ्या पक्ष्यांना खुणावण्यासाठी लाल रंगाने नटतात, पण त्यांच्या बिया मऊ मऊ कापसाच्या िझज्या िपजारून वाऱ्याबरोबर फैलावतात. आंब्याचा मोहोर खास रंगांनी नटत नाही, तो वासाच्या जोरावर परागीकरणासाठी किडय़ांना आकर्षति करतो. कच्ची असते तोवर कैरी हिरवी साडी लेवून पानांत दडून राहते. पण पिकली की लाल शालू नेसून वटवाघळांना या, गर खा आणि बाठी रानोमाळ पसरवा असा संदेश देते.  
पाहा, उत्क्रान्तियात्रेत सचेतन निघाले कुठून आणि पोहोचले कुठे! प्राणवायूपासून, अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून बचाव करायला कॅरोटीनॉइड- अ‍ॅन्थोसायानिन अवतरले. आजतागायत इमानेइतबारे ते ही कर्तव्ये पार पाडताहेत. पण त्यांच्या रंगसंगतीचा फायदा उठवत निसर्गनिवडीत त्यांना नवनव्या कामांना जुंपण्यात आले. परागीकरणासाठी फुले रंगवायला- बीजप्रसरणासाठी फळे रंगवायला. पण हे साधायला फुले-फळे रंगण्याच्या जोडीनेच प्राण्यांना रंग पाहण्याचे सामथ्र्य हवे ना? तेव्हा हातात हात गुंफून वनस्पतिसृष्टीची – प्राणिसृष्टीची समांतर उत्क्रान्ती होत राहिली. हळूहळू हिरव्या पानांचे रंगीत पाकळ्यांत रूपांतर झाले, आणि त्याच वेळी आधी केवळ काळे-पांढरे पाहणारे प्राणी रंग पाहू लागले.
हे रंग पाहण्याचे सामथ्र्य कुठून आले? ही जबाबदारी प्राण्यांनी फुलांना रंगवणाऱ्या कॅरोटीनॉइड रेणूंवरच सोपवली. अ जीवनसत्त्वाचे भाईबंद असलेल्या कॅरोटीनॉइड रेणूंचा प्रकाशकिरणाशी छान संवाद चालतो. काही विशिष्ट कंपनांचे किरण परावíतत करीत ते स्वत: रंगतात. पण जसे क्लोरोफिलचे रेणू प्रकाशातील ऊर्जा पीत पीत आपली रचना बदलतात, तसेच कॅरोटीनॉइडचे रेणूही करू शकतात. ही रचना बदलताना रेणूंच्या पातळीवर जी हालचाल होते तिच्या वापरातून प्राण्यांची रंगसंवेदना उपजली आहे. तेव्हा एकाच वेळी कॅरोटीनॉइडचे रेणू फुला-फळांना रंगवतात आणि प्राण्यांसाठी ते रंग प्रगटवतात!
पण कॅरोटीनॉइडचे रेणू केवळ फुला-फळांनाच रंगवतात असे थोडेच आहे? ते प्राण्यांनाही रंगवतात. असा रंगलेला एक अफलातून पक्षी आहे नदी-तळी-समुद्रकिनाऱ्यावर भटकत राहणारा रोहित अथवा फ्लेिमगो. चांगला चार फूट उंचीचा, मूळचा पांढरा शुभ्र. पण त्याच्या श्वेतवर्णाला खुलवणाऱ्या गुलाबी पिसांनी डोळ्यात भरतो. सगळेच रोहित सारख्या प्रमाणात गुलाबी पिसे मिरवत नाहीत. कारण रोहित पक्ष्यांना स्वत:ला या पिसांना गुलाबी छटा देणारे रंगद्रव्य बनवता येत नाही. प्राण्यांची स्वत:ला रंगवण्याची कुवत मर्यादित असते. ते फक्त माणसालाही ‘रंगात रंग तो श्यामरंग’ देणाऱ्या मेलानिनचे उत्पादन करू शकतात. केवळ बॅक्टेरिया आणि वनस्पती इतर रंग बनवू शकतात. आपल्या आहारातून मिळालेले कॅरोटीनॉइडसारखे रंगीले रेणू वापरत रोहित आणि इतर सारे प्राणी रंगतात. रोहितांचा मुख्य आहार असतो एक प्रकारचे गुलाबी िझगे. या िझग्यांनीही उधारी-उसनवारीच केलेली असते. त्यांचा गुलाबी रंग आलेला असतो त्यांच्या शाकाहारातून. असा परिसरातल्या आहारचक्रातून कॅरोटीनॉइडच्या रेणूंचा प्रवास होत राहात-राहात रोहित गुलाबी पिसांनी नटतात. साहजिकच खाऊन-पिऊन धष्टपुष्ट बनलेल्या रोहितांच्या पंखांवर खूप जास्त लाली चढलेली असते. अशक्त रोहित फिके पडतात, त्यांच्या पंखांतली थोडीच पिसे गुलाबी असतात.
उत्क्रान्तीच्या ओघात या कमी-जास्त लालीचा आणखी एक फायदा उठवला जातो. रोहितांच्या स्वयंवरात नर-माद्या शोधत असतात एक धष्टपुष्ट जोडीदार. जितका जास्त लाल तितका जास्त बळकट. भरपूर पुरावा मिळाला आहे की झकास रंगलेले रोहित प्रेमाच्या स्पध्रेतही सरशी करतात. साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी प्राणवायूपासून वाचवण्यासाठी अवतरलेले कॅरोटीनॉइडचे रेणू आज असे रोहितांच्या वैवाहिक जीवनात एक वेगळीच भूमिका वठवत आहेत. अशी आहे संधिसाधू उत्क्रान्तियात्रा. आपल्या डोळ्यांपुढे नेहमीच चालू असते वेगवेगळ्या व्यवसायांतील, खासकरून आपल्या राजकीय नेत्यांच्या जबरदस्त संधिसाधूपणाचे मनोरंजक प्रदर्शन! यात काहीच नवल नाही, ही तर आहे जीवसृष्टीची अतिप्राचीन परंपरा!
लेखक  ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.