scorecardresearch

Premium

पाहण्याची वृत्ती..

फक्त एकच लक्षात ठेवायला हवं की चित्रं हे अनुभवायची वस्तू आहे.

मला कधी कधी वाटतं की, दृश्य हे श्वासोच्छ्वासासारखं असतं, कधीही न थांबणारं..
मला कधी कधी वाटतं की, दृश्य हे श्वासोच्छ्वासासारखं असतं, कधीही न थांबणारं..

जीवनाचा वेग हा आपल्या पाहण्यावर, आपण पाहण्यासाठी, बघण्यासाठी/ किती वेळ देतो त्यावर परिणाम करतं. त्यामुळे पाहण्याची ‘गुणवत्ता’ यावर परिणाम होऊ शकतो.आपण चिकित्सकतेने पाहू लागलो तर ‘चित्रकलाही’ आपल्याला ‘कळेल’. फक्त एकच लक्षात ठेवायला हवं की चित्रं हे अनुभवायची वस्तू आहे.

मला कधी कधी वाटतं की, दृश्य हे श्वासोच्छ्वासासारखं असतं, कधीही न थांबणारं.. जिथपर्यंत डोळे शाबूत आहेत, मेंदू दृश्यसंवेदना ग्रहण करतोय, तिथपर्यंत हे चालूच राहतं. आपण टीव्ही, संगणक बंद करतो, सिनेमा संपतो, पण दृश्य संपत नाही. टीव्ही, संगणक, सिनेमाच्या पडद्यावर दिसणारे दृश्य संपते आणि टीव्ही, संगणक या वस्तू व सिनेमाच्या थिएटरच्या मंद दिव्यांच्या प्रकाशात दिसणारा पडदा हे दृश्य शिल्लक राहतं किंवा म्हटलं तर सुरू होतं. या वस्तूसमोरून किंवा थिएटरमध्ये आपल्या जागेवरून उठलो की, वेगळं दृश्य चालू राहतं. डोळे मिटले तरी दिवसा प्रकाशाच्या तीव्रतेमुळे जाणवणारे रंग, रात्री झोपल्यावर स्वप्नरूपात.. दृश्य चालूच राहते. आपल्याला त्याची जाणीव मात्र दर वेळी नसते. गाढ झोप लागली तर फक्त त्या काळातच आपण काय पाहात होतो किंवा दिसत होतं ते आपल्याला आठवत नाही.
आपल्या मानवी भौतिक जीवनात, आपण अनेक कृती करतो. त्या कृती करण्यासाठी आपण भौतिक पातळीवर अनेक गोष्टी करत असतो. त्याकरता आपल्याला संवेदना पातळीवर सजग राहणे गरजेचे असते. त्या संवेदनाच्या पातळीवर आपल्याला अनेक निर्णय घ्यायचे असतात. उदा. समजा तुम्हाला फळं विकत घ्यायची आहेत; तुम्हाला भूक लागलीय, तर आपण दिसतील ती सर्व फळं विकत घेऊच असं नाही. त्यांची किंमत हा एक भाग असेल; पण फळांचा आकार, त्यांच्या सालीचा रंग, पोत, त्यांचा पिकलेपणा, चव सुचवणारा मंद गोड वास, वजन, भरीव-पोकळपणा आदी गोष्टींद्वारे आपल्याला काही संकेत मिळत असतो. त्या संकेतांवर आधारित आपल्यामध्ये फळं घेण्याची इच्छा निर्माण होते; ती विशिष्ट फळं खाण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. आकार, रंग, गंध, त्यातून सुचवली गेलेली चव याकडे लक्ष देणं, त्याआधारे आपल्या मनातील इच्छा निर्माण होतेय हे जाणणं म्हणजे संवेदनेच्या पातळीवर सजग राहणं. त्याआधारे योग्य ठिकाणी फळं विकत घेणं म्हणजे संवेदनांच्या आधारावर निर्णय घेणं.
मानवी संवेदना ग्रहण व त्याद्वारे ज्ञान होण्याची प्रक्रिया अभ्यासणाऱ्या शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की, आपल्याला विविध संवेदनांमार्फत मोठय़ा प्रमाणात एकूण ज्ञान होतं. त्यातलं सत्तर टक्के ज्ञान डोळ्यांमार्फत आपण जे पाहतो त्यातून होतं. इतकं दृश्य महत्त्वाचं आहे, पाहण्याची क्रिया महत्त्वाची आहे.
फळं खरेदी करण्याचं एक उदाहरण झालं, पण समोरचा विक्रेता खरं-खोटं बोलतोय का? व्यक्ती आजारी आहे का? कोण कोणत्या मानसिक अवस्थेत आहे? समोरच्या व्यक्तीची भूक-गरिबीची वेदना, तीव्र, खरी आहे का? फुलांचा ताजा-टवटवीतपणा, एखाद्या ठिकाणची स्वच्छता, अशा कित्येक गोष्टी आपल्याला डोळ्यांनी कळतात. डोळे जणू काही बाहेरचं, सभोवतालचं जग आणि आपल्या मेंदूच्या, मनाच्या प्रक्रिया, भावभावना-विचार आदींचे तरंग, प्रतिसाद यांमधील एक पूल आहे.
निसर्गनिर्मित गोष्टी, घटना या एका वेगळ्या काळ, वेगाने चालतात. त्याउलट मानवनिर्मित गोष्टी या खूप वेगाने करण्याचा माणसाचा प्रयत्न दिसतो. कमळाला, कळीपासून पूर्ण उमलायला साधारणपणे तीस मिनिटे लागतात. हे निसर्गातील घटना घडण्याचं एक उदाहरण. याउलट माणूस सर्व काही जलदगतीने करण्यासाठी नवनवीन युक्त्या, यंत्रं तयार करत असतो. वेगाने प्रवास करणे, पटकन गरम-थंड करणं, पटकन कापणं, जोडणं-चिकटवणं ही काही त्याची मासलेवाईक उदाहरणं आहेत. आपण ‘कसं पाहतो’ हे आपल्या जीवनशैलीवर व त्याआधारे तयार होणाऱ्या तत्त्वज्ञानावर अवलंबून आहे.
आपलं सभोवताल हे किती नैसर्गिक आहे, आपण आपलं जीवन जगण्यासाठी निसर्गावर किती अवलंबून आहोत, निसर्गाच्या साहचर्याने आपण काहीशा संथ वेगाचं जीवन जगत असू, तर आपलं ‘पाहणं’, त्याची गुणवत्ता वेगळी असेल. जितकं आपण दूर, मानवनिर्मित शहरांमध्ये राहू तिथे आपलं ‘पाहणं’, त्याची गुणवत्ता वेगळी असेल. म्हणजे आपण घोडागाडीतून प्रवास करत असू, तर त्याच्या काहीशा संथ वेगाने आपण गोष्टी पाहू व त्या जास्त वेळ पाहू. त्याच उलट जलद जाणाऱ्या गाडीने (ताशी ९०/११० कि.मी.) आपण गोष्टी खूप कमी वेळ पाहू. त्यामुळे काही आकर्षक पाहिलं, तर एक तर गाडी थांबवावी लागेल किंवा जे पाहिलं त्याचा फोटो काढावा असं वाटेल, कारण वेगामुळे अनेक गोष्टी निसटत आहेत याचं आपल्याला भान असेल.
ज्या पद्धतीने आपण ‘पाहू’ त्यामुळे आपलं सौंेदर्यानुभव बदलेल, त्याचं स्वरूप बदलेल. पूर्वी तुलनेने संथ वेगाच्या जीवनात, मीनाकुमारी ‘चलते चलते’ असं गात अत्यंत लयबद्ध असं नृत्य ‘पाकिजा’त करतात आणि नव्वदीच्या दशकात त्याच्या उलट ‘कजरा रे’सारखं जलदगती, नृत्याचं गाणं आलं.. थोडक्यात मुद्दा असा की, जीवनाचा वेग हा आपल्या पाहण्यावर, आपण पाहण्यासाठी, बघण्यासाठी किती वेळ देतो त्यावर परिणाम करतं. त्यामुळे पाहण्याची ‘गुणवत्ता’ यावर परिणाम होऊ शकतो.
आपल्याला प्रत्यक्ष जीवनात लक्ष केंद्रित करणं, तपशिलात पाहणं आणि समग्र दृश्य पाहणं, भावनेने गहिवरून जाऊन पाहणं आणि विश्लेषक दृष्टीने निरीक्षण करणं, दृश्यपरिणाम ओळखणं आणि त्यातील सौंदर्यानुभव ओळखणं, जाणणं अशा विविध अंगांनी पाहावं लागतं. ते जीवनाच्या धर्म व धार्मिक पूजांसारखे उपचार, वैज्ञानिक तपासण्या, अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती, पोशाखाच्या कल्पना व वापर, अलंकरण्याच्या पद्धती, साधनं व माध्यमं, अभ्यास करण्याच्या पद्धती, आपण ज्या प्रकारच्या इमारतींमध्ये राहतो ती बांधावयाचं साधन, त्याचा आकार, अलंकरण व या सगळ्याहून महत्त्वाचं सोबत असलेला निसर्ग, त्याच्या तीव्रतेचं प्रमाण या सर्व गोष्टींमध्ये विखुरलेलं असतं. म्हणजे या जीवनाच्या अनेक बाबींमध्ये वर उल्लेखिलेलं ‘पाहणं’ त्याच्या अनेक पद्धती गुंतलेल्या असतात. फक्त आपल्याला त्याचं भान नसतं. म्हणजे मुंबईसारख्या शहरात रस्त्यावर यंत्राच्या साहाय्याने खड्डा खणत असतील, टीव्हीच्या दुकानात अनेक टीव्ही संचांवर क्रिकेट मॅच चालू असेल, रस्त्यावर पडलेलं झाड महानगरपालिकेचे लोक कापत असतील, डोंबारी खेळ करून दाखवत असेल, दोन व्यक्तींत भांडण सुरू झालं, भाज्या किसण्यासाठी कोणी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रं किंवा किसणी दाखवत असेल, फेरीवाल्यांकडे आकर्षक वस्तू असतील, मंडपामध्ये नवरात्र, गणेशोत्सवाची सजावट व मूर्ती असेल, तर लोक घोळक्याने गोष्टी पाहतात व प्रत्येक वेळा पाहण्याची त्यांची पद्धत सारखी नसेल, ते वेगवेगळ्या पद्धतींनी पाहात असतात. अशा विविध प्रकारच्या पाहण्यांतूनच आपलं किंवा ठरावीक समाजात दृश्यपातळीवरील ‘सौंदर्य’ निकष, त्याचे समज तयार होत असतात.
‘दृश्यकला’ निर्माण करणारे चित्रकार याच भानातून ‘सौंदर्यपूर्ण’, ‘अर्थपूर्ण’ दृश्यभाषा निर्माण करत असतात, त्यांच्या चित्रांतून मांडत असतात. ती समजण्यासाठी फक्त एक वृत्ती आपल्यात असायला हवी. ती वृत्ती म्हणजे जीवनाच्या अनेक अंगांत चिकित्सक वृत्तीने आरोग्यदायी, योग्य, आनंददायी, सौंदर्यपूर्ण निकष ओळखणं, त्यांचा आग्रह धरणं, त्यांची निर्मिती करणं. आपण चिकित्सकतेने पाहू लागलो, तर ‘चित्रकलाही’ आपल्याला ‘कळेल’. फक्त एकच लक्षात ठेवायला हवं की, चित्र हे अनुभवायची वस्तू आहे. ती इतर अनुभवायच्या वस्तूंप्रमाणे आहे म्हणजे तिचा अर्थ शब्दांत कळून उपयोग नाही. व्याख्या समजून, पाठ करून तर बिलकूल नाही. त्याकरता एकच गोष्ट करायला हवी, ती म्हणजे समांतर, एकसारखा अनुभवांविषयी भान बाळगणं आणि शाब्दिक पातळीवर ‘याचा अर्थ काय,’ असा प्रश्न स्वत:ला विचारू नये, कारण आपल्याला चित्रातून जो दृश्यानुभव मिळेल त्याचा अर्थ कदाचित नृत्य किंवा नाटय़ किंवा संगीतातील एखाद्या त्याच्यासारख्याच अनुभवातून मिळेल किंवा कदाचित प्रत्यक्षातील एखाद्या दृश्यातून मिळेल. अशा विविध अनुभवांतील सारखेपणा कळत गेल्याने, आपल्याला चित्राचा दृश्यानुभव म्हणजे काय जाणवतंय व त्यामुळे मनात काय तरंग उमटतायत, काय विचार येतायत, काय सुचतंय हे सर्व कळेल. हे कळायला लागलं की, चित्र, चित्राचा अनुभव आपण समजायला लागू, चित्रं कळेल, कळायला सुरुवात होईल; पण एक लक्षात ठेवायला हवं की, चित्रं किंवा पाहण्याची वृत्ती अंगात बाळगायला हवी, वाढवायला हवी व त्याकरिता संयम व प्रयत्नही हवेत.. एखाद्या खगोलशास्त्रज्ञ, अभ्यासकासारखा, जे अनेक र्वष एखादा तारा, आकाशगंगा आदींचे निरीक्षण करत राहतात आणि मग निष्कर्षांप्रत येतात.
(समाप्त)
महेंद्र दामले
लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत. त्यांचाई-मेल
mahendradamle@gmail.com

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व कळण्याची दृश्यं वळणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Emotion in painting

First published on: 19-12-2015 at 02:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×