गुजरातचे मुख्यमंत्री आणि आगामी लोकसभा निवडणुकीतील भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी भरविलेल्या मिठाईची मिठास जिभेवरून दूर होण्याआधीच गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी आपला बंडखोर पक्ष पुन्हा भाजपच्या दावणीला बांधण्याचा निर्णय घेऊन अखेर राजसंन्यास जाहीर केला. मोदीशाहीला कंटाळून भाजपमधून बाहेर पडलेल्यांच्या नाराजीचा फटका निवडणुकीत बसल्याचे स्पष्ट झाल्याने भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशानुसार बेरजेच्या राजकारणाची सुरुवात करण्याची गरजच होती. मोदी यांनी केशुभाईंना भरविलेला मिठाईचा घास ही या राजकारणाची दृश्य परिणती असली, तरी मोदीमार्ग निष्कंटक करण्याच्या राजनीतीची ती पहिली पायरी असल्याचे पुढे स्पष्ट होत गेले. नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी भाजपमधून बाहेर पडून गुजरात परिवर्तन नावाचा पक्ष स्थापन करणारे केशुभाई पटेल यांचा गुजरातेत भाजप रुजविण्यात मोठा वाटा असल्याने, आगामी लोकसभा निवडणुकीची विजयचिन्हे ठळक होऊ पाहत असताना असे विरोधक समोर असणे परवडणारे नाही, याची जाणीव संघ परिवारास आणि राजनीतीची सर्व सूत्रे अवगत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्यासारख्या मातब्बर नेत्यास असणार हे स्पष्ट आहे. निवडणुकीच्या मदानातून केशुभाईंच्या परिवर्तन पक्षाचे अस्तित्व बाजूला करण्यासाठी, तो पक्ष भाजपमध्ये सामावून घेणे हाच व्यवहार्य मार्ग असल्याचे ओळखून विधानसभा निवडणुकीनंतर लगोलग सुरू झालेल्या बेरजेच्या राजकारणाला अखेर यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपचा त्याग करताना मोदी यांची राक्षस या शेलक्या विशेषणात संभावना करणाऱ्या केशुभाईंची गुजरात परिवर्तन पार्टी भाजपमध्ये विलीन झाली, तरी केशुभाई मात्र त्यामध्ये नसतील. गुजरातमधील बेरजेच्या बळजबरी राजकारणाला तोंड देणे शक्य नाही आणि या राजकारणापुढे गुडघे टेकणेही शक्य नाही, अशा अवस्थेच्या अपरिहार्यतेचे सावट केशुभाईंच्या या निर्णयामागे असू शकते. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदरच केशुभाईंनी भाजपला रामराम केला होता. त्यानंतरच्या मोदींच्या दिग्विजयानंतर आता हरी हरी करीत बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सध्या वाफाळत्या चहाच्या घुटक्यांसोबत भारताच्या राजकारणावर चर्चा घडविण्यासाठी भाजपचे कार्यकत्रे देशभर सक्रिय झाले आहेत. प्रत्यक्ष भाजपच्या बंदद्वार बठकांमध्ये मात्र, खासगीतील चहापानासोबत होणाऱ्या चच्रेत केशुभाईंच्या राजकारण संन्यासाची आणि गुजरातेतील बेरजेच्या राजकारणाची कुजबुजच सुरू असेल. एरवीही मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपमध्ये केशुभाईंसारख्या नेत्याला भविष्यात स्थान असण्याची शक्यतादेखील कमीच होती. केशुभाईंप्रमाणेच, सौराष्ट्रच्या राजकारणावर प्रभाव असलेले लेवा पटेल समाजाचे काही नेतेही भाजपमधून बाहेर पडले होते. नव्या बेरजेच्या राजकारणात सौराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून या नेत्यांच्या माघारीच्या प्रक्रियेस गती दिली आहे. २००१ मध्ये केशुभाईंना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून अपमानित अवस्थेत हटविले गेले होते आणि त्यामागे मोदी यांचीच राजनीती असल्याचा आरोपही केला जात होता. पुढे संजय जोशींसारख्या संघटकाने गुजरातबाहेर जाऊन भाजपशी इमान राखले, तसे करणे गुजरातमध्ये रुजलेल्या केशुभाईंना अशक्यच होते. मोदी यांच्या विरोधातील तक्रारींचा केशुभाईंचा आवाज भाजपच्या कोणाही वरिष्ठ नेत्याच्या कानापर्यंत पोहोचलाच नव्हता. संघ परिवारात एकचालकानुवíतत्व हे एके काळी ब्रीदवाक्य होते. ते आजही तत्त्व म्हणून अस्तित्वात आहे, याची बहुधा केशुभाईंना आता जाणीव झाली असावी, एवढेच!
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2014 रोजी प्रकाशित
अपरिहार्य राजकीय संन्यास..
गुजरातचे मुख्यमंत्री आणि आगामी लोकसभा निवडणुकीतील भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी भरविलेल्या मिठाईची मिठास जिभेवरून दूर होण्याआधीच गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी आपला बंडखोर पक्ष पुन्हा भाजपच्या दावणीला बांधण्याचा निर्णय घेऊन
First published on: 14-02-2014 at 01:16 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keshubhai patel unconditional political asceticism