खुशवंत यांची खुशामत

सखोलता, उंची आणि विस्तार ही त्रिसूत्री खुशवंतसिंग यांच्या आयुष्यातील काळगतीशीही मिळतीजुळती म्हणावी लागेल..

सखोलता, उंची आणि विस्तार ही त्रिसूत्री खुशवंतसिंग यांच्या आयुष्यातील काळगतीशीही मिळतीजुळती म्हणावी लागेल.. स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्कार, त्यानंतरच्या वर्षांतील प्रगती आणि नव्वदोत्तरी काळातील प्रसिद्धी असे टप्पे त्या आयुष्याने पाहिले. स्वत:च्या स्तंभलेखनाला खुशवंत त्यांनी जी आत्मनिष्ठ शैली दिली त्याने ते अनेकांच्या अधिक लक्षात राहिले.
खुशवंतसिंग यांच्या निधनाच्या बातमीनंतर दुसऱ्या दिवशी काय होणार, हे आता दिसले आहे. अनेक इंग्रजी आणि ‘लोकसत्ता’सारख्या मराठी दैनिकांनी अख्खी पाने खुशवंतसिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाला बहाल केली आहेत. ही अशी खडी ताजीम फार कमी लेखक-संपादकांना मिळते. खुशवंतसिंग ९९ वर्षे जगले, त्यापैकी सुमारे ६० वर्षे लिहिते राहिले आणि या इतक्या वर्षांत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे भरपूर कंगोरे दिसत गेल्यामुळे एकच दंतकथा अनेकांनी निरनिराळ्या प्रकारे सांगावी तसे त्यांच्या जाण्यानंतर प्रसारमाध्यमांचे झाले. मरणानंतर एखाद्याचे देव्हारे माजवण्यात अर्थ नसतो ही भूमिका खुद्द खुशवंतांनीच कशी पाळली होती याची आठवण काढणाऱ्यांनाही खुशवंत हे कसे एकमेवाद्वितीय होते, हेच सांगावेसे वाटले. ही अद्वितीयपणाची मेख उलगडून सांगण्याऐवजी किंवा त्या व्यक्तिमत्त्वाचा अर्थ लावण्याऐवजी वर्णने करण्यात अनेकांनी धन्यता मानली.  खुशवंतसिंग म्हणजे स्त्रियांकडे भोग्यवस्तू म्हणून पाहणारे, सिंगल माल्ट व्हिस्की दररोज घेणारे, खुशवंतसिंग म्हणजे आणीबाणीला समर्थन, इंदिरांसह संजय गांधींचीही तळी उचलणे, खलिस्तानला तीव्र विरोध आणि ऑपरेशन ब्लूस्टारला काही मुद्दय़ांवर विरोध करून पद्मभूषण परत करणे, हे सारे पानोपानी उगाळून झाले. जवळपास शंभरी गाठलेल्या आणि लेखक, संपादक, स्तंभलेखक म्हणून अर्धशतकाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात वावरलेल्या व्यक्तीचे तपशील माहीत असताना त्यांचा अर्थ लावण्याचे आव्हान सर्वापुढे होते. ते पेलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, अनेकांनी वेळ साजरी केली.
अद्वितीयपणा हे काही खुशवंतसिंगांचे वैशिष्टय़ नव्हे. प्रत्येक माणूस एकमेवाद्वितीय असतोच हे प्रबोधनकाळापासून व्यक्तिस्वातंत्र्यवादी विचारवंत सांगत आले. या प्रबोधनकाळाचा वारसा नेहरूकाळात भारतीय रूप घेऊन अवतरला. याच टेम्स-जमनी काळात मुल्कराज आनंद, राजा राव, आर के नारायण या लेखकांनी इंग्रजी साहित्यात भारतीय वाट शोधली किंवा गिरिलाल जैन, रुसी करंजिया, शामलाल यांच्यापासून ते बिझीबी ऊर्फ बेहराम कॉन्ट्रॅक्टर यांच्यापर्यंत अनेकांनी भारतीय इंग्रजी पत्रकार-संपादक या नात्याने या नवलोकशाही राष्ट्राबद्दल सजग असण्याचे आपापले मार्ग शोधले. या वाटांचे, या मार्गाचे एक समकालीन सहप्रवासी म्हणजे खुशवंतसिंग. व्यक्तिस्वातंत्र्यवाद जपण्याचे संस्कारच या सर्वावर होते, ते त्यांनी पाळले. एरवी कसोशीने पाळण्याची धर्मनिरपेक्ष भूमिका आणि स्वत:च्या कूळ-मुळाशी प्रामाणिक राहण्याची सहजवृत्ती यांतला अंतर्विरोध सांभाळण्याची कसरतही या सर्वानीच केली. इंग्रजी भाषा भारतीय लोकमानस ओळखू शकते, हे दाखवून देण्याचे श्रेय तर या सर्वाखेरीज आणखीही अनेकांचे. पण झाले असे की खुशवंत यांना जगण्याने जो अवधी दिला आणि स्वत:च्या स्तंभलेखनाला त्यांनी जी आत्मनिष्ठ शैली दिली त्याने खुशवंत अनेकांच्या अधिक लक्षात राहिले. हे असे- दिसत राहिल्याने लक्षात राहणे एकविसाव्या शतकाला अधिक शोभणारे. वाहिन्यांवर सतत दिसत राहून लोकप्रियता टिकल्याच्या समाधानात असणाऱ्यांच्या फौजा, त्याहीखाली फेसबुकवर लाइक मिळवणाऱ्यांची फळी, अशी आजच्या लोकप्रियतेची व्यूहरचना असते. हे काम खुशवंत यांच्या स्तंभलेखनाने केले. आजच्याच भाषेत बोलावयाचे तर, ईमेलपासून आता व्हॉट्सअ‍ॅपपर्यंत आलेला फॉरवर्ड्स हा प्रकार खुशवंतसिंगांच्या स्तंभाने पहिल्यांदा आणला. आपल्याच स्तंभातील अखेरच्या- ‘टेलपीस’च्या जागी, अमक्या ठिकाणच्या अमक्या वाचकाने हा विनोद पाठवल्याचे सांगून तो फॉरवर्ड करणे, हे खुशवंतसिंग यांनी केले.
विस्तारणे आणि उंच किंवा सखोल जाणे ही एकंदर लेखनवैशिष्टय़े लक्षात घेतली तर असे दिसेल की स्तंभलेखक म्हणून त्यांची धाटणी विस्तारण्याची राहिली. वाचकांना सहभागी करणे हा या विस्ताराचा एक भाग, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी हाताळलेल्या विषयांचे आणि त्या विषयांशी संबंधित असलेल्या व्यक्तींचे वैविध्य. विस्तार हा खुशवंतसिंग यांच्या पत्रकारितेतील कारकिर्दीचाही स्थायिभाव होता. इलस्ट्रेटेड वीकली नामक साप्ताहिकाचा खप १९७०च्या दशकात सिंग यांनी वाढविला, त्यामागे केवळ बिकिनीतली शर्मिला टागोर मुखपृष्ठावर वापरणे किंवा दिवंगत नृत्यगुरू प्रोतिमा बेदी यांनी जुहू किनाऱ्यावर विवस्त्र धाव घेतली त्याची छायाचित्रे छापणे यांसारख्या युक्त्याच होत्या, असे नव्हे. वाचकांना आपल्याच आसपासच्या समाजासह आजच्या भारताचे प्रतिबिंब दिसल्यास इंग्रजी साप्ताहिकाचा वाचकवर्ग वाढू शकतो, हे त्या वेळी त्यांनी हेरले आणि मजकुराचा ढांचा बदलला. साप्ताहिकाखेरीज हिंदुस्तान टाइम्स या दैनिकाचेही संपादन करताना, सामान्य माणसाच्या नजरेतून आधी एखाद्या घडामोडीकडे पाहा, भेळवाला किंवा टॅक्सीवाल्याचे शहाणपण नजरेआड करू नका, असे धडे त्यांनी सहकाऱ्यांना देऊन इंग्रजी पत्रकारितेच्याही विस्ताराला हातभार लावला. खुशवंतसिंग उंचही गेले, पण ते कथा आणि कादंबऱ्यांत. ही उंची कधी कधी त्यांनाही स्वत:ला समजली नसेल, कालपरत्वे ती सुज्ञांना समजेल. उदाहरणार्थ, बटबटीत कथानक म्हणून हिणवली गेलेली आणि तरीही भारतीय फाळणीवरल्या अभिजात साहित्यात नोंद होणारी त्यांची ट्रेन टू पाकिस्तान ही कादंबरी. तिचे कथानक वापरून पुढे चित्रपटही निघाला, परंतु लेखक म्हणून सिंग यांनी गाठलेल्या उंचीचा अंदाज तेवढय़ाने येणे कठीण. या कादंबरीतील मानोमाजरा गावातील लोक नंबरदार -किंवा पंजाबीत लंबरदार- या अधिकाऱ्याकडे जातात, हा प्रसंग मांडतानाच ‘लंबरदार असला तरी गावकऱ्यांसाठी हा ‘ओये लंबरदाराऽ’च राहिला होता’.. अशी, भारतातील ग्रामस्तरीय अधिकारकेंद्रांच्या मर्मावर बोट ठेवणारी उंची खुशवंतसिंग अगदी सहजपणे गाठतात. लेखक किंवा अभ्यासक म्हणून खुशवंतसिंग यांच्या सखोलतेचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी लिहिलेला शिखांचा दोन खंडी इतिहास आणि महाराजा रणजितसिंगांचे चरित्र. भारत आणि ब्रिटनमधील सर्व संदर्भाचा अर्क इतिहासकथनासाठी काढताना स्वत:चे रागलोभ बाजूला ठेवूनही रसाळ इंग्रजी खुशवंतसिंगांना वापरता आली, याचे कारण अभ्यासविषयाची सखोल जाण. सखोलता, उंची आणि विस्तार ही त्रिसूत्री त्यांच्या आयुष्यातील काळगतीशीही मिळतीजुळती म्हणावी लागेल.. स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्कार, त्यानंतरच्या वर्षांतील प्रगती आणि नव्वदोत्तरी काळातील प्रसिद्धी असे टप्पे त्या आयुष्याने पाहिले. मात्र त्यांची लेखणी कधीही, कुठेही जाऊ शकली. त्यामुळेच दिल्लीची घुसमट मांडणाऱ्या कादंबरीचा नायक तृतीयपंथीयाला भेटतो, असे वेगळे कथानक ते मांडू शकले. खुशवंत यांचे निर्णय खप वाढवणारे असल्याची उदाहरणे आहेत खरी, परंतु बरोबर उलटी उदाहरणेही आहेतच. पेंग्विन या जगड्व्याळ प्रकाशन संस्थेचे सल्लागार संपादक या नात्याने, सलमान रश्दींची ‘द सॅटानिक व्हर्सेस’ ही कादंबरी धर्मद्रोह म्हणून पाहिली जाईल म्हणून ती आपण प्रकाशित करू नये, असे ब्रिटनमधील मुख्यालयाला लेखी कळवल्याची आठवण खुशवंत यांनी अलीकडेच हिंदी बीबीसीच्या मुलाखतीत सांगितली होती. भारतातही आज हे पुस्तक छुप्या रीतीने विकत घेता येते आणि त्याचा खप जगभर तर चांगलाच झाला आहे.
तेव्हा खुशवंत यांच्याबद्दल ते किती मोठे होते असा सूर लावण्यापेक्षा आधी ते कसे होते, हे पाहिलेले बरे. खुशवंतसिंग यांचे शब्दभांडार स्तंभलेखनापुरते नव्हते, हे लक्षात ठेवायला हवे. खुशवंतसिंग यांच्या स्तंभलेखनाला शोभणाऱ्या काहीशा टारगट शब्दांत सांगायचे तर ‘शोरूममध्ये इतके तर गोदामात किती?’ असा प्रश्न कुणाला- अगदी खुशवंत यांच्या चाहत्यांनाही त्यांच्या निधनानंतर न पडणे बरे नव्हे. ती आदरांजली न ठरता मरणोत्तर खुशामत ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Khushwant singhs adulation

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी