‘दो बिघा जमीन’आणि ‘किंगफिशर’

सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तेव्हा अनेक शेतकरी या कर्जमाफीतून जसे सुटले तशी अनेकांनी ही कर्जमाफी अक्षरश ओरबाडली हेही लक्षात आले.

सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तेव्हा अनेक शेतकरी या कर्जमाफीतून जसे सुटले तशी अनेकांनी ही कर्जमाफी अक्षरश ओरबाडली हेही लक्षात आले.  नंतर कर्ज थकविणाऱ्या बडय़ा उद्योजकांना सरकारने  शेतकऱ्यांपेक्षाही दुप्पट सहानुभूती दाखविली. यात अर्थातच विजय मल्ल्या यांचा क्रम फार वरचा. आजही खेडय़ापाडय़ांत सावकाराच्या तगाद्याने झोप उडालेले ‘दो बिघा जमीन’मधल्या शंभूसारखे अनेक जण आहेत, पण विजय मल्ल्यांना मात्र कोणताही ताण नाही..
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या त्या नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे झाल्या. या निष्कर्षांबाबत आता कोणी दुमत व्यक्त करीत नाही. कर्जबाजारीपणाला कारण म्हणजे बँकांचे नाही, तर सावकारांचे भरमसाट व्याज. बँका हवे तेव्हा, हवे तेवढे कर्ज देत नाहीत. अशा वेळी शेतकऱ्यांना सावकार जवळचा वाटू लागतो. एकूणच शेतीधंद्यावर सावकाराची गडद अशी छाया पूर्वापार चालत आली आहे. कित्येकदा एका पिढीत घेतलेले सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी पुढच्या पिढीपर्यंत आटापिटा करावा लागल्याची उदाहरणे आहेत. बापाने घेतलेले कर्ज मुलांपर्यंत गेले आणि मुलांकडूनही जेव्हा परतफेड झालीच नाही तेव्हा जमिनीचा तुकडाच गमावण्याची पाळी अनेकांवर आलेली आहे. कर्जापायी सावकाराकडे पोटची लेक गहाण ठेवल्याची काही उदाहरणे आपल्याकडे इतिहासाच्या पानात आढळतात.  सावकाराचे कर्ज निर्दयीपणे वाढतच असते आणि तसतसा शेतकऱ्याच्या गळ्याभोवतीचा काचही आवळत जातो. जुनी, अनुभवी माणसे म्हणतात, ‘एक वेळ वाहत्या पाण्याला झोप असते, पण सावकाराच्या व्याजाला नाही.’ काळ बदलला, काळाचे संदर्भ बदलले, पण अजून तरी ‘सावकार’ या शब्दाची दहशत आहेच.
सावकार तोंडात पानाचा विडा घेऊन, झुळझुळत्या तलम वस्त्रानिशी गादीवर बसलेला आहे. आपल्या मुनीमजीला तो अमक्या-तमक्याला एवढे-एवढे पसे द्यायचे, असे सांगतो आहे. मुनीमजींच्या समोर चोपडय़ांची चळत, हातात बोरू आणि दाराच्याही पलीकडे दीनवाण्या अवस्थेत हात जोडून बसलेला गरजू कर्ज मागणारा.. असे चित्र कदाचित आता कुठेच दिसणार नाही, पण सावकारीसुद्धा आहे आणि सावकारही आहेत. आपापल्या पंचक्रोशीत दबदबा असणाऱ्या सावकारांचे आजचे रंगरूप ओळखणे जरा कठीण आहे. अडल्यानडल्या शेतकऱ्यांना कर्ज देताना त्यांच्या जमिनीचे करून घेतलेले गहाणखत आणि अशा गहाण खतांचे गठ्ठेच्या गठ्ठे जवळ असणारे सावकार आजही आहेत. असे जोखीम पत्करणारे व्यवसाय करायचे तर पूर्वीसारखे एकटे आणि आपल्या कोषात राहून चालत नाही म्हणून अनेक सावकार कुठल्या ना कुठल्या स्थानिक पुढाऱ्यांच्या आश्रयाने आपला हा व्यवसाय करीत असतात. ‘कोपरापासून ते ढोपरापर्यंत’ सोलण्याच्या इशाऱ्यात हे मात्र कुठेच बसत नाहीत, कारण यातले अनेक जण गावपातळीवरचे पुढारीच. ‘शोषक’ आणि ‘तारणहार’ यातली सीमारेषाच नष्ट व्हावी अशीही कमालीची गुंतागुंत. सावकारी प्रतिबंधक कायद्याने ही गुंतागुंत किती कमी होईल हे सांगता येणे अवघड, पण ही व्यवस्थाच नष्ट करण्याचे प्रयत्न होत नाहीत हे मात्र ढळढळीत सत्य.
केवळ शेतकरीच नव्हे, तर ग्रामीण भागातले छोटेछोटे कारागीर, शेतमजूर असे असंख्य घटक सावकाराच्या जबडय़ात असतात. आपली व्यवस्था अशी थोर की, कोणतीच खात्री नसताना, आवश्यक ती कागदपत्रे नसताना आणि गहाणखत केलेले नसताना एखाद्या साखर कारखान्याला दहा-पाच कोटी रुपये कर्ज बिनव्याजी मिळू शकते, पण ते शेतकऱ्याला सहजासहजी मिळेल अशी व्यवस्था नाही. पुढाऱ्यांनी दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर आणून ठेवलेल्या प्रकल्पांना तारण आणि कारण यापकी कशाचाही विचार न करता कशाच्या आधारे कर्ज मिळते? याउलट कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्याला एकरी दहा हजार रुपये मिळविण्यासाठी अनेक ठिकाणी खेटे घालून एक-एक कागद गोळा करावा लागतो. तरीही बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे हात ओले केल्याशिवाय कर्ज मिळत नाही. शेतकऱ्यासाठी सावकारीच्या गल्लीकडे जाणारा रस्ता हाच असतो. साध्या पीक कर्जासाठीही जर गहाणखत करून द्यायचे असेल तर मग सगळी कागदपत्रे, गहाणखताचा खर्च आणि पुन्हा कर्जाचे व्याज यापेक्षा सरळ सावकाराकडे जाऊन तात्काळ कर्ज मिळविण्याचा मार्ग शेतकऱ्याला जवळचा वाटू लागतो. सध्या ग्रामीण महाराष्ट्रात आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांतूनही तालुकास्तरापर्यंत फायनान्स कंपन्या दाखल झाल्या आहेत.
‘दो बिघा जमीन’मध्ये शंभू (बलराज सहानी) आपल्या कुटुंबासाठी शेतात राबराब मरतो. खूप कष्ट करूनही हाती काही उरत नाही. तरीही त्याची ‘दो बिघा जमीन’ त्याला जिवापाड प्रिय आहे. गावातल्या ठाकूर हरनामसिंहकडे जमीन भरपूर असली तरीही नेमकी शंभूची ‘दो बिघा जमीन’ त्याच्या डोळ्यात येते. शहरातल्या ठेकेदारामार्फत गावात कारखाना उभा करण्याचे निश्चित होते तेव्हा एवढय़ा मोठय़ा शिवारात फक्त शंभूच्या जमिनीचा तुकडा आड येतो. जमीनदार हरनामसिंहला वाटते, आज ना उद्या शंभू आपल्याला जमीन विकणार. तो ऐकत नाही तेव्हा त्याला कर्ज चुकवायला सांगितले जाते. कर्ज चुकविण्याची शंभूची इच्छा असली तरीही त्याचा निरुपाय असतो, कारण सावकाराने खोटी कागदपत्रे करून कर्जाची रक्कमच वाढवून टाकलेली असते. शेवटी तीन महिन्यांत कर्जाची रक्कम व्याजासह परत करायची, अन्यथा शंभूचा जमिनीवरील ताबा जाणार असे ठरते. आपली जमीन सावकाराच्या जबडय़ातून सोडविण्यासाठी तो शहरात येतो. रिक्षा चालवतो. त्याची प्राणांतिक तगमग चाललेली असते. तो रक्त ओकेपर्यंत रिक्षा ओढत  राहतो. दरम्यानच्या काळात त्याच्या संसारावर एकापाठोपाठ एक आपत्ती कोसळत असतात. हताश अवस्थेत तो गावाकडे येतो तेव्हा आपली जमीन आपल्या ताब्यातून गेली आहे आणि त्या जमिनीवर कारखान्याचे काम सुरू झालेले आहे हे पाहण्याची पाळी त्याच्यावर येते. त्याच ठिकाणी मूठभर माती उचलण्याचा तो प्रयत्न करतो, पण ती मातीही तिथले वॉचमन त्याच्या हातातून हिसकावून घेतात.. कर्जाच्या विळख्यात अडकलेले आणि त्यातून सुटण्यासाठी जिवाच्या आकांताने धडपडणारे अनेक शंभू आजही वेगवेगळ्या गावांमध्ये आढळतात. काही गावातच अडकतात, काही शहरात लोंढय़ानिशी आदळतात. एका मजबूर क्षणी त्यांनी कर्ज घेतलेले असते. हे कर्ज त्यांना फेडता येऊ नये आणि त्यांची मालमत्ता आपल्याला घशाखाली घालता यावी अशीच सावकारांची सुप्त इच्छा असते.
सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तेव्हा या निर्णयाची माध्यमाद्वारे प्रचंड चर्चा झाली. प्रत्यक्षात या कर्जमाफीचा फायदा घेऊन दिवाळखोरीत निघालेल्या सहकारी बँकांची परिस्थिती सुधारली. रुग्णाच्या सेवेसाठी उश्या-पायथ्याशी बसून देखभाल करणाऱ्यांना हे रुग्णाचे आजारपणच मानावे तसे घडले. प्रत्यक्षात अनेक शेतकरी या कर्जमाफीतून जसे सुटले तशी अनेकांनी ही कर्जमाफी अक्षरश: ओरबाडली हेही नंतर लक्षात आले. कर्ज थकविणाऱ्या बडय़ा उद्योजकांना सरकारने नंतरच्या काळात शेतकऱ्यांपेक्षाही दुप्पट सहानुभूती दाखविल्याचे उघड झाले. ही सहानुभूती उघड करणे सरकारला परवडले नसते म्हणून या गोष्टीची चर्चाच झाली नाही. या थकबाकीदार सहानुभूतीदारांमध्ये अर्थातच विजय मल्ल्या यांचा क्रम फार वरचा. म्हणजे साठ वर्षांपूर्वी आलेल्या ‘दो बिघा जमीन’मधल्या शंभूच्याही डोक्यावर कर्ज होते आणि विजय मल्ल्यांच्याही आहे, पण शेतकऱ्याकडे जसे सावकाराचे कर्ज असते तसे या लोकांकडे सावकाराचे कर्ज नाही, किंबहुना आजही खेडय़ापाडय़ांत सावकाराच्या तगाद्याने झोप उडालेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी नाही, पण विजय मल्ल्याला मात्र ताण असह्य़ होत नाही. ‘खेडय़ाकडे चला’, असे म्हणणाऱ्या महात्म्याच्या काही वस्तू लिलावात घेतल्यानंतर असे आत्मबल प्राप्त होते की काय माहीत नाही. कुठे भाजून काढणाऱ्या उन्हात धुळीने माखलेला शंभू आणि कुठे हे सचल जलचर.. कसा लागावा निभाव?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व धूळपेर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kingfisher and do bigha zameen

ताज्या बातम्या