लढाई रंगू लागली!

विधानसभेची निवडणूक फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार असून आत्ता तरी सत्ता राखण्याची संधी भाजपला अधिक असल्याचे मानले जाते

महेश सरलष्कर mahesh.sarlashkar@expressindia.com

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता राखण्याची संधी अधिक असली तरी, अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने लहान लहान पक्षांची एकजूट करून सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याची तयारी केली आहे. अखेरच्या टप्प्यात काँग्रेस पक्षही आक्रमक होत, आम्हालाही गांभीर्याने घ्या, असे म्हणू लागला आहे.

गेल्या आठवडय़ापासून उत्तर प्रदेशमध्ये निवडणूकपूर्व प्रचाराला सुरुवात झाली. विधानसभेची निवडणूक फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार असून आत्ता तरी सत्ता राखण्याची संधी भाजपला अधिक असल्याचे मानले जाते. पण, प्रतिस्पध्र्यानी संघर्ष करू नये असे नव्हे! लखीमपूर प्रकरणापासून काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारविरोधात आक्रमक झाल्याचा दिसला. लखीमपूरमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या समर्थकांच्या ताफ्यातील कारने आंदोलक शेतकऱ्यांना चिरडले, त्यात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. हे हत्याकांड मुख्यमंत्री योगी यांच्या विरोधातील प्रमुख मुद्दा ठरला आहे. त्यानिमित्ताने काँग्रेसने प्रियंका गांधी-वाड्रा यांना निवडणुकीचा चेहरा म्हणून प्रचारात उतरवले आहे. प्रियंका या लखीमपूरला जाण्याआधी प्रचंड राजकीय नाटय़ घडले आणि त्यानंतर गेले काही दिवस प्रियंका सातत्याने प्रकाशझोतात राहिल्या आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही लखीमपूरला जाऊन मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, पण लखीमपूर हत्याकांडावरून अखिलेश यांच्यापेक्षा प्रियंकांनी आघाडी घेतल्याचे चित्र उभे राहिले. मुख्यमंत्री योगी यांनी शनिवारी लखनऊमध्ये झालेल्या कार्यक्रमात मात्र समाजवादी पक्ष हाच प्रमुख विरोधक असल्याचे म्हटले आहे. थेट लढतीत पराभूत होण्याचा धोका वाढतो हे लक्षात घेऊन लढाई तिहेरी झाली तर पाहावे असे भाजपने ठरवले असावे आणि त्यासाठी लखीमपूर दुर्घटनेचा (गैर)वापर भाजपने काँग्रेसमध्ये उसने अवसान भरण्यासाठी केला असावा असे दिसते. त्यामुळेच प्रियंका आणि अखिलेश यांची विमानातील योगायोगाने झालेली भेटही बातमीचा विषय बनली.

सपा लक्ष्य, काँग्रेसकडे दुर्लक्ष

खरे तर लखीमपूर प्रकरणाच्या निमित्ताने राजकीय नाटय़ निर्माण केले ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांना मधल्या वाटेत अडवले नसते, त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की आणि नंतर अटकेची कारवाई केली नसती तर प्रियंका यांना योगींच्या कृतीचा राजकीय लाभ मिळाला नसता. ‘नजरकैदे’तील खोली आणि वाल्मीकी मंदिराच्या परिसरातील प्रियंका यांच्या स्वच्छता मोहिमेचा वापर काँग्रेसने प्रसिद्धीसाठी योग्य रीतीने करून घेतला. प्रियंकांना अटक करण्याचा निर्णय योगींनी राजकीय डावपेचाचा भाग म्हणून केलेला नव्हता. त्यांचा अहंभाव दुखावला की, ते विरोधकांवर ‘कारवाई’ करतात, तशी त्यांनी प्रियंकांविरोधातही अटकेची कारवाई केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रियंकांना सोडण्याची सूचना केल्यानंतर योगींनी सबुरीने हे प्रकरण हाताळले, त्यानंतर प्रियंका यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली असे सांगितले जाते. पण, योगींच्या कृतीमुळे प्रियंका अचानक ‘प्रसिद्धीझोता’त आल्या, काँग्रेसचा निवडणुकीचा फुगा आणखी फुगला तर राजकीय लाभ मिळू शकतो हे भाजपच्या लक्षात आले. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपने आता काँग्रेसकडे दुर्लक्ष करत समाजवादी पक्षाला लक्ष्य बनवले आहे! काँग्रेसनेही लखीमपूरचा धागा पकडत आगेकूच केली आहे. प्रियंका यांनी बाराबंकीमधून ‘प्रतिज्ञा यात्रा’ सुरू केली असून आश्वासनांची खैरात केली आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, २० लाख रोजगार, अवाच्या सवा किमतीने शेतीमालाच्या खरेदीची हमी अशा घोषणा करून त्यांनी काँग्रेसचा जणू ‘जाहीरनामा’ प्रसिद्ध करून टाकला. ४० टक्के जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा काँग्रेसने यापूर्वी केली आहे. या सगळ्या ‘प्रसिद्धी’तून उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत ‘आम्हालाही गांभीर्याने घ्या’, असे काँग्रेसला बहुधा भाजपला सांगायचे असावे. ही घोषणाबाजी करून झाली तरी, इतक्या उशिरा पक्ष संघटना कशी बांधायची हे कोडे अजून सुटलेले नाही. त्यामुळे प्रियंका यांचा चेहरा समोर ठेवून मते मागण्याचे काँग्रेसने ठरवले आहे.

छोटय़ा पक्षांशी युती

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला आव्हान देण्याची ताकद कोणाकडे असेल तर ती थोडीफार समाजवादी पक्षात असल्याचे वर्षभरापासून म्हटले जात होते. काँग्रेसकडे संघटना नाही आणि प्रियंका यांच्या नेतृत्वाचा पक्षाला फार फायदा होणार नाही, मायावती यांनी कुंपणावर बसण्याचे ठरवले आहे. मग, उरतो फक्त समाजवादी पक्ष. गेल्या सहा महिन्यांपासून अखिलेश यादव यांची निवडणुकीची तयारी सुरू आहे. पहिला निर्णय होता काँग्रेसशी युती न करण्याचा. गेल्या विधानसभेतील अनुभव गाठीशी होता आणि बिहारमध्ये काँग्रेसशी युती करून राष्ट्रीय जनता दलाने पायावर दगड मारून घेतल्याचा अनुभवही ताजा आहे. त्यापेक्षा जातीनिहाय छोटय़ा पक्षांशी युती केल्यास अधिक जागा जिंकता येतील असा विचार करून त्यादृष्टीने अखिलेश यांनी प्रयत्न केले. मुस्लीम आणि यादव या दोन समूहांवर अवलंबून न राहता ओबीसी जातींचीही मदत घेतली पाहिजे हाही विचार छोटय़ा पक्षांशी संपर्क साधताना केला गेला. मुस्लीम-यादवांचा पक्ष या बदनाम झालेल्या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी अखिलेश यांनी ब्राह्मण संमेलन आयोजित करून उच्चवर्णीयांनाही सप सामावून घेत असल्याचे दाखवले. पुढचा टप्पा ओबीसी जातींच्या पक्षांना आकर्षित करण्याचा होता. ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाशी (एसबीएसपी) युती निश्चित झाली असून त्याचा सपला वाराणसी, आझमगढ, गोरखपूर या पूर्वाचलच्या पट्टय़ात लाभ होऊ शकतो असे गणित मांडले आहे. राजभर यांनी विधानसभा आणि लोकसभेत भाजपशी युती केली होती पण, योगींच्या कारभारावर नाराज होऊन राजभर यांनी सपला प्रतिसाद दिला. काही महिन्यांपूर्वी याच राजभर यांनी दहा छोटय़ा राजकीय पक्षांना एकत्र करून ‘भागीदारी संकल्प मोर्चा’ नावाची आघाडी तयार केली होती. यात, ओवेसी यांच्या ‘एमआयएम’चा समावेश होता. चंद्रशेखर आझाद यांची भीम आर्मीही या आघाडीत सहभागी होण्याची शक्यता होती. पण, आता ही ‘भागीदारी’ संपुष्टात आली आहे. सपने ‘एसबीएसपी’शी युती निश्चित करून अतिमागास जातींना आवाहन केले आहे. पश्चिम उत्तर प्रदेशच्या पट्टय़ात प्रभाव असलेल्या जयंत चौधरी यांच्या ‘राष्ट्रीय लोक दला’शी आघाडी करून जाट मते आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय, केशव देव मौर्या यांचा महान दल, संजय चौहान यांचा जनवादी पक्ष, अपना दलातील अन्य गट अशा पक्षांशीही सपने जागावाटप करण्याचे ठरवले आहे. या पक्षांची मदत घेऊन कुशवाह, शाक्य, सैनी, चौहान, बेलदार आदी जातींची मते मिळवण्याचा प्रयत्न आहे. या छोटय़ा पक्षांकडे निवडणूक चिन्ह नसल्याने सपच्या सायकलवरून त्यांच्या उमेदवाराला मैदानात उतरवता येऊ शकते. त्यामुळे चिन्ह नसलेल्या पक्षांना सपची ओळख मिळते, हाही सपचा

फायदा!

सर्व विरोधक एकत्र लढले वा छुप्या आघाडय़ा करून मतदारसंघनिहाय प्रबळ पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर भाजपचा पराभव होऊ शकतो. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला पराभूत करायचा असेल तर यापैकी एका मार्गाने विरोधी पक्षांना जावे लागेल असे विरोधी पक्षांतील ज्येष्ठ नेते सांगत आहेत, पण उघडपणे आघाडी होण्याची शक्यता नाही, त्यातून लाभही होत नाही. काँग्रेस आणि सपची छुपी आघाडी कितपत होऊ शकेल याचा अंदाज प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात येऊ शकेल. आता तरी काँग्रेस-सप दोघेही भाजपच्या विरोधात जोमाने मैदानात उतरले आहेत. काँग्रेसच्या नवनव्या घोषणांना मतदार कसे प्रतिसाद देतात वा सपने छोटय़ा पक्षांशी युती करण्याकडे ओबीसी जाती किती विश्वासाने पाहतात याकडे भाजपचे लक्ष असेल. उत्तर प्रदेशमध्ये प्रामुख्याने समाजवादी पक्षामुळे विधानसभा निवडणुकीच्या लढाईत रंग भरू लागले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाल किल्ला बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Political parties start preparation for uttar pradesh assembly elections zws

Next Story
‘बनाना’ पक्षाचे ‘मँगो’ नेते!
ताज्या बातम्या