महेश सरलष्कर mahesh.sarlashkar@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपसाठी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक दिवसेंदिवस अवघड होत असताना मोदींचा चेहरा हे एकमेव भांडवल उरले आहे. म्हणूनच पंजाबात जे गमावले ते उत्तर प्रदेशमध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला जात असावा.

गमावण्याजोगे काहीच नाही म्हणून कोणी स्वत:साठी खड्डा खणून ठेवत नाही. पंजाबात भाजपने नेमके तेच केलेले आहे. त्यात भाजप अधिकाधिक रुतत चालला आहे. पंजाबमध्ये भाजपची संघटना कमकुवत आहे, तिथे स्वबळावर सत्ता मिळण्याची शक्यता नाही. विधानसभा निवडणुकीत दोन-चार जागा जिंकायच्या तरीही अन्य पक्षाची मदत लागेल. इथे भाजपचा एकमेव उद्देश आहे तो काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचणे. पंजाबात कोणाचेही कडबोळे सरकार आले तरी चालेल. मग, पंजाबचे काय करायचे ते बघू, असा दृष्टिकोन भाजपने बाळगला असावा असे दिसते. त्यामुळे बहुधा भाजपने शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे पहिल्यापासून दुर्लक्ष केले, त्यांना टोमणे मारले, त्यांचा अपमान केला. ‘’आमच्या बरोबर नसाल तर तुम्ही देशद्रोही’’ हे भाजपचे इतरत्र यशस्वी होणारे धोरण पंजाबातील शिखांवर निरुपयोगी ठरले! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फसलेल्या पंजाब दौऱ्यानंतर भाजपने केलेल्या क्लृप्तय़ांमुळे या पक्षाने स्वत:चे हसे करून घेतलेले आहे. फिरोजपूरला जाताना मोदींचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला. मग, मोदी दिल्लीला परत आले. भटिंडा विमानतळावर त्यांनी, ‘’जिवंत परत आलो’’ असे उद्गार काढल्याचे सांगितले गेले. मोदींच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्या की नाही, हे आता सर्वोच्च न्यायालय ठरवेल. न्यायालयाने पंजाब आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारांनी सुरू केलेली चौकशी स्थगित करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे पंजाबातील काँग्रेसच्या सरकारवर न्यायालयाने विश्वास ठेवलेला नाही तसा भाजपप्रणीत केंद्र सरकारच्या चौकशीवरही ठेवलेला नाही असे दिसते.

पंजाबात कॅप्टन अमिरदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून बाजूला करण्याचा काँग्रेसचा निर्णय योग्य होता. प्रश्न इतकाच होता की, नवज्योतसिंग सिद्धू नावाच्या अस्थिर, अपरिपक्व आणि बोलघेवडय़ा नेत्याच्या ताब्यात अख्खा पंजाब कशासाठी दिला? पण, काँग्रेस नेतृत्वाने सिद्धू यांच्याकडे पंजाब काँग्रेस सोपवून जाट शीख मतदारांना आणि चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री करून दलित शीख मतदारांना आपलेसे केले आहे. विधानसभेसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होईल, या दोन समाजांनी काँग्रेसला मते दिली तर पंजाबात पुन्हा काँग्रेसच्या हाती सत्ता राहू शकेल. अमिरदरसिंग यांच्या भरवशावर काँग्रेस राहिला असता तर पंजाब हातातून गेलेच असते असे काँग्रेसला वाटू लागले होते. आता कदाचित काँग्रेसला जिंकण्याची संधी मिळू शकते. निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित न करून काँग्रेसने शहाणपणा दाखवला आहे. वीजबिलामध्ये सवलती वगैरे आम आदमी पक्षाच्या लोकप्रिय घोषणा चन्नी यांनी हिसकावून घेतलेल्या आहेत.

काँग्रेसपुढे थोडीफार चिंता आहे ती, अमिरदरसिंग यांच्या नव्या आघाडीची. कॅप्टन यांचा पंजाब लोक काँग्रेस, सुखदेवसिंग ढिंडसा यांचा शिरोमणी अकाली दल (संयुक्त) आणि भाजप हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. ही आघाडी काँग्रेसच्या किती उमेदवारांना आव्हान देते यावर काँग्रेसचे यश अवलंबून असेल. पण, या नव्या आघाडीचे नेतृत्व भाजप करणार आहे. पंजाबातील ११७ जागांपैकी अधिकाधिक जागा भाजप लढवणार असेल आणि उर्वरित जागा कॅप्टन आणि सुखदेवसिंग ढिंडसा यांच्या पक्षांमध्ये वाटल्या जाणार असतील तर, काँग्रेसने केलेल्या अपमानाचा ‘बदला’ कॅप्टन अमिरदरसिंग कसे घेणार? मोदींच्या पंजाब दौऱ्यानंतर तर पंजाबात भाजपला तोंड दाखवायलाही जागा राहिलेली नाही. पंजाबमध्ये भाजपचा प्रचार सुरू होण्याआधीच अमिरदरसिंग यांचा अवसानघात झाला असेल तर कॅप्टन लढणार कोणाच्या जिवावर? शिवाय, भाजपने कॅप्टन यांच्या पक्षाला लढण्यासाठी जागाही कमी दिल्या तर काँग्रेसला हरवण्याच्या वल्गना तशाच हवेत विरून जातील. पंजाबात चौरंगी लढत होत असली तरी, ‘आप’ खरोखरच बिगरशीख मतदारांना आकर्षित करण्यात यशस्वी होईल का, हा आणखी एक प्रश्न आहे. पंजाबमध्ये ‘आप’ने मुख्यमंत्रीपदाचा शीख चेहरा जाहीर केलेला नाही. काहींच्या मते, ‘आप’ने पंजाबात शिखांपेक्षा बिगरशीख मतदारांकडे मोर्चा वळवलेला आहे. त्यातही शहरी भागांमध्ये अधिकाधिक मतदार खेचून घेण्याचा ‘आप’चा प्रयत्न असू शकतो. चंडीगड महापालिकेत विकासाच्या दिल्ली प्रारूपाचा प्रचार करून सर्वाधिक जागा मिळवल्या आणि भाजपचा पराभव केला. ‘आप’कडून पराभूत व्हावे लागणे हा भाजपसाठी धक्का होता. विकासाच्या मुद्दय़ाला मतदारांचा प्रतिसाद मिळाला तर पंजाबच्या शहरी भागांमध्ये ‘आप’ला मते मिळू शकतात. ‘आप’ची भिस्त पंजाबातील हिंदू मतदारांवर असेल असे मानले जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही ‘आप’च्या बाजूने वातावरण निर्माण झाले होते पण, त्यांचा फुगा फुटला. यंदाही ‘आप’बद्दल उत्सुकता असली तरी हा पक्ष खरोखरच किती जागा जिंकू शकेल याचा अंदाज बांधता आलेला नाही. आता पंजाबमधील लढतीत उरला तो बादल यांचा शिरोमणी अकाली दल. शेतकरी आंदोलनाचा या पक्षाला कोणताही लाभ झालेला नाही. या पक्षावर पंजाबातील शेतकरी नाराज आहेत, भाजपशी काडीमोड घेतला खरा पण, त्याला खूप उशीर झाला होता. विधानसभा निवडणुकीत अकाली दलाला काँग्रेसच्या संभाव्य चुकांतून मिळू शकणाऱ्या संधीची वाट पाहावी लागेल!

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होण्यास महिन्याभराचा अवधी असल्याने पंजाबमधील राजकीय परिस्थिती थोडीफार बदलू शकेल पण, त्याचा कोणताही लाभ भाजपला होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पंजाबमधील फसलेल्या धोरणाचा उत्तर प्रदेशात काही फायदा होऊ शकतो का, याची चाचपणी भाजप करू लागला आहे. मोदींच्या सुरक्षेत त्रुटी राहिली असेल पण, त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता का, असा प्रश्न विचारला जात आहे. हिंदूू महासभेने निवेदन काढून‘मोदी, तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा’, असे भाजपचे वाभाडे काढावेत हे अतिच झाले! भाजपच्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी, ‘मोदींच्या जिवाला धोका पोहोचवण्याचा काँग्रेसचा इरादा फोल ठरला’ असे विधान केले. मोदींवर हल्ला करण्याचा जणू कट रचला गेल्याचा भाजपने आरोप केला. त्यानंतर, भाजपने ‘महामृत्युंजय जपा’चे नाटय़ निर्माण केले. त्याचा प्रचारही भाजपच्या माध्यम विभागाने जोरदार केला. दिल्लीत कुठे कुठे महामृत्युंजयाचे मंत्रपठण होणार आहे आणि ते कोणता नेता करणार आहे, याची माहिती पुरवण्यात आली होती. मग, मंत्रपठणाचे आयोजन देशभर केले गेले. उत्तर प्रदेशात मोदींचा लोकसभेचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पोहोचले. त्यांनी एका दिवसात दोन मंदिरांत मंत्रपठण केले. पाकिस्तानच्या सीमेपासून काही अंतरावर मोदींचा ताफा अडवला गेला, त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता.. मोदींशी वैर धरा, पंतप्रधानांशी नको.. अशी विधाने करून मोदींच्या पंजाबातील दौऱ्याला भावनिक किनार दिली गेली. भाजपला पंजाबमध्ये भावनिक आवाहन करता येणार नाही, पण, उत्तर प्रदेशमध्ये मतदारांच्या हृदयाला हात घालण्याचा प्रयत्न भाजप करू लागला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने अजूनही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित केलेला नाही. योगींच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढवली जाईल असे जाहीर केले असले तरी सगळी सूत्रे मोदींनी हाती घेतली आहेत. २०१७ मध्ये अमित शहांनी बूथ स्तरावरील रणनीतीदेखील निश्चित केली होती. या वेळी उत्तर प्रदेशात शहा कुठेही सक्रिय झाल्याचे दिसलेले नाही. मुख्यमंत्री योगींच्या आधारे भाजपला उत्तर प्रदेश जिंकता येणार नाही हे भाजपला माहीत आहे. योगींनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा इरादा व्यक्त केला असला तरी भाजपकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांना उमेदवारी दिली जाईल का, यावर शंका घेतल्या जात आहेत. भाजपने सत्ता राखली तर मुख्यमंत्री कोणीही बनू शकतो, अशी विधाने योगींचे स्पर्धक व उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी सातत्याने केलेली आहेत. भाजपसाठी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक दिवसेंदिवस अवघड होत असताना मोदींचा चेहरा हे भाजपचे एकमेव भांडवल उरले आहे. म्हणूनच पंजाबात जे गमावले ते उत्तर प्रदेशमध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसते.

मराठीतील सर्व लाल किल्ला बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh assembly elections becoming more difficult for the bjp zws
First published on: 10-01-2022 at 01:02 IST