वारीने मराठी माणसामध्ये जो आत्मविश्वास निर्माण केला, तो बाकीचे ११ महिने कसा गळून पडू शकतो, या कल्पनेने अनेकदा शहारून जायला होते.
भूलोकीच्या वैकुंठी म्हणजे पंढरपुरी पोहोचण्याची आस लागलेला पालखी सोहळा हे महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक आणि सामाजिक संचित आहे. गेली ८०० वर्षे सुरू असलेला हा सोहळा समाजातील विविध गटातटांतील आणि जातिधर्मातील भेदाभेद विसरणारे ठिकाण मानले जाते. विठ्ठलाच्या अनुपम प्रेमाने ओथंबलेल्या समस्त बांधवांसाठी वर्षांतील हे १९ दिवस सुखसोहळ्याचे असतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पडणाऱ्या वळिवाच्या पावसानंतर पेरणीच्या कामांना सुरुवात करून शेतीची कामे मार्गी लावल्यानंतर सुरू होणारी वारी आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचते, तेव्हा या सोहळ्याचा अंतिम आनंदाचा क्षण अनुभवणे म्हणजे दिव्यत्वाचा स्पर्श असतो. तो आपले सारे जीवन उजळून टाकेल, अशा विश्वासाने लाखो भाविक वारीत सहभागी होतात. अडीचशे किलोमीटरचे अंतर पायी चालतात आणि त्या काळात शिस्त नावाच्या ‘जाचा’ला प्रेमाने आपलेसे करतात. केवळ पायी चालणे म्हणजे वारी नव्हे, तसे केवळ नामस्मरण म्हणजेही भक्ती नव्हे, हा संदेश गेली अनेक शतके पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणारा हा सोहळा महाराष्ट्राचे एक ललामभूत वैशिष्टय़ आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या काळापासून सुरू झालेल्या या पालखीला त्यानंतरच्या काळात संत नामदेव, संत एकनाथ यांनी जनाधार मिळवून दिला. आपल्या वैखरीने साऱ्या मानवजातीच्या कल्याणाचे गणित उलगडणाऱ्या संत तुकारामांनी हा सोहळा अत्युच्च शिखरावर नेला. केवळ वर्षांतील काही दिवस पालखीबरोबर चालत जाण्यामुळे काय होते, या प्रश्नाचे उत्तर भागवतधर्मात सहजपणे दिले आहे. ‘येथे जातिकुळ अप्रमाण, हे आवघेचि अकारण’ असे म्हणणारे ज्ञानेश्वर आणि ‘संताचिया गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ, दु:ख लेश’ असे सांगणारे संत तुकाराम, यांनी या समाजाला जगण्याचा नवा मंत्र दिला. ज्या वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रातील राजकीय पुनरुत्थानाला आधार दिला, त्याच संप्रदायातून निर्माण झालेल्या भागवतधर्माने समाजातील एकीच्या प्रयत्नांना बळ दिले. भक्ती निर्हेतुक असली तरी त्यामागे जगण्याचे एक विशाल तत्त्वज्ञान सामावलेले असते, याचे भान या संतपरंपरेने सामान्यांना दिले. त्या आधीच्या सांप्रदायिक परंपरा सर्वसमावेशक होऊ शकल्या नाहीत आणि भागवतधर्माला ते सहजसाध्य झाले, याचे कारण त्यामध्ये मठप्रधानता नव्हती. समाजातल्या शेवटच्या माणसाबद्दल कमालीचा कळवळा होता. म्हणूनच सर्वमुक्त ही परंपरा सामाजिक सुधारणांची सर्वात मोठी आणि यशस्वी प्रयोगशाळा ठरली आणि पंढरीची वारी हे त्याचे जिवंत प्रात्यक्षिक!
पांडुरंगाच्या ओढीने आळंदी आणि देहूतून निघणाऱ्या या वारकऱ्यांच्या दिंडय़ा जेव्हा चालू लागतात, तेव्हा आताच्या काळातील आधुनिक व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासकांनाही आश्चर्य वाटेल, अशी स्वयंशिस्त दिसायला लागते. अडीचशे किलोमीटरच्या या प्रवासात लाखो वारकऱ्यांचे एकत्र जमणे ही केवळ समरसता नसते, तर त्यात एकमेकांबद्दलचा अपार बंधुभाव असतो. १९ दिवसांतील १३ मुक्कामांच्या जागी जमणाऱ्या या वारकऱ्यांची सेवा करायला मिळणे हे परमभाग्याचे आहे, अशी जी समजूत आहे, त्यामागेही मानवाच्या कल्याणाचीच भावना आहे. एवढय़ा मोठय़ा जनसमुदायाच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारी पातळीवर मात्र सतत अनास्था दिसून येते. वारकऱ्यांच्या निवासाची, भोजनाची आणि नैसर्गिक विधींची व्यवस्था उत्तमरीतीने करणे अजिबात अवघड नाही. केवळ टाळ हाती धरून पालखीत चार पावले चालणाऱ्या सत्ताधाऱ्यांना हे प्रश्न कधी भेडसावत नाहीत आणि भागवतधर्माची शिकवण असणारे हे लाखो वारकरी त्याबद्दल कधी ब्रही काढणार नाहीत. गेली अनेक दशके पालखीमार्गाच्या सुधारणांचे आश्वासन दिले जाते. त्यात तुटपुंजी दुरुस्ती केली जाते. परंतु साऱ्या जगाला आश्चर्य वाटावे अशा या सोहळ्याला आणखी झळाळी प्राप्त व्हावी, यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. उलट पालखीमार्गावरील गावांमध्ये मुक्कामानंतर दरवर्षी रोगराई पसरण्याचे दुष्टचक्र थांबवण्याकडे सहेतुक दुर्लक्ष होते. वारकऱ्यांचे जगणे अधिक सुखकर करण्यासाठी या मुक्कामांवर आणि मार्गावरही आधुनिक अशी शौचालये उभी करणे ही काय अशक्य कोटीतील गोष्ट आहे? भूलोकीचे वैकुंठ म्हणायचे आणि पंढरपुरातील सामान्य व्यवस्थांकडे दुर्लक्ष करायचे, हे काय सभ्यपणाचे म्हणायचे? पंढरपूरच्या अवघ्या लाखभर लोकसंख्येसाठीही पुरेशा व्यवस्था नसताना, केवळ वारीच्या दिवशी दहा-पंधरा लाख लोकांच्या आगमनाने तेथील साऱ्या व्यवस्था वाहून जातील, एवढेही भान असू नये, हे खरोखरीच दुर्भाग्याचे आहे. पांडुरंगाला महाराष्ट्राच्या कल्याणाचे साकडे घालणाऱ्या मंत्र्यांनी आषाढी एकादशीनंतरचे दोन-चार दिवस पंढरपुरात राहून पाहावे, म्हणजे त्यांना काय करायला हवे, ते आपोआप समजेल. पालखीमार्गावर पुरेसे पाणी आणि नैसर्गिक विधींची उत्तम व्यवस्था करणे अजिबात अशक्य नाही. प्रश्न आहे, तो इच्छेचा आणि माशी तिथेच शिंकते आहे! तर त्यांना कोणतेही निमंत्रण न मिळता, आपापल्या जबाबदारीवर एवढय़ा संख्येने वारकरी एकत्र येतात आणि एवढय़ा दिवसांचा सहवास घडवतात, ही सामान्य गोष्ट निश्चितच नव्हे. अकारण भांडण नाही, तंटा नाही, गडबड-गोंधळाचा तर लवलेशही नाही. जातीचा उल्लेख नाही आणि पुरुषत्वाचा बडिवार नाही, असे एरवीच्या जगण्यात जवळजवळ न दिसणारे चित्र या काळात पाहायला मिळते, तेव्हा प्रसन्नचित्त अनेकदा शंकावते. वारीचा काळ संपल्यानंतर पुन्हा वारी येईपर्यंत भागवतधर्माची पताका खांद्यावर घेऊन नाचणारा हा वारकरी सामान्य जगात सर्व विकारांनी पुन्हा कसा ग्रस्त होतो आणि संतांनाही जातींच्या कप्प्यात कसे कोंडून ठेवू शकतो, याचे आश्चर्य वाटते. जगण्याच्या या मानवी मूल्यांनी आपले कुटुंब आणि आपला परिसर बदलण्यासाठी खरेतर वेगळे प्रयत्नही करण्याची आवश्यकता नाही. वारीतले आपले जगणे हे सदाचे जीवन करणे एवढीच खरी गरज. पण गेल्या काही काळात त्यात फरक पडतो आहे खरा. संतांनी गाडून टाकलेल्या जातीपातीला राजकारण्यांनी स्वार्थासाठी आपलेसे केले आणि त्यांच्यामागे सारा समाज मेंढरांसारखा वाहवत जाऊ लागल्याचे चित्र आपण सगळेच अनुभवतो आहोत. हजार वर्षांच्या परंपरेने माणसाला माणूस म्हणून जगण्याचे महत्त्व पटवून दिल्यानंतरही जातपंचायती आपले प्रभुत्व सिद्ध करताना दिसतात आणि केवळ खालच्या जातीचा म्हणून एखाद्याचे जगणेही दुष्कर होताना पाहायला मिळते. वारीने मराठी माणसामध्ये जो आत्मविश्वास निर्माण केला, तो बाकीचे ११ महिने कसा गळून पडू शकतो, या कल्पनेने अनेकदा शहारून जायला होते. भागवतधर्माचा हा संदेश आयुष्यभर पाळण्याचे स्वत:लाच दिलेले वचन पाळणाऱ्यांची संख्या वाढत गेली, तर हे चित्र पुन्हा पालटेल. गरज आहे, ती वारीच्या सोहळ्याच्या निमित्ताने आयुष्य जगण्याची नवी पद्धत रूढ करण्याची. जिथे जातीला थारा नसेल, स्त्रीला तिच्या स्त्रीत्वाचा अभिमान असेल, परस्परांबद्दल प्रेम असेल आणि असलेला वाद सामोपचाराने मिटवण्याची इच्छा असेल. वारीचे साफल्य याहून अधिक काय असू शकेल?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Less affection at saint home worst condition of infrastructure in pandharpur
First published on: 13-07-2013 at 01:01 IST