‘सुषमा स्वराज यांचा प्रतिहल्ला’ हे वृत्त (७ ऑगस्ट) वाचून करमणूक झाली. १७ वष्रे कर्करोगग्रस्त असणे आणि दहाव्यांदा आजार बळावणे, या गोष्टी मानवतेला पाझर फोडणाऱ्या आहेत, यात शंकाच नाही. पण याच काळात ललित मोदी जी थेरं करत होते, आणि त्यांची विलासी वृत्ती दर्शविणारी जी अनेकानेक छायाचित्रे गेल्या महिन्याभरात विविध प्रसार माध्यमांवरून प्रसिद्ध झाली होती, त्यावरून आपल्या पत्नीच्या आजारपणाबद्दल या मोदी-महाशयांना काही सोयरसुतक असावे, असे काही वाटले नाही. याबद्दल सुषमा यांना काय म्हणायचे आहे?
सोनिया गांधी माझ्या जागी असत्या, तर त्यांनी काय केले असते, हा स्वराज यांचा प्रश्नही असाच बालिश आहे. ज्या सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या, तर आपण केशवपन करू अशी धमकी एकेकाळी देणाऱ्या स्वराज यांना स्वत: सत्तेत असताना त्याच सोनिया गांधींचा मापदंड वापरावा लागतो, यातच स्वराज यांच्या तकलादू सबबीचा फोलपणा उघड होतो.
-दीपा भुसार, (दादर), मुंबई

तावडे यांचा ढोंगीपणा

‘महामंडळावरील नियुक्तीत आंबेडकरवादी साहित्यिकांची उपेक्षा’ ही बातमी (८ ऑगस्ट) वाचली. त्यावर साहित्यातील रंगभेद अमान्य असल्याचे मराठी भाषा विभाग व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांचे विधान शुद्ध ढोंगीपणाचा नमुना आहे.
गेल्या सहा दशकांपासून आंबेडकरी तथा दलित साहित्यिकांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केले आहे. त्यापकी कोणाही साहित्यिकास मराठी साहित्य व संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश मंडळ व मराठी भाषा सल्लागार समितीवर स्थान न देऊन तावडे यांनी आपला जातीय रंगही उघड केलेला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अजित पवारांना आंबेडकरी कार्यकर्त्यांची अ‍ॅलर्जी आहे. त्यांचाच कित्ता तावडे यांनी साहित्यिकांच्या क्षेत्रात गिरवला आहे, असे दुर्दैवाने म्हणावे वाटते.
-प्रीतिश भोसले, अंबरनाथ

करमणूक आणि आनंदही!

मराठी वृत्तपत्राच्या इतिहासात अजरामर ठरू शकणाऱ्या ‘एक शोकान्त उन्माद’ या आपल्या अग्रलेखावर झालेल्या चौफेर टीकेवर आपण इतके वळणावळणाने फिरवून फिरवून ‘मीरमरणाच्या मोलाचे’ उत्तर द्याल अशी अपेक्षा नव्हती.
जी काही आपली भूमिका होती, ती योग्य वा अयोग्य हा वेगळा प्रश्न, परंतु तिच्यासाठी ‘आहे हे असे आहे’ असे म्हणून आपण आपल्या मताशी ‘थेट’ शब्दात ठाम राहिला असता तर बरे वाटले असते. किंबहुना आपल्यासारख्यांकडून हीच अपेक्षा असते. त्यामुळे भ्रमनिरास झाला.
आपला ‘मीरमरणाचे मोल’ हा लेख (अन्यथा, ८ ऑगस्ट) वाचून फार करमणूक झाली. त्याचे श्रेय मात्र आपल्याला द्यायलाच हवे. आणि आजच्या लाचार विचारवंतांच्या युगात ‘सुंभ जळला तरी..’ पीळ न जळणारे कोणी तरी आहेत याचा मनोमन आनंदही वाटला.
अभिषेक वाघमारे, नागपूर</strong>

सर्वाधिक मान किती तोफांचा?

‘संस्थानांची बखर’ हे ‘लोकसत्ता’मधील सदर चांगले व माहितीपूर्ण आहे. या सदरामध्ये अंतिम वाक्यात असे सांगितले जाते की, या संस्थानास अमुक अमुक तोफांच्या सलामीचा मान दिला गेला. विविध विषम अंकी आकडे त्यात असतात. यापुढे हे जरूर सांगावे की हा मान देण्यामागे ब्रिटिशांचे काय निकष असायचे? तोफांचा मान विषम संख्येतच असायचा का? आणि सर्वाधिक मान किती तोफांचा असे ?
विशाल चव्हाण, औरंगाबाद</strong>
कलियुग नावाची थाप?

‘कलियुग’ हा शरद बेडेकर यांचा लेख (३ ऑगस्ट) वाचला. ज्या काळाबद्दल बेडेकर समाधानी आहेत, तो काळ गेल्या तीन-चारशे वर्षांचा असणार. या काळात अनेक दशलक्ष वष्रे उत्क्रांत झालेली सृष्टी निदान तीस ते चाळीस टक्के बेचिराख झाली, मृतवत अवस्थेत आहे किंवा घायकुतीला आली आहे हे खरे की खोटे? जवळजवळ सगळ्या नद्या प्रदूषित झाल्या, सागरावरही परिणाम झाला, सर्व प्रकारच्या जळणाचा वापर केल्यामुळे मळभ जमले हिमनग वितळले, पाऊस आणि ऋतू लहरी झाले आणि हे सगळे मानवाच्या आत्मकेंद्रित भोगीपणामुळे घडले हे खरे नव्हे काय? माणसे जास्त जगू लागली परंतु काय प्रतीचे जीवन ते जगतात याची मोजमापणी काय? एक पुरुष आणि एक स्त्री अशा विवाह नीतीचे निकष बेडेकर सांगतात. या प्रकारचे विवाह पाश्चिमात्य जगात केव्हाच हद्दपार झाले. विवाहपूर्व संबंध विवाहबाह्य़ संबंध आणि घटस्फोटांचे प्रमाण साठ-सत्तर टक्क्यांहून अधिक आहे. विवाहामुळे सुख नव्हे तर दुख आणि अडचण होते असाच कल दिसतो. त्यातच समिलगी संबंध हे नवेच प्रकरण उद्भवले असून नीतिशास्त्रज्ञ त्याला पाश्चिामात्य देशांत अनतिक म्हणायला तयार नाहीत.
इस्लामी देशातल्या विवाहाबद्दल, स्त्रियांवरच्या अत्याचारांबद्दल जेवढे बोलू तेवढे थोडे आहे. हल्लीचे तिथले आतंकवादी मुलींना पळवून नेऊन त्यांचा उपयोग करमणुकीसाठी आणि गरज भागवण्यासाठी करत आहेत. या गेल्या दोनशे वर्षांत दोन महायुद्धे आणि पाच मध्यम प्रतीची युद्धे झाली. दुसऱ्या महायुद्धात यहुदी लोकांचा वंशस्खलन करण्याचा एक अतिअमानुष प्रयत्न झाला. बोस्नियात हल्लीच मुसलमानांचे शिरकाण झाले, आफ्रिकेतल्या अनेक देशांत वर्णयुद्धांमध्ये कत्तली झाल्या हे खरे नव्हे काय? हल्लीच्या मध्य पूर्वेतल्या संघर्षांत इतके पंथ आहेत की कोण कोणाचा शत्रू हे कळायला मार्ग नाही. जिथे थोडेफार स्थर्य आहे तिथे भोगवाद बोकाळला आहे. सर्व प्रकारची चन हाच धर्म झाला असून या चनवस्तूंच्या धंद्यावर अर्थव्यवहार चालतो. त्यातूनच नोकऱ्या निर्माण होतात. हे नोकरदार बँकांमधे थोडेफार पसे वाचवतात आणि त्या पशावर डल्ले मारून कंपन्या आणखी काडीचीही गरज नसलेल्या अनेक वस्तूंचे उत्पादन करतात हे खरे की खोटे? ज्या कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुगाचा बेडेकर उल्लेख करतात ती युगे ९५ टक्के िहदू लोकांना माहीतही नाहीत. उरलेल्या पाच टक्क्यांत ते शब्द ऱ्हस्व-दीर्घाच्या चुका न करत ९९ टक्के लोक लिहू शकणार नाहीत. राहिलेल्यांत कोणाचाच या पुराणांवर विश्वास नाही. तेव्हा जुने काही तरी उकरून साप समजून दोरीला बडवण्याचा हा प्रकार आहे. या युगांच्या कल्पना मांडून झाल्यावर काही शतकांनंतर देवाने सहा दिवसांत विश्व केले आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली असा एक आठवडय़ाचा कार्यक्रम प्रसृत झाला. या धर्माच्या पाठीराख्यांनी तर एकही दिवस विश्रांती न घेता जी प्रचंड घालमेल केली आणि कारनामे रचले त्यांचेच पृथ्वीवर गेली ३०० वष्रे प्रभुत्व होते. त्यांचाच कित्ता सर्वानी गिरवला आहे. त्याचेच वर्णन या लेखात उमटले आहे. बेडेकरांच्या लेखामुळे मला हे आधुनिक कलियुग उमगले.
डॉ. रविन थत्ते, माहीम (मुंबई)

भोंदू धर्मगुरूंचे शिष्यच खरे गुन्हेगार

‘राधे माँला लवकरच समन्स’ व ‘सारथी बाबाला अटक’ या दोन्ही बातम्या (९ ऑगस्ट) वाचताच सध्याच्या ‘बाबामय’ जगताचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. पोलीस तपासाअंती या धर्मगुरूंचा कितपत गुन्हा आहे हे सिद्ध होईलच, परंतु खरे गुन्हेगार या तथाकथित गुरुमहाराजांना देव-देविकाचे अवतार मानणारे त्यांचे असंख्य अनुयायी आहेत. कुठला तरी सत्संग नाही तर आश्रम निवडायचा व तेथे जाऊन ध्यानाला बसायचे हे समजू शकण्यासारखे आहे, पण त्या धर्मगुरूंच्या मोहपाशात स्वत:ला संपूर्ण हरवून जायचे व घरादारावर नांगर फिरवायचा हे समजण्यापलीकडचे आहे. शेजारी, अवतीभोवती असंख्य गरजू लोकांना आपल्या सहकार्याची गरज असताना अशा फसव्या सत्संगामध्ये आपला अमूल्य वेळ व्यर्थ दवडणे हा कायद्याला मान्य नसलेला, पण सर्वात मोठा गुन्हा आहे. अशा भोंदू देव-देविकांच्या मागे लागून परमेश्वराचे खरे सर्वकालीन अस्तित्व नाहीसे करणारे अशा धर्मगुरूंचे शिष्य सर्वप्रथम गुन्हेगार आहेत याबद्दल शंका नाही.
सूर्यकांत भोसले, मुलुंड (मुंबई)