सुमारे तीन दशकांपूर्वी निवडणुका म्हणजे आरोप-प्रत्यारोपांची अंदाधुंद राळ असेच चित्र असायचे. कोणालाच कोणत्याही बंधनाचा धाक नव्हता. खरे म्हणजे, देश किंवा राज्ये चालवावयास निघालेल्यांनी स्वत:च्या व्यवहारातील, कृतीतील व उक्तीमधील सभ्यपणाचे काही अंश निवडणुकीच्या काळातच नव्हे, तर सातत्याने समाजासमोर ठेवावेत, हा काही लिखित नियम नाही. पण समाजाची नेहमीच तशी अपेक्षा असते. मात्र, लिखित स्वरूपातील ‘आदर्श आचारसंहिता’ अस्तित्वात असतानादेखील सभ्यपणाची पातळी सोडण्याचे सारे प्रयोग निवडणुकीच्या धुमाळीत उसळू लागतात. अशाच प्रकारामुळे राजकारण्यांवरील विश्वासाची पातळी मात्र घसरत गेली, तेव्हा राजकारणाला सभ्यतेची पातळी असावी, असा समंजस विचार शेषन नावाच्या सुज्ञ प्रशासकीय अधिकाऱ्याने केला. अगोदरपासूनच अस्तित्वात असलेल्या आदर्श आचारसंहितेची केवळ कठोर अंमलबजावणी शेषन यांनी सुरू केली. त्यामुळे, निवडणुकीच्या काळातील दृश्य राजकीय व्यवहारांवर तरी आचारसंहितेची बंधने आली. व्यवहाराची व कृतीची पातळी पाळली जावी यासाठी आचारसंहितेची ही वेसण खूपच प्रभावी ठरली होती; पण कोणत्याही गोष्टीचा वारंवार वापर झाला, की ती घासून गुळगुळीत होऊन जाते. आचारसंहिता नावाच्या ‘बडग्या’चेही बहुधा तसेच झाले आहे. त्यामुळे, अलीकडच्या निवडणुकांमध्ये प्रचारातील पातळीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रचाराच्या दरम्यान, परस्परांवर केल्या जाणाऱ्या आरोप आणि सवालांमुळे सामान्य मतदाराच्या मनात खरोखरीच काही प्रश्नचिन्हांचे थैमान सुरू झाले आहे. ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ असा सवाल करणाऱ्या एका प्रचारकी जाहिरातीच्या चालीवर असेच अनेक नवे प्रश्न समाजमाध्यमांमध्ये डोके वर काढू लागले आहेत. पण प्रचाराच्या दरम्यान सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ पाहता, ‘कुठे नेऊन ठेवली प्रचाराची पातळी’ असाही एक प्रश्न मतदाराला छळू लागला आहे. अर्थात, अशा प्रश्नांची उत्तरे कोणाकडे मागायची याबाबत मतदाराचा संभ्रम कायमचाच असल्याने, एकमेकांनाच हा प्रश्न विचारून उत्तराची शोधयात्रा सुरू करेपर्यंत निवडणुका पार पडतील आणि आदर्श आचारसंहितेची अगोदरच सैलावलेली वेसणही दूर होऊन पुन्हा सारे रान मोकाट होऊन जाईल. निवडणुकीच्या मैदानात हे असे चालायचेच, अशी अखेर मतदार आपली समजूत  करून घेईल. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक पावसाळे, उन्हाळे आणि सुगीचेच हंगाम पाहिलेले शरद पवार यांच्या राजकीय सभ्यतेबद्दल सर्वपक्षीय एकमत आहे. मात्र, पावणेपाच वर्षांची सभ्यता शमीच्या झाडावर ठेवलेल्या शस्त्रांप्रमाणे निवडणुकीच्या काळातील तीन महिन्यांत गुंडाळून ठेवून, सभ्यतेच्या मर्यादांवर घाव घालणारी शस्त्रे बाहेर काढण्याची जणू स्पर्धा आता सुरू झाल्याचे दिसत आहे. शरद पवार यांनीच कोणाला तरी उद्देशून ‘कुठे झक मारायला’ गेले होते, असा प्रश्न जाहीरपणे विचारला, तेव्हा राजकीय सभ्यतेच्या मर्यादा मतदारांना मात्र नक्कीच आठवल्या असतील. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही निवडणुकीच्या काळातील ‘लक्ष्मीदर्शन मंत्रा’चे गुपित जाहीर सभेत फोडले. जबाबदारीचे भान असलेल्या अनेक मतदारांसाठी हा केवळ ऐकीव असाच प्रकार असतो. पण लक्ष्मीदर्शन व्रताची संथा जाहीरपणे मिळाल्याने आचारसंहितेची ऐशीतैशी करण्याच्या स्पर्धेत उतरण्याचे अधिकृत आमंत्रणच जणू मतदारांना मिळाले आहे. महाराष्ट्रीय मतदार सुज्ञ आहे, याचे प्रत्यंतरही वेळोवेळी येते; पण नेत्यांच्या गोतावळ्यात मात्र, सभ्यतेची पातळी सांभाळण्यात कमीपणा का मानला जातो, हे कोडे मतदाराच्या मनात उमटू शकते. नेत्यांनी याचे भान राखले पाहिजे.