मावळ प्रांतात झालेला शिवशक्ती संगम हा खऱ्या अर्थाने बहुजनांची दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे बहुजन समाजाने या संघ विचारांपासून दूरच राहायला हवे. जेव्हा एखाद्या धर्माचा आधार राजसत्तेला प्राप्त होतो तेव्हा ती राजसत्ता बळकट होते व राज्यसत्तेच्या आधारावर धर्मसत्ता बळकट होते. त्याचे उदाहरण म्हणजे संघ व भाजप. नाही तरी काँग्रेसच्या काळात असले संघ संगम पाहायला मिळाले नाहीत ते आता भाजप सत्तेवर आल्यावर बघायला मिळत आहेत. शिवशक्ती संगमद्वारे बहुजन तरुणांना आकर्षति करण्यासाठी छत्रपती शिवरायांची प्रतिमा वापरण्यात आली, कारण संघाकडे असा सर्वसमावेशक दुसरा आदर्शच नाही. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांना तर बहुजनांतील बहुतांशी तरुण ओळखतच नाहीत. त्यामुळे छत्रपतींचे नाव घ्यायचे व बहुजनांचा आधार घेऊन संघ वाढवायचा, टिकवायचा हे संघाचे जुनेच धोरण आहे.
या शिवशक्ती संगम कार्यक्रमासाठी गेल्या तीन महिन्यांपासून भाजपचे नेते, कार्यकत्रे अहोरात्र झटत होते. त्यासाठी कोटय़वधी रुपयांचा चुराडा झाला. त्यापेक्षा एवढे झपाटून जर बहुजन शेतकऱ्यांसाठी संघाने कार्य केले असते तर नक्कीच संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असता व संघाला प्रेरणास्थानांचा खोटा आधार घ्यायची गरजच पडली नसती. परंतु संघ हे करणार नाही, कारण येथे कोणताही धर्म नाही. त्यामुळे लोक भावनिक होणार नाहीत व संघाला त्याचा फायदा होणार नाही, हे संघाला चांगले माहीत आहे.
समाजामध्ये समरसता वाढविण्यासाठी सर्वानी एकत्र या, असे सांगणारा संघच खरे तर समाजामध्ये विषमता वाढविण्याचे कार्य करीत असतो व हाच संघाचा आधार आहे. बहुजनांच्या मनात विशिष्ट धर्माची भीती घालून त्यांना राष्ट्रभक्तीची खोटी जोड देऊन बहुजन तरुणांची दिशाभूल करणे हे संघाचे आधीचेच धोरण आहे. हिंदू धर्माची व्याख्या ही चातुर्वर्णावर आधारित आहे. त्यामुळे आजपर्यंत कोणीही बहुजन सरसंघचालक होऊ शकला नाही अन् होणारही नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे बहुजनांनी फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा चालवावा. त्यांचे खऱ्या मानवता धर्माचे विचार आचरणात आणावेत व धर्माध संघशक्तीपासून दूर राहावे, त्यातच बहुजनांचे व देशाचे हित आहे.
अमोल पालकर, अंबड (जालना)

‘लबाड’ म्हणणे ही सबनीसांची घोडचूक
मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मराठीचा आग्रह धरणाऱ्या व्यक्तींची मुले इंग्रजी शाळेत जातात म्हणून त्यांना लबाड म्हटले आहे. मात्र प्रा. सबनीस याबाबतीत अज्ञानी आहेत. शिक्षणासाठी मराठी माध्यमाचा आग्रह धरणाऱ्या व्यक्ती इंग्रजी भाषा शिकावयास विरोध करीत नाहीत. उत्तम इंग्रजी भाषा आलीच पाहिजे, असेच त्यांचे मत असते. मात्र त्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच गेले पाहिजे असे नाही. सध्या मराठी माध्यमाच्या शाळांत पहिलीपासून इंग्रजी विषय असतो. त्यामुळे दहा वष्रे इंग्रजी विषय शिकणाऱ्या मुलांचे इंग्रजी चांगले झालेच पाहिजे. तसे नसेल तर तो दोष इंग्रजी शिकवणाऱ्याचा, शिकणाऱ्याचा आहे. मराठी माध्यमाचा नाही. सबनीस म्हणतात, त्याप्रमाणे पाया मराठीचा होण्यासाठी तरी विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाच्या शाळेत गेले पाहिजे.
गेल्या अनेक वर्षांत इंग्रजी भाषेचे मराठीवरील आक्रमण वाढले आहे. प्रचलित मराठी शब्दांची जागा इंग्रजी शब्दांनी घेतली आहे. पुष्कळ मराठी माणसांना दूरध्वनी/ भ्रमणध्वनी क्रमांक मराठी भाषेत सांगता-लिहिता येत नाहीत. हे चूकच आहे. पण आपण चुकत आहोत हेच मराठी माणसांना समजत नाही. संगणकाच्या माऊसला मराठीत उंदीर म्हटले तर काय बिघडले? सबनीसांनी त्याला चांगला पर्यायी शब्द सांगावयास हवा होता. अर्थात चांगला व सुटसुटीत मराठी शब्द सुचण्यासाठीही बुद्धी लागते. ‘माइलस्टोन’चे भाषांतर ‘महत्त्वाचा टप्पा’ असे करण्याऐवजी मलाचा दगड असे चुकीचे रूपांतर केले जातेच ना?
मराठीचा आग्रह धरणाऱ्यांची मुले इंग्रजी माध्यमात शिकणे शक्यच नाही. त्यांची नातवंडे इंग्रजी माध्यमात शिकत असतील. त्यांनी कुठे शिकावे याचा निर्णय घेण्याचा अधिकार मराठीचा आग्रह धरणाऱ्यांना नाही. तो निर्णय त्यांची मुले घेतात व त्यांना पटवणे शक्य होत नसेल. तेव्हा त्यांना लबाड म्हणणे ही सबनीसांची घोडचूक आहे.
वासुदेव गजानन पेंढारकर, डोंबिवली (पूर्व)

सबनीसांकडून काय काय ऐकावे लागणार?
‘आता समजले का सबनीस हे कोण?’ (लोकमानस, ४ जानेवारी) या पत्रात उल्लेखिलेली डॉ. सबनीस यांनी बदलापूरमध्ये केलेल्या भाषणाची बातमी मीही वाचली होती. त्यात म्हटलेय की, १८७८ मध्ये न्या. रानडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रानडे यांनी ‘ग्रेट मॅन’ म्हणून गौरव केला होता. हे कसे शक्य आहे? रानडे यांचे १९०१ साली निधन झाले. बाबासाहेबांचा जन्म १८९१ सालचा. धनंजय कीर यांनी बाबासाहेबांचे चरित्र लिहिले आहे. त्यात पान क्र. १९ वर म्हटलेय की, ‘भीम दुसरीत असताना रानडे कालवश झाले. त्या दिवशी भीमाच्या शाळेस सुट्टी मिळाली. रानडे कोण होते, त्यांनी कोणते कार्य केले, त्यांच्या निधनानिमित्त सुट्टी का मिळाली, यासंबंधी आपणास गंधवार्ता नव्हती, असे पुढे डॉ. आंबेडकरांनी रानडे यांच्या शतसांवत्सरिक उत्सवानिमित्त भरलेल्या एका सभेत म्हटले होते.’ मग रानडे बाबासाहेबांचा गौरव करणे कसे शक्य आहे? सबनीसांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत काय काय ऐकावे लागणार आहे, ते सरस्वतीच जाणे! पण लोकांचे मनोरंजन होईल, हे मात्र निश्चित.
प्रदीप राऊत, अंधेरी (मुंबई)

चष्मा उलटा केल्यास हेही दिसते..
जसा चष्मा लावाल तसे दिसते, असे म्हणतात. पण ‘उलटा चष्मा’ (लोकसत्ता, ५ जानेवारी) लावून आपल्या मनातले चित्र नजरेसमोर आणण्याचे कसब सदर लेखकाने सहज सादर केले आहे. केवळ आणीबाणीतली हुकूमशाही नाही, तर आणखीही बऱ्याच गोष्टींचे त्यांना वावडे आहे. काही दिवसांपूर्वी गाजलेल्या ‘पुरस्कारवापसी’चे प्रथम त्यांना थोडेसे कौतुक वाटले, पण लगेचच त्यांच्या अंतर्मनाने त्यांना जागृत करून असे प्रकार यापूर्वीच्या ६२ वर्षांच्या काळात (म्हणजे काँग्रेस राजवटीत का?) कधी झाल्याचे आठवत नाही, याचे त्यांना स्मरण दिले! माननीय गोखले साहेबांना गेल्या दशकात, रंगमंचावर त्यांचा संचार असताना कोणा ‘बेपर्वा’ (?) प्रेक्षकाचा भ्रमणध्वनी बोलायला लागताच, ‘मॅनर्स’शी विसंगत अशा त्या वर्तनाचाही भयानक राग यायचा. प्रसंगी कार्यक्रम बंद करण्याची धमकी दिली जात असे. अन्य ‘बिचाऱ्या’ प्रेक्षकांचा, सहकलाकारांचा, ठेकेदाराचा हिरमोड त्यांच्या लेखी गौण होता.
अनिल ओढेकर, ठाणे.

दृष्टिकोन बदलायला हवाच..
पठाणकोटच्या भारतीय वायुसेनेच्या अत्यंत मोक्याच्या तळावर झालेला दहशतवाद्यांचा हल्ला म्हणजे पाकिस्तानातील भारतविरोधी शक्तींनी उभय देशांच्या शांतता प्रक्रियेला लावलेला सुरुंग आहे. यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे सरहद्दीवर भारतीय भूसेनेचा रात्रंदिवस कडक पहारा असूनही पाकिस्तानातील बहावलपूर भागातून भारतात शिरकाव करण्यात अतिरेकी यशस्वी झाले. दोन दहशतवादी दिल्लीतही घुसण्यात यशस्वी झाल्याचे वृत्त होते. भारतीय गुप्तचरांनी असा हल्ला होण्याची दाट शक्यता वर्तवूनही सहा महिन्यांपूर्वी पठाणकोटजवळील गुरदासपूरला हल्ला झाला आणि आता त्यांनी पठाणकोटला लक्ष्य केले. पठाणकोटच्या तळावरील वायुसेनेची अनेक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर उडवून देण्याची हल्लेखोरांची योजना आपल्या वीर सुरक्षा सनिकांनी धुळीला मिळविली. माजी वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक यांनी, सुरक्षाव्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा असे जे मत व्यक्त केले आहे ते या संदर्भात महत्त्वाचे ठरते.
अनिल रा. तोरणे, तळेगाव दाभाडे

धार्मिक नव्हे, आर्थिक असहिष्णुता जास्त
जावेद अख्तर यांनी एकदा म्हटले होते की, ज्यांना पाकिस्तान चांगला वाटतो त्यांनी एकदा तिथे जाऊन यावे, मग ठरवावे भारत चांगला की पाकिस्तान. अदनान सामी याने भारताचे नागरिकत्व स्वीकारल्याने याची आठवण झाली. तर इकडे शाहरुख, आमिर भारतात सर्व कमवून देश सोडण्याच्या गोष्टी करतात. भारतात असहिष्णुता आहेच, पण एवढीही नाही की आमिर, शाहरुखसारख्या पसे असलेल्या लोकांवर देश सोडून जायची पाळी यावी. ज्यांच्याकडे पसे नाहीत ते रोज देशाबाहेर नोकरी, धंद्यासाठी जातच आहेत. येथे धार्मिक नाही, तर आर्थिक असहिष्णुता जास्त दिसते आहे. पसे भरल्यावर अपात्र उमेदवारालाही नोकरी मिळते. महाविद्यालयीन प्रवेश राजकारणी आणि मोठय़ा दलालांच्या ताब्यात आहेत. सामान्याच्या छोटय़ा घरदुरुस्तीवरही कारवाई केली जाते आणि भूमाफियांची वस्तीच्या वस्ती नियमित केली जाते. बडय़ा कैद्यांना राजेशाही वागणूक मिळते, लालूसारखे राजकारणी शिक्षा होऊनही बाहेर उजळमाथ्याने फिरतात. संजय, सलमानचे लाड तर विचारूच नका. रिलायन्स, अदानी तर सरकारचे जावईच आहेत.
अर्थात याला अपवादही आहेत. १० टक्के प्रामाणिक प्रशासक आणि १० टक्के उत्पन्नावर हा देश चालला आहे. कारण ९० टक्के लोक देशास फसवतात. तरीही भारताची परिस्थिती रवांडा किंवा इराकएवढी बिघडलेली नाही, लष्कराने अजून मर्यादा सोडलेली नाही.
प्रवीण धोत्रे, गिरगाव (मुंबई)