‘उद्या आणि परवाही..’ हा अग्रलेख (२९ सप्टें.) वाचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत विदेश दौरे करून स्वत:चे मार्केटिंग करीत तेथील उद्योगपतींना भारतात येण्याचे आवाहन करीत आहेत. तिकडे विदेशातील उद्योगपतींना बऱ्याच भारतीय सरकारी खात्यातील अगदी तळापासूनच लालफितीचा भ्रष्टाचार, वीज, पाणी आणि मूलभूत सुविधांची वानवा या भारतीय उद्योजकांच्या प्रश्नांची चांगलीच जाण आहे. पंतप्रधान मोदी केवळ आश्वासनांच्या पलीकडे जाताना दिसत नाहीत. म्हणूनच अमेरिका भेटीस या वेळी तेथील माध्यमांनी फारसे महत्त्व दिले नाही. इकडे देशांतर्गत उद्योजकांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष, म्हणून भारतीय उद्योगजगत गळा काढत आहे व परदेशातील उद्योगपती भारतात आíथक आघाडीवर वेग वाढवा म्हणून आपल्या पंतप्रधानांना दटावत आहेत. ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ वगरे घोषणा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत हा कृषिप्रधान देश आहे हे विसरले असे वाटते. परदेशातील उद्योगपतींनी देशातील आíथक आघाडीवर वेग वाढवण्यासाठी पंतप्रधानांनी आवश्यक वातावरणनिर्मिती करावी व त्यासाठी कृपया पुढील काही महिने आपले वास्तव्य स्वदेशातच घालवावे आणि जीएसटी, वीज, रस्ते, पाणी, कायदे असो वा लालफितीचा भ्रष्टाचार इत्यादी जुन्याच प्रश्नांवर वेगवान हालचाली कराव्यात असे तर अप्रत्यक्षपणे सुचविले नाही ना? भारतात निवडणूकपूर्व सुमारे तीन लाख किलोमीटर प्रवास व आश्वासनांच्या िहदोळ्यांवर मतदारांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून निवडणूक जिंकता आली. परंतु उद्योगपती हे नेहमी वास्तवातील वर्तमान परिस्थितीच्या आधारे पुढील गुंतवणुकीचा विचार करतात व त्यांना आश्वासनांचा भूलभुलया देऊन जिंकता येत नाही हे मोदींना या अमेरिकी दौऱ्यावरून लक्षात आले असेल तर हेच या दौऱ्याचे फलित म्हणावे काय?
– प्रवीण आंबेसकर, ठाणे

इंदिराजी व एमिली शेंकेल
नेताजी बोस यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दलची माहिती (२६ सप्टें.) वाचली. त्यात त्यांची पत्नी एमिली शेंकेल यांचा उल्लेख आहे. त्यांच्याबद्दलची एका पुस्तकात वाचलेली आठवण नमूद करणे येथे प्रस्तुत ठरेल. पुस्तकाचे नाव आहे ‘द अ‍ॅम्बेसेडर्स क्लब.’ संपादक माजी राजदूत के. व्ही. राजन. अनेक राजदूतांचे अनुभव या पुस्तकात दिले आहेत. त्यापकी एक के. एल. दलाल! जेव्हा त्यांची ऑस्ट्रियात राजदूत म्हणून नेमणूक झाली तेव्हा इंदिराजींनी दलालांना तीन गोष्टींबद्दल माहिती करून घेण्याची सूचना केली. पहिली गोष्ट म. गांधींच्या शिष्या मीराबेन ज्या गांधीहत्येनंतर भारत सोडून ऑस्ट्रियात स्थायिक झाल्या होत्या, त्यांच्या आरोग्याची, त्याच्या खर्चाची काळजी घेणे. दुसरी गोष्ट ऑस्ट्रियाचे तत्कालीन पंतप्रधान ब्रूनो क्रेस्की जे आणीबाणीमुळे इंदिराजींवर नाराज होते, त्यांची समजूत घालणे. तिसरी गोष्ट नेताजी बोस यांच्या पत्नी, ज्या ऑस्ट्रियात राहत होत्या त्यांच्या संपर्कात राहाणे, त्यांना मदत करणे. एमिली शेंकेल या सुभाषबाबूंच्या पत्नी व्हिएन्नात राहत होत्या. त्यांच्याशी संपर्क साधणे राजदूत दलाल यांना कठीण झाले होते. शेवटी त्यांच्याशी संपर्क साधण्यात दलाल यशस्वी झाले. नेहरू व बोस यांचे संबंध कसे होते ते ठाऊक नाही, पण इंदिराजींना बोस पत्नीबद्दल वाटणारी काळजी या आठवणीतून दिसून येते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. –
– प्रदीप राऊत, अंधेरी

भारतीयांना तंत्रज्ञान प्रगतीचा दिलासा!
चांद्रयान, मंगळयानाच्या यशस्वी मोहिमेनंतर भारताने खगोलशास्त्राचे महत्त्वपूर्ण संशोधन करण्यासाठी ही संशोधन वेधशाळा अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपित केली. ब्रह्मांडाची कोणती रहस्ये आता समोर येणार आहेत याची उत्सुकता संपूर्ण जगाला आहे. सूर्याकडे झेप घेण्यासाठी ‘आदित्य-१’चे २०१७-१८ मध्ये प्रक्षेपण करण्याचा इस्रोचा मानस आहे. मंगळावर उष्ण पाण्याचे वाहते झरे असल्याचे नासाने नुकतेच जाहीर केले आहे. एकंदरीत अवकाशातील रहस्य उलगडण्यासाठी तांत्रिक स्तरावर प्रगतिशील देश सतत कार्यरत असतात. मोहिमांसाठी जशी काही वष्रे खर्ची घालावी लागतात त्याप्रमाणे पसेही खर्च करावे लागतात. एकामागोमाग एक अशा यशस्वी मोहिमा इस्रोकडून होत असल्याने समस्त देशवासीयांना त्यांचा सार्थ अभिमान आहे. आपण जे काही करतो ते यशाच्या स्वरूपात ठळकपणे दिसू लागले की आपल्या निंदकांनाही ते यश मान्य करावेच लागते. किंबहुना त्याविना पर्याय नसतो. आपल्या देशात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन होण्यास अजून किती काळ लागेल हे नक्की सांगता येत नाही. अशा बिकट स्थितीत तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा गौरव हे भारतीयांसाठी दिलासा देणारे आहे. – जयेश राणे, भांडुप

‘एक गाव एक गणपती’ची गरज
‘यंदा घरगुती आणि सार्वजनिक गणपतींच्या संख्येत तब्बल ३४ हजारांची भर’ ही बातमी वाचली अन् उरात धडकी भरली. आपण एक व्यक्ती आणि समाज म्हणून काय करतो आहोत याचे भान आपल्याला राहिलेच नाही हे आधी मान्य केले पाहिजे. कुटुंबाला-समाजाला एकत्र आणणारा हा उत्सव आपल्याला हळूहळू विभाजित करायचे काम करतोय हे यानिमित्ताने लक्षात घेतले पाहिजे. पूर्वी एका परिवाराचा एकाच घरात साजरा होणारा गणपती लहान मुलांच्या, मोठय़ांच्या आग्रहाखातर किंवा वितुष्टामुळे वेगळा बसू लागला. परराज्यातून आलेले किंवा अमराठी लोकही वातावरणाने प्रभावित होऊन घरगुती गणपती आणू लागले. सार्वजनिक ठिकाणीही प्रत्येक गल्लीची, इमारतीची मंडळे स्थापन झाली. त्यामुळे ‘मंडळे उदंड जाहली’ अशी स्थिती आहे. हजारोंच्या संख्येने वाढ होतेय, पण त्याच प्रमाणात समाज तुटतोय आणि त्याचेच राजकारण करून संबंधित लोक त्याचा फायदा करून घेत आहेत. ज्या इंग्रजांच्या विरुद्ध लढायला लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरू केला, त्यांचीच ‘फोडा आणि झोडा’ ही नीती राजकारण्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या कामी येते आहे. समाजाला सतत उन्मादी अवस्थेत ठेवणे ही त्यांची ‘गरज’ आहे.
समाजातल्या समंजस लोकांनी तरी यापुढे पंचधातू किंवा तत्सम मूर्ती आणून त्याच्या सन्मुख सुपारीत प्राणप्रतिष्ठा करून पूजन करावे. तसेच आप्तेष्टांचा वाढदिवस असेल त्या वेळेस अशा मूर्ती भेट देऊन त्यांनाही यात सामील करून घ्यावे. सार्वजनिक समस्या अधिक गंभीर होत आहे. ‘एक गाव एक गणपती’चा पुरस्कार करण्यासाठी मंडळांनी पुढाकार घेणे अतिआवश्यक झाले आहे. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?
 संजय उपाध्ये, भांडुप.

सरकारी बोलघेवडेपणाला चपराक
‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ या खगोलीय वेधशाळेच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्रोचे अभिनंदन. आजवर इस्रोच्या यशस्वी अवकाश मोहिमा ‘किफायतशीर’ ठरल्या. चांद्रयान-२ चा खर्च ४२६ कोटी, मंगळयान ४५० कोटी, तर अ‍ॅस्ट्रोसॅट १७८ कोटी. सहस्र कोटी आकडय़ांचे प्रकल्प, त्यांच्या शतपटींमध्ये वाढणाऱ्या किमती यांचा तौलनिक विचार केला तर अवकाश संशोधनाहूनही सामाजिक सुधारणा जास्त खर्चीक वाटतात अन् त्या प्रकल्पांची देदीप्यमान यशपूर्ती ही आपण भ्रष्टाचाराच्या रूपात अनुभवतो. आपला देश गरीब नसून ते राजकीय इच्छाशक्तीचे दारिद्रय़ आहे. इस्रोचे यश हे खरे तर सरकारी बोलघेवडेपणाला सणसणीत चपराक आहे. प्रखर देशाभिमान अन् प्रगल्भ इच्छाशक्तीचा वारसा राजकीय धोरणांमध्येही परावर्तित होणे गरजेचे आहे. देशाच्या सर्वागीण विकासासाठी इस्रोचे अनुकरण करून सर्व भारतीयांनी देशहित सर्वोच्च मानले पाहिजे.
– रणजितसिंह राजेंद्र भोसले, नवी दिल्ली.