‘विशीतले दिलवाले’ हे शनिवारचे संपादकीय (२४ ऑक्टोबर) वाचले. इतक्या वर्षांनंतर त्या चित्रपटाबद्दल विचार करताना असे जाणवले की, जागतिकीकरणाच्या पाश्र्वभूमीवर फुलणाऱ्या कथानकाचा भारतीय परंपरेत शेवट करताना वेगळीच उंची गाठण्याच्या दोन संधी घेता आल्या असत्या. सिमरनचे वडील भारतीय मूल्यांवर खूप निष्ठा असणारे दाखवले आहेत. त्यांनी तिचे लग्न भारतात वाढलेल्या मुलाशीच हट्टाने ठरवले होते. लंडनमध्ये वाढलेला नायक हा भारतात वाढलेल्या मुलापेक्षा जास्त ‘भारतीय’ आहे हे वेळोवेळी जाणवत गेल्यामुळेच त्यांचा विरोध मावळला, अशा अंगाचा शेवट कथानकाशी जास्त मिळताजुळता ठरला असता. ‘जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी’मध्ये केवळ आपली इच्छा मुलांवर न लादणे (प्रेमाची जीत) इतकेच सूचित होते. दुसरे म्हणजे स्वत:चे सुरक्षित बालपण भारतात लाडाकोडात घालवून मग ‘करिअर’करिता परदेशी गेलेली बरीच मंडळी परदेशात जन्मलेल्या आपल्या मुलांना हट्टाने भारतीय बनवू पाहतात. बाहेर पाश्चिमात्य संस्कृतीला साजेसे वागणे आणि घरात पूर्णपणे वेगळे वागणे अशी घुसमट आपणही सिमरनची करत होतो याची जाणीव तिच्या पित्याला झालेली दाखवता आली असती.
ज्या काळावर आणि पाश्र्वभूमीवर कथानक बेतले आहे त्यात या गोष्टी चपखल बसल्या असत्या आणि एका उत्कृष्ट व्यावसायिक चित्रपटाला सखोल कलात्मक चित्रपटाचे परिमाणही सहज देऊन गेल्या असत्या असे वाटले.
-विनिता दीक्षित, ठाणे

धर्मगुरूंशी चर्चा निष्फळ ठरेल
‘‘काळानुसार धर्मातील परंपरांचे पुनíनरीक्षण आवश्यक वाटत असेल तर ते व्हायला हवे. मात्र त्यासाठी धर्मगुरूंशी चर्चा करायला हवी,’’ असे प्रतिपादन सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी केल्याची बातमी (२४ ऑक्टो.) वाचली. िहदू धर्मात अनेक सुधारणा झाल्या. त्या काळच्या समाजसुधारकांनी समाजजागृती त्या घडवून आणल्या, धर्मगुरूंशी चर्चा करून नव्हे. सती प्रथा बंदी, विधवा केशवपन बंदी, बालविवाह बंदी, संमती वयाचा कायदा अशा सर्व सुधारणांना प्रत्येक वेळी धर्मगुरूंनी आणि सनातनी विचारांच्या धार्मिकांनी विरोधच केला होता. हजारो वष्रे रूढ असलेली चातुर्वण्र्य समाजपद्धती बंद झाली ती आपल्या संविधानातील तत्त्वांमुळे. शंकराचार्य अजूनही चातुर्वण्र्याचे समर्थन करतात. धर्मगुरूंच्या मते धर्मतत्त्वे अपरिवर्तनीय असतात. त्यामुळे सुधारणांसाठी धर्मगुरूंशी चर्चा करणे निष्फळ ठरेल; किंबहुना धर्मगुरूंची संमती घेऊन धर्मसुधारणा करायचे ठरविले, तर कोणतीही सुधारणा होणे शक्य नाही.
– प्रा. य. ना. वालावलकर

मोदींनी पदाचे भान ठेवावे
‘केळीचे सुकले बाग’ हा अग्रलेख (२२ ऑक्टो.) वाचला. लोकशाही मार्गाने निवडून यायचे आणि सर्व अधिकार आपल्याकडे ठेवायचे, हा सत्ता राबविण्याचा मोदींचा आवडता फॉम्र्युला आहे. यासाठी त्यांनी सोम्यागोम्यांची हेतूपूर्वक निवड केली आहे. त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याकडे जनतेने दुर्लक्ष करावे, असे सांगणारे मोदी अप्रत्यक्षपणे त्यांना पाठीशी घालत आहेत. त्यासाठीच दादरी हत्याकांडास तीन आठवडे झाल्यानंतर राष्ट्रपतींचे विधान पुढे करीत त्या घटनेचा थेट निषेध न करता त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदविली होती. देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मोदींनी आपण एका पक्षाचे प्रचारप्रमुख म्हणून न वागता या देशाचे पंतप्रधान आहोत याचे भान ठेवणे गरजेचे आहे.
– श्रीकांत मिठबावकर, कल्याण</strong>

मृत्यूची किंमत २६० रुपये!
मागील तीन वर्षांपासून मराठवाडय़ात पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या. आतापावेतो विविध कारणांमुळे वडीलधारी मंडळी आत्महत्या करीत होते. मात्र आता दुष्काळामुळेच शाळकरी मुलेही आत्महत्या करू लागली आहेत. लातूर जिल्हय़ातील घटना मन सुन्न करणारी आहे. जढाळा गावातील स्वाती विठ्ठल पिटले या अकरावीतील मुलीने एसटी पासचे २६० रुपये वडिलांकडे नाहीत, तसेच भविष्यात त्यांना आपल्या लग्नाचा त्रास होऊ नये म्हणून आत्महत्या केली.
शासनाने किमान मुलींच्या शिक्षणातील लहान लहान अपेक्षा पूर्ण करायला हव्यात. खेडय़ातील गरीब, होतकरू मुली शिक्षणासाठी शहरात दररोज बसने जात असतात. ँपण पाससाठी आईने किंवा वडिलांनी कुणाकडेच हात पसरवू नयेत म्हणून स्वातीने जी आत्महत्या केलीय ती संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला लावणारी आहे. अशा घटना घडल्यावर समाजातील काही लोक स्वातीच्या घरी जाऊन पसे देतील, मात्र तिच्या मरणाची किंमत फक्त २६० रुपयेच राहील, हे अच्छे दिन आणणाऱ्यांनी ध्यानात ठेवावे.
 संतोष मुसळे, जालना</strong>

सामीला नागरिकत्व नकोच
पाकिस्तानी गायक अदनान सामी यास भारताचे नागरिकत्व देण्यात येऊ नये. नागरिकत्व बदलल्याने सामीमध्ये अचानक भारताबद्दल प्रेम, आदर निर्माण होणार आहे का? शेवटी पाकिस्तानी ते पाकिस्तानीच. त्यांचे वाकडे शेपूट कधीच सरळ होणार नाही. फक्तस्वत:ची आíथक प्रगती, नावाचा गाजावाजा होण्यासाठी पाकिस्तानी कोणत्याही थराला जाऊ शकतात. अदनान सामी याला भारताचे नागरिकत्व देऊन देशाचे काय कल्याण होणार आहे? अनेक इस्लामी राष्ट्रे असताना याचे येथेच काय अडले आहे?
जयेश राणे, भांडुप (मुंबई)

मानव धर्माची संहिता तयार करावी
देव व ईश्वर यासंबंधातील शरद बेडेकर यांचा लेख (१९ ऑक्टो.) नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण व विचार प्रवर्तक आहे. आपली सृष्टी (व्यष्टी, समष्टी व परमेष्टीसहित) व त्याचे गतिमान आणि सतत बदलणारे स्वरूप इतके अद्भुत आहे की त्याचे शब्दात वर्णन करणे मानवी आकलनशक्तीच्या पलीकडे आहे. मी कोण आहे, परमेश्वराचे स्वरूप काय, माझा व परमेश्वराचा कोणता संबंध आहे, हे व इतर अनुषंगिक सर्व प्रश्न याबाबत प्रचंड साहित्य उपलब्ध असले, तरी समग्र घटनांचे शास्त्रीय व तर्कदृष्टय़ा समाधानपूर्वक उत्तर सापडले नाही. आस्तिक्य, अज्ञेय, नास्तिक्य याबाबत कितीही वितंडवाद झाले तरी एकंदर ब्रह्मांडाचा (आपल्या सूर्यमालेच्या संदर्भात) व्यापार इतका अनपेक्षित आहे की, अंतिम सूत्रसंचालन करणारी जी शक्ती आहे, त्याचे आकलनाप्रमाणे स्वरूप मानण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला द्यावे लागेल. निसर्ग, देवदेवता, अवतार कार्य, प्रेषित, परमेश्वर याबाबत कोण बरोबर/चूक, कोणाचे योग्य /अयोग्य याबाबत कायदा करणे तर दूरच कोणतीही सक्ती करणे समाजाची घडी विस्कटणारे ठरेल. एक गोष्ट नक्की की अंतिम शक्तीला मानण्यामुळे मानवी अहंकार मर्यादित राहील व समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने ते गरजेचे आहे. सर्व धर्माचार्यानी व विवकेवाद्यांनी एकत्र येऊन मानव धर्माची संहिता तयार करणे व आपली सृष्टी भविष्यातील पिढय़ांकरिता आरोग्यदायी करणे एवढे आपण निश्चित करू शकतो.
श्रीकृष्ण नारायण फडणीस, दादर (मुंबई)

पारदर्शकता हवी
‘आत्महत्येपूर्वी परमार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र’ ही बातमी (२३ ऑक्टो.) वाचली. नियम-कायद्याची ढाल पुढे करत नागरिकांना हेलपाटे मारायला लावून घायाळ करावयाचे, हा आपल्या प्रशासनाचा ‘नियमच’ झाला आहे. यासाठी नागरिकांनी दाखल केलेल्या फाइलच्या संपूर्ण प्रवासाचा ‘ट्रॅक’ ठेवण्याची पद्धत शासनाने सुरू करावी. नस्तीच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस फाइलचा संपूर्ण प्रवास नोंदविण्यासाठी ‘अनुक्रमांक, आवक तारीख, अधिकाऱ्याचे नाव, हुद्दा, अधिकाऱ्याचा शेरा, सही आणि जावक दिनांक’ यांची नोंद केली जावी. नस्तीच्या प्रवासात पारदर्शकता आणली जात नाही तोपर्यंत नोकरशाहीच्या ‘फििक्सग’ला आळा घालणे अशक्य दिसते.
सुधीर लक्ष्मीकांत दाणी, बेलापूर, नवी मुंबई</strong>