नव्या नेपाळी घटनेच्या बातमीत ‘नेपाळ धर्मनिरपेक्ष’ हा तपशील (लोकसत्ता, २१ सप्टेंबर) वाचून आनंद झाला. ‘जगाच्या पाठीवरील एकमेव हिंदुराष्ट्र’ असतानासुद्धा धर्मनिरपेक्षतेचे बीज पेरणाऱ्या प्रयत्नाचे स्वागत करणे महत्त्वाचे वाटते. लोकशाही देशात सर्वाना समान न्याय देण्यासाठी धर्मनिरपेक्षता हा मार्ग अधिक योग्य आहे, असेच म्हणावे लागेल. सर्व धर्माचा आदर करणे हेच खरे कोणत्याही धर्माचे मूलतत्त्व असते. म्हणून नेपाळमध्ये असणारे बौद्ध असतील, हिंदू अथवा मुस्लीम असतील किंवा अन्य कोणी.. हे सर्व एका राज्यघटनेच्या अमलाखाली असतील अशा प्रकारची रचना करून नेपाळ सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. विशेषत, एका धर्माची बहुसंख्या असतानाही नेपाळी जनतेच्या प्रतिनिधींनी हा निर्णय घेऊन जगासमोर आपला आदर्श ठेवला आहे.
हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या भारताबरोबर आता या पर्वताच्या कुशीत वसलेले नेपाळही ‘धर्मनिरपेक्ष लोकशाही’ ठरेल. पण नेपाळने काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. नेपाळमधील राजकीय पक्षांनी भविष्यात कधीही धर्माचे राजकारण करून राज्यघटनेचे महत्त्व कमी करू नये. सत्ता मिळविण्याच्या नादात धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. याबरोबरच नागरिकांनीही काही पथ्ये पाळली पाहिजेत. नेपाळमधील प्रत्येक नागरिकाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ हा राज्यघटना असली पाहिजे, म्हणजे कोणीही आपापल्या धर्मग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करावे अशा प्रकारचे भाष्य करणार नाही. ‘कोणत्याही धर्माचे असू, आम्ही पहिले नेपाळी आहोत,’ अशी भावना निर्माण झाली, तर खऱ्या अर्थाने लोकशाही अधिक बळकट होऊ शकते.
लोकशाहीच्या मार्गाने देशात शांतता नांदते; परंतु धर्माच्या आधिपत्याखाली असणाऱ्या देशांत नेहमी रक्तरंजित क्रांती घडून आल्या आहेत. धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व हास्यास्पद झाले आहे असे मानले, तर नागरिकांचीच हानी होते, हेही दिसले आहे.
– मारोती संग्राम गायकवाड, नांदेड

डझनभर ‘नरबळी’ दिल्यानंतरही जाग नाही?
‘नरबळी’च्या आरोपावरून पी. आर. पलनिचामी या भारतातील सर्वात मोठय़ा ग्रानाईट निर्यातदाराची चौकशी मदुराई पोलीस करीत असून आतापर्यंत लहान मुलासह चार माणसांची हाडे सापडली आहेत. या प्रकरणी मदत केल्याच्या आरोपावरून केरळमधील मांत्रिकाचीही चौकशी करीत आहेत. सेव्हरकोडियन या कंपनीच्या माजी चालकाने तक्रार करून हे बळी पाहिल्याचे पोलिसांना सांगितले, म्हणून हे प्रकरण उघडकीला तरी येऊ शकले! मद्रास उच्च न्यायालयाने उत्खननांचा हुकूम केल्यावर हे अवशेष सापडले आहेत. भिकारी, मतिमंद माणसे पकडून त्यांना खाऊपिऊ घालून मग हे बळी देत. यामागचे कारण कंपनीचा विस्तार ‘शुभ व्हावा’ किंवा मार्गात येणारे देऊळ पाडले तर त्याचे पापक्षालन व्हावे, असे काही तरी असावे. आजवर १२ जणांना अशा प्रकारे मारण्यात आले असावे, असा अंदाज आहे. या प्रकरणाकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष मात्र कमी आहे. याच पी. आर. पलनिचामीला राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी यापूर्वी पुरस्कार दिलेले आहेत, हे विशेष!
– केशव देवधर, नेरुळ (नवी मुंबई)

गणेशोत्सवात ‘हेलस’ची आगळी रीत
‘एक गाव एक गणपती’चे प्रमाण या वर्षी घटल्याची बातमी (लोकसत्ता, १८ सप्टेंबर) वाचली. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात कुठेही साजरा होत नसावा अशी हेलस गणोशोत्सवाची कहाणी त्यामुळेच सांगावीशी वाटली..
मराठवाडय़ातील जालना या जिह्याच्या ठिकाणापासून ७५ कि.मी.वर वसलेले हेलस हे एक धार्मिक- सांस्कृतिक इतिहास असलेले गाव. हेमाडपंती मंदिरांचे व मोडी लिपीचे उद्गाते हेमाद्रीपंत यांचे हे मूळगाव. गावाच्या मधोमध गणपतीचे हेमाडपंती मंदिर असून त्यात असलेली गणेशाची साडेतीन फूट उंचीची मूर्ती हे या गावाचे ग्रामदैवत.
आजमितीस आपल्याकडे नानाविध गणेशमंडळे गल्लीबोळात गणपतीची मूर्ती मांडून दहा दिवस ध्वनी, अन्न, जलप्रदूषण मोठय़ा प्रमाणावर करतात. मात्र पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे मूíतमंत उदाहरण या गावात पाहता येते. सामान्यपणे आपण गणेशोत्सवाची सुरुवात गणेश चतुर्थीला घरोघरी मूर्तीस्थापनेने करतो व विसर्जन अनंत चतुर्दशीला विसर्जनाने करतो. इथे कुणाच्याही घरी गणपतीची मूर्ती मांडली जात नाही. त्यामुळे विसर्जनचा प्रश्नच येत नाही. ग्रामदैवत असलेल्या गणेशाच्या मंदिरातच भाद्रपद शुद्ध नवमीला भागवत सप्ताहाने गणोशोत्सवाची सुरुवात होते आणि भाद्रपद पौर्णिमेला श्रींची पालखी रात्रभर गावात मिरवून मंदिरात विसर्जन केले जाते.
या पालखी पौर्णिमेचे विशेष महत्त्व म्हणजे यादिवशी या गावातून आजपावेतो जेवढय़ा मुली लग्न होऊन परगावी गेलेल्या आहेत त्या आपापल्या चार चार पिढय़ा घेऊन या दिवशी येतातच. येथील आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे गणेशोत्सवातील नाटय़परंपरा. उत्सवादरम्यान दर वर्षी सामाजिक, ऐतिहासिक व धार्मिक अशी तीन नाटके सादर करण्याची परंपरा आजही चालूच आहे. या गावाचा आदर्श इतरांनीही घेण्यासारखा आहे.
– संतोष मुसळे, जालना.

‘सर्वाधिक फायदा’? मग देशी गुंतवणूक का नाही?
‘गुंतवणुकीवर सर्वाधिक परतावा- अर्थमंत्री अरुण जेटली यांचे उद्योजकांना आश्वासन’ हे वृत्त (लोकसत्ता, २१ सप्टेंबर) आणि त्यातील ‘इतर देशापेक्षा भारतातील गुंतवणुकीवर परदेशी गुंतवणूकदारांना फायदाच होईल’ हे पहिलेच वाक्य वाचून मी खरोखरच गोंधळून गेलो. हाँगकाँगमध्ये अर्थमंत्र्यांनी दिलेले हे आश्वासन वाचून मला प्रश्न पडला : तर मग देशी गुंतवणूकदार ‘सर्वाधिक फायद्यासाठी’ आपल्याच देशात गुंतवणूक का बरे करीत नाहीत, अर्थमंत्र्यांना विदेशी का बरे जावे लागते?
सरतेशेवटी अर्थमंत्री म्हणाले, ‘रिझव्‍‌र्ह बँक आपली जबाबदारी समजते, त्यामुळे व्याजदरात कपात करण्याचे भान ते ठेवतील.’ म्हणजे बँकेने व्याजदरात कपात केली की कर्जे स्वस्त होऊन गुंतवणूकदारांना फायदा होईल; पण मग सामान्य जनतेचे काय? आज निवृत ज्येष्ठ नागरिकांना जगणे मुश्कील झाले आहे. दिवसेंदिवस एकीकडे बँकेतील ठेवींवर मिळणारे व्याजदर कमी होताहेत तर दुसरीकडे महागाई दामदुपटीने वाढत आहे. आता बहुधा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांनंतर निवृत्तांना आत्महत्या करावी लागेल. जेव्हा एकाचा फायदा होतो तेव्हा दुसरा तोटय़ात जाणारच. मग अर्थमंत्री म्हणतात त्याप्रमाणे विदेशी गुंतवणूकदराचा फायदा आणि देशामधील निवृत नागरिक तोटय़ात.
– प्रफुल्लचंद्र ना. पुरंदरे, वसरेवा (मुंबई)