loksatta@expressindia.com  

‘‘क्वाड’च्या कुशीतले काटे!’ या अग्रलेखात (२५ मे) विचारलेला, ‘प्रत्यक्षात हे देश काय करणार?’ हा प्रश्न जागतिक राजकारणात आणि सद्य परिस्थितीत लाखमोलाचा आहे. विसाव्या शतकातील शीतयुद्धकाळात शस्त्रास्त्रांची श्रीमंती हा निर्णायक घटक होता आणि जग दोन ध्रुवीय होते. नाटो आणि वॉर्सा करार या दोन गटांमध्ये विभागणी झालेल्या जगात अलिप्त राष्ट्रांचाही समूह होता आणि त्यामध्ये भारताला महत्त्व होते. एकविसाव्या शतकातील जागतिक राजकारणात सैन्यसामर्थ्यांपेक्षा देशाचे आर्थिक सामथ्र्य महत्त्वाचे ठरत आहे, त्यामुळे ‘क्वाड’ला मर्यादा आहेत.

चीनचे वेगाने वाढणारे आर्थिक वर्चस्व पाहाता, त्या देशाच्या विस्तारवादी धोरणास आव्हान देताना क्वाडच्या राष्ट्रप्रमुखांच्या मुत्सद्देगिरीची कसोटी लागणार आहे. रशियाकडे दुर्लक्ष करून चीनला आव्हान देणे तसे कठीणच. भारतासाठी तर ते अधिक कठीण, कारण आपले शेजारी राष्ट्रांशी संबंध सलोख्याचे राहिलेले नाहीत आणि चीनची घुसखोरी ही इतरांपेक्षा आपल्या बाबतीत अधिक आक्रमक आहे. भारताने पुन्हा एकदा अलिप्ततावादी देशांचे नेतृत्व करण्याचा विचार करावा.

– अ‍ॅड. वसंत नलावडे, सातारा

राज्यकर्ते तरुणांना उत्पादकतेकडे वळवतील?

‘‘क्वाड’च्या कुशीतले काटे!’ हा अग्रलेख वाचला. चीनला थेट विरोध करणे सध्या तरी आशियाई देशांसाठी अशक्य आहे. जवळपास सर्वच देश चिनी वस्तूंवर अवलंबून आहेत. कमी किंमत आणि बरा दर्जा असणाऱ्या वस्तूंसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या तरी चीनला पर्याय नाही. भारत हा ‘तरुण’ देश आहे. या तरुणांना धार्मिक तेढ निर्माण करण्यात गुंतवून ठेवण्याऐवजी नियोजनबद्ध धोरण आखून देशाला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने आतापासून पावले टाकल्यास भविष्यात चीनच्या मुजोरीवर मात करणे शक्य होईल. त्यासाठी राज्यकर्त्यांनी इच्छाशक्ती दाखवणे गरजेचे ठरेल.

– लक्ष्मण नारायण भोसले, हिंगोली

राष्ट्र कुणाचे? कुणासाठी?

संस्कृत ग्रंथांचे दाखले देत राष्ट्र ही संकल्पना वैदिक काळापासून अस्तित्वात आहे, हे सांगणारा रवींद्र महाजन यांचा लेख (२५ मे) वाचला. या देशात मूठभर लोकांनी फार कल्पकतेने जातीची उतरंड निर्माण केली. फक्त स्वत:साठी एक प्रगल्भ भाषा विकसित केली. साहित्य, विज्ञान, धर्मग्रंथ आणि कायदे वाचण्यास बंदी घातली. ते वाचण्याचा प्रयत्न जरी केला तर काय होते, हे रामराज्यातील शम्बुक दर्शवतो. यातील सर्वोच्च स्थानी असलेल्या दोन-तीन टक्के

व्यक्तींनी क्षत्रियांच्या मदतीने हा विशाल भूभाग स्वत:ची वसाहत म्हणून वापरला. तुम्ही शूद्र आहात, असे सांगत ३० टक्के जनतेला अनेक शतके पाशवी वागणूक दिली. त्यांच्यासाठी त्यांची ही वसाहत हेच अखंड, संघटित आणि एक घटनात्मक राष्ट्र होते, याची साक्ष संस्कृत ग्रंथ देतात.

– दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा

संकल्पनांचा उलगडा आवश्यक

रवींद्र महाजन यांचा ‘एकात्म मानव दर्शन’ हा लेख (२५ मे) वाचून काही गोष्टींचा स्पष्ट उलगडा होत नाही. मोक्ष याचा अर्थ पुनर्जन्मापासून मुक्तता असा होतो. या धर्माला आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग आणि नरक या संकल्पना आणि मागील जन्मातील पाप-पुण्याचे बक्षीस किंवा शिक्षा या जन्मात भोगायला लागणे असा कर्मसिद्धांत इत्यादी गोष्टी मान्य आहेत, असा अर्थ घ्यावा का? आपली वर्णव्यवस्था किंवा जातव्यवस्था याच कर्मसिद्धांतामुळे निर्माण आणि बळकट होते. लेखकाला ही सर्व व्यवस्था मान्य आहे का?

मोक्ष साधण्यासाठी ज्ञानमार्ग, भक्तीमार्ग, नामस्मरण आणि कर्ममार्ग सांगितले आहेत. भक्ती परमेश्वराचीच केली जाते. मग परमेश्वर कोणाचा, हा प्रश्न उद्भवतो. त्याचे उत्तर काय देणार? किंवा कर्ममार्ग म्हणजे ‘आपापल्या वर्णानुसार कर्म करणे’ असा अर्थ होतो. म्हणजे या धर्माला वर्णव्यवस्था मान्य आहे, असा अर्थ होतो. सर्वच युरोपीय गोष्टी वाईट आणि त्याज्य समजायच्या, की त्यातील चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या, त्या कोणत्या आणि हे कोणी ठरवायचे याचा खुलासा होणे आवश्यक आहे. आचार्याची निवड कोण करणार?  एकूणच निवडणुका राहणार की नाही? राजकीय पक्ष असतील की  नाही? निवडणूक पद्धती कोणती राहील? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात.

   – सुभाष आठले, कोल्हापूर</p>

काश्मीरप्रश्नी सर्वच पक्ष असमर्थ

‘काश्मीर धुमसताच ठेवायचा आहे..?’ हा सचिन सावंत यांचा लेख (२५ मे) वाचला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस या नात्याने त्यांचा हा लेख त्यांच्याच पक्षाच्या बाजूने जाणारा आहे.  प्रश्न आहे तो जम्मू-काश्मीरमधील पंडित समुदाय आणि तेथील मुस्लिम जनतेच्या सहअस्तित्वाचा. हा प्रश्न सोडवण्याऐवजी, तो नेहमी भिजत ठेवण्यात आजवरचे सर्व सत्ताधारी यशस्वी ठरले आहेत. संसदेत आपले मानधन व भत्ते वाढवून घेताना विरोधक व सत्ताधारी एकमुखाने संमती देतात, तशीच मोट या महत्वाच्या प्रश्नांवर का बांधली जात नाही?  काश्मीरमधील बंधुभाव हा देशापुढील महत्त्वाचा प्रश्न असताना त्यावर अभ्यासपूर्ण चर्चेतून कायमस्वरूपी, व्यवहार्य तोडगा काढण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात सर्वच पक्ष असमर्थ ठरण्याचे खरे कारण काय?

– प्रवीण आंबेसकर, ठाणे

‘चकमक संस्कृती’ ही चिंतेची बाब

‘चकमकींवर वचक नाही?’ हे विश्लेषण (२५ मे) वाचले. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या हैद्राबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपी पोलिसांशी झालेल्या कथित चकमकीत ठार झाले होते. या चकमकीची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर समितीच्या अलीकडेच आलेल्या अहवालात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. या समितीने केलेली संबंधित पोलिसांवर खूनाचा खटला चालविण्याची शिफारस निश्चितच स्वागतार्ह आहे. कारण ज्या प्रकारे त्या आरोपींना निर्घृणपणे ठार मारण्यात आले, ती कुठल्याही सुसंस्कृत समाजाला शोभणारी कृती नव्हती. त्या आरोपींकडून जरी मानवतेला काळीमा फासणारा गुन्हा घडला असला तरी त्यांना फौजदारी न्याय प्रक्रियेचे पालन करून शिक्षा होऊ शकली असती. अशा प्रकारे पोलिसांमार्फत बनावट चकमकी घडवून आणून आरोपींच्या हत्या होणे म्हणजे कायद्याच्या राज्याला आव्हानच आहे. दुर्दैवाने देशातील अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारची ‘चकमक संस्कृती’ रुळली आहे, ही जास्तच चिंतेची बाब आहे.

– गणेश शशिकला शिंदे, औरंगाबाद</p>

१८ खेळाडूंचा संघ कशासाठी?

पाच ‘टी २०’ सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ जूनमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेसाठी निवड समितीने १८ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा नुकतीच केली. भारतात होणाऱ्या मालिकेसाठी १८ सदस्यीय संघ निवडण्याचे कारण काय? ही मालिका जर परदेशात असती आणि करोनाचा कहर सुरू असता तर १८ सदस्यीय संघ योग्य होता, पण देशातील मालिकेत १८ सदस्यांची गरज काय? देशात खेळवल्या जाणाऱ्या मालिकेसाठी पूर्वीप्रमाणेच १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर करायला हवा होता.

– श्याम ठाणेदार, पुणे

एकाक्षरप्रधान वाक्प्रचारांमुळे भाषा समृद्ध

‘भाषासूत्र’ सदरातील ‘एकाक्षरप्रधान वाक्प्रचार’ हा लेख (२५ मे) वाचला. मराठी भाषेत व तिच्या बोलीभाषांत अन्यही अनेक एकाक्षरप्रधान वाक्प्रचार आहेत. यानिमित्ताने त्यातील आणखी काही वाक्प्रचार आठवले.  खो खो या खेळातून ‘खो देणे’ व ‘खो घालणे’ हे दोन वाक्प्रचार आले आहेत. ‘खो देणे’ याचा अर्थ शह देणे तर ‘खो घालणे’ याचा अर्थ कामात अडथळा वा आडकाठी आणणे असा आहे. अहंकार, गर्व झालेल्या व्यक्तीसाठी ‘ग’ची बाधा होणे, असा वाक्प्रचार केला जातो. ‘त त प प’ होणे याचा अर्थ घाबरून जाणे, गोंधळून जाणे असा होतो. ‘री’ ओढणेचा अर्थ आहे, बाजू घेणे. अशा प्रकारच्या अनेक एकाक्षरप्रधान वाक्प्रचारांमुळे मराठी व तिच्या बोलीभाषा समृद्ध झाल्या आहेत.

– टिळक उमाजी खाडे, नागोठणे (रायगड)

लोथल ‘जगातील प्राचीन बंदर’ नव्हे

हिंदू-प्रशांत क्षेत्र जागतिक व्यापार, आर्थिक गुंतवणूक व उत्पादन यांच्या दृष्टीने केंद्रस्थानी राहिले असून त्यामध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो येथे केले. गुजरात (काठियावाड) येथील लोथल हे ‘जगातील सर्वात प्राचीन बंदर’ होते, असेही ते म्हणाले.  मात्र प्रत्यक्षात जगातील सर्वात प्राचीन- साडेचार हजार वर्षांपूर्वीचे बंदर लाल समुद्राच्या किनारी इजिप्तमध्ये सापडले होते. लोथल हे भारतातील प्राचीन- सुमारे तीन हजार ७०० वर्षांपूर्वीचे बंदर असल्याचे, पुरातत्त्वशास्त्रज्ञ आर. एस. राव यांनी शोधून काढले होते.

– डॉ. श्रीकांत परळकर, दादर