loksatta@expressindia.com

अधिकाऱ्यांना विश्वाचे अंगण आंदण दिल्यावर त्यांच्या श्वानास विधी उरकण्यासाठी क्रीडांगण लागते यात त्यांचा तरी काय दोष? उलट देशाचा अमृत महोत्सव साजरा करताना आपले चारही खांब किती ‘सजत’ चालले आहेत, याचा आपल्याला आनंद वाटायला हवा. ‘कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे’ हा बाणा घेऊन दाखल होणारे अधिकारी जसजसे उच्चपदावर जातात तसतसा त्यांचा गुब्बारा गुरुत्वाकर्षणाशी असलेले नाते तोडून जातो, याच्या असंख्य सुरस चित्तथरारक व अद्भुत, सत्य-कथा आपल्या वाटय़ाला येत आहेत, हेच आपले भाग्य!

या लोकांची बात आम जनतेच्या ध्यानात येणे अशक्यच आहे. हे सारे कुठून येते, असे प्रश्न आलतूफालतू लोकांसाठी बरे. त्या बिचाऱ्यांना मानसन्मानाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी बुद्धी पणाला लावावी लागते. लाखाची बात कोणी करावी, कोटी उड्डाणे कोणी व कशी दाखवावी, कोणत्या जमिनीवरील माया कुठे व्यक्त करावी, याचेही काही शिष्टाचार असतात व ते पाळावे लागतात. त्यातील अडथळे अजिबात खपवून घेतले जात नसतात.

पु. ल. देशपांडे यांनी ‘तीन पैशाचा तमाशा’मधील ‘कसायदानात’ ‘कसाई राहोत संतुष्ट त्यांना लाभोत गाई पुष्ट, अधिकातला अधिक भ्रष्ट त्यास सत्ता मिळो सदा’ असे सांगितले होते. त्यात अखेरीस ते म्हणतात. ‘आमुच्या भाळी उन्मत्तांच्या लाथा खात राहणे, लाथा खाता आपणही एखादी ठेवून द्यावी, पाहिलेत इथे तुम्ही जे ते इथेच विसरुनी जाणे, हे होते आमच्या खेळातील एक पैशाचे नाणे,’ पण तो सामान्य माणूसच २००० साली चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्या दिल्लीस्थित अधिकाऱ्याला ‘नियम’ सांगतो. प्रतिभावंत लेखक अरुण साधू यांच्या ‘ग्लानिर्भवति भारत’ कथेत अधिकारी कसे जबरदस्त ‘सरकारी’ हिसके दाखवतो, याचे मर्मभेदी वर्णन केले आहे. आता २०२२ आहे. त्यानुसार अधिकारी प्र-गत होणे आवश्यक आहे. कोणालाही कोणतेही प्रश्न विचारून त्यांच्या भावना दुखावून कसे चालेल? सचोटी वगैरे दाखवणाऱ्या अधिकाऱ्याला कशी सर्वत्र अस्पृश्यता सहन करावी लागते, हे माहीत नसणारे अजाण काहीबाही बोलतात व विसरूनही जातात.

तात्पर्य- अधिकाऱ्यांचे व शाही लोकांचे छान स्थान दर्शविण्यासाठी त्यांना काही विशेष कृती करावी लागते, ती त्यांना करू द्यावी. अशा कार्यात आम जनतेने कुठलेही अडथळे आणू नयेत, यातच त्यांचे सौख्य सामावले आहे.

– अतुल देऊळगावकर, लातूर</p>

निवृत्तीनंतरच्या लाभांचा मोह सुटेना..

दिल्लीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी सामान्य जनतेला वेठीस धरले जाणे काही नवे नाही. व्यापक जनहित आणि देशहितासाठी घटनेने राज्यकर्ते आणि वरिष्ठ नोकरशहांना अधिकार दिले, मात्र सत्ता आणि अधिकाराचा सदुपयोग होण्याऐवजी दुरुपयोगच होण्याची प्रथा दिवसेंदिवस अधिक रूढ होत आहे. याच संदर्भात ‘कुत्रा आणि कृतिशून्य’ या संपादकीयातून (२७ मे) अतिशय योग्य भाष्य केले आहे. सत्तेचा गैरवापर सर्वपक्षीय राज्यकर्त्यांकडून कालही होत होता, आजही होत आहे. नोकरीत राज्यकर्त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी अधिकार वापरायचे आणि सेवानिवृत्तीनंतर राज्यकर्त्यांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची निवृत्तीची सोय करायची, यात कोणाचे भले होते हे ‘ये पब्लिक है, ये सब जानती है’. आता बोलबाला झाल्यानंतर दिल्लीतील त्या सचिवाची लडाखमध्ये बदली केली, त्यापलीकडे काही नाही. नवल याचे वाटते की, पूर्वाश्रमींच्या राज्यकर्त्यांवर खापर फोडणारे सध्याचे राज्यकर्तेही तीच कार्यपद्धती अवलंबत आहेत. नवा भारत घडविण्याचे दावे केव्हाच फोल ठरले आहेत. हल्ली राज्यकर्त्यांना आपल्या मर्जीनुसार खासगी विशेष अधिकारी हवा असतो, तो कशासाठी, हे एक मोठे कोडेच आहे. एवढय़ा वरिष्ठ पदावर वर्षांनुवर्षे नोकरी केल्यानंतरही अनेकांना निवृतीनंतरचा मोह आवरला जात नाही, याचे गुपित काय असावे. खुद्द देशाच्या माजी सरन्यायाधीशांना खासदारकीचा मोह आवरता आला नाही.

ईडीच्या सेवेतील एक अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेतो, एका राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवतो. यातून कोणते संकेत मिळतात? निवृत्तीनंतर दोन वर्षे कोणतीही नोकरी करता येत नाही, हा नियम केवळ कागदावरच राहतो. कायदे कसे राबवायचे आणि मोडायचे याचे आपल्याकडील राजकीय पक्षांना आणि वरिष्ठ नोकरशहांना चांगलेच ज्ञान आहे. आम्ही जनतेचे मालक आहोत, ही मनोवृत्ती आणि कार्यपद्धती आजकालच्या राजकारण्यांमध्ये आणि वरिष्ठ नोकरशहांच्या नसानसांत भिनू लागली आहे आणि हे देशाच्या आणि समाजाच्या दृष्टीने घातकच आहे. लोकशाहीच्या नावाखाली स्वार्थ फोफावत चालला आहे.

– अनंत बोरसे, शहापूर, ठाणे</p>

फाळणीत जीनांबरोबर सावरकरही वाटेकरी

रवींद्र साठे यांचा ‘सावरकरांच्या राष्ट्रवादाची प्रचीती’ हा लेख (२७ मे) वाचला. सत्य व अर्धसत्याचा मिलाफ साधून सावरकरांचा गौरव करण्याचा हा प्रयत्न होता. लेखात म्हटले आहे की, ‘हिंदुत्वाच्या शासनप्रणालीत सर्व धार्मिक अल्पसंख्याक भयमुक्त अवस्थेत राहू शकतात,’ असे सावरकरांनी त्यांच्या साहित्यात नमूद केले आहे. सावरकरांनी असे कोणत्या पुस्तकात लिहिले आहे, हे स्पष्ट केले असते तर बरे झाले असते. कारण त्यांचे ‘सोनेरी पाने’ हे पुस्तक वाचल्यावर त्यांना धार्मिक अल्पसंख्याकांबद्दल असे काही वाटत असेल असे दिसत नाही. याच पुस्तकात कल्याणच्या  सुभेदाराची सून व शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले विवेचन त्यांच्याबद्दल बरेच काही सांगून जाते. या पुस्तकात त्यांनी मांडलेले मुस्लीम समाज, विशेषत: महिलांबाबतचे विचार कोणताही सुसंस्कृत समाज मान्य करणार नाही. सावरकरांची धर्मनिरपेक्षता भारतीय संस्कृतीला मानवणारी नसल्यामुळे सर्व भारतीयांनी ती नाकारली, हे सत्य आहे.

फाळणीला द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत जबाबदार होता, हे सर्वमान्य आहे. मात्र हा सिद्धांत प्रथम कोणी मांडला, याबद्दल मतभेद आहेत. राष्ट्रीयत्व निश्चित करण्यासाठी धर्माचा निकष लावावा का, याबद्दल बरेच विचारमंथन सुरू होते. त्या वेळी नेहरू, गांधी व काँग्रेसने धर्माचा निकष लावण्यास कडाडून विरोध केला होता. परंतु मुस्लीम लीग व हिंदु महासभा मात्र धर्माचा निकष लावावा यासाठी आग्रही होते. या दोघांचा काँग्रेसविरोध इतका टोकाचा होता की, त्यांनी काँग्रेसला पराभूत करण्यासाठी हातमिळवणी केली. बंगाल, सिंध आणि वायव्य सीमेवरील राज्यांत संयुक्त सरकारे स्थापन केली. सिंधमधील संयुक्त सरकारने पाकिस्तानच्या निर्मितीला पाठिंबा देणारा ठराव संमत केला.

याबाबतची स्पष्ट भूमिका सावरकरांनी ‘हिंदु राष्ट्रदर्शन’ या पुस्तकात मांडली आहे. ‘जीना यांच्या द्विराष्ट्रवादाच्या भूमिकेबद्दल मुळीच वाद नाही. किंबहुना या देशात हिंदु व मुस्लीम ही दोन राष्ट्रे पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. ही भूमी ज्यांची पित्रुभूमी आहे तेच या भूमीवर राज्य करतील. हिंदुंसोबत शीख, जैन व बौद्ध धर्मीयांव्यतिरिक्त अन्य धर्मीयांना स्थान नाही,’ अशी त्यांची भूमिका होती. गोळवलकरांनी तर इंग्रज देशातून गेल्यानंतर ‘मुस्लीम्स शुड लिव्ह इन इंडिया अ‍ॅट द स्वीट विल ऑफ हिंदुज,’ असे स्पष्टपणे बजावले होते.

मुस्लिमांना एक स्वतंत्र राष्ट्र द्या, ही जीनांची भूमिका होती, तर मुस्लिमांना वेगळे राष्ट्र देता येणार नाही. त्यांनी भारतातच राहावे, मात्र देशाची सत्ता हिंदुंकडे राहील आणि गोळवलकरांनी म्हटल्याप्रमाणे मुस्लिमांनी हिंदुंच्या इच्छेनुसार राहावे, ही सावरकरांची भूमिका होती. ही भूमिका कोणताही समाज मान्य करू शकला नसता. त्यामुळे देशाच्या फाळणीत जीनांबरोबर सावरकर, गोळवलकर आणि हिंदुत्ववादीसुद्धा समान वाटेकरी होते, हे मान्य करायलाच हवे.

– गिरीश नार्वेकर, मुंबई</p>

मुस्लिमांबाबत एकांगी मतप्रदर्शन

‘एकत्वाचा धर्म हे केवळ स्वप्नरंजन’ हे पत्र (२७ मे) वाचले. कुराण आदी मुस्लीम धर्मग्रंथांतील दाखले देत भारतीय मुस्लीम समाजाविरोधात नकारात्मक मांडणी करण्यात आली असून ‘गोळवलकर-सावरकरी’ प्रवृत्तीचा स्पष्ट प्रभाव दिसतो. मुस्लीम समाजाच्या रोजच्या संपर्कात वा सहवासात न आल्यामुळे किंबहुना, तसा संपर्क येऊ न देण्याची ‘खबरदारी’ घेतल्यामुळे, ही मांडणी अनेकदा डोळे झाकून स्वीकारलीदेखील जाते. प्रत्यक्षात कोणीही धर्मग्रंथ वाचून त्याप्रमाणे वागत नसते. आजचा हिंदु समाज मनुस्मृती वाचून त्यानुसार जगतो का? तेव्हा भारतातील मुस्लीम समाज हिंदुंशी संवाद आणि सहकार्य साधण्यास कदापि तयार होणार नाही, असा निष्कर्ष मुस्लीम धर्मग्रंथांचा दाखला देत काढणे, वास्तवाशी पूर्ण विसंगत आहे. पत्रकार/ लेखिका गझला वहाब यांच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘बॉर्न अ मुस्लीम, सम ट्रुथ्स अबाउट इस्लाम इन इंडिया’ या ग्रंथात तर हिंदु समाजाशी सौहार्दाचे संबंध स्थापू पाहणाऱ्या मुस्लिमांनाच अलीकडच्या धर्माध वातावरणामुळे कटू अनुभव कसे आले, याचे प्रत्यक्षदर्शी वर्णन आहे.

भारतातील इस्लाम हा जगातील इस्लामपेक्षा वेगळा कसा आहे, त्यावर येथल्या सहिष्णू आणि उदार हिंदु संस्कृतीचा मोठा प्रभाव कसा आहे, (म्हणूनच येथे सुफी संप्रदाय रुजला) हे अनेक लेखकांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. म्हणूनच परस्पर सहकार्य आणि संवादाची साक्ष देणारी संस्कृती निर्माण झाली. मुस्लीम राजांच्या पदरी असलेले हिंदु आणि हिंदु राजांच्या सैन्यात असलेले मुस्लीम हे याचेच प्रतीक. उस्ताद बिस्मिल्लाह खान यांनी काशी विश्वेश्वराच्या मंदिरात सनईवादन करणे, ही याचीच साक्ष! हा संवाद, पुन्हा अस्तित्वात येऊ शकतो. पण दोन्ही समाजांतील धर्माचे राजकारण करणारे हे यातील सर्वात मोठे अडथळे आहेत. ते स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहेत. पत्रात महात्मा गांधींबाबत सोयीच्या आणि निवडक संदर्भाचा आधार घेत एकांगी मते व्यक्त करण्यात आली आहेत. वास्तविक त्यांचे साधार आणि तर्कशुद्ध खंडन करणारे साहित्य उपलब्ध आहे.

– अनिल मुसळे, ठाणे