loksatta@expressindia.com

‘मारा आणि तारा!’ हा अग्रलेख (१५ एप्रिल) वाचला. एकंदरच आपल्याकडे फुकटेपणाची सवय हा आपला मूलभूत हक्क असल्याची जनतेची समजूत असल्याने अन् आपली सत्ता राखणे ही राजकारण्यांची गरज लक्षात घेता ही प्रवृत्ती देशाला दिवाळखोरीकडे नेणारी आहे. या जगात कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. त्यामुळे या खिशातून काढून त्या खिशात घातले जाते. पण लोकांची बेताची अर्थसाक्षरता लक्षात घेऊन दिल्लीत केजरीवालांनी पाणी व वीज फुकट वाटली व तोच प्रयोग आता पंजाबमध्ये राबवला जातोय. दिल्लीत हे धोरण राबवणे शक्य झाले कारण तेथे काही खाती केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने राज्य सरकारच्या काही जबाबदाऱ्या आपोआपच  कमी होतात. पंजाबही आकाराने लहानच आहे. पण तिथेही फुकट वाटप करताना ‘आप’ची खरी कसोटी लागणार आहे. कारण पाणी त्याच्या मूळ स्रोतापासून लाभार्थ्यांकडे जाताना वीज वापरावी लागते.

    आपली विजेची गरज व उपलब्धता याचे प्रमाण दिवसेंदिवस व्यस्त होत जाणार असून शेवटी प्रकरण हाताबाहेर गेले की खासगीकरण हा सध्याचा परवलीचा मंत्र राजकारण्यांच्या कामी येईल व जनतेसमोर महाग वीज खरीदणे हा एकच पर्याय शिल्लक राहील.

– डॉ. किरण गायतोंडे, चेंबूर, मुंबई

वैचारिक गोंधळ नाही कसा.. तो तर आहेच!

‘भारतीय संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृतीच !’ हा रवींद्र माधव साठे यांचा लेख (१५ एप्रिल) वाचला. साठे यांनी कोणताही वैचारिक गोंधळ नाही असे प्रतिपादन केले असले तरी त्यांच्या लेखात परस्परविरोध स्पष्टपणे दिसून येतो. एकीकडे हिंदुत्व ही सर्वसमावेशक संकल्पना असून त्यात सर्व धर्म, पंथ, उपासना पद्धती इत्यादी समाविष्ट आहेत असा युक्तिवाद करायचा व दुसरीकडे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सवर्णाच्या हृदयशून्यतेमुळे वैदिक धर्म सोडला याची वेदना आहेच’ असेही म्हणायचे यात विसंगती आहे.

  हिंदुत्व सर्वसमावेशक आहे तर आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला याबद्दल वेदना कशासाठी? तसेच मग धर्मातरविरोधी कायद्यांची गरजच का वाटते? वैदिक धर्म हा हिंदुत्वाचा एकमेव पाया आहे, हेसुद्धा योग्य नाही. मौर्यकाळात लोकायत हे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान लोकप्रिय होते व त्यामध्ये केवळ अनुमान अथवा तर्काने कुठल्याही सिद्धांताची सत्यता प्रस्थापित होत नसून ‘प्रत्यक्ष’ अनुभव अथवा निरीक्षणाने त्याची पडताळणी होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले होते. प्राचीन काळातील प्रसिद्ध वैज्ञानिक आर्यभट्ट हे या लोकायत विचारांचे होते. पुढील काळात ही विज्ञाननिष्ठा कुठे लुप्त झाली व केवळ वैदिक विचार, धार्मिक परंपरा व रूढींचा पगडा समाजमनावर का बसला याचाही विचार होणे आवश्यक आहे.

भारतात १९४७ पूर्वी राजकीय ऐक्य कधीही नव्हते. सिंध प्रांतावर महंमद बिन कासीमने आक्रमण केल्यावर बचावासाठी केरळ किंवा तमिळनाडूतून कोणीही गेले नाही. हिंदुत्वावर आधारित सांस्कृतिक ऐक्य होते तर असे कसे झाले? आज मात्र पुलवामा हल्ला झाल्यावर तमिळनाडूतील शूर वैमानिक काश्मीरमध्ये शत्रूशी लढतो, यातूनच योग्य बोध घ्यायला हवा. राष्ट्रउभारणी व राष्ट्रभावासाठी सांस्कृतिक ऐक्य नव्हे तर राजकीय ऐक्य गरजेचे आहे व त्यासाठी विविध समाजगटांत भावनिक ऐक्य असायला हवे. सामाजिक विविधतेचे रूपांतर बळजबरीने एकजिनसीपणात करणे हा यावरील उपाय नाही हे लक्षात घेतले तर या लेखातील वैचारिक गोंधळ स्पष्टपणे दिसून येईल.

– प्रमोद पाटील, नाशिक

ते स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे..

‘भारतीय संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृतीच !’ हा  लेख वाचला. हिंदुस्थानात उपासनेच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. तरीही प्रत्येक व्यक्ती स्वत:ला हिंदू म्हणवून घेत आहेत हे विधान निखालस खोटे आहे. कारण मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध हे हिंदूंचा कधीही भाग नव्हते आणि  नाहीत. हे पवित्र अज्ञान होय. केवळ भूत, प्रेत, दगडाची पूजा करणारे आणि  निसर्गनियमांविरुद्ध काहीही घडून येते यावर ज्यांचा विश्वास आहे तेच हिंदू म्हणवतात. बौद्ध धम्मात भूतप्रेत, पिशाच्च यांना मात्र थारा नाही, तसेच दगडाची ते कधीही पूजा करत नाहीत. बौद्ध धम्म हा पूर्णत: निरीश्वरवादी, अनात्मवादी आहे. अनादी काळापासून हिंदू धर्माने अनेक संप्रदायांना जन्म दिला हे विधान मात्र सत्य आहे कारण त्यामुळेच भारत हा देश अनेक जातीपातींत विभागला जाऊन छिन्नविच्छिन्न झालेला आहे.

‘भारतीय या शब्दाची कितीही ओढाताण केली तरी त्यातून हिंदूशिवाय कोणताच अर्थ निघत नाही’ असे लेखकाचे म्हणणे म्हणजे ओढूनताणून हिंदू धर्माचे उदात्तीकरण करणे होय. घटनाकारांनी ‘हिंदू कोड बिल’ असा शब्दप्रयोग केला म्हणून घटनाकारांना हिंदू धर्म मान्य होता असे गृहीतक चुकीचे आहे. वास्तविक घटनाकारांनी हिंदू धर्मात सुधारणा करण्याच्या हेतूने ‘हिंदू कोड बिल’ संसदेत मांडले. इस्लाम, ख्रिस्ती हे सगळे पंथ आहेत असे लेखकाचे म्हणणे निर्थक आणि निराधार आहे. हिंदू धर्मामुळे येथील मुसलमान कुराण वाचू शकतात, ख्रिश्चन बायबलचे पठण करू शकतात, असे लेखकाचे म्हणणे आहे. वास्तविक हे स्वातंत्र्य हिंदू धर्माने दिलेले नसून संविधानाने दिलेले स्वातंत्र्य आहे. लेखकाच्या मते मध्यंतरीच्या  काळात आपल्या समाजव्यवस्थेत दोष निर्माण झालेत. परंतु हे दोष कोणत्या धर्माने समाजावर लादले, हे स्पष्ट केले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वैदिक धर्म सोडला हे विधानही चुकीचे आहे. कारण बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग केला आहे. एकंदरीत रवींद्र साठे यांनी हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याचा निष्फळ प्रयत्न केला आहे.

– श्रीराम बनसोड, नागपूर</p>

युक्तिवादात अग्नीदेखील थंड असू शकतो..

आजमितीस जगात ख्रिश्चन धर्मीयांची संख्या ३१ टक्के आहे. इस्लाम धर्मीयांची संख्या २५ टक्के, निधर्मी १५ टक्के आणि हिंदू १५ टक्के अशी आहे. या वास्तवाशी फारकत घेऊन हिंदू सगळय़ा धर्माचा संघ आहे आणि इस्लाम, ख्रिस्ती, यहुदी एवढेच काय मार्क्‍सवाद हे सगळे पंथ किंवा संप्रदाय आहेत असे म्हणणे (राष्ट्रभाव : भारतीय संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृतीच! ) कुठल्याही तर्कवादाला धरून नाही.

   प्रत्येक ‘भारतीय म्हणजे हिंदू’ या विधानाच्या  समर्थनासाठी ‘घटनाकारांनीसुद्धा संविधानात भारतीय शब्दाऐवजी ‘हिंदू कोड बिल’ असा शब्दप्रयोग केला आहे’ असे म्हणणे हास्यास्पद आहे. ११ एप्रिल १९४७ रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी प्रस्तावित केलेले हिंदू कोड बिल हे केवळ हिंदू धर्मीयांसाठी होते. हे बिल द्विभार्या प्रतिबंधक होते आणि त्यात नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी, मुलगा, मुलगी यांना बरोबरीने कायदेशीर हक्कदार मानणारे होते. या बिलाला जोरदार निदर्शने करून आरएसएस, हिंदू महासभा या कट्टरपंथीय हिंदूंनी विरोध केला. याला हिंदूंचा ‘धर्माविषयी मागासलेपणा’ म्हणावे की उदारमतवाद? जनतेच्या रोषाला घाबरून हे बिल तेव्हा बासनात गुंडाळले गेले आणि डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या कायदेमंत्रिपदाचा राजीनामा दिला, हे वास्तव आहे.

भारतीय संस्कृतीला बुद्ध, जैन, इस्लाम, ज्यू व ख्रिश्चन या सर्व धर्मानी समृद्ध केले आहे. भारतीय संगीत, तत्त्वज्ञान, स्थापत्य, पाककला इत्यादी याची साक्ष देतात. लवचीक युक्तिवादाने काहीही सिद्ध करता येते. अगदी ‘अग्नी थंड आहे’ हेसुद्धा, हेच खरे.

– प्रभा पुरोहित, जोगेश्वरी, मुंबई.

इतरांनीही हा कित्ता गिरवावा

‘उच्च न्यायालयाचा पुढाकार: दंडाच्या रकमेतून पुस्तक खरेदी’  ही ‘लोकसत्ता’मधील बातमी वाचली. सुनील सुक्रे व जी.ए. सानप हे न्यायमूर्ती द्वय अभिनंदनास पात्र आहेत. शिक्षेचा दंड वसूल करून खजिन्यात पडून राहण्यापेक्षा कारागृहातील ग्रंथालयात योग्य पुस्तक खरेदी करावी असा उत्कृष्ट पायंडा त्यांनी घालून दिला आहे. या पुस्तकांचा कैद्यांना वाचनासाठी उपयोग होऊ शकतो. बाकीच्या न्यायालयांनीही हाच कित्ता गिरवावा. 

– राम देशपांडे, नवी मुंबई</p>

शिक्षणाची आवड जोपासणे एवढाच उपयोग

‘ही नाही तर ती..’ या अग्रलेखात (१४ एप्रिल) सध्याची परिस्थिती अगदी चोख मांडली आहे. कुठल्याही अभ्यासक्रमाला व्यावहारिक दृष्टिकोन आणि अनुप्रयोग नसेल तर त्याचा आजच्या काळात काडीमात्र उपयोग नाही. कायद्याचे शिक्षण ऑनलाइन, एमसीक्यू (MCQ) पद्धतीने घेणारी युवा पिढी आपले भविष्य कुठे, कशात आहे याने त्रासलेली आहेत. कायदा शिकवणारे प्राध्यापक कधी न्यायालयात गेले नाहीत, ना न्यायालये (procedural practice) कायद्याच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात. मुंबई, पुणे इत्यादी वगळता इतर ठिकाणी तर परिस्थिती अगदी वाईट आहे. एकाच वेळी दोन पदव्या कोणत्या व्यवसायात उपयोगी पडू शकतात? एखाद्याला आवड आहे म्हणून दुसरा विषय शिकणे यापलीकडे त्याचा काही फायदा होईल असे वाटत नाही.

– अ‍ॅड. शोभिता अरुण जाधव, मुंबई

त्या पदव्यांचा फायदा फक्त शिक्षणसम्राटांना

‘ही नाही तर ती’ हे संपादकीय वाचले. एकाच वेळी दोन-दोन पदव्यांनी काय साध्य होणार, हा प्रश्न आहे. त्यापेक्षा शालेय शिक्षणात सुधार करून ते रोजगारमूलक केले असते तर बरे झाले असते. या पदव्या फक्त बेरोजगार पदवीधर तयार करतील. या पदवीधरांना त्या विषयाचे मूलभूत ज्ञान किती आहे, हा विषय वेगळा. दोन-दोन पदव्या घेताना आयुष्य व पैसा खर्च होणार हे मात्र नक्की. आणि याचा फायदा मात्र शिक्षणसम्राटांना होणार.

– प्रवीण सूर्यराव, भिवंडी